Wednesday, March 11, 2026

एक वाटी वरण

*एक वाटी वरण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*11 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*एक वाटी वरण!*

       *संध्याकाळी नवऱ्याला चहा देता  देता बायकोने नवऱ्याच्या वाढत्या पोटाकडे पाहिलं आणि खूप दिवसांपासून तिच्या मनात शिजत असलेला विषय शेवटी काढलाच… “अहो, ऐका ना!” “बोल.” “तुम्ही डायट वगैरे का करत नाही?” “म्हणजे??” “अहो, जरा तुमच्या पोटाचा घेर कुठे चाललाय त्याचा काही विचार? आणि ती शर्टची बटनं पहा, तुटतात की सुटतात अशी सारखी भीती वाटते मला.” अचानक झालेला अण्वस्त्र हल्ला सावधतेने परतून लावत नवरा म्हणाला, “आता तुझ्यासारखी चांगलंचुंगलं करून खाऊ घालणारी बायको म्हटल्यावर ढेरी वाढणारच ना?”*

 *पण बायकोने विषय पुढे रेटलाच, “हो! ते झालं तुमचं म्हणणं, पण ते बरं दिसतं का? इतर बायकांचे नवरे बघा कसे सडसडीत बांध्याचे आणि तुमच्या पोटाची चाललीय पृथ्वीगोलाबरोबर स्पर्धा! कुठे घेऊन जाणार आहात म्हणते मी एवढा सगळा डोलारा!?”*   

 *“अगं, वाढलेली ढेरी म्हणजे सुखी माणसाचं लक्षण असतं. आता त्या वाळकुट्या माणसांचे पोट वाढत नाही त्याला आम्ही काय करणार? ढेरीवरून हात फिरवण्याचं समाधान आणि आत्मानंद आहे का त्यांच्या नशिबात? जळतात मेले आमच्यासारख्यांवर!”*

 *“ते बाकी मला काही माहीत नाही. उद्यापासून तुम्ही डायटवर! समजलं? सकाळी चहा-बिहा काही मिळणार नाही. बीट-काकडी-गाजराचा ज्यूस देते तुम्हाला. जेवण जरा कमी करत जा, आणि फिरायला जात जा सकाळ-संध्याकाळ दहा-पंधरा हजार पावलं! पंधरा दिवसात ढेरी कमी झाली पाहिजे. मी माझ्या मैत्रिणीशी पैज लावलीय- नवऱ्याची ढेरी कमी करून दाखवते म्हणून!”*

*नवरा जागेवर उडालाच. “ऑं? अगं काय हे? बावळट झाली का तू?” “नाही! त्यातसुद्धा स्वार्थच आहे माझा. जर या निमित्ताने माझा नवरा हिरोसारखा दिसायला लागला, तर नको आहे का आपल्याला, म्हणजे मला??” “अगं माणूस कर्माने हिरो बनतो, दिसण्याने नाही! आता तू बारीक किडकिडीत आहेस म्हणून मीही तसंच व्हावं यात कोणतं आलं लॉजिक आणि शहाणपण?” “अहो, लग्नाच्या वेळेस होतात का तुम्ही असे? तेव्हा तर काडीसारखे होतात अगदी. आता झालात बटाटा घातलेल्या वड्यासारखे! लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसायला पाहिजे की नको..?” “जा मग! शोध दुसरा बारीक आणि किडकिडीत काडीसारखा नवरा..!” “दुसरा कशाला? मी माझा जो आहे त्यालाच बारीक करून दाखवणार!” “अगं पण अधूनमधून थोडं-थोडं खाल्ल्याशिवाय राहवत नाही मला. भूक लागते!” “ही भूकच मारायची आहे मला. सदानकदा खायला मागता. बरणीत हात घालून शेंगदाणे घेऊन पळता. हद्द झाली बाई या खाण्याची!”*

 *“ऐक ना, आपण आज मस्तपैकी चिकन बिर्याणीचा बेत करूयात, ओके?  मी घेऊन येतो हवं तर अर्धा किलो.’’ बायकोने थेट सिक्सरच मारला, “ओ चिकनवाले..., आता हे जिभेचे चोचले किमान पंधरा दिवस बंद!” “म्हणजे??” “म्हंजे वाघाचे पंजे! आजपासून संध्याकाळी तुम्हाला फक्त एक वाटीभर वरण देणार आहे मी प्यायला!” “देवा देवा! मेलो!! अगं कोणी घातलं तुझ्या डोक्यात हे भूत?” “त्या दिवशी ते तुमचे कोण मित्र आले नव्हते का आपल्या घरी जेवायला? तेच सांगून गेले जाताना. म्हणाले, ताई तुमच्या मिस्टरांची ढेरी कमी करायची असेल तर यांना संध्याकाळी फक्त एक वाटीभर वरण देत जा!” “अस्सं का...! नवरा निश्चयाच्या सुरात म्हणाला, “आता येऊ दे पुढच्या वेळी त्यांना. नाही चहाऐवजी वाटीभर मुगाचं वरण प्यायला दिलं तर नाव नाही सांगणार!!”* 
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, March 5, 2026

अनुभवाच्या पलीकडले

*अनुभवाच्या पलीकडले !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अनुभवाच्या पलीकडले*

*निसर्गाने माणसाला अभिव्यक्त होण्याची क्षमता दिली आहे. हे त्याने त्याच्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत.*

 *मिळणाऱ्या उण्यापुऱ्या सत्तर-ऐंशी वर्षाच्या जगण्यात माणूस इतकं पाहतो, सोसतो, अनुभवतो की ते इतरांसमोर मांडल्याशिवाय त्याला राहवत नाही. बोलकी माणसं भडभड बोलून, रागावून, प्रसंगी दोन शिव्या देऊन, दोन कानाखाली देऊन-घेऊन का होईना, पण ‘मोकळी’ होतात. पण सगळीच माणसं बोलकी थोडीच असतात? काही अबोल असतात, काही अबोल राहतात. स्वतःसोबत स्वतःचा हिमनग घेऊन फिरतात. एखाद्या कलेचं बोट धरून स्वतःचं अव्यक्त सांगणं सांगत राहतात, आणि लोक असे, की त्याकडे मनोरंजन म्हणून पाहतात!*

 *खरं तर जगात कला आणि कलाकार आहेत म्हणून माणसे जिवंत आहेत. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर मारलेला एक फटकारा ‘त्याने का मारला होता’ हे तो हे जग सोडून जातो तरीही लोकांना समजत नाही. एखाद्या गायकाने अचानक घेतलेली ताण ही खरे तर अगोदर त्याच्याच काळजातल्या वेदनेचा ठाव घेते, पण लोक त्यांच्या परीने याचा अर्थ लावतात, आणि ‘वाहवा!’ म्हणतात! एखादी स्त्री प्रख्यात लेखिका असेल, तिच्या लिखाणाचे लाखो चाहते असतील; परंतु तिने प्रत्यक्षात काय भोगले होते हे कदाचित तिच्या लिखाणात कधीही येणार नाही; ती ते येऊ देणार नाही. आले तरी लोकांना ते कळणार नाही, कारण लोक फक्त तिने गोलगोल फिरवलेल्या शब्दांची जादू पाहतील, तिच्या त्यावेळच्या मनस्थितीचा कयास लावू शकणार नाहीत. एखादा कवी हजारो कविता लिहील; परंतु ज्या एका दुःखामुळे तो प्रचंड कोलमडून पडला होता, ते दुःख त्याच्या कवितेत कदाचित कधीही येणार नाही. कदाचित म्हणूनच कलाकाराची कला आपण कैकदा पाहतो; पण त्यामागचा माणूस आपल्याला क्वचितच दिसतो!*

*शहाणी, समजदार माणसं दुनियेला जे हवं आहे ते ते पुढे ठेवत जातात. जे दुनियेला नको आहे, परंतु आपल्याकडे भरपूर आहे, ते जाणीवपूर्वक आपल्याकडेच ठेवत जातात. ही सुद्धा एक कलाच आहे. या अर्थाने जर प्रत्येक माणसाला आणि विशेष करून दुनियेतल्या समस्त कलाकारांना उकलून पाहिलं, तर आपल्या डोळ्यांना झेपवणार नाहीत असे दुःखाचे असंख्य निद्रिस्त झरे आपल्याला दिसतील. परंतु आपण तरी त्याचं काय करणार? आपल्या अश्रुंचे आणखी दोन थेंब त्यात टाकल्यामुळे ते प्रवाहीत थोडेच होणार आहेत? त्यामुळे ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे राहू द्यावं. आताच्या या घडीला तो माणूस ‘जसा आहे तसा’ त्याला स्वीकारावं. त्याने स्वतःहून काही सांगितलं तर गुमान ऐकावं, त्याला रिक्त होऊ द्यावं; विसरून जावं. त्याला सल्ले देऊ नयेत. शांत झालेलं पाणी पुन्हा ढवळून गढूळ करू नये. अशा वेळी त्याला मनातल्या मनात फक्त इतकंच म्हणावं,*

*_कुठून तू आणलास संयम, शिकव मला_*
*_तुझ्यापुढे मी उजाड पत्थर, घडव मला!_*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...