Wednesday, June 26, 2024

मी खेड्यामधला मुलगा...

▪️

मी खेड्यामधला मुलगा,
कष्टातून शिक्षण घेतो 
मी अभ्यासातही रमतो
अन शेतावरही खपतो...

मी दूर मळ्यातून येतो
अंतरही बरेच आहे
कधी कंटाळाही येतो
हो, होही खरेच आहे.
 मग घरच्यांना आठवतो
अन् रस्ता छोटा करतो!
मी अभ्यासातही रमतो
अन शेतावरही खपतो......

वर ढगाळ दिसता काही
घरच्यांची धांदल उडते
बागाला औषधपाणी
देण्याची घाई उठते,
 मी फेकून देतो दप्तर,
अन् फवारणीला पळतो!
मी अभ्यासातही रमतो
अन शेतावरही खपतो...

शहरातून भाऊ येतो,
मी मनात माझ्या म्हणतो
जर मीही शहरी असतो,
तर सुंदर दिसलो असतो,
जेव्हा भानावर येतो 
मज समोर गोठा दिसतो !!
मी अभ्यासातही रमतो
अन शेतावरही खपतो...

'कष्टाची लाज कशाला?'
ही घरातल्यांची शिकवण
डोळयांना बघवत नाही
 त्यांचीही इतकी वणवण
 मग, शिकून मोठे होतु'
हा विचार पक्का ठरतो !
मी अभ्यासातही रमतो,
अन् शेतावरही खपतो !

मी शहरामधला मुलगा
मी घड्याळ पाहून जगतो
*मी अलार्म ऐकून उठतो*
*अन् घड्याळ पाहून निजतो!*

मी इंग्लीश मिडीयम आहे 
मी इंटरनॅशनल आहे 
मी डिसीप्लीन्ड विद्यार्थी
मी अप टू डेट ही आहे!
मॉर्निंगला स्कुलबस येते
मी विनाचहाचा पळतो!
*मी अलार्म ऐकून उठतो*
*अन् घड्याळ पाहून निजतो!*

माझ्या शिकण्याशी माझा
कसलाही कनेक्ट नाही
माझ्या स्वप्नांशी माझा
कुठलाही रिलेट नाही
मम्मी पपांची स्वप्ने...
बोजा माझ्यावर पडतो!
*मी अलार्म ऐकून उठतो*
*अन् घड्याळ पाहून निजतो!*

मी लवकर बाहेर पडतो
अन् उशीरा घरी परततो
दिवसभर शाळा करतो
मग ट्यूशनलाही जातो
मम्मी पप्पांना म्हणते,
मी फारच चिडचिड करतो!
*मी अलार्म ऐकून उठतो*
*अन् घड्याळ पाहून निजतो!*

गावाहून भाऊ येतो,
मी मनात माझ्या म्हणतो
जर मीही गावी असतो,
तर निवांत शिकलो असतो,
शेतावर फिरलो असतो,
पुस्तकांत रमलो असतो !!

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...