◾
*बापाचे मालक नका होऊ*
_एक मुद्दा, एक विचार!_
_26 मार्च, बुधवार_
▪️
*बापाचे मालक नका होऊ*
*प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटीने आगार सोडलं आणि कंडक्टरसाहेब "तिकीट! तिकीट!" करत मोहिमेवर निघाले. निम्मी बस लाडक्या बहिणींनी आणि उरलेली ज्येष्ठांनी भरलेली असल्यामुळे दर्दी कमी आणि हाफ तिकीटवाली गर्दीच जास्त होती. त्यामुळे उत्पन्न वाढीचा प्रश्न नव्हताच. उलट कंडक्टरना पैशाची खणखण कमी आणि वाद घालणाऱ्या प्रवाशांची भनभन जास्त ऐकावी लागणार होती. तेही तशी तयारी करूनच आले होते.*
*अवाढव्य शरीरांच्या गर्दी आणि गोंगाटामधून आपला देह कसाबसा ओढून काढत कंडक्टर एकदाचे मागच्या प्रवाशांपर्यंत पोहोचले. एक गृहस्थ हातात पैसे धरून त्यांच्याकडेच पाहत होते. कंडक्टरची आणि त्यांची नजरानजर होताच त्यांनी पैसे त्यांच्या हातावर सोपवले आणि गावाचं नाव सांगितलं. अर्थातच हाफ तिकीट होतं. कंडक्टरनी पैसे मोजले तर भरले पंचावन्न रुपये. मधल्या काळात भाववाढ झालेली बाबांना माहीत नसावी म्हणून कंडक्टरनी त्यांना सांगितलं, "बाबा अजून पाच रुपये द्या." बाबा म्हणाले, "तिकीट पंचावन रुपये हाय ना?" कंडक्टर म्हणाले, "आहे नाही, होतं! आता पाच रुपये वाढले." बाबा म्हणाले, "कवा?" कंडक्टर म्हणाले, "कवा काय? मागच्याच हप्त्यात." बाबा म्हणाले, "पण माझं पोरगं तर म्हणलं पंचावनच रुपये लागतेत." "त्याला भाव वाढ झालेली माहीत नसेल. द्या पाच रुपये", कंडक्टर म्हणाले. बाबांचा चेहरा पडला. व्याकुळ नजरेने कंडक्टरकडे बघत म्हणाले, "त्यानी इतकेच दिलते." "काय? इतकेच पैसे देऊन तुम्हाला एसटीत बसवून दिलं??" "व्हय." "आणि परत यायला पैसे? रस्त्यात चहा पाण्याला लागले तर?" बाबांकडून उत्तर आलं नाही. पण त्यांचा हताश चेहरा बरंच काही सांगू पाहत होता. कंडक्टरसाहेबांचं डोकं गरगर करायला लागलं. डोळ्यासमोर त्यांच्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा उभा राहिला. समोरच्या बाबांच्या रूपाने त्यांचे वडील त्यांच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत होते. प्रश्न पाच रुपयांचा नव्हताच. त्यांनी बाबांना तिकीट दिलं पण त्यांच्या डोळ्यांत बघण्याची त्यांना हिंमत होईना. "इतकेच पैसे देऊन बापाला एसटीत बसवून दिलं??" प्रश्न वेताळाचं रूप घेऊन त्यांच्या मानगुटीवर बसला. प्रवास संपला. प्रवासी घरी गेले. प्रश्न कंडक्टरसोबत सहकुटुंब त्यांच्या घरी आला.*
*प्रवासाला निघालेल्या बापाच्या हातावर फक्त जाण्यापुरते हाफ तिकिटाचे पंचावन्न रुपये टेकवताना त्याच्या तरुण कर्त्या मुलाला काहीच वाटलं नसेल का? की मुलाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून बापालाच अधिक पैसे मागण्याची हिंमत झाली नसावी? की बाप तेही पैसे पोराला न सांगता दुसऱ्याकडून उसने घेऊन आला होता? की वडिलांनी अशा वृद्धापकाळात प्रवासाची दगदग करू नये म्हणून त्याने त्यांच्या काळजीपोटी खोटी कडकी दाखवली, जेणेकरून ते जाणार नाहीत, घरीच राहतील? की खरोखर आजकालच्या कमावत्या मुलांनी आई-वडिलांवर अशी लाचारीची वेळ आणली आहे ज्याची त्यांना बिलकुल जाणीव नाही? प्रश्नांचं मोहळ उठलं.*
*अस्वस्थ कंडक्टरनी दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर इतकंच लिहिलं, "हाती पैसे आले म्हणून मुलांनो, बापाचे मालक होऊ नका कधी!"*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224