Friday, May 8, 2026

आन, बान आणि शान

*आन, बान आणि शान*
_एक मुद्दा, एक विचार!_
*6 मे 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आन, बान आणि शान*

*तिन्ही सांजेची वेळ होती. हवेत छानसा गारवा होता. आई संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी चिरत बसली होती. बाहेर खेळायला गेलेला तिचा मुलगा घरी आला. घरावर फडकत असलेल्या झेंड्याकडे पाहून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. हातपाय धुवून झाल्यावर तो आईजवळ येऊन बसला आणि म्हणाला, "आई, आपल्या घरावर हा एवढा मोठा झेंडा का लावतो आपण?"*

 *"अरे हा झेंडा तर आपली आन बान आणि शान आहे!" मुलगा काहीतरी विचार करत म्हणाला, "आणि तो माझा एक मित्र, त्यांच्या घरावर तर वेगळा झेंडा असतो? इतकाच मोठा. तोही त्यांची आन, बान आणि शान आहे का?"  "असेल." "आणि त्या तिकडच्या गल्लीमध्ये तर मी वेगळ्याच रंगाचा आणखी एक झेंडा इतकाच मोठा पाहिला? त्यांचंही तसंच असेल का?" "असू शकतं." "आई, हे झेंड्याचे इतके सगळे प्रकार कशासाठी?" "कारण प्रत्येकाचा धर्म, जात, पंथ, भाषा, विचार वेगवेगळा आहे म्हणून. झेंडा आपली वेगळी ओळख निर्माण करतो." "म्हणजे वेगवेगळे झेंडे- वेगवेगळी माणसे. बरोबर?" "हो." "म्हणजे झेंडे माणसांना विभागण्याचं काम करतात का?" "गप्प बस. तुला त्यातलं काही कळत नाही." "म्हणून तर तुला विचारतोय ना?" "तुझ्या पप्पांना विचार." "ते म्हटले, झेंड्याबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही." "मग मला का विचारतोयस?" "कारण तू ऐकून घेतेस!"*

  *दोन मिनिटं शांततेत गेली. मुलगा पुन्हा सुरू झाला, "आई, ऐक ना..." "बोल." "हा झेंडा लावल्यावर काय होतं?" "आपलं संरक्षण होतं. लोक आपल्याला वचकून राहतात. आपण कोण आहोत, आपल्या मागे कोण आहे, आणि आपण काय करू शकतो हे जगाला समजतं. मग लोक आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत." "आई, झेंडा नसल्यावर लोक एकमेकांकडे वाकडया नजरेने बघतात का?" ”तसं नाही, पण कमजोर समजतात. झेंडा असला की आपल्याला ताकतवान समजतात." "मग गावातील प्रत्येक घरावर लोक झेंडा का लावत नाहीत?" "त्यांना तशी गरज वाटत नाही." "मग आपल्याला का वाटते?" "कारण आपल्याला आपल्या धर्माचा आणि झेंड्याचा अभिमान आहे." "म्हणजे जे झेंडा लावत नाहीत त्यांना तसा अभिमान नाही का?" "ते तू त्यांना जाऊन विचार."*

 *"आई ज्यांच्या घरावर झेंडा नाही त्यांना जर धर्माचा अभिमान नसेल तर त्यांना जगण्याचाही अधिकार नाही का?"  "तसं नाही, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण झेंडा लावला की जगण्यात आणि वागण्यात जरा ऐट येते, जरब येते, रुबाब येतो." "आई मी शाळेत जाताना त्या झोपडपट्टीमध्ये एक मोठा झेंडा पाहिला, पण तिथली लोकं तर खूप गरीबीचं आणि हालाखीचं जीवन जगतात. ना ऐट, ना रुबाब. मग ते कसं?" "तो झेंडा तिथे आहे म्हणूनच ती लोक तिथे राहू शकतात; नाहीतर त्यांना आतापर्यंत लोकांनी तिथून हाकलून दिलं असतं! झेंडा समूहाचं रक्षण करतो." "आई, सगळ्यांचा मिळून एकच झेंडा राहू शकत नाही का गं? म्हणजे सगळ्यांचं एकदाच रक्षण होईल?" "राहू शकतो ना. पण तो नेमका कोणाचा आणि कोणता हे कोण ठरवणार? प्रत्येकाला वाटतं, आपलाच झेंडा श्रेष्ठ." "आई, पण तिरंगा तर आपल्या सगळ्यांचा झेंडा आहे ना? मग हे सगळे इतर झेंडे बंद करून तो एकच का नाही लावत ज्यांना झेंडा लावायचा आहे त्यांच्या घरावर?" "मूर्ख आहेस का रे तू? निघ! अभ्यासाला जाऊन बस! म्हणे सगळ्यांचे झेंडे बंद करून एकच लावा!"*

 *मुलगा शांतपणे उठत म्हणाला, “म्हणजे तिरंगा फक्त शाळेतच सगळ्यांचा असतो तर!” भाजी चिरणारे आईचे हात आपोआप थांबले. त्याला उत्तर मात्र ती देऊ शकली नाही. तिच्याकडे ते नव्हतंच!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Friday, May 1, 2026

यंदा लग्नाचं काही बघताय का

*यंदा लग्नाचं काही बघताय का?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*29 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*यंदा लग्नाचं काही बघताय का?*

*लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणे… आता स्वर्ग कुणी प्रत्यक्ष जाऊन पाहिलाय का? नाही; पण त्या गाठी बांधायला देवाने त्याची काही खास माणसं मात्र पृथ्वीवर पाठवलेली आहेत एवढं मात्र नक्की. त्यांच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सुपारीचं खांडही फुटत नाही! असं म्हणतात की नवरदेव येतो नवरीसाठी, वऱ्हाड येतं जेवण्यासाठी! पण पुढचं आपल्याला सांगितलंच जात नाही, ते म्हणजे 'काही खास माणसं' येतात पुढचा नवरदेव-नवरी शोधण्यासाठी!*

*कोणतंही लग्न घ्या, त्यात 'लग्नाला आलेल्या' मुला-मुलींची माहिती काढणारी एक तरी दिव्य विभूती असतेच! मग ती स्त्री असो की पुरुष. शिवाय वयानेही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली; त्यामुळे इतरांना सांगण्याचा अधिकारही त्यांचा चिमुटभर जास्तच. शहरातल्या ‘वधुवरसूचक मंडळातले चाणक्य’ यांच्या बुद्धीपुढे लोटांगण घालतील! त्यांच्या वागण्यात एक रुबाब असतो, बोलण्यात एक ढब असते. “ती आत्ता गेली ती लाल ड्रेसवाली कोण? कोणाची मुलगी? कितवी शिकलेली आहे? काय करते? यंदा लग्नाचं काही बघतायत का? आपल्याकडे तीन चार स्थळं आहेत चांगली.” झालं! पाच मिनिटात मुलींचा डेटा फोटोसकट जमा! तर, “तो उंचसा सोफ्यावर बसलेला कोण हो? काय करतो? लग्न झालंय का त्याचं? पगार किती आहे? परमनंट आहे का? भाऊ बहिणी किती आहेत त्याला? क्षेत्र वगैरे किती आहे? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?” झाला डेटा जमा! पण दोन माणसांच्या खऱ्या स्वभावाचा ‘डेटा’ मात्र यांच्यापैकी कुणाकडेच नसतो बरं का! इकडची माहिती तिकडे पोहोचवून, तिकडची माहिती इकडे आणून, मध्यस्थी करून मंडळी अशी काही जादूची कांडी फिरवतील, की गोष्ट लग्नाच्या लाईनला आलीच पाहिजे. गुळुमूळू स्वभावाचं कुटुंब असलं तर ही माणसं त्यांना अक्षरशः कच्चं खातात. असल्या-नसलेल्या कोणत्याही चार गोष्टी सांगून पार्टीला बाटलीत उतरवतीलच!*

*मंडळी, लग्न कोणीही जुळवो, संसार सुखाचा होईलच याची गॅरंटी नाही. कारण स्थळ पाच मिनिटांत जुळतं हो, पण नातं? पाच वर्षांत काय कधीकधी आयुष्यभरातही ते जुळेलच याची खात्री नाही. लग्न जुळवणारी माणसं नाती जोडतात, पण ती टिकवण्याची जबाबदारी कोणाची? घरातल्यांची!*

*माणसं, मग ती कोणीही असो, तोंड सोडून बोलायला लागली, की संसाराला दृष्ट लागते. एकदा नात्यात फट पडायला लागली, की ती वाढतच जाते आणि तुटू नये, पण संसार तुटतो. अशावेळी शिव्याशापांचा पहिला धनी कोण होतो?“हे लग्न व्हावे ही ‘ज्यांची’ इच्छा!” होती तो किंवा ती! दोन्हीकडून बिचाऱ्यांना शिव्या खाव्या लागतात. म्हणजे कोळशाच्या दलालीत हात काळे करण्यासारखंच! तरी ही मंडळी त्यांचं काम थांबवत नाहीत. कारण, त्यांना अनुभवाने माहीत असतं, की जेव्हा एखादा हतबल बाप स्थळ शोधून थकतो, तेव्हा प्रत्येक घरात काळजीचा एकच प्रश्न कायम असतो- "बघा ना एखादं चांगलं स्थळ असेल तर!?"*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

शहरातले, गावाकडचे

*शहरातले, गावाकडचे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*22 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*शहरातले, गावाकडचे!*

*एका मोठ्या भावाच्या शहरातल्या घरी लहान भावाचा गावाकडचा पोरगा शिकायला आणला. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. मोठ्या भावाची मुलं आणि हा धाकट्याचा मुलगा यांच्यात काही वादावादी झाली, की मोठ्या भावाचा जीव तीळतीळ तुटायचा. नेमकी बाजू कोणाची घ्यावी हे त्याला काही कळायचं नाही. भावाच्या पोराची बाजू घेतली, की बायको त्याच्यावर डाफरायची. स्वतःच्या पोरांची बाजू घेतली की भावाचा पोरगा फोनवर सांगायचा, “मला मारतात! माझ्यावर मुद्दाम चिडतात!”*

 *मोठ्या भावाची कुचंबणा बिचाऱ्यालाच माहीत.*

 *एके दिवशी असाच कशावरून तरी खटका उडाला, आणि संध्याकाळची वेळ पाहून पोरगा घरातून गायब झाला!*

    *मोठा भाऊ कामाच्या वैतागातून घरी पोहोचलाच होता, की घरच्यांनी त्याच्या कानावर बातमी घातली. त्याचं डोकं बिथरलं. 'पोरांचं काहीतरी भांडण झालं होतं’ कळल्याबरोबर त्याने पहिल्यांदा आपल्या पोराच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि हातातली पिशवी टाकून स्वतः पोराला शोधायला निघाला. घरातली सगळी मंडळी कामाला लागली.*

 *सात-आठ वर्षाचा पोरगा कुठे गेला असावा कोणाला कळेना. अंधार पडायला लागला तसा यांच्या पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. पोरगा सापडला नाही, तर घरच्यांना काय तोंड द्यायचं? तेवढ्यात एकजण म्हणाला की गावाच्या बाहेर त्याला हायवेवर चालताना मी मगाशी बघितला! म्हणजे? हा मुलगा पायी गावाच्या दिशेने चालत गेला की काय? आणि जर रस्त्याने एखाद्या ट्रकमध्ये वगैरे जाऊन बसला, एखाद्या अनोळखी गाडीत बसून गेला, तर काय करायचं? पोराला शोधायला हायवेवर चार गाड्या गेल्या. दूरपर्यंत जाऊन त्यांनी फोन केला, “मुलगा इकडे कुठे दिसत नाही.” वातावरण गंभीर झालं. शोधून बिचारे थकून गेले.*

  *इकडे घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या एका देवळात एक आजोबा संध्याकाळी फेरफटका मारायला गेले आणि बाकड्यावर बसले. बाकड्याखाली त्यांच्या पायाला काहीतरी लागलं म्हणून खाली वाकून बघतात तर काय? खाली पोरगा बसलेला! त्यांनी त्याला बाहेर काढलं, व्यवस्थित विचारपूस केली, आणि विश्वासात घेऊन त्याला मोठ्या भावाच्या घरी घेऊन आले. त्याचा जीव भांड्यात पडला. रात्र गंभीर शांततेत सरली.*

 *सकाळी धाकट्याच्या मुलाची आंघोळ वगैरे झाल्यावर मोठ्या भावाने त्याला चारचाकी गाडीत टाकलं आणि शंभर दीडशे किलोमीटरवर असलेल्या थेट आपल्या गावी गाडी घेऊन आला. पोराला गाडीतून उतरवलं, त्याच्या बापाच्या स्वाधीन केलं आणि म्हणाला, “सांभाळ रे बाबा! शहरात इकडे मला माझा जीव जड झालाय, तिथे तुझ्या पोराचे नखरे झेलायला मला कुठे वेळ आहे? शिवाय कपाळावर एखाद्या वेळी कलंक लागला तर आयुष्यभर मिटायचा नाही!”*

   *म्हणून ज्यांची बाजू पडती आहे, त्यांनी पोरांना ‘तिकडच्या घरी कसं रहावं, कसं वागावं, आणि दुसऱ्याच्या पोटात शिरून त्याला कसं जिंकावं’ हे शिकवून ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्या घरी दुसऱ्यांची मुलं शिकायला आहेत त्यांनी, त्यांच्या मुलांनी, या मुलांना समजून घेऊन त्यांना मायेचा आधार दिला पाहिजे, म्हणजे ते शिकून पुढे गेलेलं मूल मरेपर्यंत उपकार विसरत नाही!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


भ्रमाचा भोपळा

*भ्रमाचा भोपळा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*8 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*भ्रमाचा भोपळा!*

  *माणसाची तीन बलस्थानं आहेत. माय, माती आणि मायबोली. ज्यांच्याकडे ह्या तीनही गोष्टी शाबूत आहेत ते नशिबवान! पण मायबाप आयुष्यभरासाठी थोडेच पुरतात? आपल्या आयुष्याचा गाडा योग्य वळणावर आणून सोडण्यापुरता त्यांचा प्रवास!*

  *माय म्हणजे नुसती माय नाही; तिच्यात बापही आला. ते दोघे एकच आहेत. बापाचं छत्र पोरांच्या डोक्यावरून लहानपणीच हरवलेलं असतानाही लेकरांच्या भल्यासाठी आयुष्यभर संकटाशी झुंजणारी माय म्हणजे धैर्याचा मर्द हिमालय! आणि बाप? बाप ही दुसरी मायच असते; शर्ट पॅन्ट घातलेली. मायच्या परोक्ष लेकरांची माय बनून त्यांचा सांभाळ करणारा बाप बघा. प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, काळजी तीच; फक्त शरीर वेगळं. पण आजकाल मायला 'माय म्हटलेलं चालत नाही. बापाला 'बाप म्हटलं तर राग येतो. शहरात जन्माला झालेल्या नव्या पिढीला आईवडिलांना 'मम्मा 'डॅडा म्हटलं की जास्त 'कुल आणि 'क्लोज वाटतं असा गोड भ्रम आहे.*

   *आपण सर्वजण मातीचे पुतळे आहोत. मातीतूनच आपल्याला प्रत्येकाला उगवून यायचं आहे आणि शेवटी माती बनून या मातीतच मिसळून जायचं आहे. आपला आदी आणि अंत मातीच तर आहे!*

*कधीकाळी माती सगळ्यांसाठी होती. लोक मातीला धरून राहत. माती कपाळाला लावली की आयुष्यभराची निष्ठा वाहत. पण जसे माणसाला हावरटपणाचे डोहाळे लागले, तो दुसऱ्यांच्याही वाट्याची माती हडप करू लागला. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने काही माणसं मातीवान झाली. जे बळी नव्हते त्यांचा बळीराजा झाला, आणि मातीमोल झाला. आज शहरात मातीच्या कणाला कोटीची किंमत येऊ लागली आहे. मोक्याच्या जागेवरच्या मातीसाठी माणसं एकमेकांचे मुडदे पाडू लागली आहेत. 'शेती इकायची नसती, राखायची असती', हे शहरालगतच्या कानपाड्या शेतकऱ्यांना ऐकू येईनासे झाले आहे. हातची शेती विकून गाडी, बंगला, शॉपिंग आणि इलेक्शनमध्ये पैसा घालवणाऱ्यांना भपक्यात सुख असल्याचा गोड भ्रम आहे.*

    *आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आपली माय आपल्याशी ज्या बोलीत बोलायची ती मंजुळ वाणी म्हणजे मायबोली! ते अमृत पिऊनच आपला भाषिक जीव पोसला. तिचे शब्द आपले झाले. आपण शाळेत पहिलं पाऊल टाकलं, आणि आपलं बोट पुस्तकांच्या हातात दिलं. पुस्तकांनी आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याच्या नावाखाली हळूहळू आपली मायबोली कधी आपल्यापासून काढून घेतली हे आपल्याला कळलंही नाही. आता पुस्तकी भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणतो आणि मायबोलीला गावंढळ! काँक्रीटचा कॅनॉल कधी खळखळ वाहणारा झरा होईल का? 'तुका म्हणे झरा, आहे मूळचाच खरा' पण आता झऱ्यालाच लोकं नाला म्हणून नावं ठेवू लागलीयत. इस्त्री आणि इन केलेल्या कपड्यांमध्ये मायबोली कोंबून इंग्रजी मिश्रित चमचमीत प्रमाणभाषा बोललं की आपला प्रभाव पडतो असा आजच्या नवभाषकांना भ्रम आहे! पण नारळाच्या पाण्याची सर मुन्शीपाल्टीच्या नळाच्या पाण्याला केव्हा यावी?*

 *मंडळी गोष्ट अशी आहे की हल्ली आपण स्पष्टयुगात नाही, तर भ्रष्टयुगात आणि भ्रमयुगात राहतो आहोत, म्हणून भ्रष्ट आणि भ्रमिष्ट झालो आहोत! झाडं तोडून विकासाच्या सावलीचं स्वप्न पाहत आहोत! हा निव्वळ भ्रमाचा भोपळा आहे. तो लवकर फुटो, माय, माती, मायबोली, आपली माणसं आणि आपल्याला पोसणारा निसर्ग यांना ओळखण्याची, जपण्याची सद्बुद्धी प्रत्येकाला लाभो इतकंच मागणं आहे!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...