Wednesday, May 28, 2025

सध्या सुरू आहे उन्साळा

*सध्या सुरू आहे उन्साळा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_28 मे, बुधवार_

▪️
*सध्या सुरू आहे उन्साळा*

*"भय्या, पप्पांना म्हण की चिखलाचे पाय धुऊन मग या घरात. आत्ताच फरशी पुसलीय. आणि त्या चपलापण धुवा म्हणा तिकडे दगडावर. सगळ्या चिखलाच्या ढपल्या लावून आणल्या असतील चपलांना खालून." "भय्या, मम्मीला सांग, मला कळतं म्हणा. आणि हे पण सांग, घरात बसणाऱ्यांना कळणार नाही बाहेर रस्त्यावर किती चिखल आहे ते!" "पप्पा, सोडा हो! हे तुमचं दररोजचंच आहे. मला सांगा पावसाळा सुरू व्हायच्या आधीच एवढा पाऊस का पडतोय? उन्हाळा सुरू आहे की पावसाळा?"*

 *"बाळा, सध्या सुरू आहे उन्साळा!" "उन्साळा? हे काय नवीनच?" "अरे, तसा उन्हाळा आहे पण असा पावसाळा सुरू आहे! याला अवकाळी पाऊस म्हणतात. "पण हा पाऊस असा पावसाळ्याच्या आधीच का पडतोय?" "अरे, उन्हाळ्यात जेव्हा खूप उष्णता वाढते ना, तेव्हा जमीन तापते, जमिनीलगतची हलकी गरम हवा वर जाते, वर गेली की जड आणि थंड होते. तिचा ढग बनतो. या ढगाला पाणीयुक्त हवेचा भार पेलवला नाही, आणि वरतून अजून एखादा थर त्यावर येऊन साचू लागला, की आपण जसे केस झटकतो ना, तसाच ढगसुद्धा त्याच्या डोक्यावरचे पाणी झटकतो, त्यालाच आपण पाऊस पडला म्हणतो!" "अच्छा, म्हणजे पाऊस ढगाच्या वरतून पडतो, खालून नाही?" "करेक्ट!” “पण त्याने पावसाळ्यात पडायचं ना!”*

 *“अरे जुन्या काळात बरोब्बर पावसाळ्यातच पडायचा तो. उन्हाळ्यात जमीन तापली तरी ती उष्णता शोषून घ्यायची. आता सगळीकडे लोकांनी काँक्रीट करून ठेवलंय. मग ती गरम हवा जमिनीत शोषलीच जात नाही. सरळ वर जाते. शिवाय अगोदर झाडं खूप असायची. वातावरणात ओलावा टिकून असायचा. तो जमिनीला गरम होऊ द्यायचा नाही. आता झाडंच नाहीयेत. होती ती झाडं तोडून लोकांनी उंच इमारती बांधण्याचा तडाखा लावलाय. घ्या म्हणा मग आता बक्षीस म्हणून उन्हाळ्यात पाऊस!" "पप्पा, कालचा पाऊस काय भयानक होता ना?"*

 *"भय्या, ते सगळं सोड. पप्पांना विचार एवढ्या पावसात बाहेर जायची गरज होती का? घरात गोड लागत नाही का?" "अगं, मी काही फिरायला नव्हतो गेलो." "मग?" "काल रात्रीच्या पावसात शेजारच्या वावरातल्या हरिभाऊंचं पत्र्याचं घर सगळंच कोसळलं. सगळा संसार उघड्यावर आला. रात्रभर अंधारात बसून होते बिचारे सगळे. सकाळी गावात लोकांना कळलं. म्हणून आम्ही सगळेजण तिथे गेलो. घर पुन्हा उभारलं. कुटुंबाला धीर दिला. थोडे पैसेपण दिले." "बाई गं! अहो, पण जाताना सांगून गेले असते तर, त्यांच्या कुटुंबासाठी भाकरी नसत्या का बांधून दिल्या?" "अगं, गाव त्यांना उपाशी मरू देणार आहे का? चल, मला जेवायला वाढ बरं!"*

 -

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, May 21, 2025

पुन्हा उरते रे आई


*पुन्हा उरते रे आई**
_एक मुद्दा, एक विचार!_
_21 मे, बुधवार_

▪️
*पुन्हा उरते रे आई*

  *सकाळी सकाळी ड्युटीवर जाणाऱ्यांची धावपळ बघण्यासारखी असते. घरचे लवकर आवरत नसतात. यांना लवकर निघायचं असतं. बाथरूम कुणीतरी अडवलेलं असतं. बाहेर आणीबाणी लागलेली असते. बायको टिफिन बनवण्याच्या युद्धावर असते. ज्यांनी नेमकं उठून बसायला नाही पाहिजे, ती म्हातारी माणसं सकाळीच उठून बसलेली असतात. पोरगं मध्येच "पप्पा मला चौकापर्यंत स्कुलबससाठी ड्रॉप करता का?" म्हणत असतं. बाप वैतागलेला+ असतो. कसंबसं तयार होऊन त्याला पुढे वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं असतं. अशावेळी घाईघाईत आवरून बुटाची लेस बांधत असताना मध्येच कोपऱ्यात बसलेली आई म्हणते, "दोन घास खाऊन जा!"*

   *"अगं आई, माझी कोणती घाई चालू आहे आणि तुझं काय मध्येच? कितीवेळा सांगितलंय की घाईत असताना असं बोलत जाऊ नको म्हणून? दुपारी खाणारच आहे ना, टिफिन घेऊन चाललोय ना?" "बरं. आजच्यापुरतं खाऊन जा. नाट लागलेली चांगली नसते." “आधी कोण बोललं? आधी बोलतेस आणि मग म्हणतेस नाट लागते, अन्नाचा अपमान होतो, हे होतं, ते होतं म्हणून. आधी बोलायचंच नाही ना.”  “बरं उद्यापासून नाही बोलणार. घे दोन घास खाऊन.” सकाळी सकाळी चिडचिड नको, वादावादी नको म्हणून मुलगा गपगुमान दोन चार घास तोंडात कोंबतो, पाणी ओततो, आणि निघतो.*

 *कर्मधर्मसंयोग असा, की त्याला कामाच्या गर्दीत खरंच दिवसभर जेवायला सोडा, पाणी प्यायलाही उसंत मिळत नाही. सकाळी आईने बळजबरी खायला लावलेले दोन घास त्याला आठवतात. मनातल्या मनात म्हणतो, “बरं झालं दोन घास खाऊन निघालो होतो; नाहीतर आज उपाशीच मेलो असतो!”*

  *घराकडे परतताना त्याचं मन त्याला सांगतं, “अरे, आई सकाळी सकाळी नाट लावत नसते; तर तिच्या अनुभवावरून तिला माहित असतं, की हा एकदा घराबाहेर पडला, की याच्यामागे इतकी कामं असतात, की याला जेवायलाही वेळ मिळणार नाही. पोटात दोन घास असले की हा कामं करायला मोकळा.” दुसरं मन म्हणतं, “पण तिनेही माझी घाई समजून घ्यायला नको का?”*
   
*माणसं दोन्ही ठिकाणची योग्यच. दोघांचाही हेतू सारखाच आणि चांगलाच; परंतु एखाद्यामागची घाई मोठ्यांनी ओळखून घ्यावी, आणि मोठ्या माणसांची भावनाही तरुण पिढीने समजून घ्यावी. नेमकं तसं होत नाही. चिडचीड होते. तरी मुलाच्या माघारी आई म्हणते, “खाल्ले बाई पोराने दोन घास! आणि आईच्या माघारी मुलगा म्हणतो, “किती जीव लावशील आई!” असं हे नातं. कुण्या कवीने उगीचच म्हणून ठेवलेलं नाही,*

*तिचा डोक्यावर हात* 
*तुझी लाखाची कमाई*
*सारं आयुष्य सरून* 
*पुन्हा उरते रे आई!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, May 14, 2025

नावात काय आहे

*नावात काय आहे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_14 मे, बुधवार_

▪️
*नावात काय आहे*

   *एका मुलीला राहुल नाव खूप आवडायचं. तिला लग्नासाठी एक स्थळ आलं. घरात मुलाची चर्चा सुरू झाली. मुलगा इतका शिकलेला आहे वगैरे वगैरे... मुलीने एकच प्रश्न विचारला, "त्याचं नावं काय आहे?" वडील म्हणाले, "राहुल!" मग काय? पोरगी मनातल्या मनात नाचायला लागली. 'आज मैं उपर...' वाली फिलिंग तिला यायला लागली. शून्य मिनिटात तिने लग्न आपल्या बाजूने फिक्स करून टाकलं. घरचे म्हणाले, "अगं अगोदर बघ तरी त्याला." ती म्हणाली, बाकीचं तुम्ही बघा आता! माझं काम झालं!" अर्थात मुलगा चांगलाच होता. घरच्यांनी व्यवस्थित पाहून मगच लग्नाचा बार उडवला.*

 *सर्वकाही उरकल्यावर नव्या नवरीचा पहिलाच संवाद नावाने सुरू झाला. "अहो, तुम्हाला एक सांगू?" "हं", "मला राहुल हे नाव फार आवडतं!" "मलाही!" "म्हणजे?" "मलाही राहुल नाव फार आवडतं. म्हणून मी माझं नाव राहुल ठेवुन घेतलं आहे." "म्हणजे??" "माझं खरं नाव राहुल नाहीच आहे!" "मग?" "परसराम आहे!" पोरीचा पार कडेलोट झाला. पोरगी ढसाढसा रडली. अचानक "अच्छा सिला दिया तुने.." वाली फिलिंग यायला लागली. तिचा आक्षेप परसराम नावाला नव्हता; ‘राहुल का नाही?’ याला होता. नावांच्या प्रेमात माणसं पडतात ती अशी!*

     *तुम्ही म्हणाल, नावात काय आहे? पण नावातच तर सगळं काही आहे! आजकालच्या पिढीला जुनी नावं चालत नाहीत. बंटी, बबली, जॉली, डॉली, रिया, सिया, शाल्वली यांच्या काळात कौशल्या, धृपदा, शशिकला, शकुंतला, चंद्रकला, कमल, वेणू कशा चालाव्यात? आणि इवान, विहान, किहान, शुआन यांच्या काळात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, किंवा महादेव, मच्छिंदर, जालिंदर, मारोती, हनुमान, भगवान, शांताराम यांचा टिकाव कसा लागावा? म्हणून 'नावं ठेवताना जरा आधुनिक ठेवा, नाहीतर आम्ही गॅझेट करून बदलून घेऊ!' असं म्हणणारी पिढी आता आहे. त्यात आता सिद्धार्थ सिड झाला आहे, पंढरीनाथ पॅडी, समाधान सॅम, तर निखील निक झाला आहे. स्टायलिश मुलांची स्टायलिश नावं! याचा अतिरेक म्हणजे काहींनी मुलांची नावं अशी ठेवली आहेत, की त्यांचा अर्थ त्या मुलांना सोडा, त्यांच्या मम्मी-पप्पांनाही माहित नाही आणि आजी आजोबांना ती म्हणताही येत नाहीत! मग फक्त मॉडर्न वाटतं म्हणून, किंवा सिरीयल मध्ये, चित्रपटात गाजत आहे म्हणून ते नाव ठेवायचं हे कितपत शहाणपणाचं लक्षण आहे?*

     *प्रत्येक नावामागे काहीतरी अर्थ असतो. तो माहित असला पाहिजे. मुलांना सांगितला पाहिजे. नावाप्रमाणे वागता आलं पाहिजे, आणि तेही नाही जमलं, तर किमान आपल्या, आणि आपल्या आईवडिलांच्या नावाला जागता तरी आलंच पाहिजे! राहिला प्रश्न राहुलचा, तर ती जोडी आनंदात आहे!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

Wednesday, May 7, 2025

गाईच्या पोटाची गोष्ट

*गायीच्या पोटाची गोष्ट*
_एक मुद्दा, एक विचार!_
_7 मे, बुधवार_

▪️
*गायीच्या पोटाची गोष्ट*

*“मम्माsss लवकर बाहेर ये. आपल्या दारात काऊ आली आहे. सोबत तिचं बेबीपण आहे!” एक चिमुरडी मम्मीला हाक मारत होती. मम्मा किचन मधून बाहेर आली आणि म्हणाली, “अगं तिला गाय म्हणावं आणि तिच्या बेबीला वासरू. मम्मीने गायवासराला हळदकुंकू लावलं. स्वतःच्या कपाळावरही लावलं, मनोभावे नमस्कार केला, आणि मुलीलाही करायला लावला. मुलगी हे पहिल्यांदा पाहत होती. तिने विचारलं, “मम्मा, गायीला हळदकुंकू का लावलं? मम्मी म्हणाली, “बेटा गाय आपली माता असते. तिच्या पोटात तेहतीस कोटी देव राहतात.” मुलगी भुवया उंचावत म्हणाली, “यू मिन थर्टी थ्री करोर्स?” मम्मी म्हणाली, “मी तर लहानपणापासून हेच ऐकत आले आहे बाई.” “म्हणून गायीचं पोट मोठं असतं का?”  या मुलीच्या प्रश्नावर मात्र मम्मीसह मुलगीही जोरात हसली.*

*मायलेकीचा हा संवाद ऐकत असलेले आजोबा मागून म्हणाले, “बाळा, कोटी म्हणजे दरवेळी करोडच असले पाहिजेत असं नाही. कोटी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो ‘प्रकार’. गायीच्या शरीरात तेहतीस निरनिराळ्या देवता वास करतात; किंबहुना त्यांनी रहावं इतकी गाय पवित्र आणि उपयुक्त आहे असं त्यामागील शास्त्र आहे.” नात म्हणाली, “तेहतीस तर तेहतीस. परंतु एवढ्या सगळ्यांना बसायला जागा तर लागेलच ना!” आजोबांनी ‘हो तर!’ असं म्हणत हसत बाजू मारून नेली. 'गायीच्या पोटात एवढ्या सगळ्या देवता कशा राहत असतील?' हा प्रश्न मुलीच्या मनात घोळत राहिला. आजकालची मुलं केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नाहीत. मुलीने अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाल्यावर मोबाईल घेऊन बसली, आणि इंटरनेटवर प्रश्न विचारला, ‘गायीच्या पोटात काय असते?’ इंटरनेटवरचे उत्तर वाचून तिला धक्काच बसला, कारण स्क्रीनवर उत्तर आलं होतं, ‘प्लास्टिक’!*

*मुलीने आजोबांना हाक मारली, “आजोबा, तुम्ही दोघांनीही मला सांगितलं नाही, की गायीच्या पोटात प्लास्टिक असतं म्हणून, आणि त्यामुळे गाय मरते म्हणून? हे फोटो पहा बरं. एक गाय मरून पडलेली आहे, आणि तिच्या पोटातून प्लास्टिकच्या मोठमोठ्या पिशव्या बाहेर काढतायेत. खोटं आहे का हे?” नातीच्या ठाम आणि थेट प्रश्नावर आजोबांना काय बोलावं कळेना. गंभीर चेहऱ्याने फक्त इतकंच म्हणाले, “खरं आहे बाळा. आम्हाला माफ कर. पण शिळंपाकं अन्न आणि कालचे उरलेले पदार्थ उघड्यावर टाकून देणारे मूर्ख लोक ते पदार्थ प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवतात. घरात नको असलेलं प्लास्टिक रस्त्यावर फेकतात. बिचारी गाय भूकेपोटी ते तसेच खाते. घातक प्लास्टिक तिच्या पोटात जाते, त्याचा गोळा होतो, आणि ती पोट फुगून मरते. हे वाईट आहे. पण या मुर्खांना सांगणार कोण? आपल्यापुरतं म्हणशील तर आपण प्लास्टिक पिशवी अजिबात वापरत नाही. तू बघीतलयस का मला कधी, प्लास्टिक पिशवीत काही नेताना किंवा आणताना?” “नाही! आणि म्हणूनच तुम्ही आणि आजी कधीही बाहेर जाताना  कापडी पिशवी घेऊन जाता, हो, ना?” “करेक्ट!” म्हणत आजोबांनी नातीला गोड मिठी मारली.*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...