🔳
*वास्तांगुणाहूंया!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*५ ऑगस्ट २०२६, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,
▪️
*वास्तांगुणाहूंया!*
*शहाण्यासुरत्या म्हणवल्या जाणाऱ्या माणसांचा जमाना असा इतक्या लवकर संपून जाईल असं वाटलं नव्हतं! कालपर्यंत नाक साफ करायची अक्कल नसलेल्या लहानसहान पोरांनी चार-सहा इंचाच्या मोबाईलचा ताबा घेतल्यापासून मोठ्यांना केव्हाच सामाजिक पटलावरून हद्दपार करून टाकलंय. जिकडे पहावं तिकडे नुसता वास्तांगुणाहूंया!*
*कधीकाळी लहान मुलं समाजासमोर अशी स्पष्टपणे अजिबात दिसायची नाहीत. घरातली मोठी माणसे बोलायची आणि लहान मुलं ऐकायची. आता लहान मुलं सांगतात, आणि मोठी माणसं ऐकतात! कधीकाळी आईबाप पोरांना रस्ता दाखवत असत, आता पोरं आईबापांना रस्ता दाखवत निघाली आहेत. आई बापांना फक्त "म्हणजे आम्ही येडे!!" एवढंच म्हणायचं काम त्यांनी शिल्लक ठेवलं आहे. पप्पांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या खुर्चीत बसण्यापर्यंतची या मुलांची लुडबुड समजण्यासारखी होती. पण यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांच्याच वस्त्राला हात घालावा? तोही अगदी बिनधास्तपणे? कहर झाला अगदी!*
*डोंगरांवरच्या मुक्त माकडांना आवरणं जसं कठीण असतं, तसंच इंटरनेटच्या या 'माकड्यांना आवरणं आता कठीण झालंय! अख्ख्या भारतभर पोरं पसरलेली.. कुणाकुणाला आवरणार? आणि कसं आवरणार? लहान पोरांवर केस करून त्यांना तुरुंगात डांबलं तर सरकारला स्वतःलाच घरी बसावं लागणार! नुसता डोक्याला ताप करून ठेवलाय पोरांनी!! उंडारलेल्या पोरांच्या दोन कानाखाली लावून त्यांना शांत करण्यासारखी परिस्थितीच या पोरांनी ठेवलेली नाही. कारण मोठ्या माणसांच्या नाकाला झोंबणाऱ्या असल्या तरीही या पोरांनी दाखवलेल्या त्यांच्या चुका मात्र नाकारता येणाऱ्या नाहीत! आणि 'एवढंसं पोरगं माझी चूक दाखवतंय का??' म्हणून मोठ्या माणसांना त्या सहन होणाऱ्या नाहीत! सगळा सावळा गोंधळ झाला आहे!*
*या रेटारेटीत एक गोष्ट मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही. रिल्स बनवून लोकांना इम्प्रेस करण्याच्या नादात ह्यांच्यातल्या काही पोरांची भाषा कुठे चालली आहे? त्यांचे हावभाव कुठे चालले आहेत? जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होऊ लागलाय त्याचं काय? अभिव्यक्तीच्या नावाखाली 'वागण्या- बोलण्याची एक पद्धत असते' हेच ही पोरं विसरून चाललीयत की काय? इन्स्टाच्या रिल्सवर लाईक्स येण्यासाठी काहीही करणारी, जयंत्या पुण्यतिथ्यांना गाड्यांच्या टपांवर बिभत्स डान्स करणारी, आणि बघणाऱ्याला बघताना लाज वाटेल असे अश्लील हावभाव कॅमेऱ्यासमोर करणारी मुलं, त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले कोणते संस्कार दाखवू पाहत आहेत? की यांच्या आईवडिलांना याची कल्पनाच नाही? आपल्या मुलांनी काय रेकॉर्ड केलं आहे हे अगोदर त्यांच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर दिसण्याची सोय पाहिजे होती!*
*एका बाजूला नाशकातल्या 'के के वाघ’ सारख्या शिक्षणसंस्थेत गेल्या ४३ वर्षांपासून सलग आयोजित करण्यात येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये जिल्हाभरातली शेकडो मुलं त्यांच्या अमोघ आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असताना, शिक्षणाचं वारं नं लागलेल्या किंवा जरा जास्तच लागलेल्या या 'अतिमर्कट मुलांना जागेवर दोन फटके देऊन का होईना, पण आवर घालायलाच हवा! कारण भारताचे भविष्य असलेल्या या निरागस मुलांच्या तोंडी असली घाण भाषा आणि त्यांच्या सुकुमार देही असले अभद्र हातवारे अजूनतरी शोभून दिसत नाहीत. बाकी ‘अभ्यासोनि निडरपणे थेट प्रकटणाऱ्या’ जेन-झीचं करावं तितकं कौतुक थोडंच! क्या बोलती पब्लिक?*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.