Wednesday, December 24, 2025

फोनपुराण!

*फोनपुराण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_24 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*फोनपुराण!*
अर्थात 
_घरात मोकळेपणाने बोला_

*नवरा-बायको घरी एकटेच निवांत बसले होते. बायकोने हळूच विषय काढला. "अहो ऐका ना, तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा." "का? काय झालं?"*

 *"काय झालं काय, दिवसभर सारखं फोनवर बोलत असतात. इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक? त्यांना कंटाळा कसा येत नाही? अहो मी म्हणते, ते काय एकटेच नवलाचे मोबाईल वापरतात का? आता घरामध्ये आपल्या इतके फोन आहेत, पण एवढं बोलतो का आपण फोनवर?  अगदी सकाळपासूनच त्यांचे फोन जायला किंवा त्यांना फोन यायला सुरुवात होते. उठले का? चहा घेतला का. नाष्टा केला का? जेवण केलं का."*

 *तुम्ही जाता सकाळी उठून ड्युटीवर. इथे दिवसभर आम्हाला ऐकावं लागतं फोनपुराण! अक्षरश: जेवत असतील आणि फोन जर वाजला, तर तोंडातला घास थांबवून कोणाचा फोन आला बघायला फोनकडे धावतील. झोपलेले असतील आणि रिंग वाजली तर खाडकन उठून बसतील! मिस्ड कॉल पडला तर त्यांना ‘कधी इकडून फोन करू’ असं होतं. आणि तुम्हाला गंमत सांगू का? फोनमध्ये सगळं असतं इंग्लिश. यांचा आणि इंग्लिशचा छत्तीसचा आकडा. त्यातलं यांना ‘ओ की ठो’ कळत नाही. तरी बरोब्बर फोन लावतात बरं! शेवटच्या अंकांकडे बघून त्यांना बरोबर समजतं की हा याचा नंबर, तो त्याचा नंबर. कसं काय कळतं कोण जाणे बाई. पण कधीकधी चुकीच्याच लोकांनासुद्धा लावतात फोन,  मग ऐकणारे सांगतात, बाबा फोन दुसरीकडे लागला! तरी त्यांना काही फरक पडत नाही.*

 *अहो, सगळ्यांची लग्न ते इथेच बसून जुळवतात! कोणाच्या घरी काही भांडण झालं तर त्याचा तोडगाही इथूनच सांगतात. कधी कधी तर इतकं तावातावाने बोलतात की मलाच भीती वाटते- आता फोनवरच भांडण लागतं की काय? मग त्याचं टेन्शन घेऊन पुन्हा ‘राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी’ करत बसतात आणि विक्स नाहीतर झंडूबाम मागतात! आता तुम्हीच सांगा या वयात माणसाने फोनला एवढं चिटकण्याची गरज आहे का?”*

*नवरा म्हणाला, “तुला माहितीये का घरात अबोल राहणारी वयस्कर माणसं फोनवर इतकं का बोलतात?” बायकोने विचारलं,  “का?”  तो म्हणाला, “कारण घरातली माणसं त्यांच्याशी खास बोलत नाहीत...! मग त्यांना आपल्याच घरात पोरकं झाल्यासारखं वाटतं. हे पोरकेपण जर फोन भरून काढत असेल तर बोलू देत त्यांना. बोललं की माणूस मोकळा होतो. मोकळ्या देहात मोकळा श्वास फिरतो. तेवढंच चिमुटभर आयुष्य वाढतं. आज फोन आहे, म्हणून त्यांचा आवाज जिवंत आहे. उद्या फोनही नसेल, तेही नसतील. रिंग तेव्हाही वाजेल, पण ती फोनची नसेल; ती असेल केवळ त्यांच्या आठवणींची...!" तिने नवऱ्याकडे पाहिलं, आणि पहिल्यांदाच मनापासून म्हटलं— "उद्यापासून मी त्यांच्याशी बोलते मोकळेपणाने. बस्स?"*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, December 17, 2025

रस्ता आणि पाट्या


*रस्ता आणि पाट्या*
_एक मुद्दा, एक विचार!_
_17 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*रस्ता आणि पाट्या*

*"रामराम पाव्हणं!" "रामराम!" "काय, रस्त्यावर बसले, थकले-बिकले की काय? "चला आता थोडंच राहिलं दोन-तीन कोस फक्त." "थकलो नाही, या आंब्याच्या झाडाची सावली दाट वाटली म्हणून बसलो जरा. या वाईच घाई नसली तर, जाऊ संगंच." "कोणगाव म्हणले?" "घडीभर इथल्या जवळच्याच गावचा आहे म्हणा की."*

*"बरं! काय करता मग तुमी कामधंदा?" "पाट्या लावतो!" "पाट्या?? कसल्या? कुठं?" "रस्त्यावर!" "कसल्या पाट्या?" "रस्त्यावरच्या खुणा सांगणाऱ्या!" "आस्सं!! मग लेबर हाय म्हणा की!" "हो लेबरच घडीभर." "मग काढा की तंबाकू. हाय का?" "नाही! मी तंबाखू खात नाही." "काय राव तुम्ही लेबर असून तंबाकू खात नाही? आमच्या गावाकडं तोंडभरून तंबाकूचा बोकना टाकल्याबिगर लेबर कामाला हात लावत नाही. बरं असू द्या. मुकादम कुठाय तुमचा?" "मुकादम आमच्याबरोबर फिरत नसतो. निवांत एका जागी बसतो आणि संध्याकाळी काम किती झालं याचा हिशोब मागतो." "भारीच काम आहे राव तुमचं. बरं मग पाट्या दिसत न्हाईत कुठं?" "पाट्या?? लावून टाकल्या हितून मागच्या सगळ्या!" "मग आजचं काम झालं म्हणायचं!" "नाही. आमचं काम कधीच संपत नसतं." "म्हंजी?" "जिथपर्यंत रस्ता जातो का, तितकं आमचं काम." "आता हितं कंची पाटी लावणार?” "तुम्हीच सांगा कोणती पाटी लावायची. लावून टाकू!" "ऑ? म्हंजी आम्ही सांगणार, आणि तुमी लिवनार का?" "हो मग!" "लिवा मंग, अपघाती वळणाची जागा! लै डेंजर जागाय ही.*

 *हितून मागच्या सगळ्या पाट्या असंच लोकांना इचारून लिवल्या का?" "सगळ्या नाही, पण बऱ्याच. माझ्यापेक्षा इथल्या जुन्या-जाणत्या लोकांना हा रस्ता जास्त चांगला माहित आहे ना! त्यांच्या अनुभवाच्या शहाणपणातून त्यांनी जे सांगितलं तेच मी पाटीवर लिहितो, जसं की तुम्ही आताच म्हणालात, ही अपघाताची जागा आहे म्हणून. मी पुढं लिहितो, जपून जावा. इतकंच." “वा वा! म्हंजी उपकाराचंच काम करता की तुमी.” “तसं काही नाही, ते माझं कामच आहे. पण बघा ना, रस्त्यावर जर पाट्याच नसल्या तर नव्या माणसाने जायचं कसं? एकवेळ मोबाईलमधली रस्ता सांगणारी बाई धोका देईल, पण रस्त्यावरच्या पाट्या कधी धोका देणार नाहीत. हो की नाही?” “आता कस्सं, आक्षी माझ्या मनासारखं बोलले बगा तुमी. एक इचारू का? तुमी मुन्शीपाल्टीमधले पाट्या लावणारे दिसत न्हाई. खरं खरं सांगा, कोण तुमी?”*
  
 *“माझं नाव लेखकराव. माझा तटस्थ मेंदू हा माझा मुकादम. जीवनाचे कडू-गोड अनुभव मी शब्दांतून मांडतो. माझी प्रत्येक कविता, लिखाण, आणि व्याख्यान याच या रस्त्यावरच्या पाट्या! या पाट्यांमधली एखादी जरी पाटी एखाद्या जरी माणसाला अडचणीच्या काळात कामा आली, तरी आयुष्याच्या या अवघड रस्त्यावर या पाट्या लावण्याचं सार्थक झालंच म्हणून समजायचं! काय म्हणता?*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, December 10, 2025

चकवा

*चकवा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_10 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*चकवा*

*आजच्या डिजिटल जाहिरातीच्या युगात प्रत्येक दुकान रंगबिरंगी लाइटिंगने सजत असताना एका गरीब दिसणाऱ्या दुकानाची मात्र नेहमी कीव येते. कुठलाही डामडौल नाही, लाइटिंग नाही, गाजावाजा नाही, भपका नाही. एखाद्या साधूने एखादी शांत निवांत जागा बघून तपाला बसावं तसं हे दुकान लोकांच्या गजबजाटापासून आपलं गुमान एका बाजूला असतं. शिवाय दुकानाचं नावही कोणाही गरीब, सामान्य, अल्पशिक्षित माणसाला सहज वाचता येईल असं. अगदी साध्या सोप्या मराठीत लिहिलेलं. 'सरकारमान्य देशी दारू दुकान!'*

  *असं म्हणतात की दूध विकणाऱ्याला घरोघरी जाऊन विकावं लागतं; परंतु दारू विकणारा हा थकल्याभागल्या आत्म्याला परमतृप्तीचा आनंद देणारा असल्यामुळे त्याचे साधक त्याला शोधत-शोधत या दिव्य दुकानापर्यंत स्वतःच जाऊन पोहोचतात, इतकंच नव्हे तर स्वतःला त्या दिव्य तेजाची प्राप्ती झाल्यानंतर मित्रांनाही त्याचा कसा फायदा आहे हे परोपरीने पटवून देत त्यांनाही या सोमरस-भक्तिमार्गात आणतात. आधुनिक भाषेत जिला माऊथ ‘पब्लिकसिटी' म्हणतात ती हीच! देशी दारू दुकानदार गिऱ्हाइकाच्या माघारी पाणी न टाकता त्याच्यासमोरच दारूत पाणी टाकतो, शिवाय ग्लाससुद्धा काचेचा ठेवतो, त्यामुळे गिऱ्हाइकाला त्याचा व्यवहार ‘पारदर्शक’ वाटतो. मग पैसे मागण्याच्या आधीच गिऱ्हाइक काउंटरवर पैसे ठेवतं आणि दिल्या जाणाऱ्या ओल्या प्रसादाकडे मिटीमिटी बघतं. बऱ्याच लोकांना माहीत नसेल की दारू पिणारे लोकही ग्लासामधला पहिला थेंब दोन बोटांच्या टिचकीने देवाला अर्पण करून, डोळे बंद करून, भक्तीभावाने दारू पितात! काही तर अगदी दोन बोटांच्या चिमटीने नाकपुड्या बंद करून, कडू तोंड करून घशात ओततात; पण पितातच! पहाटे पाचला उठून दारू प्यायला जाणारे महाभागही कमी नाहीत.*  

    *इतर दुकानांमध्ये वस्तू घेऊन गिर्‍हाइकाचा किती फायदा होतो माहीत नाही परंतु या दुकानातल्या गिऱ्हाइकाला दारू पिल्याबरोबर पाचच मिनिटात फायदा होतो, म्हणजे ज्ञानवृद्धी होते, अनेक भाषा ज्ञात होतात, वक्तृत्व कला साधते, गायन जमते, स्मरणशक्ती वाढते, शिवाय बडबडीनंतर एक दीड तासात ध्यान आणि समाधीची अनुभूतीही येते! या अनुभूतीचा उच्चांक असा की आपण रस्त्यावर आहोत की गटारात याचेही भान त्याला राहत नाही.*

  *अगोदर 'कष्ट करून थकतो म्हणून पितो' असं म्हणत माणूस दारू पितो, मग हळूहळू दारू त्याला पिते. गिर्‍हाइकाचा बेवडा करते. घरातलं किडूक-मिडूक विकून देशोधडीला लागेपर्यंत, आणि 'चाळीस रुपये द्या ना!’ ची भिक लागेपर्यंत त्याला आपटून आपटून मारते. मग तो घरच्या लक्ष्मीसारख्या बायकोला शिव्या आणि लाथा घालतो आणि जिथे काम करत असेल त्यांच्या शिव्या आणि टोमणे खात राहतो. एके दिवशी छातीच्या पिंजऱ्याचा ताबा खोकल्याची उबळ घेते, आणि अखेरीस चादरीवर पडलेला दम्याचा रोगी, मुलाबाळांना उघड्यावर टाकून, उशीखाली बाटली घेऊन शून्यत्वाला जातो. आपल्यातलं कुणी अशा चकव्यात भरकटत असेल तर त्याला वेळेआधीच सावरा, कारण दारू शेवटी माणसाला संपवते, पण वेळेआधी दिलेला आधार एखादं घर, एखादा संसार वाचवू शकतो!*

  *सरतेशेवटी ज्याने आयुष्यात अजून एकदाही पिलेली नाही, परंतु परिस्थिती त्याला दारूकडे खेचते आहे, त्याने छातीवर दगड ठेवून मनाला ठणकावून सांगितलं पाहिजे की, "काहीही झालं तरी मी या मार्गाला जाणार नाही!" मित्रांनीही जे पीत नाहीत त्यांना अतिआग्रह करून या मार्गाला आणण्याचं पातक करू नये. जे म्हणतात की 'मी कधीकधीच आणि थोडीशीच घेतो', त्यांनी बेवडेपण येण्यापूर्वीच विचारपूर्वक थांबून घेतलं पाहिजे. जे दारूच्या आहारी गेले आहेत, पण त्यांना सोडायची मनापासून इच्छा आहे, त्यांनी डॉक्टरांना भेटून मोकळेपणाने त्यांची इच्छा सांगितली पाहिजे, कारण दारू नक्की सुटते, फक्त पिणाऱ्याची तशी तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि शेवटी राहिले ते, जे भरपूर पितात कारण त्यांच्याकडे चिक्कार पैसा आहे, त्यांना सोडायचीच नाहीये. त्यांना फक्त मजा करायची आहे. त्यांच्याबद्दल काय बोलावं? 'नंगे से खुदा भी डरे!'*
-

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, December 3, 2025

हुद्दा आणि मुद्दा

*हुद्दा आणि मुद्दा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_03 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*हुद्दा आणि मुद्दा*

   *ऑफिसला नवीन साहेब बदलून आले. त्यांची नवी कोरी चार चाकी गाडी आवारात आली, की बाकीच्यांना नुसता घाम फुटायचा कारण स्वभाव कडक, चिडका आणि तडक्या. पण चार-पाचच दिवस झाले असतील नसतील की बाहेर कोणी एक माणूस त्यांना भेटायला आल्याचं कळलं. ऑफिसमध्ये आल्याबरोबर त्याने पहिलंच वाक्य टाकलं, "ती बाहेर उभीय ती गाडी केवढ्याला द्यायची?"*

 *साहेबांचे डोळे चमकले. समोरच्या कागदांच्या गठ्ठ्यामधून नजर वर करत म्हणाले, "विकायची नाहीये ती." समोरचा म्हणाला, "पण मला घ्यायची आहे." साहेब तडकलेच, "अहो मला विकायची नाही म्हटलं ना? कोण तुम्ही?" समोरचा माणूससुद्धा भडकला, "पण मला घ्यायची आहे म्हटलं ना? किंमत सांगा! आणि ते तुमच्या हातातलं घड्याळ, ते पण आवडलं मला. त्याची पण किंमत सांगा. आणि आयफोन नवीन दिसतोय. हा पण घेऊन टाकतो. बोला!" म्हणत समोरच्या माणसाने चक्क टेबलावर पैशांचा ढीग मांडला. एक चेकबुकपण आपटलं. तोपर्यंत सगळा स्टाफ गोळा झाला. काय झालंय कोणाला कळेना. मग एक जुने पोक्त कर्मचारी हात जोडून म्हणाले, "साहेब, काही चुकलं असेल तर मोकळं सांगा. उगाच सगळ्यांना कोड्यात कशाला टाकताय?" यावर तो माणूस म्हणाला, "हा काल माझ्या बायकोला ‘भिकारी’ म्हटला!"*

   *आता मात्र सरसाहेबांचं तोंड पाहण्यासारखं झालं! म्हणाले, "कोण तुमची बायको?" माणसाने बायकोला हाक मारली. तिला पाहून तर साहेबांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ऑफिसमधल्या साध्या वर्ग चार कर्मचारी होत्या त्या! या बाईचा नवरा इतका श्रीमंत? साहेबांच्या डोक्याचा पार खकाणा झाला!*

 *काल 'टेबलवर पाण्याचा ग्लास का भरून ठेवला नाही?' म्हणून ते तिच्यावर भडकले होते, आणि नको-नको ते ऐकवलं होतं, शिवाय बोलता बोलता बोलून गेले होते, "या फोर-क्लास लोकांना एकतर कामं मिळत नाहीत, मिळाली तर यांना कामं करण्याची अक्कल नसते. भिकारी कुठले!" पण आता समोरच्या माणसाला आणि त्याच्या श्रीमंतीला बघून त्यांना स्वतःच भिकारी असल्यासारखं वाटू लागलं. चेहऱ्यावर घाम जमायला लागला. त्याचा चिडलेला अवतार पाहून नकळत त्यांचे दोन्ही हात कानाकडे गेले आणि म्हणाले, “साहेब माफ करा. चुकून शब्द सुटला. यानंतर अशी चूक होणार नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं.”*

 *समोरचा माणूस म्हणाला, “एवढ्या वेळ सोडून देतो, पण लक्षात ठेवा, वर्ग चार कर्मचारी हे तुमची शारीरिक धावपळ होऊ नये यासाठी असतात; जेणेकरून तुमची बुद्धी जास्त चालेल. ते तुमचे वैयक्तिक घरगडी किंवा नोकर नाहीत! त्यांचा सन्मान ठेवायला शिका; नाहीतर तुमचा हा सायबीपणा कचऱ्याच्या कुंडीत टाकायच्याही लायकीचा नाही! अजून एक, समोरच्याचा हुद्दा बघून त्याची लायकी ठरवत जाऊ नका, महागात पडेल एखाद्या दिवशी!” साहेबांनी मान हलवली.*

   *मंडळी, अहंकाराचा शेवट अपमानात होतो, तो असा!*

- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...