◾
प्रश्न:
तुम्ही जर कवी असाल तर तुम्हाला तुमच्या सोडून इतर किती कवींच्या किती कविता पाठ आहेत?
- दहा, पंधरा, वीस, की पन्नास? की एकही नाही?
विचार करून झाला असेल तर पुढे चला. पुढील वाक्य वाचून तुम्हाला आश्चर्य वाटायला नको की, एक असाही कवी, साहित्यिक अवलिया आहे की त्याच्या स्वतःच्या आणि महाराष्ट्रभरातील कित्येक कवींच्या कवितांच्या ओळी शेकडोंनी तोंडपाठ आहेत! तुम्हाला तुमचीच एखादी कविता ऐकवून तुम्हाला तो कधी क्लीन बोल्ड करेल सांगता येणार नाही! तुम्हाला त्याची कविता माहीत नसेल, पण त्याला मात्र तुमची कविता तोंडपाठ असू शकते. एवढेच नव्हे, तो स्वतःच एकटा कवी झाला नाही, तर त्याने तो ज्यांना ज्यांना भेटला त्या सगळ्यांना कवितेचं वेड लावलं. नाशिक जिल्ह्यातले निम्मे कवी हे या एकट्या माणसाने प्रकाशात आणलेले आहेत!! तो सर्वांचा लाडका तर आहेच, परंतु पायाला भिंगरी बांधून गेली 40 वर्ष कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी तो अविरत झटतो आहे. खेडोपाड्यात कवितेची पाऊलवाट घेऊन जात असताना ऊन-वारा, थंडी-पाऊस याचा त्याने कधी विचार केला नाही. कवितेपायी भर पावसात नदीच्या पाण्यातून एम 80 गाडी लोटत आणणारा हा काव्यवेडा पठ्ठ्या आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक खेडोपाड्यांमध्ये त्याचा काव्य गोतावळा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तो प्रकाशित झालेल्या प्रत्येक पुस्तकावर वर्तमानपत्रातून सातत्याने लिहितो आहे. आज मी त्याच्याच पुस्तकावर लिहिणार आहे. Big hands for the one and only THE GREAT RAVINDRA MUKUNDRAO MALUNJKAR!
सूत्रसंचालनाचे विद्यापीठ म्हणून रवींद्र मालुंजकर हा एक स्वतंत्र अध्याय आहेत. मी आज फक्त त्यांच्या कवितेबद्दल बोलतो आहे.
तसं मालुंजकर चौफेर लिहितात, परंतु कविता ही थोडी अखीव, रेखीव,घोटीव असली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. कविता कोणाचीही असो ती ठेक्यात म्हणता आली की त्यांना आनंद होतो. म्हणून त्यांची कविताही तुम्ही सहज अष्टाक्षरी मध्ये किंवा कुठल्याही एका तालामध्ये बसवू शकता. लेकीसाठी लिहिलेल्या ह्या पुढील काही ओळी पहा,
लेक लाडकी सर्वांची
लेक साऊली घराची
तिच्या आगमने वाजे
रोज तुतारी सुखाची...
सोपे शब्द मोठा आशय हे मालुंजकरांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. लाडकी लेक सासरी जाताना तिच्या आईवडिलांची होणारी अवस्था त्यांनी किती सुंदर पकडली आहे पहा,
लेक चालली सासरी
कसे लपवावे आसू
किती वेळ दाखवावे
मुखावर खोटे हसू...
लेक चालली सासरी
झाल्या आठवणी गोळा
काळजात दाटलेला
भावभावनांचा मेळा...
आपली लेक सुखात राहिली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा बापाची असते. तिला भेटून येतानाची त्याची मन:स्थिती कवीने खालील शब्दांमध्ये खूप सुंदर रेखाटली आहे.
सुख लेकीचे पाहून
झाला आनंद बापाला
तिच्या घरून निघता
मनोमन सुखावला...
कालपर्यंत अंगणात बागडणारी आपली लेक सासरी कशी राहत असेल आठवणीने व्याकुळ बाप खालील ओळींमध्ये आपल्याला बघायला मिळतो.
आज कळतंय मला
'बापाचं बापपण'
लेकीच्या काळजीनं
झोपेचं सरपण
अधूनमधून जळल्यावर...!
कवी लोकांना कविता सुचते कशी? हा एक भाबडा प्रश्न अनेक अकवींना नेहमी पडत असतो. मालुंजकर या प्रश्नाचे उत्तर शोधताना म्हणतात,
देहगाभारा भेदून
येते कविता आतून
मनातल्या भावनांना
घेते शब्दांत गुंफून...
दुःख जगाचे पाहून
मला सुचते कविता
तान्हुल्याच्या हसण्यात
माझी दिसते कविता...
कविता लिहिणे म्हणजे केवळ 'वेळ जात नाही म्हणून काहीतरी खरडणे' असे नव्हे. कवितेची आणि पर्यायाने कवीची एक भूमिका असते. समाजासाठी कवी अप्रत्यक्षपणे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत असतो. आपल्या कविता लेखनाचं प्रयोजन काय आहे हे कवीने पुढील काही ओळींमध्ये खूप सुंदर सांगितलं आहे. कवी म्हणतो,
माझ्या कवितेने लाभो
दीनदुबळ्या उभारी
त्याच्या आकांक्षांनी घ्यावी
उंच गगनी भरारी...
माझ्या कवितेने द्यावा
घास चिमण पाखरा
येता पंखामध्ये बळ
व्हावा आभाळ आसरा...
या ओळी वाचल्यानंतर कोणाही काव्यरसिकाला या कविचं शब्दचित्र सहज रेखाटता येण्यासारखं आहे. समाजाच्या भल्यासाठी माझी कविता कामी येवो या भावनेमागे माऊलींचं पसायदानच आहे. मालुंजकरांच्या निरनिराळ्या कविता वाचताना त्यांचा हा स्थायीभाव आपल्याला पदोपदी जाणवल्याशिवाय राहत नाही. यंदाच्या पावसाने बळीराजाला हवालदिल करून सोडलं. त्यावर व्यक्त होताना कवी म्हणतो,
साऱ्या वावरात पाणी
आली घरालाही ओल
सारं सारं आवरता
जगायाचा गेला तोल...
दिसरात केले काम
नाही तुला आली दया
घास तोंडातला आता
तूच लागला ओढाया...
साक्षात निसर्गाशी भांडण्याची आणि शेतकऱ्याची बाजू मांडण्याची भूमिका इथे कवी घेताना दिसतो, त्याचबरोबर त्याच्या सुखासाठी याचनाही करतो,
त्याच्या पिकल्या पिकाला
नित्य मिळो रास्त भाव
समाधानाच्या ओव्यांनी
आनंदात न्हावो गाव...
त्याच्या जखमेवर शब्दमलम लावताना धीर देतो,
सुख आणि दुःख
येती नियमित
जगण्याची रीत
शिकविण्या
शिवाय छोट्या छोट्या गोष्टीतलाही आनंद माणसाने घ्यायला शिकलं पाहिजे हे सांगताना मालुंजकर म्हणतात,
अहो, जमेल तेवढं तुम्ही रुजून घ्या पाऊससरीत ओलंचिंब भिजून घ्या...
'अन्नदाता सुखी राहावा ही मनोभूमिका हे उदात्त माणुसकीचे लक्षण आहे. आणि हे लक्षण रवींद्र मालुंजकरांच्या कवितेमध्ये ठिकठिकाणी जाणवते. असं म्हणतात की 'आपल्या शब्दांना कृतीची आणि कृतीला शब्दांची जोड असली पाहिजे. मालुंजकरांना या दोन्ही गोष्टी साधल्या आहेत. त्यांच्या घराचे दरवाजे अतिथीसाठी सदैव खुले असतात. त्यांच्या घरी गेलेला कोणीही अतिथी विना आदरातिथ्याचा परतत नाही असा सर्वांचाच आजपर्यंतचा अनुभव आहे. कवीचा स्वभाव त्याच्या शब्दांमधून प्रतीत होत असतो. याचा सुंदर दाखला म्हणजे पुढील काही ओळी. ते म्हणतात,
हात बुडत्याला द्यावा
जपा मानवाचा धर्म
जगताना प्रामाणिक
ध्यानी ठेवा हेच वर्म...
कधी धरू नका इच्छा
मान-सन्मानाची मनी
व्हावे कार्यकर्तृत्वाने
जगी गौरवाचे धनी...
याचकाला देता काही
गाणे समृद्धीचे गावे
देता आधार कुणाला
मन आनंदून जावे...
हे औदार्य अंगी येण्यासाठी कवी एकटाच सुहृदयी असून चालत नाही, त्याची अर्धांगिनी ही त्याच्या सारखीच असेल तर त्याच्या वागण्या, बोलण्या, संसाराला खरी शोभा येते. त्यांनीच लिहून ठेवलेल्या या पुढील ओळी पहा.
उद्या तिचा वाढदिवस.
म्हणालो तिला...
'काय आणू तुला गिफ्ट... ?'
खळखळून हसत ती उत्तरली...
'कशाला हवंय दुसरं गिफ्ट,
तुझ्याएवढं सर्वांगसुंदर गिफ्ट असताना!'
ती बोलली सहज
आणि मिळाली
बायको समजदार असल्याची खूण..!
हे कुटुंब समजदार असण्याचं एक कारण म्हणजे ते पॅराशुटर्स नाहीयेत; ते ग्रासरूटर्स आहेत. ज्या परिस्थितीशी तोंड देऊन आई-वडिलांनी आपल्याला घडवलं, तिची त्यांना जाणीव आहे. ताई दादांच्या आठवणी मध्ये रमताना कवी म्हणतो,
आई आभाळ आभाळ
डोळा गच्च भरलेलं
सुखी ठेवण्या संसारा
सारं सारं रितं झालं...
आई माझी वा तुमची
नसे कधीही वेगळी
साऱ्या पोरांवर तिची
माया सारखी सगळी
वडिलांचे आयुष्य वर्तमानाशी सांधताना कवी नॉस्टेल्जिक होतो. कवीचं व्याकुळ मन प्रकर्षाने लिहितं होतं,
हाडं गोठवणाऱ्या थंडीत
जगण्याची लढाई लढण्यासाठी
सायकलला पॅडल मारणारं
कोणी पाहिलं की
दादा...तुमची आठवण येते!
मी वही मागितल्यावर
तुम्ही मोठ्या कसरतीने
बनवून द्यायचात माझ्यासाठी
जुन्या पानांची वही.
आज मुलांसाठी नवी वही आणताना
कुणाचा व्याकूळ चेहरा दिसला की दादा...तुमची आठवण येते!
कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमधली
ज्योत जागते रात्री
धगधगत्या स्वप्नांना असते
उजाडण्याची खात्री
या कवी राजेश्वर शेळके यांच्या ओळींचा प्रत्यय मालुंजकरांच्या खालील ओळींमधून येतो,
कंदिलाच्या इवल्या प्रकाशात
जमेल तसा केला अभ्यास
उज्ज्वल भविष्यासाठी जपला
काळजामधला प्रत्येक श्वास...
चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी शेवटी चांगला होतोच. मालुंजकरही तसेच झाले. स्वतः शिक्षक होऊन ज्ञानदानाचे काम करणारे रवींद्र मालुंजकर आपल्या शिक्षकांबद्दलची कृतज्ञता खालील ओळींमध्ये व्यक्त करतात,
गुरुजी....
आपणच चेतवला आमच्यात
विश्वासाचा लख्ख दिवा
आपणास मिळो दीर्घायुष्य
अन् आनंदाचा अक्षय ठेवा.
शेवटी, आयुष्य ज्याला म्हणतात ते तरी वेगळं काय आहे? कवी म्हणतो,
आयुष्य
म्हणजे
वाहते
पाणी....
सुख
दुःखाची
झुळझुळ
गाणी...!
आयुष्य
म्हणजे
हक्काचं
घर...
पाहुण्यांनी
जपावा
स्वतःचा
स्वर...!
आयुष्य
म्हणजे
प्रसन्न
फूल...
जपावं
सुंदर
आतलं
मूल...!
आयुष्य
म्हणजे
राबणारे
हात...
संकटांवर
द्यावी
हसत
मात...!
अशा सहज सुंदर अक्षरप्रतिभेचा हा शब्दप्रभू त्याच्या आयुष्यामध्येही एक गोड आणि सर्वांना हवाहवासा मित्र आहे. नाशिकचा साहित्यिक आणि सांस्कृतिक कोश रवींद्र मालुंजकर या नावाशिवाय अपूर्ण आहे, राहील. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'आठवांचे लक्ष मोती' या काव्यसंग्रहाच्या संदर्भाने मी त्यांच्या कवितांचं हे माझ्या परीने केलेलं रसग्रहण आहे. तुम्हाला हे रसग्रहण कसं वाटलं? नक्की कळवा. तुम्हाला त्यांच्या कविता वाचायच्या असतील, तर तुम्ही त्यांना त्यांच्या 9423090526 या क्रमांकावर कॉल करून संग्रह मागवू शकता. काही उणं अधिक लिहिलं गेलं असेल, टाईपो झाला असेल, व्याकरण चुकलं असेल,अशुद्धलेखन झालं असेल, तर ती माझी लेखन-उणीव आहे हे मान्य करतो.
काव्यसंग्रह : आठवांचे लक्ष मोती
कवी : रवींद्र मुकुंदराव मालुंजकर
वैशाली प्रकाशन पुणे
मुखपृष्ठ : अरविंद शेलार
पाठ राखण : ( ब्लर्ब )विवेक उगलमुगले
निर्मिती मूल्य: ₹150 केवळ.
रसग्रहण :
राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
चलभाष: 9423542224
No comments:
Post a Comment