Thursday, February 6, 2025

सामान्य माणसं!



सामान्य माणसं!

ग्रहण कोणतंही असो 
सुटणारच असतं आज ना उद्या...
दैन्य कुणाचंही असो,
फिटणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं
ऐरण झाल्यावर सोसवत नाही
हातोडा झाल्यावर मारवत नाही 
आणि आपल्याला मात्र हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार??.. 

अडून पडलेलं प्रत्येक काम 
होणारच असतं आज ना उद्या... 
कष्टाप्रमाणे फळसुद्धा
मिळणारच असतं आज ना उद्या...
पण आपण पडलो सामान्य माणसं 
वाट पाहणं जमत नाही 
जीव कामात रमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

कणभर असो की मनभर असो 
दुःख काय थांबणार असतं?
ते ही निघून जाणारच असतं आज ना उद्या...
जीवघेण्या वेदनेमधून, 
शरीर मुक्त होणारच असतं आज ना उद्या
पण आपण पडलो सामान्य माणसं 
दुःखाला झेलण्याची हिंमत नाही 
भेटल्या सुखाची किंमत नाही 
आपल्याला फक्त हवं असतं 
सगळं काही मनासारखं!
काय करणार?

मनासारखंच घडणार असतं 
सगळं काही आज ना उद्या 
पदरात दानही पडणार असतं 
हवं तसंच आज ना उद्या
दारी तोरण सजणार असतं
अंगण गाणी म्हणणार असतं
पण आपण पडलो सामान्य माणसं 
मन ताब्यात राहत नाही 
स्वतःला आरशात पाहत नाही 
आणि तरीही आपल्याला हवं असतं 
सगळं काही मनासारखं !!

काय करणार!?
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...