Wednesday, November 26, 2025

संघर्षाचे प्रवासी


*संघर्षाचे प्रवासी*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*संघर्षाचे प्रवासी*

     *काही माणसं अनंत काळच्या संघर्षाचे प्रवासी असतात. त्यांच्या पाचवीलाच त्यांच्या कपाळावर सटवीने संघर्षाची अशी काही अक्षरं लिहिलेली असतात, की लहानपणापासून त्यांच्या वाट्याला जो संघर्ष येतो, तो आयुष्यभर सुरूच राहतो. नियती एकेक फासा टाकत राहते. ही माणसं त्यातून स्वतःची सुटका करून घेत राहतात. पण एकातून बाहेर पडेपर्यंत नवा फासा तयारच असतो. पहिला गुंता सोडवता सोडवताच दमछाक झालेली माणसं पुन्हा दुसऱ्या गुंत्यात अडकतात. हातपाय मारतात, पाय कसातरी मोकळा करतात. पण नियती पुन्हा नव्या फाशाच्या तयारीत असते.*

 *किती कस लागत असेल अशा वेळी या माणसांचा? काय म्हणत असेल त्यांचा जीव? कशी लढत असतील ही माणसं?*

      *खरं तर सतत लढतं राहण्यासाठी फार मोठी हिंमत लागते, ती या लढणाऱ्या लोकांकडे असते. फार मोठी किंमत मोजावी लागते; ही माणसं ती किंमत मोजतात. या संघर्षाच्या काळात कितीतरी गोष्टी हातून निसटून जातात. त्यांच्यावर हसऱ्या चेहऱ्याने पाणी सोडावे लागते. ही लढणारी माणसं तेही करतात. लोकांना त्यांचं  फक्त यशस्वी होणं दिसतं परंतु त्यांचा त्याग दिसत नाही. कारण आनंदाच्या काळात आपल्यासाठी टाळ्या वाजवणारी माणसं दुखाच्या काळात लपून बसलेली असतात. ज्याची लढाई त्यालाच लढायची असते. कधी कधी तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा मदत करत नाही. तोही म्हणतो की तुझी समस्या इतकी अवघड आहे की ती मी सुद्धा सोडवू शकत नाही. ती फक्त तू स्वतःच सोडवू शकतोस! आणि ही लढवय्यी माणसं अशा वेळेला प्रत्यक्ष परमेश्वरालाही वेळेवर मदत न करण्याबद्दल माफ करतात! हार न मानता लढत राहतात. संकटांवर तुटून पडतात. एक वेळ अशी येते की संकटसुद्धा त्यांना घाबरू लागतं. फार कणखर बनतात अशाने माणसं. पण प्रत्येकालाच इतकं कणखर कसं होता येईल?*

 *कधीकाळी पहाडासारखी धिप्पाड असलेली बरीच माणसं दिवसागणिक आतुन पोखरली जातात. नंतर शरीराच्या आडून फक्त सापळा शिल्लक राहतो, आणि त्यावर डकवलेली निस्तेज चेहऱ्याची माणसं! सगळं काही अलबेल असलेल्या माणसांना ही माणसं दुर्बल वाटतात; पण तसं नसतं. एका खूप मोठ्या लढाईचे ते एकांडे शिलेदार असतात.*

    *खरं जीवन अशी जिद्दी माणसं जगतात, बाकीची फक्त जिवंत राहतात. देवाने पृथ्वीवर पाठवलं म्हणून यायचं, ठेवलं तोपर्यंत राहायचं, बोलावलं की जायचं! या जगण्याला काही अर्थ आहे का? पेक्षा देवा तू मला पृथ्वीवर पाठवलंस, धन्यवाद. तुला मुद्दा माझ्या जगण्यात आडकाठी निर्माण करायची आहे? कर. माझी परीक्षा पहायची आहे? पहा. मी लढतो की नाही बघायचं आहे? बघ. असं म्हणत देवाने घेतलेल्या परीक्षेला जिद्दीने सामोरे जाणारी माणसं हीच खरी माणसं. बाकीची नुसती मिळमिळीत. अशी माणसं काय कामाची?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Thursday, November 20, 2025

तिचं असणं


*तिचं असणं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*तिचं असणं* 

*जगात खऱ्या जाती दोनच. स्त्री आणि पुरूष. तसं बघितलं तर स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक संयमी, सहनशील, विचारी आणि धाडसीसुद्धा. त्याग स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. आपण केवळ आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणला तरी या विधानाची खात्री पटते.*

 *अशा या सर्वगुणसंपन्न स्त्रीला बरोबरीचा दर्जा देत राहिलो तर आपलं वर्चस्वच संपुष्टात येईल असला अहंकारी विचार पुरूषजातीत केव्हातरी आला आणि त्यांनी स्त्रियांना कमी लेखायला सुरुवात केली. काही स्वार्थी माणसं काळालाच कसं अघोरी वळण लावतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण.*

   *स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजाने त्यांच्या पायाला दोर बांधला परंतु स्त्रियांनी त्यांचीच पैंजणं केली. त्यांनी दोन चांगले शब्द ऐकू नयेत म्हणून त्यांच्या कानांना छिद्र पाडली; तर त्यांनी त्या कानांनाच डूल अडकवून त्यांचं सुंदर आभूषण बनवलं. त्यांना चांगला सुगंध घेता येऊ नये म्हणून समाजाने त्यांच्या नाकाला छिद्र पाडलं; स्त्रियांनी त्याच्यामध्ये नथ अडकवली आणि आणखी सुंदर बनल्या. त्यांनी कुरूप दिसावं म्हणून समाजाने त्यांचं कपाळ गोंदून विद्रूप केलं; परंतु स्त्रियांनी त्यावर सुरेख कुंकू रेखून त्या आणखी सुंदर झाल्या. शेवटी माणूस हरला, पण स्त्रिया हरल्या नाहीत. उलट जेव्हा जेव्हा माणूस हतबल झाला, हवालदिल झाला, तेव्हा तेव्हा स्त्रियांनीच त्याला प्रेरणा दिली, प्रेम दिलं, आधार दिला आहे.*

*आजही स्त्री घरी राहणारी असो, की कमावती असो, कुटुंबाचा आधारच आहे. मुलं शाळेतून परतली की अगोदर आईकडे धाव घेतात. नवरा थकून-भागून घरी आला की बायकोलाच हक्काने चहा ठेवायला सांगतो. तीही आवडीने बनवते. कमावत्या स्त्रीचा पगार झाला की ती कुटुंबासाठी काय करता येईल याचाच अगोदर विचार करते.*

*कित्येक कमावत्या स्त्रियांच्या पगारावर थेट नवरे हक्क सांगतात. त्या स्वतःच्याच पगारातून मनासारखा खर्चही करू शकत नाहीत, घरी राहणाऱ्या असतील तर नवऱ्याचे पैसे हक्काने हवे तेव्हा हवे तसे वापरू शकत नाहीत; तरीही त्यांचं प्रेम तसूभरही कमी होत नाही. कारण त्यांच्यात उपजत असलेली ममता, प्रेम, जिव्हाळा! या मायेपोटी त्या एकवेळ स्वतःकडे दुर्लक्ष करतील पण कुटुंबाचं अगोदर पाहतील. त्यांच्या तब्येतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी त्या उठसुठ मांडत बसत नाहीत; मांडल्या तरी बऱ्याचदा त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. काढू नये, पण तरीही त्या आजही अंगावर आजारपण काढतात. पण कधीकधी हे अंगावर काढलेलं दुखणंच त्यांच्या जीवावर बेततं तेव्हा सगळं कुटुंबच हादरून जातं! कारण स्त्री आहे, तर घर आहे. एका विशिष्ट वयानंतर स्त्री एकटी जगू शकते; पुरूष नाही! प्रसंगी आभाळाएवढ्या उंचीचा धिप्पाड कर्तृत्त्वसम्राट माणूसही बायकोच्या किंवा आईच्या कुशीत ढसाढसा रडतो. म्हणून कुटुंबात स्त्री असली पाहिजे, आनंदाने जगली पाहिजे, आणि कुटुंबातील प्रत्येकाने तिला जीवापाड जपलं पाहिजे!*  

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Thursday, November 13, 2025

शांततेचा आवाज

*शांततेचा आवाज*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*शांततेचा आवाज*

 *पहाटेच्या किंवा रात्रीच्या नीरव शांततेचा आवाज तुम्ही कधी ऐकलाय का? भिंतीवरच्या घडयाळाच्या सेकंद काट्याचा आवाज कधी ऐकलाय? स्वतःच्या हृदयाच्या तालबंद ठोक्यांचा आवाज तुम्ही कधी ऐकलाय? ऐकला असेल तर तुम्ही शांततेचे पाठीराखे आहात!*

 *तसं हे जगच अखंड शांततेचं पाठीराखं आहे. ब्रह्मांडात स्वैर विहार करणाऱ्या स्वयंभू ध्वनिव्यतिरिक्त या जगात दुसरं काहीही असू नये इतकं हे जग शांतताप्रिय आहे. परंतु पृथ्वीच्या पाठीवर सृष्टीची निर्मिती झाली आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांना अधिकच्या ध्वनींची साथ मिळाली. मग वाहत्या हवेचा, जलाचा, निसर्गातील प्रत्येक घटकाचा ध्वनी निनादू लागला. पशुपक्ष्यांच्या मंजुळ ध्वनींपर्यंत हे ठीक होतं, परंतु कुठल्याशा मुहूर्ताला, कुठल्याशा शैवालापासून, कुठल्याशा एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली म्हणे, आणि त्याची स्थित्यंतरे होत होत माणूस नावाचा प्राणी जन्माला आला. मातेच्या उदरात असेपर्यंत तो ही शांतच होता; पण त्याने बाहेर येतानाच पहिला 'ट्याहाss' केला, आणि निसर्गदेवतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 'हा नवा जीव आपल्या सात्विक शांततेला गोंगाटाचं बोट लावणार!' माणसानेही ती शंका खरी ठरवली.*

 *निसर्गाच्या, पशुपक्ष्यांच्या ध्वनीची नक्कल करून माणसाने नरड्यातून जाडाभरडा आवाज काढला!  एकमेकांच्या आवाजाचीही नक्कल केली आणि तिला चक्क भाषा असं गोंडस नाव दिलं. दोन माणसांना एकमेकांची आवाजी भाषा कधीच समजायला नको होती. ती समजली नसती तर निसर्गात जास्तीत जास्त आणखी एका आवाजाची भर पडली असती; पण शांततेला गालबोट लागलं नसतं! माणसं एकमेकांशी बोलली, एकमेकांच्या चित्रविचित्र भाषा एकमेकांना ऐकवल्या, संवादाच्या नावाखाली आणखी लोकांना एकत्र आणलं, वेगवेगळ्या अचाट कल्पना लढवल्या, प्रत्यक्षात आणल्या, आणि शांततेला छळायला सुरुवात केली.*

 *नवनिर्मितीच्या नावाखाली माणसाने वस्तू बनवल्या. त्या एकमेकांवर आदळून त्यांचा गोंगाट केला. यंत्रं बनवली. कर्कश्यतेची परिसीमा गाठली. निसर्गाच्या संगीतात छेडछाड करून त्याने स्वतःची तथाकथित मंजुळ वाद्ये बनवली. त्याच्या येणाऱ्या वारसदारांनी त्यांच्यातही सगळा कर्णकर्कश्य गोंगाट घुसवला! सुधारणेच्या नावाखाली माणसाने जे जे केलं ते प्रत्येक पाऊल निसर्गाला आणि त्याच्या स्वयंभू शांततेला गालबोट लावणारंच ठरलं. शेवटी व्हायचं तेच झालं. अतिची माती होणारच.*

 *आता माणसाला उशिरा शहाणपण आलंय. आता त्याला गोंगाट सहन होत नाही. डीजे ऐकून त्याचे कान फाटू लागलेयत, हृदय बंद पडू लागलंय. घरात टीव्हीचा दणादणाट आणि भांडणाचा कलकलाट ऐकून त्याचा दिवस खराब होऊ लागलाय. स्वतःचा स्वतःशी होणारा संवाद हरवलाय. मोबाईल नावाचं कर्णपिशाच्च त्याच्या 'कान'गुटीवर बसलंय. हेडफोनच्या नावाखाली अगदी कानात घुसून गोंगाट करू लागलंय. पैसे कमवून देणाऱ्या महाकाय यंत्रांसमोर दिवसभर काम करून माणसाचे कान बधिर झालेयत. आता त्याला पुन्हा शांतता हवी आहे! हे म्हणजे अवघड झालं. निसर्गाने बहाल केलेली सर्वांगसुंदर शांतता भंग करून आयुष्याची वाट लागण्याची चिन्हे दिसू लागल्यावर पुन्हा त्याच शांततेचा धावा करणं म्हणजे पुण्याहून पुणतांबं करण्यासारखंच नाही काय?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, November 5, 2025

तिसरी बाजू

*तिसरी बाजू*
_एक मुद्दा, एक विचार!_
_5 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*तिसरी बाजू*

  *महाभारतात एक प्रसंग आहे. पितामह भीष्म अंगराज कर्णाचा आणि त्याच्या युद्धक्षमतेचा इतका अपमान करतात की रागाने लालबुंद झालेला कर्ण म्हणतो, "जोपर्यंत हा थेरडा जिवंत आहे तोपर्यंत मी धनुष्याला बाण लावणार नाही!" आणि खरोखरच भीष्म धारातीर्थी पडेपर्यंत कर्ण युद्धात उतरत नाही.*

*बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्म कर्णाला भेटण्याची इच्छा प्रकट करतात. कर्ण जरासा चरफडतच त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा भीष्म म्हणतात, "मला तुझ्या युद्ध कौशल्यावर कधीही संशय नव्हता, नाही. उलट माझं तुझ्यावर निरातिशय प्रेमच आहे, परंतु कुंतीचा प्रथम पुत्र असलेल्या तुझ्यासारख्या तेजस्वी हिऱ्याचा या घनघोर युद्धात हकनाक बळी जाऊ नये, तू सुरक्षित रहावास, म्हणून मी तुझ्याबद्दल कटू वचन काढले, जेणेकरून तू माझा राग-राग करून का होईना, परंतु युद्धापासून थोडा अलिप्त राहशील आणि महत्त्वाचं म्हणजे जिवंत राहशील. मी जे बोललो ते तुझ्या हितासाठीच बोललो. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मृत्यू शय्येवर कोणीही खोटं बोलत नाही." हे सर्व ऐकून कर्णाचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याने भीष्मराजांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला.*

 *या ठिकाणी भीष्मांनी कर्णाचा केलेला अपमान, त्याची लगोलग आलेली प्रतिक्रिया, आणि घटनेमागची सत्यता, अशा तीन बाजू आहेत. माझी बाजू, तुझी बाजू आणि तिसरी बाजू.*

*प्रत्येक घटना प्रसंगाला अशा तीन बाजू असतात. आपल्यापैकी किती जण तिसऱ्या बाजूने विचार करतात? फक्त 'समोरचा काय बोलला? 'मी काय बोललो?' या दोनच बाजूंवर बहुतांश जण कितीतरी दिवस खल करत राहतात आणि विषय कुठल्या कुठे घेऊन जातात. याने विषय ताणला जातो. नातेसंबंध बिघडतात. होऊ शकणारं काम राहून जातं.*

*'तिसरी बाजू असू शकते आणि आपण त्यावर विचार केला पाहिजे’ एवढी समज आपल्याला बऱ्याचदा राहत नाही. ही समज अनुभवाने येते. संयमाने येते. आयुष्यातील चढउतार पाहिल्यावर येते. ज्याने आयुष्याची बरीवाईट चव चाखली आहे, ज्याने अपयश पचवलं आहे तो माणूस कधीही लगेचच मत बनवत नाही. मध्ये थोडा वेळ-काळ जाऊ देतो. ‘समोरचा काय बोलला यापेक्षा तो असं ‘का’ बोलला’ यावर शांत मनाने विचार करतो. बऱ्याचदा त्याला त्यात त्याचं स्वतःचं हित सापडतं. म्हणून ‘या वादाची तिसरी बाजू काय असू शकते’ याचा वेळ हातून निसटून जाण्यापूर्वी एकदा तरी विचार केला पाहिजे. कारण एरवी माणसं चांगलीच असतात. रागात त्यांचा तोल जातो. पण शिटी झाली की कुकरचा कोंडमारा जसा बाहेर पडतो तसंच त्यांचं होतं. नाहीतर ही माणसंही आतून खूप हळवी असतात. अस्वस्थ असतात. हे आपल्याला कळलं की आपला तोल ढळत नाही, आणि हेच जगण्याचं मर्म आहे!* 

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...