Tuesday, April 20, 2021

इतके अवलंबुन राहुन चालेल कसे?

इतके अवलंबुन राहुन चालेल कसे?
सगळे इतरांवर टाकुन चालेल कसे?

कोण जवळचा आहे ते नंतर पाहू
गरजू जो, त्याला टाळुन चालेल कसे?

पूर्ण दिवाळे निघण्याची ही वेळ अता
अक्कल रस्त्यावर टाकुन चालेल कसे?

मालक असशिल... पण तसदी घे, ऊठ जरा
गल्ल्यावर फतकल मांडुन चालेल कसे?

डोक्याचे टक्कल झाकुन राहील म्हणुन
कंबरेचे लंगुट सोडुन चालेल कसे?

दुसऱ्यांचे करता करता मेलास गड्या
मित्रा, घरच्यांना विसरुन चालेल कसे?

कडु काळाची वेळ सभोती टपलेली
कळते तर, गाफिल राहुन चालेल कसे?

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Sunday, April 18, 2021

जरा अंधारल्यावर भोवती घोटाळतो मृत्यू

■जरा अंधारल्यावर भोवती घोटाळतो मृत्यू

जरा अंधारल्यावर भोवती घोटाळतो मृत्यू
फिरवतो हात मायेने, जणू गोंजारतो मृत्यू

जगूही देत नाही अन् मरूही देत नाही बघ
असा कुठल्या प्रकाराने मला सांभाळतो मृत्यू

कुणाच्या ऐन आनंदात पडते मीठ मृत्यूचे...
सुखाचे ताट खेचुन दुःख त्याला वाढतो मृत्यू

जगाला त्रासलेला जीव जेव्हा यायचे म्हणतो
उचलणे त्यास मुद्दामून वेडा टाळतो मृत्यू!

अताशा खातरीचा राहिला नाही दवाखाना
तिथे म्हणतात, गणवेशात फेऱ्या मारतो मृत्यू

जगाला वाटते केली असावी आत्महत्या पण
खरेतर खून झाल्याची कहाणी सांगतो मृत्यू!

बुवा, बाबा,नवस अंगार,साधू, संत अन् योगी
अशा प्रत्येक मध्यस्थास जागा दावतो मृत्यू

कळो प्रत्येक प्राण्याला जिवाचे मूल्य, यासाठी
घडीभर मार्ग श्वासाचा अचानक रोखतो मृत्यू!

जगायाची प्रबळ इच्छा यमाशी झुंजते तेव्हा
लढाई जिंकणाऱ्याला... सलामी ठोकतो मृत्यू!

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224


Saturday, April 17, 2021

दिखावा लागतो मित्रा दिखाव्याची गरज आहे

दिखावा लागतो मित्रा दिखाव्याची गरज आहे
जगाला फक्त एखाद्या बहाण्याची गरज आहे

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांनो थांबवा जथ्थे
इथे विझल्या पलित्यांना निखाऱ्याची गरज आहे

जरासे खट्ट झाले की जमाया लागते गर्दी
रिकामे लोक हे यांना तमाशाची गरज आहे!

तुझे रडणे, तुझी ओरड, तुझा कर्कश्य हा टाहो
तरी न्यायासनाला बस, पुराव्याची गरज आहे

घटस्फोटास दोघांनी दिला होकार आहे, पण
मुलांना नेमकी,आई नि बापाची गरज आहे!

सुखाच्या वळचणीला पोसला, त्याला कुठे कळते?
खरे जगणे कळाया खास दुःखाची गरज आहे!

-राजेश्वर शेळके
नाशिक
94235 42224

हो, माझ्यातील बाप हरवला आहे

हो माझ्यातिल बाप हरवला आहे
मी पोराचा हात सोडला आहे

नियतीच्या दारात फाटली झोळी
अन दैवाने घास टाकला आहे

जगणे कसले...ही लंगड्याची शर्यत
अन मी खोटा पाय बसवला आहे!

या चंद्रांनो रात्र जागती ठेवू
सूर्याने अंधार पसरला आहे

फडफड केली पिंजऱ्यात पंखांनी
आकाशाने श्वास रोखला आहे!

रडण्याचा मज एक फायदा झाला
मी हसण्याचा मार्ग शोधला आहे

मेल्यावरही जीव जायचा नाही
मी शब्दांतुन श्वास ओतला आहे!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

होता हाईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं..


होता होईल तेवढं

मन थोडं मोठं करून 
थोडं उदार व्हायचं 
होता हाईल तेवढं आपण 
स्वतःच समजदार व्हायचं..

भांड्याला भांडं लागून 
घरात आवाज होतोच ना?
रांगतं मूल चालू लागल्यावर 
त्याचाही तोल जातोच ना?
मोठ्यांचही तसंच असतं,
त्यांनाही सांभाळून घ्यायचं..

मोठ्यांमध्येही लपलेलं असतं 
एक लहान मूल 
तेही कधी पांघरून घेतं
खोडकरपणाची झूल
त्यालाही कधी मोकळेपणाने 
मस्त रडू द्यायचं...

अधूनमधून येतच असतं
एखादं वादळ भेटायला 
एखादा अश्रू पुरेसा असतो 
माणसाचा धीर सुटायला 
संयमाचं तीर्थ थोडं 
हळूच मस्तकावर घ्यायचं...

कष्टाविनाच सगळं मिळावं 
असं होतं का कधी?
मोगरासुद्धा ऊन सोसतो
फुलून येण्याआधी!
प्रयत्नांच्या रोपट्याला 
ठरवून पाणी द्यायचं...

अहंकाराचा वारा लागून
बहकू शकतो माणूस 
थोडा इकडे थोडा तिकडे
 सरकू शकतो माणूस 
येतच कधीतरी भान माणसाला
पुन्हा माणसांत यायचं...
होता होईल तेवढ आपण 
स्वतःच समजदार व्हायचं...

राजेश्वर उर्फ राज शेळके, 
नाशिक
9423542224

बूट आणि टाय

बूट आणि टाय

शाळेमधी आले बघ
बूट आणि टाय
मला बी आनशीन का
बाजारातून माय
ऐकलं का तू माझं
सांगतो मी काय
माझ्या बोलण्याकडं
ध्यान तुझं नाय।। शाळेमधी

लाल लाल टाय मी
गळ्यामधी बांधिन
काळे काळे बूट माझ्या
पायामधी घालीन
त्याच्याशिवाय शाळेत मी
जायाचो नाय।। मला बी..

पुस्तकं बी फाटलेली
दिली मला आणून
नवी वही बनवली
जूनी रद्दी फाडून
दप्तराची पिशवी बी
फाटकीच् हाय ।। मला बी..

का वं माय झाले तुझे
डोळे अशे वले
गरिबीनी आपल्या का
रडाया लावले
रडू नको माय तुला
मागणार मी नाय
नको बूट नको टाय
आणू नको काय

हाय तसा माय मी
शाळेला जाईन
शाळा शिकून एका दिवशी
सायेब व्हईन
सायबाला कसा दिसल
*कोट आणि टाय*
रडु नको माय
तुला मागणार मी नाय
रडू नको माय तुला...
....
मागणार मी नाय

       ©राजेश्वर शेळके
            नाशिक

rajshelkesir@gmail.com
#9423542224.

पुण्यवानाला इथे मिळतात ना लेकी


लेकी

पुण्यवानाला इथे मिळतात ना लेकी
थेट स्वर्गातून अवतरतात ना लेकी

प्रेम त्यांना पाहिजे दुसरे नको काही
लेक भाग्याची म्हणा हसतात ना लेकी

खूप त्या करतात दंगा नाचगाणेही
पण घराची शिस्त ही जपतात ना लेकी

राग एखाद्या क्षणी येतोच बापाला
जाउ द्या बाबा पुन्हा म्हणतात ना लेकी

मागताना चार पैसे शिक्षणासाठी
चेहरा हसरा किती करतात ना लेकी

कोण देते ही समज या दोन डोळ्यांना
मायबापा पाहुनी शिकतात ना लेकी

त्या नसू दे या घराला काय मग किंमत
झोपडीचे देवघर करतात ना लेकी

झोपताना दृष्ट काढा रोज लेकींची
लाख नजरांशी किती लढतात ना लेकी

त्या नटाया लागल्यावर आरसा म्हणतो
अप्सरेसम देखण्या दिसतात ना लेकी

लग्न ठरताना सुना होकार देताना
हाय केवळ बाहुल्या ठरतात ना लेकी

बोल लेकाचा जिव्हारी लागतो जेव्हा
पापण्यांच्या भोवती जमतात ना लेकी

जीव लावा, खूप बोला, प्रेम द्या त्यांना
दो दिसांच्या पाहुण्या असतात ना लेकी!!

-राज शेळके, नाशिक
9523542224

उजेड पेरत जातो!


उजेड पेरत जातो

अंधाराच्या काठावर मी मशाल ठेवत जातो
उजेड पेरत जातो मी उजेड पेरत जातो!

इथे जन्मले सूर्य हजारो अमावस्येच्या पोटी
कर्तृत्वाची सजली गाणी सदैव त्यांच्या ओठी
त्या सुर्यांच्या किरणांना मी उदंड उधळत जातो...

माळावरच्या खडकामधुनी अंकुर जेथे फुटला
एक भरारी घेण्यासाठी राखेतून जो उठला
त्या जगण्याच्या जिद्दीला मी अखंड गिरवत जातो...

कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमधली ज्योत जागते रात्री
धगधगत्या स्वप्नांना असते उजाडण्याची खात्री
त्या डोळ्यांचे भविष्य उज्ज्वल त्रिखंड गर्जत जातो...

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

पापण्यांचे पाळणे करशिल कदाचित


पापण्यांचे पाळणे करशिल कदाचित 
वाट माझी पाहशिल; रडशिल कदाचित

एकट्याने चालणे वाईट नाही...
हे खरे पण, एकटा थकशिल कदाचित!

चेहऱ्यावर काजळी कोठून आली? 
लाख चिंताचा धनी असशिल कदाचित

ऐकल्यावर दोन शब्दाचा खुलासा
तू मला वेडा जरा म्हणशिल कदाचित

आठवण माझी तुला येईल जेव्हा
हासताना आसवे पुसशिल कदाचित

ज्या सुखासाठी उभे आयुष्य गेले
ते बघाया तू इथे नसशिल कदाचित

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

एक बाहुली घरात जेव्हा दंगा मांडत असते..


एक बाहुली घरात जेव्हा दंगा मांडत असते
थकलेले घर थकवा विसरुन क्षणभर हासत असते

शाळा भरली, शाळा सुटली, जे जे काही घडले
दप्तर टाकुन लेक अगोदर सगळे सांगत असते

हातामधला खाऊ अर्धा पप्पांना "खा" म्हणते
लेक भरवते अन बापाचे पोट टरारत असते

बापाच्याही नकळत त्याला वाचत असते मुलगी
परिस्थितीची पाने काही, तीही चाळत असते

मुलगी म्हणजे काटकसर अन ऐनवेळची लक्ष्मी
अडचण आली की गल्ल्यातिल चिल्लर नाचत असते

कुरकुरमाळ्या करता करता दुःख विसरतो बाबा
बापालाही लेक निरागस जगणे शिकवत असते!.

-राज शेळके, नाशिक

तू ज्ञानाची पहिली ओळख तू तेजाचे नाव नवे


दीपस्तंभ

तू ज्ञानाची पहिली ओळख तू तेजाचे नाव नवे 
तू गेला त्या मार्गावरती नवपक्ष्यांचे 
लक्ष थवे

अंधाराला भेदुन तेथे तू पेटवला दीप नवा 
स्पर्श तुझा झाला अन् झाली सुगंधित सारीच हवा

तू शब्दांचा असीम साधक तू ज्ञानाची भूक नवी
तू बुद्धाचा दिव्य उपासक तू अजरामर चिरंजीवी

तू जिद्दीची अमर कहाणी, तू यत्नांचे नाव दुजे 
अखंड ऊर्जा, स्वयंप्रेरणा, बा भीमराया नाव तुझे

खचलेल्यांच्या उद्धाराची तू शेवटची आस भीमा
तू लढणाच्यांच्या देहातील धडधडणारा श्वास भीमा 

तुझा चेहरा, तुझे दाखले दीपस्तंभ बनतील इथे 
संघर्षांचे सर्व प्रवासी तुझे शिष्य बनतील इथे

जोवर राहील चंद्र चांदणे, जोवर राहील सूर्य नभी 
अखंड तळपत राहील तोवर भीमा तुझेही नाव जगी

तुझ्या दिव्य तेजाचा येवो अंश जरा आमच्यात भीमा 
तुझा त्याग,बलिदान लढाई सदा असो लक्षात भीमा!

राजेश्वर शेळके,
नाशिक
9423542224

आयुष्य माणसाला स्वस्तात नाडते


आयुष्य माणसाला स्वस्तात नाडते
घेते बरेच काही, थोडेच वाढते!

अंधार भेदण्याला लढतात माणसे
तेथे शरीर पडते... जेथे उजाडते

इतक्यात वाढली का जवळीक आपली
ही घोर संकटाची चाहूल वाटते 

साधू नकोस संधी दिसताच फायदा
मित्रा, अति हुशारी तोट्यात घालते

ज्याच्या घरी सुखांचा नियमीत राबता
त्याला कठोर नियती रस्त्यात गाठते!

ही बक्षिसी म्हणू की आहे नवी तऱ्हा
लालूच ती नशा जी जाळ्यात ओढते

जेथे सदा टवाळी सत्कर्म झेलते
तेथेच दुर्गुणांची किंमत वधारते!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

ऐकण्यासाठी मनाचे कान केले




ऐकण्यासाठी मनाचे कान केले
मी पुन्हा शब्दांस माझ्या म्यान केले

हात आधी जोडले... मग फूट केली
एवढेसे काम...पण तू छान केले

माणसे तर शांतता पाळीत होती
दंगलींचे हे कुणी फर्मान केले?

जेवढा एल्गार केला जिंकण्याचा
हारण्याने तेवढे बेभान केले

कोंडमारा काळजाला सोसवेना
शब्द आले... मोकळे मैदान केले

घेउनी अंदाज माझ्या ताकदीचा
भांडण्याच्या ऐवजी गुणगान केले

ही तुझ्या दारी कशी आली गरीबी
व्यर्थ सारे तू तुझे कुर्बान केले! 

तुडविले नात्यांस साऱ्या ऐनवेळी
माणसांनी हे असे बलिदान केले

     ©राज पांडुरंग शेळके
            नाशिक
        #9423542224

पुरुष


राबतो इतका घरासाठी पुरुष
मग कुठे उरतो स्वतःसाठी पुरुष

वेदना त्याची कधी कळते कुणा
फक्त आठवतो सुखासाठी पुरुष!

भाकरीशी झुंजतो सारा दिवस
घास बनतो लेकरासाठी पुरुष

तो सुरक्षित राहतो निश्चिन्त ही
भिंत ठरतो ज्या कुणासाठी पुरुष

देव जेव्हा देवपण नाकारतो
देव ठरतो माणसासाठी पुरुष

संकटांचे सैन्य जेव्हा घेरते
जीव देतो जिंकण्यासाठी पुरुष

राज शेळके, नाशिक
9423542224







माणसे दुखवायची नसतात म्हटले ते...


माणसे दुखवायची नसतात म्हटले ते
आणि वर छद्मीपणाने खास हसले ते

हाक जेव्हा मारली, तेव्हा कुणी नव्हते
आज त्यांचे काम अडले, अन प्रकटले ते!

ठेवली आधी नजर, ठरवून माझ्यावर
बैठका जमवून मग चघळीत बसले ते

ते कुठे गेले जयांना मी नको होतो?
की मला पाहून येथेही...निसटले ते?

दूरवर येणार होते सोबती माझ्या
चार कोसांवर थबकले, हाय थकले ते!

पांघरुण एका चुकीवर घालण्यासाठी
कैकदा केल्या चुका...मुद्दाम चुकले ते

फेकला ज्यांनी चिखल सर्रास दुनियेवर
आज त्यांची वेळ आली...फार चिडले ते!

-राजेश्वर शेळके
9423542224






वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...