Thursday, May 14, 2020

गझल । दुनियेत जाणत्यांच्या वेडा ठरू नको

📌

दुनियेत जाणत्यांच्या वेडा ठरू नको
जे अंथरूण आहे,ते पांघरू नको

घरट्यातल्या पिलांच्या चोचीत घास दे
घरटे कसे रिकामे... चर्चा करू नको

डोळ्यांस शिस्त थोडी लावून यार घे
झाली सुरू कहाणी की पाझरू नको

बहकत असेल मुलगा चॅनल बघून तर
मैत्रीत सांग त्याला...तू हादरू नको

मालक लबाड होता, इतकेच बोलला
आम्हास खोकणारा भाडेकरू नको

धनधान्ययुक्त राहिल कोठी तुझी सदा
गरिबांस वाटताना मागे सरू नको

शतकात एकदा हे सद्भाग्य लाभते
संधी तुला मिळाली, तर बावरू नको

डोळ्यांत वाच पैसे, तुटकी परिस्थिती
नुसता हपापल्यागत गल्ला भरू नको!

✒️
-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224
rajshelkenashik.blogspot.com

Saturday, May 9, 2020

गझल । संकटांची पायरी कर



संकटांची पायरी कर
मग यशाची खातरी कर

राग येइल... भेट त्याला
संयमाची ओसरी कर

गोष्ट नाही ना चुकीची?
वेळ लागू दे, खरी कर!

रिक्त होऊ दे मनाला... 
काळजाची बासरी कर

लाव हास्याचा मुलामा
दुःख थोडे भरजरी कर

घे तुला पर्याय दोन्ही
राज्य कर, वा चाकरी कर!


-राज शेळके, नाशिक
9423542224


त्याच्यासाठी...

📌


त्याच्यासाठी.!

कोण म्हणतो अभ्यास म्हणजे 
नुसता डोक्याला ताप आहे?
शाळा म्हणजे टाइमपास 
अन् शिकणे म्हणजे पाप आहे?

सांगा कोणाला प्रत्येक लेक्चर 
भकास,बोरींग, रटाळ वाटतं?
सांगा कोणाला शाळा सोडून 
अर्ध्यावरती कटावं वाटतं?

गृहपाठ कम्प्लीट कर म्हटल्यावर
 कोण फक्त रटा मारतो?
अधली मधली वाक्ये गाळून 
उभा आडवा पटटा मारतो?

वर्गामधला भाई बनून
 कोण दुसऱ्याला छळतो?
खिडकीमधून सर दिसले की 
आपल्या जागेकडे पळतो?

पहिला बेंच रिकामा असूनही 
कोण शेवटीच बसतो?
वर्गात कधिकधीच असतो, 
पण त्याला गमपस्तावा नसतो?

कोण वर्गात टॉन्टस मारण्यात 
सगळ्यात पुढे असतो?
आणि सरानी प्रश्न विचारल्यावर 
एकदम गुपचूप बसतो!

कोण आठवडयातून एकदा तरी 
खरपूस मार खातो?
आणि एवढं सगळं सोसूनसुद्धा 
खुशाल अॅबसेंट राहतो?

परीक्षा जवळ आल्यावरती 
कोणाचा चेहरा पडतो?
कॉपी करताना पकडल्यावर
सांगा बरं कोण रडतो?

प्रत्येक वेळेला रिझल्ट लागल्यावर 
कोण निकालपत्रक लपवतो?
आणि चुकून सापडल्यावर 
काहीही कारणं खपवतो?

सांगा त्याच्या अशा वागण्याचं 
असतं कारण काय?
अहो त्याला मुळात कळलेलंच नसतं
हाऊ व्हाट अँड व्हाय?

गणितातल्या उदाहरणानी 
पुरता जाम होतो 
व्याकरणाच्या नियमांनी 
बिचारा हैराण हातो

विज्ञानाची अवघड भाषा 
सुपीक डोक्यात शिरत नाही
नुसता अक्षराचा पाऊस, 
मातीत पाणी जिरत नाही!

इतिहासाच्या तारखा छळतात, 
भूगोलामधले मॅप्स,
पोकळी भरून निघत नाही, 
डोक्यात राहतात गॅप्स !

शिकण्याची हौस त्यालाही आहे 
पण त्याचं शिकणं होत नाही
कानावर फक्त एवढंच त्याच्या
"याला काही येत नाही!

थोडं जाऊ त्याच्या कलाने,
 मेथड बदलून पाहू 
शिकविण्याचं टेक्निक बदलू, 
रिझल्ट येतो का पाहू

शिक्षणाने त्याच्या चेहऱ्यावर
 स्माईल ठेवलंच पाहिजे
खरंच दोस्तहो,आपण त्याच्यासाठी
एवढं केलंच पाहिजे
एवढं केलंच पाहिजे!

✒️
-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Friday, May 8, 2020

कवितेची कविता

📌

निमित्तमात्र

कविते,
तुला यायचंच असतं जन्माला
अनंत अडचणींच्या सगळ्याच सीमा ओलांडून
तुला रोखू शकत नाही कुठलीही शक्ती कधीच
अगदी ठरवूनही

तरीसुद्धा माझ्या दुबळ्या कुडीचा
तू घेतेस आधार,
ढग दाटून वीज चमकावी
तशी चमकतेस माझ्या मेंदूमध्ये लख्खपणे एखाद्या अवचित क्षणाला,
आणि माझ्या हाताबोटांचं निमित्त करत उतरतेस कागदावर हळुवारपणे
एखाद्या नववधुसारखी.

तुझ्या केवळ येण्याने
माझी झोळी भरून जाते काठोकाठ
कौतुकानी आणि पुरस्कारांनी...

पण मला तेव्हाही ठाऊक असतं
की मी असतो केवळ निमित्तमात्र
केवळ निमित्तमात्र!


✒️
राजेश्वर शेळके, नाशिक
94235 42224

गझल । ओळखी

📌



ओळखी


घ्यायच्या ओळखी, द्यायच्या ओळखी
वेळकाळापुढे न्यायच्या ओळखी

रोज थांबायची सावली एकटी
मग उन्हाशी तिच्या व्हायच्या ओळखी

संपला फायदा, ओळखींचा जसा
पाय काढून मग घ्यायच्या ओळखी

बोलण्याची तऱ्हा सांगण्याची लकब
ओळखीचाच गाठायच्या ओळखी

ओळखी भेटल्या... ना जशा ओळखी
या जगाला किती भ्यायच्या ओळखी!

सूर्य कलला तशा ओळखी पांगल्या
टाळुनीया किती जायच्या ओळखी

खूप भेटायच्या... खूप बोलायच्या
खूप कामी अशा यायच्या ओळखी

ओळखींचा जरी त्रास झाला तुला
नवनव्या रोज पेरायच्या ओळखी!

वृत्त : स्त्रग्विणी


✒️
-राजेश्वर शेळके, नाशिक
© 9423542224

गझल । कुठले कुठले फासे फेकत असतो

📌




कुठले कुठले फासे फेकत असतो
मृत्यू अपुली धाव तपासत असतो

माणुस बाई दोन ध्रुवांची टोके
या टोकांना मध्य खुणावत असतो

पकडा, सोडा पुन्हा मुटकुळे बांधा
काळ मुठीतून हळूच निसटत असतो

त्या शब्दांचे अत्तर होते बहुदा
ज्या शब्दांतुन सुगंध पसरत असतो

जीवन म्हणजे बिनवल्ह्याची होडी
अन नावाडी पाणी कापत असतो

माणुस मरतो, पण तो विसरत नाही
कुणी जवळचा जेव्हा फसवत असतो

सरपण होउन जळणाऱ्याला सांगा
दुसरा त्यावर भाकर शेकत असतो


✒️
-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

गझल । कधी असे जगायचे

📌



कधी असे जगायचे,कधी तसे जगायचे
कधी गुलाम व्हायचे, कधी सलाम घ्यायचे

पुढारली किती पहा, पुढ्यातली नवी पिढी
जुन्या रुढीस पोसणे तिला कसे जमायचे

मनात राहुदे तुझ्या मनातली खरी व्यथा
इथे निमित्त पाहिजे कुणासही हसायचे

दिवा असून का असा स्वतःस जाळतोस तू
तुझ्यात तेज राहते, तुला कधी कळायचे

जरी अबोल राहतो, नशेत छान बोलतो
जिवंत ठेवते तिला, नशा कसे म्हणायचे

प्रवास लांबला तरी नकोस काळजी करू
जरा विराम घ्यायचा...पुन्हा पुढे निघायचे!

वृत्त - कलिंदनंदिनी

✒️
राजेश्वर पांडुरंग शेळके
( प्रा. राज शेळके नाशिक )

तीन प्रयोग




📌


तीन प्रयोग



प्रयोग १
एका कार्यक्रमात एका प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांशी बोलता बोलता खिशातून एक कोरा करकरीत कागद काढला. मुलांना विचारलं, " याला तुम्ही काय म्हणाल?" मुलांनी एका सुरात सांगितलं," कोरा कागद!" पाहुण्यांनी तो कागद एका क्षणात चुरगळून टाकला. मुलांच्या मनात धस्स झालं. पाहुण्यांनी विचारलं, " मी या कागदाचं काय केलं?" मुलं म्हणाली," चुरगळून टाकला!" पाहुणे म्हटले," आता याला पहिल्यासारखा करता येईल का?" मुलं म्हटली, " नाही!" बोलता बोलता पाहुण्यांनी त्या कागदाचा एक सुंदर मोर बनवून मुलांसमोर पेश केला! मुलांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला!! आता पाहुण्यांनी विचारलं," तुम्हाला काय जास्त आवडलं? चुरगळलेला कागद की मोर??" मुलांनी दंगा केला," मोssssssर!!" मग पाहुणे म्हणाले," मित्रांनो, आपलं आयुष्य हे या कोऱ्या कागदासारखं असतं! त्याला चुरगळून टाकायचं की त्याचा सुंदर मोर बनवायचा ते आपल्या हातात असतं! आपण चांगल्या सवयी लावल्या, चांगलं शिकलो, शिक्षकांना आदरसन्मान दिला तर, आपल्या आयुष्याचाही आपल्याला सुंदर मोर करता येईल!"
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
       मित्रांनो, ते प्रमुख अतिथी होते, प्रसिद्ध साहित्यिक आणि आदर्श पिता, पितृतुल्य मित्र, आणि अनेक पुरस्कार मिळवूनही जमिनीवर पाय भक्कम असलेले प्रिय कमलाकर आबा देसले सर!!



प्रयोग २
आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे जागरूकपणे लक्ष देणाऱ्या एका पालकाच्या मनात एके दिवशी विचार आला, की मी माझ्या मुलांचा अभ्यास करवून घेतो आहे, त्यांची प्रगतीही होते आहे, परंतु अशी कित्येक मुलं असतील की त्यांचे आई बाबा या बाबतीत शैक्षणिक किंवा कौटुंबिक बाबतीत तितके सक्षम नसतील, त्यांचा अभ्यास मागे तर पडत नसेल ना?
  विचारांचं काहूर त्याला शाळेपर्यंत ओढत घेऊन गेलं. तो पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटला, सद्यस्थिती जाणून घेतली. जेव्हा त्याला कळलं की आणखी बरीच मुलं मागे पडताहेत, त्याच्या काळजात कालवाकालव झाली. आपण केवळ शाळेवर दोषारोप करत बसण्यापेक्षा आपल्या परीने काही करता येईल का? असा विचार त्याच्या मनात आला. त्याने मुख्याध्यापकांकडे विचारणा केली की जर आपली परवानगी असेल तर मी स्वेच्छेने या कच्च्या मुलांसाठी माझा थोडा वेळ दिला तर चालेल का? मुख्याध्यापकांनी वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना हिरवा कंदील दिला.
   आज त्या घटनेला तब्बल एक वर्ष झालं! तो पालक वर्षभर कच्च्या मुलांच्यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त त्याचा एक तास देतो आहे. मुलांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली, त्याच्याही मुलांचा अभ्यास सुधारला!!एका भव्य कार्यक्रमात त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
  मित्रहो, ही दंतकथा नव्हे! त्या पालकांचं नाव मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, त्यांचं नाव आहे श्रीमान मनोज शिंपी साहेब!
सलाम!!


प्रयोग ३
तात्यासाहेबांची जयंती आणि मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने नाशकातील नामवंत साहित्यसंस्थांनी एका कविसंमेलनाचे आयोजन केले.अनेक महनीय कवींनी संमेलनाला हजेरी लावली.एक आई तिच्या चार पाच वर्षाच्या लेकीला घेऊन कार्यक्रमाला आली. मराठी भाषा आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज या विषयांना वाहिलेल्या अनेक कविता सादर झाल्या. एका पाठोपाठ एक कवी व्यासपीठावर येऊन आपली रचना सादर करत होते. एक नाव पुकारले गेलं आणि ही चिमुरडी व्यासपीठावर आली. तिच्याकडे पाहून तिला एक चॉकलेट किंवा जास्तीत जास्त गोड गोड पापा देण्याचा मोह कुणालाही सहज व्हावा! पण बालकन्या जेव्हा 'मला कविता म्हणायचीय' असं म्हटली तेव्हा उपस्थित कवींना नवल वाटलं. माईकचा ताबा घेत तिने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची एक दीर्घ रचना इतकी सुंदर अगदी हो अगदी मुखोदगत म्हटली!की टाळ्यांचा कडकडाट झाला!! कार्यक्रमाच्या शेवटी तीन क्रमांक काढले गेले. या चिमुरडीला चक्क पहिल्या क्रमांकाने गौरविलं गेलं.
या गोजिऱ्या मुलीचे नाव... ऋषिका पाटील!

मित्रहो!
मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे, कारण मराठी मनं अजून जिवंत आहेत!

-प्रा.राज शेळके, नाशिक.
   ९४२३५ ४२२२४

📌 बेस्टसेलर आणि आपण!






















📌


📖📖📖📖📖📖📖📖
📚📚📚📚📚📚📚📚


बेस्टसेलर आणि आपण!

       बेस्टसेलर पुस्तकं म्हटली, की आपल्या डोळ्यासमोर यु कॅन विन, सिक्रेट, द मॉंक हु सोल्ड हिज फेरारी, हू मुव्हड माय चीज, रिच डॅड पुअर डॅड, चीपर बाय दी डझन ही नावे येतात. त्यांच्या विकलेल्या प्रति अक्षरशः लाखांच्या घरात असतात. आकडा पाहूनच थक्क व्हायला होेतं. आपलं इंग्रजी जेमतेम असतं ( किंवा तेवढा अर्थ काढत बसायला आपल्याकडे वेळ नसतो ) म्हणून आपण त्याची मराठी आवृत्ती घेतो, आणि त्या आकड्यात आणखी एकाची भर घालतो. हो की नाही?

मुद्दा इथे आहे!

    आपल्या किती मराठी लेखकांची पुस्तकं लाखांच्या आकड्यात विकली गेली असतील? किती मराठी लेखकांची पुस्तकं ऑस्ट्रेलियात,इंग्लंडमध्ये, यु एस मध्ये तिथली माणसं वाचत असतील?? मी तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल समजू शकतो. पण आपलं मराठी लेखन तेवढ्या ताकदीचं नाही असं म्हणत असाल तर तुम्ही घाई करीत आहात!
        अमृतातेही पैजा जिंकणारी सर्वगुणसंपन्न अशी आपली मराठी भाषा! हिची श्रीमंती काय वर्णावी? माझ्या मराठी भाषेचा ललाटास टिळा लावून अभिमानाने मिरवावं अशी आपली माय मराठी! आणि म्हणूनच आपल्या मराठी भाषेत लिहिलं गेलेलं लिखाणही अत्युच्च दर्जाचं आणि जगभर पोहोचवावं अशा पात्रतेचं नक्कीच आहे असं उच्चरवाने म्हणताना आपली जीभ चाचरता कामा नये. मग प्रश्न असा आहे की ही आपली ज्ञानसंपदा जागतिक पातळीवर ठळकपणे दिसत का नाही? जगातील दर सातवा माणूस जर भारतीय असेल तर जागतिक साहित्यात आपल्या साहित्याचा डंका का वाजत नाही?
      त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, की आपण आपलं साहित्य जागतिक बाजारपेठेत, जगाला समजेल अशा भाषेत नेण्यात कमी पडत आहोत!!
    बऱ्याच साहित्यिक व्यासपीठांवर या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा झडत आहेत. नामवंत समीक्षकांनी या मुद्द्यावर काळजी व्यक्त केली आहे. आपण इतरांचं साहित्य आवडीने वाचतो कारण ते आपल्याला आपल्या मराठी भाषेत उपलब्ध आहे, परंतु आपलं मराठी साहित्य इतर भाषांमधून इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण आणि आपले लेखक कितपत प्रयत्न करत आहेत? ज्यांच्या लक्षात ही गोष्ट आली, त्यांच्या पुस्तकांनी विक्रमी मजल मारली आहे. आमचा बाप अन आम्ही हे मा. नरेंद्र जाधवांचं आणि इडली ऑर्किड आणि मी हे विठ्ठल कामतांचं पुस्तक याचं ठळक उदाहरण आहे!
     बऱ्याच लेखक कवींना या मुद्द्याचं गांभीर्य आताशा लक्षात येऊ लागलं आहे. माझ्या सुदैवाने मला केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या बिझिनेस इंग्लिश पर्यंत मजल मारता आली. बेक ही जागतिक दर्जा असलेली इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मायमराठीचा झेंडा सातासमुद्रापार लावण्याची संधी मला चालून आली. मी आवडीने कित्येक मराठी पुस्तकांचं इंग्रजीकरण करून त्यांना जागतिक बाजारपेठेत दिमाखाने उतरवतो आहे. इंग्रजी आता जगभरात स्वीकारली गेली आहे.जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचं इंग्रजी रूपांतरण करण्याचा मी मनोमन निश्चय केला आहे. एक प्रकारे हा मायमराठीचा जागतिक जागरच आहे. माझ्यातला कवी जेव्हा एखाद्या काव्यसंग्रहाचं इंग्रजी रूपांतरण करताना त्यातला भाव मरु देत नाही, तेव्हा मूळ मराठी कविता इंग्रजीत वाचताना खूपच मस्त वाटतं.
प्रसिद्ध कवी विवेक उगलमूगले यांनी लिहिलेल्या 'आतला आवाज' या पूज्य महात्मा गांधींवर आधारीत कवितासंग्रहाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे, तर नुकत्याच नागपूरहून आलेल्या मा. शंकर घोरसे यांच्या 'बा स्वातंत्र्या' या संग्रहाचं रुपांतरण पूर्ण झालं आहे.
       सांगायचं एवढंच की येत्या काळात जर तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तुम्हाला टोकियो, लंडन, वॉशिंग्टन, मॉस्को मधल्या एखादया लायब्ररीत नाशकातल्या आपल्या एखाद्या प्रिय कवी लेखकाच्या मराठी आवृत्तीचं इंग्रजी व्हर्जन वाचताना तिथला कोणी गोरा वाचक दिसला तर थक्क होऊ नका!

लवकरच तो सुवर्णक्षण येणार आहे!!

✒️
-rajshelkenashik

📌 अटॅकिंग कोरोना आणि नशीबलेस माणसं!




📌
अटॅकिंग कोरोना आणि नशीबलेस माणसं!

      सध्याच्या लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये शासन, पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, शेतकरी समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असताना समाजसेवकांची खूप मोठी फळी घरोघरी जाऊन शिधावाटप आणि आवश्यक त्या ठिकाणी आर्थिक मदत करताना दिसते आहे. माणुसकीचं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे. माणसं घरीच आहेत, परंतु मनाने एकमेकांशी जोडली जात आहेत. सध्या कोणालाही कुणाबद्दल वैरभाव निर्माण झाल्यासारखं वाटत नाही.
जाईल रात्र काळी
होईल लख्ख सारे
पण तांबडे फुटेतो
थांबायला हवे तू!
असा धीर देत सगळ्यांचं भलंच होवो अशीच सगळ्यांची इच्छा दिसते आहे. संकटात अवघा माणूस एक झाला आहे!
         तरीही या सगळ्यांमध्ये एक वर्ग डोळ्यासमोर तरळून गेला, नशीबलेस!
        नाही! हा तो वर्ग नाही, जो मजुरांचा आहे, हा तोही वर्ग नाही, जो दुसरीकडे अडकून पडला आहे किंवा त्याचे दोन वेळचे खाण्याचे हाल होत आहेत. माझ्या नजरेत आलेले नशीबलेस दुसरेच आहेत. सध्या त्यांच्यावर कुठलंही आर्थिक संकट आलेलं नाही. बँकेत चिकार पैसा आहे, असाही एक खूप मोठा वर्ग आहे. घरात बसून आहे. जास्तीत जास्त त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असणार इतकंच. परंतु सोशल आय क्यु किंवा समाजांक असतो ना, त्या बाबतीत ही माणसं नशीबलेस आहेत. म्हणजे लॉकडाऊनच्या किंबहूना कोरोना क्रायसिसच्या अगोदर ही माणसं कधी समाजात जाऊन मिसळलीच नव्हती. चारचौघात जाऊन गप्पांची मैफिल रंगवण्यात ही माणसं त्यावेळेला कमी पडायची. कायम आपल्याच कोषात राहत असल्यामुळे किंवा अधिकारपणाचा बडेजाव असल्यामुळे आपण इतरांमध्ये मिसळू शकतो ही भावना त्यांच्यात तेव्हा नव्हतीच मुळी!
        आता तर ही माणसं अगदी एकाकी झाली आहेत. त्यांना साधी साधी माणसं भारी पडु लागलीयेत. बाहेरच्या जगाचं सोडा, ही माणसं घरातल्यांशीही धड बोलू शकत नाहीयेत. आपला मोबाईल आणि आपण. बस! घरात राहून बायकोशी बोलणार नाहीत, मुलांशी खेळणार नाहीत, आई वडिलांशी चर्चा करणार नाहीत.  त्यांना स्वतःला काय वाटतंय हेही बाकीच्यांना सांगणार नाहीत!! आपल्याच कोषात रमलेली. बिचारी नशीबलेस माणसं!
       सध्या प्रशासनाच्या परवानगीने गोरगरिबांना शिधावाटप करण्यासाठी खूप हात पुढे येत आहेत. ही नशीबलेस माणसं त्यात त्यांचा वाटा देवू इच्छितात, शकतात परंतु तेही त्यांना जमत नाहीये! त्यांच्याकडे पैसा आहे, पण पुढे होऊन 'मी इतकी रक्कम देतो' असं म्हणण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांच्याकडे धान्याची पोती भरलेली आहेत, पण मी पसाभर धान्य देतो असं म्हणण्याची त्यांच्यात हिंमत नाही आणि म्हणू तर कुणाला म्हणू?ही एक भीती त्यांना खात आहे. अवघड आहे हे सगळं. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना आतून असं वाटतं आहे की आपण काहीतरी मदत करायला पाहिजे पण, कोणाला मदत करायची? आणि कशी करायची? हेच त्यांना कळत नाहीये. त्यांचे नशीब त्यांना साथ देत नाहीये. त्यामुळे ही माणसं एकाकी पडल्यासारखी झाली आहेत. अगदी मानसिक Quarantine म्हणा हवं तर. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवसभर इतरांना वाटप करणारी दुसरी फळी बघितल्यावर यांच्या मनात कससंच होतं. पण करणार काय? तळमळत असतात बिचारी.

बाजू दुसरी-
असा एक वर्ग ज्यांचं नशीब खरोखरच पालथं पडलेलं आहे सध्या. यांना खूप सगळं हवं आहे. या वर्गाकडे पैसे नाहीयेत. त्यांच्याकडे शिधासुद्धा नाही. पण त्यांच्याकडे 'मुखवटा' आहे. तोच त्यांचा अडथळाही आहे. तो आहे म्हणूनच तर ते मागू शकत नाहीयेत. पुढे येऊन म्हणू शकत नाहीत की, 'मला द्या'. नशीबलेस बिचारी. त्यांना इतरांनी ओळखा आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना बळजबरी करून सगळं द्या.  तेव्हा तुम्ही निघून गेल्यावर ते आतून म्हणणार, "हो! मला हे पाहिजे होतं, पण माफ करा मी मागु शकलो नाही." नशीबलेस बिचारी माणसं!
       एका बाजूला देऊ न शकणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला घेऊ न शकणाऱ्या या दोन्ही नशीबलेस वाल्यांना आताच्या कोंडीच्या वातावरणात कुणीतरी एकत्र आणणं फार गरजेचं आहे.  त्यांच्यासाठी एखादा क्रमांक उपलब्ध करून द्यावा, की ज्याच्यावर ते कॉल करून म्हणतील की हो, मला एवढे पैसे द्यायचे आहेत, मला एवढा शिधा द्यायचा आहे. मागणारानेही म्हणावं की, हो मला गरज आहे, मला प्लिज देता आलं तर पहा. अगदी अगदी गॅसचा नंबर आपण लावतो, तसा!
      प्रशासनाने एखादी गाडी फिरवावी, अगदी माणुसकीची भिंत असावी तशी. ज्यांना द्यायचं आहे त्यांनी या गाडीमध्ये पसाभर धान्य टाकावं. तेव्हा तरी या पहिल्या गटातील नशीबलेस लोकांना अपूर्ण राहिलेलं त्यांचं देण्याचं  स्वप्न पूर्ण करता येईल, आणि दुसऱ्या गटातील नशीबलेस माणसांसाठी त्याच गाडीतील, हवा तितकाच गरजेचा शिधा उचलून घेण्याचीही व्यवस्था असावी, जेणेकरून त्यालाही मागण्याची लाज वाटणार नाही आणि तोही त्याच्या नशिबलेसपणातून थोडा बाहेर येईल. कदाचित त्याच्याकडे जे आहे ते तोही त्या गाडीत नक्की टाकण्याची शक्यता आहे, कारण माणसं तशी मनाने चांगली असतात! घंटागाडी आजकाल कचरा जमा करताना महिला वर्गाला बरीच शिस्त लावताना दिसते आहे. मास्क लावा, एकेक या वगैरे. हाच नियम इथेही करता येईल.
       एक असाही प्रश्न आहे की शिधा मिळाला तर कुटुंबाचा खाण्याचा प्रश्न सुटतो आहे हे खरेच आहे, पण काही बाबींसाठी केवळ आणि केवळ पैसाच लागतो हे नाकारून कसं चालेल?खोबरेल तेल, साबण, औषध हवं असेल तर किराणा दुकानात त्याला पैसेच द्यावे लागतील. अशा वेळी आर्थिक संकटात सापडलेलं कुटुंब काय करेल? आणि त्यावर उपाय म्हणून  पैसे वाटप करायचे ठरल्यास माणसं आपली माणुसजात विसरून क्षणात हावरट झालीच म्हणून समजा. फुकट मिळतंय म्हटलं की आपल्याला किती ची मूळ गरज होती ते माणसं पटकन विसरतात हा मोठा पेच आहे. परंतु काही कुटुंबाना पैशाचीही नितांत आवश्यकता आहे हे पूर्णसत्य आहे.
      माणसाने थोडसं मोकळं असावं.ज्याला मनातलं सांगता येतं, मांडता येतं तो नशीबवान! माणसं मोकळी नसली, की ती आतल्या आत कुढत राहतात आणि मग नशीब वेताळाचं रूप घेऊन त्यांच्या मानगुटीवर बसतं.
    आयुष्य हे इतके कसे
    परक्याप्रमाणे वागले
    जे जे नकोसे वाटले,
    नशिबात ते ते टाकले
अशी अवस्था होते. आजच्या कठीण प्रसंगात देण्याच्या यज्ञात झोकून देणाऱ्या सगळ्यांचच अगदी मनापासून करावं तितकं अभिनंदन कमीच आहे. तुमच्याकडे कुणी द्यायला आलं तर किमान त्यांना तुमच्याकडे आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटावं अशी मनस्वी वागणूक आणि सन्मान त्यांना  द्या.
      तुम्ही द्यायला जात असाल, तर चमकोगिरी करू नका.
      काहीच नाही तर किमान आपल्या परिचयातल्या एखाद्याला तरी फोन करून हे  विचारा की काही मदत हवीय का? तुम्ही देऊ शकत नसाल तरीही! एव्हढ्यानेही माणुसकी जिवंत राहील.
  एक आशेचा दिवा
  मी पेटता जो ठेवला
  सावरायाला मला
  तो जीव जाळत राहिला!
याची जाणीव ठेवून.

      जे जे सध्यापुरते टेम्पररी नशीबलेस आहेत, त्यांना नशीबवानांच्या पंक्तीत येण्यासाठी योग्य संधी मिळो ही सदिच्छा.

हे दिवस आले तसे जातीलही
माणसांची काळजी घेऊ चला!

✒️
- rajshelkenashik

📌 गझलेत रमलेलं एक मनस्वी व्यक्तिमत्व : प्रा. तुकाराम पाटील


📌
गझलेत रमलेलं एक मनस्वी व्यक्तिमत्व : प्रा. तुकाराम पाटील


      प्रसिद्ध गझलकार माननीय प्रा. तुकाराम पाटील सर, पुणे यांचे काही शेर पोस्ट करतो आहे. सरांबद्दल थोडंसं...
      मृत्युंजयकार शिवाजी सावंतांच्या सानिध्याने आणि मार्गदर्शनाने सरांची साहित्यिक वाटचाल दमदार झाली.
       सरांचे एकूण 8 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या,7 काव्यसंग्रह, 6 नाटके एकांकिका, 4 बालसंग्रह आणि निर्मोही, हे बंध रेशमाचे, रूजुवात आणि तुकाराम पाटील यांच्या निवडक गझला असे चार गझलसंग्रह, इतक्या प्रचंड प्रमाणात साहित्य लेखन आहे. ही एक मोठी तपश्चर्या आहे.
      मराठी गझलचे खलिफा कविवर्य सुरेश भट यांनी स्वतः सरांना मार्गदर्शन केलेलं आहे. निर्मोही ला प्रस्तावनाही लिहिली आहे. मा. प्रदीप निफाडकर सर, म भा चव्हाण सर, रमण रणदिवे हा त्यांचा तेव्हाचा गोतावळा! इतके सारे असूनही सरांचे पाय जमिनीवर घट्ट आहेत.
       सरांच्या प्रसिद्ध शेरांपैकी काही आपल्यापुढे ठेवत आहे.आशा आहे की ते आपल्याला नक्की आवडतील.



१.  तू वैभवात साऱ्या ल्यालीस तारकांना
     माझे जुनेर अंगी ओढू नकोस बाई!

२. मी पुरा समजून होतो दोष हा नाही कुणाचा,
 संशयी माझ्या मनाला यातना डसणार होत्या!

३. आज येथे संकटाच्या पावसाचा जोर आहे,
    तोड सारी बंधने अन कोरडी राहून जा तू

४.  भगवे, निळे, गुलाबी, हिरवे, तसेच पिवळे,
      रंगावरून फसव्या का रक्त सांडतो मी

५. कोणी शराबखाने उमजून बांधले हे
    ही मोडकी शिडी हो स्वर्गास जोडलेली

६. मला भाकरी माझी मिळते पुण्याईची कर्तृत्वाची
त्याच बळावर म्हणून कोठे हरलो नाही कळले आता

७. बरे झाले घराला मी झरोके ठेवले मोठे
  झरोक्याच्याच कानांनी विराण्या ऐकल्या काही

८. काय ही धुंदी यशाची काय हा व्यवहार त्यांचा
  हा विचारी त्या यशाने नेमका आसूर झाला

१०. जनीचे दळण दळताना विठाई लाजली नाही,
स्मराया माणसे आपुली असे का लाजतो आम्ही

११. बाजार भोवताली भलतेच स्वस्त झाले,
प्रेमात कैक नकली आलेत वान आता


 १२. जिंदगीला झिंग यावी एवढा मी व्यस्त आहे
 दुःख मी घेतो खरेदी गझल त्याचा दस्त आहे

१३. पाठीवरी पखाली आजन्म लादलेल्या,
      ओझे वहावयाला सारे तयार होते!

१४ विश्वास संपलेला परतून काय येतो?
ते शब्द साखरेचे घोळून बोलताना?

१५ तू दिल्या होत्यास काही बोच-या जखमा मलाही,
 त्यातल्या थोड्या तुलाही नेमक्या छळणार होत्या!

१६. ह्या राजकारण्यांनी केला हिशेब नाही,
कुरणात कोण कुठल्या चरला किती कळेना!

१७. केलेले होते तयांनी घाव जबरी जीवघेणे,
शेवटी सगळ्या जगाचे मानले आभार त्यांनी!

१८. माझीच जिंदगी मी पिसतो जराजराशी,
 हुकमी जुनाच पत्ता एकेक टाकतो मी!

१९. दावतो माझा मलाही चेहरा हा आरसा,
मी मला पाहून तेव्हा त्याच जागी थांबतो!

२०. देण्यासाठी नव्हते काही कंगालाचे जगणे जगलो,
जे जे माझे होते ते ते वाटसरूंनी लुटले होते!

२१. मघाशी दार वाऱ्याने घराचे ढकलले मागे,
परी मी पाहिले तेव्हा पळाल्या सावल्या काही

२२. दारात करपला चाफा,
पाऊस बरसला नाही!

२३. चितचोर चांदण्यांचे हसणे लबाड असते
 चंद्रास झुलवण्याचे करतात डाव नकली

२४. देश मी माझा म्हणाया लागलो तेव्हाच कळले,
चैन करती सर्व नेते कर्ज माझ्या वाटणीला!

२५.  तू घरी येतेस तेव्हा बंद नसते दार माझे,
जायला सांगू कसा मी तो मला अधिकार नाही!

२६. भाकरी मागू नका हो,
 काम इथले बंद आहे!

✒️
rajshelkesir@gmail.com

एक कवी; एक कविता : इरफान शेख, चंद्रपूर

📌


एक कवी ; एक कविता : कवी - इरफान शेख, चंद्रपूर

      पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी भरपूर वाचन केलं. पुस्तकांची श्रीमंती हीच एका कवीची खरी श्रीमंती.
      पुस्तक आणि कवी यांच्यामधलं नातं सांगणारी चंद्रपूरचा कवीमित्र इरफान शेख याची ही कविता काल वाचली, आणि वाटलं, यानिमित्ताने या कवितेचं इंग्रजी भाषांतर का करू नये? अनेक पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रहातील, जगभर पोहोचावी अशी ही सुंदर कविता तुमच्याशीही नक्कीच दोन शब्द बोलेल,शिवाय कवीने कुठल्या उंचीचं लिहावं याबद्दलही हितगुज करेल.

काव्यसंग्रह-
माझ्यातला कवी मरत चाललाय...

कवी - इरफान शेख, चंद्रपूर

इंग्रजी रूपांतर - प्रा. राज शेळके, नाशिक

कपाटात बंद पुस्तके पाहतात काचेआडून...

कपाटात बंद पुस्तके पाहतात काचेआडून मला
जेव्हा मी घेतो वाचायला एखादे पुस्तक हातात
 तेव्हा ती पडतात भडाभडा खाली कपाटातून
बंदिस्त दुःखाने सांडावे मोकळेपणाने तशीच...

मी वाचावे त्यांना म्हणून बघतात ती आशेने
पडतात एकमेकांच्या उरावर माझी जावी नजर म्हणून
माझ्या नजरेखालून जावा अक्षरांचा थवा उडत
त्यासाठी मोकळे करतात ही पुस्तके आभाळ पानांचे...

याच पुस्तकांनी लावला जीव माझ्या धगधगत्या आयुष्यात
म्हणूनच मी जिंकू शकलो लढाई जगण्याच्या समरभूमीत
मी ऐकतो कधी कधी अर्ध्या रात्री कपाटातून येणारे हुंदके
फडफडणारी पाने जेव्हा हिरमुसतात, स्फुंदत अन रडतात...

मीही नाही राहिलो मात्र त्यांच्याशी कृतघ्न कधी
जिथे जिथे दिसली तिथून आणली मी बोट धरून यांना
आता मातृत्वाच्या नजरेने पुस्तकांनीच धरलं आहे माझं बोट
 हे न जाणण्याइतपत नाही होऊ शकत मी बेईमान...

रणरणत्या उन्हात याच पुस्तकांनी धरली डोक्यावर सावली
वेदनेवर असहायतेच्या घातली फुंकर माझ्या सदाच
बहरून आणलं माझं जगणं अनुभवाच्या फळाफुलांनी
परसदार केलं हिरवंगार याच पुस्तकांमधल्या अक्षरांच्या वेलींनी...

माझ्या खांद्यावर असणाऱ्या मुलालाही दाखवावी दिशा पुस्तकांनी
बापाच्या कणखर इराद्याने सांभाळावं मी नसताना आसपास त्याच्या
मायेच्या ओलभरल्या शब्दानी गोंजारावे माझ्या येणाऱ्या पिढीला
पुस्तकांना एवढेच मागत असतो दान मी माझ्या झोळीत!

-



Anthology -
The poet in me is dying ...

Poet-
Irfan Shaikh, Chandrapur.

Transcreation -
Prof.Raj Shelke, Nashik


Books locked in cupboards, look through the glass...

Books locked in cupboards,
Look at me through the glass
When I take a book to read,
They fall out of the cupboard
As if the closed grief feeling free to pour out...

They look up with hopeful eyes,
So I can read them
They fall on each other's chests to catch my eye
They open the heavens of pages
So that the flock of letters can fly through my sight,

These books brought me to life in my fiery life
That’s why I was able to win
The battle on the battlefield of survival
I sometimes hear hoots
Coming out of the closet In the middle of the night
When the fluttering pages
Lose their hearts, sob and cry ...

I,too never have been ungrateful to them
Wherever they appeared, I grabbed their finger
And brought them home
Now books are holding my finger
 With a motherly sight
Unbeknownst to it, I can't be dishonest ...

These very books cast
A shadow over my head
In the scorching sun
They always blew on the pain of my helplessness 
They brought my life to fruition
With the fruits of experience
The vines of the letters in these books
Made my backyard green

I hope books will
guide the child
Sitting on my shoulder 
When I am not around, They should take care of him
With the firm intention of a father
They should fondle my coming generation
With mother's warm loving words...

That's all I ask for books In my bag  !

-


✒️
rajshelkesir@gmail.com

कवितेचं गाणं करणारा कवी : अरुण इंगळे


📌

कवितेचं गाणं करणारा कवी : अरुण इंगळे


         गोड गळ्याचं दान सृष्टीनं ज्याला भरभरून दिलं असा एक कलंदर कवी म्हणजे कवी अरुण इंगळे सर. त्यांच्या हुंकार मातीचा या काव्यसंग्रहाचा नुकताच आस्वाद घेतला. वाचकाला स्वतःच्या शब्दांत गुंफून घेण्याची किमया अरुण यांना लीलया साधली आहे.

शब्द फुलावे मनात
जशी पालवी पानात
 हितगुज भावनांचे
 शब्द रुजावे कानात
किंवा

धुंद वाऱ्याच्या पायात
 कोणी बांधला भोवरा
ऋतू नवीन येताना
झाला कावराबावरा...
  अशी अलवार शब्दकळा घेऊन त्यांची कविता आपल्याला भेटते. निसर्गातील विविध बदल कवी अगदी सहज टिपतो.
आणि या ओळी तर पहा,

रानावनात गोंगाट
वारा खट्याळ घुमतो
वाऱ्याच्या या तालावर
 सारा शिवार डोलतो

      पावसाचं माणसाशी असलेलं नातं अधोरेखित करणाऱ्या अनेक रचना या संग्रहात आहेत. काही पावसासाठीच्या, काही त्याच्या नंतरच्या तर काही त्याच्या न येण्याच्या. कविवर्य विठ्ठल वाघांनी मांडलेल्या

' पाऊस टाळतो येणे
 कधी विसरतो जाणे'

 या अनुभवाची प्रचिती अरुण यांच्या विविध कवितांमधून येत राहते.

थेंब ढवळा नि निळा
कवटाळतो मातीला
सारं करून हिरवं
 रंग लावतो पाठीला

नभी दाटता गारवा
फुटे पाण्याची घागर
ओल्या डोंगरकुशीत
उरी सुखाचा पाझर

साऱ्या सृष्टीचा हुंदका
गेला आभाळाच्या कानी
सरसर बरसून
त्यानं केलं आबादानी

      या काव्यओळी याची साक्ष देतात. कालचक्र चालत राहतं, ऋतू बदलत राहतो. परंतु मातीत मळणाऱ्या गावगाड्यातल्या माणसांच्या आयुष्याची उलथापालथ करून जातो. त्यांचं सोसणं अरुण इंगळे यांची कविता प्रामाणिकपणे मांडत राहते .

हात राबता राबता
घट्टा हाताला निब्बर
घट्ट्यातून हिरवाई
डोळी झुलते अंबर

यातून राबणारे हात डोळ्यांसमोर उभे राहतात. मग पोराच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणारा बाप

पैसा जोडून जोडून
तुझ्या बांधला गाठीला
 तूच व्हायचं आधार
माझ्या साठीच्या काठीला
     अशी अपेक्षा व्यक्त करतो, तर हतबल बापाचं दुर्दैव रेखाटताना मुलगा

गेलं मातीत विरून
 सारं सुगीचं सपान
स्वत: विझून एकटा
 गेला पेटवून रान

 या शब्दांचा आसरा घेतो. बापाला आलेल्या कटू अनुभवांना मांडताना

चामडी पायताणागत
तू झिजून झिजून वाकडा झालास कमरेत डोळ्यात अंधार साठवून,
घरभर फिरत होतास तू
भूतकाळाचा पसारा होऊन
तेव्हा हक्काच्या आधाराच्या काठ्या
 नेमक्या तुझ्या हाताशी लागल्या नाहीत
      अशी जग-रीत मांडतो. पण अरुण यांचा नायक धीर सोडणाऱ्यांपैकी नाही. उलट

कधी नाही रडायचं
सदा आपण हसायचं
दु:ख किती आले तरी
 त्याला नाही घाबरायचं...
अशी ठाम भूमिका घेतो.

उद्याचे तारे मोर पिसारे
उद्याची आम्हीच किरणे
क्षणा-क्षणाला जगणं सोडूनी
उगाच कशाला मरणे
मुक्त होऊनी पंखामध्ये
सारं आकाश भरायचं...
 असं म्हणत पुन्हा आकाश कवेत घेण्याची तयारी करतो!

मन ठेवूनी निर्मळ
भरू पंखामध्ये बळ
माणसाचा माणसाशी
देवू घालुनिया मेळ
कायमची मिटेल ती
दोन मनातली दरी...
किंवा
एक दिस भाकरीचा
चंद्र येईन दाराशी
चंद्रमौळी झोपडीत
 घालू रिंगण आकाशी

अशा आशावाद पेरणाऱ्या रचना रसिकाला खिळवून ठेवतात.

आईवडिलांबद्दल सांगताना कवीचे शब्द थकत नाहीत.

सारं विश्व पदरात
कसं मोजू मी आकाश
तुझ्या डोळ्यांत साचला
लाख सूर्याचा प्रकाश
किंवा

पावसाची सर । मायेचा पाझर ।
 सुखाची झालर । बाप माझा ।।
या त्यांच्या ओळी अंतरीचा ओलावा स्पष्ट करतात.

ज्या मायबाप या कार्यक्रमाने अरुण राज यांनी जनमानसावर गारुड केलं त्याच्या खालील मुखगीतपंक्ती वाचकाचं नातं आईवडिलांशी पुन्हा घट्ट करतात,

 माय बापाची विसरू नका कीर्ती
 तेच आपले आभाळ आपली धरती
 सांभाळती दौलत लेकरांची
 जाळूनी जिवांच्या ज्योती
मायबाप... मायबाप...

 माणुसकीचा खळखळता झरा असणाऱ्या सर्वगुणसंपन्न अरुण इंगळे सरांच्या पुढील काव्यप्रवासास आपण सर्वच रसिकमित्र शुभेच्छा देऊयात.

✒️
rajshelkesir@gmail.com

कविवर्य नारायण सुर्वे : एक मुक्त चिंतन

📌

कविवर्य नारायण सुर्वे : एक मुक्त चिंतन


🚩🚩🚩

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
 सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.

-अर्थातच, पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे!

        कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकरांनी नारायण सुर्वे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि त्यानंतर अनेक कवितांमधून कविवर्य नारायण सुर्वे लखलखत राहिले. त्यांच्या शब्दांनी चळवळ उभी केली. त्यांची कविता म्हणजे घणाघात झाली. महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. कुठलाही आडपडदा न ठेवता थेट हल्लाबोल करणारी ही कविता कामगारांच्या गळ्यातील ताईत झाली नसती तरच नवल! आयुष्याची सायंकाळ कुसुमाग्रजांच्या शब्दछायेत घालवावी या उद्देशाने सुर्व्यांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याचं ठरवलं. दोन महान शब्दसाधकांच्या राहिवासाने  नाशिकनगरी काव्यमय झाली. शेवटचा श्वास मात्र सुर्व्यांनी त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत घेतला. त्यांच्याच काही रचनांचा हा ठेवा खास आपल्यासाठी!
        ऐसा गा मी ब्रह्म हा नारायण सुर्वे यांचा पहिलाच काव्यसंग्रह! त्यानंतर त्यांचे 'जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, माझे विद्यापीठ, सनद' असे सर्वच संग्रह मैलाचे दगड ठरले!
       एका कवीचं काव्यविश्व आणि त्याची खरी परिस्थिती सुर्व्यांनी खूप चपखल पकडली आहे. कल्पनेच्या आकाशाचा मालक असलेल्या कवीला या कवितेच्या शेवटच्या ओळीत सुर्वे जमिनीवर आणून ठेवतात!

घालीन मी साऱ्या । ब्रह्मांडास पाठी ।
सोडवीन गाठी । दिक्कालांच्या ॥
विश्वाचे गोकुळ | खेळे माझ्या दारी ।
सूर्याची लगोरी टिचवीन ॥
ढगांचा गा हत्ती । बांधीन मी दारी।
भरीन घागरी | अमृताने ||
ऐसा गा मी ब्रह्म । विश्वाचा आधार ।
खोलीस लाचार | हक्काचिया ॥
   
   परंतु निसर्गाशी गप्पा मारताना कवी अगदी एकरूप होऊन जातो. पक्ष्यांशी बोलताना

हिरव्या पक्ष्यांनो फुलवा ही बाग
भूपाळीत ओवा मालकंस राग

अशी साद घालतो, तर अगदी सुर्यालाही नमस्कार करायला भाग पाडतो!

अगा सूर्यदेवा स्पर्श करा येथे
ऐश्या भूमीपुढे नमवावे माथे

परंतु प्रत्येकच कवीला आर्थिक बाबतीत सद्भाग्य मिळतेच असे नव्हे.

कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकविता आले असते

        अशी अवस्थाही बऱ्याच जणांची होते. सुर्वे ती दुखरी नस पकडतात. त्याचबरोबर पत्नीचा आपल्या पतीवरचा विश्वास त्याला किती सजग रहायला भाग पाडतो तेही दोन ओळीत सांगतात

तुझ्या पापण्यांचा पहारा माझ्या शब्दांवर असतो
 म्हणून माझ्या पद्यपंक्तीत व्यभिचाराचा अंश नसतो

  वाह! प्रत्येक कवीला हे भाग्य मिळावं आणि त्याच्या व्यभिचाराचा स्पर्शही होऊ नये ही भावनाच उच्च आहे.

     मला खात्री आहे की, पुढील कवितेची लहानपणी पारायणं केलेले माझ्यासह आपल्यापैकी बरेचजण असतील, ती आठवण ताजी व्हावी म्हणून पूर्ण कविताच देतो

दोन दिवस वाट पाहाण्यात गेले; दोन दुःखात गेले
 हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली

हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेंहि क्षण आले
 तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
 दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले.
दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दुःखात गेले!

      प्रत्येक शब्द अगदी तावून सुलाखून निघालेला. भाकरीचा चंद्र तेव्हापासून आजतागायत मराठी साहित्यिकांचा परवलीचा शब्द बनला. शब्दांचं सोनं करण्याचं भागग असं सगळ्याच कवींच्या भाग्यात असतं थोडीच? आपला भवताल, बेगडी माणसं यांतही स्वतःला जागं ठेवताना ते मनाला बजावतात

त्याच दिवशी मनाच्या एका
कोऱ्या पानावर लिहिले, "हे नारायणा,
अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट
लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा."

      36 कडव्यांची माझे विद्यापीठ ही कविता वाचताना आपण केव्हा सुर्वेमय होतो ते आपल्याही लक्षात येत नाही
       कामगारांचं कष्टकऱ्यांचं आयुष्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून जोरकसपणे मांडताना सुर्व्यांनी कधीच शब्दांची कसर केली नाही. येतील तसे शब्द येऊ दिले, त्यांना प्रमाण भाषेच्या बेड्यांमध्ये अडकू दिलं नाही. मुंबई महानगरातील कॉस्मोपोलिटन पोर्टस वर काम करणाऱ्या कामगारांची जी रांगडी भाषा तीच सुर्व्यांच्या कवितेची भाषा झाली!

आफ्रिकी चाचा चिडे, धुके, म्हणे: "काम नहीं करेगा."
चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा?"

टरकावले घामेजले खमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरू पहिले वाक्य बोलला,

"हमारा खून झिंदाबाद !" वाटले, चाचाने उलचलाच पृथ्वीगोल
 खळाळल्या नसानसांत लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अशा शब्दांत सुर्व्यांनी अक्षरशः निखारे ओतले!
नेहरूंच्या निधनाच्या दिवशी वेगवेगळ्या थरातील लोकांनी आपापल्या परीने संवेदना प्रकट केल्या, तिथे कामगारांची प्रतिक्रिया अशी होती-

क्या हुआ ए सुंद्रे ! '
आज लोबन मत जला! ...नेहरू गये !!
'सच; तो चलो आज छुट्टी !..
शीण पेलणारे जग खाटेवर कलले.
नेहरू गेले त्यावेळची गोष्ट!

      कामगारांचं नेतृत्व करणाऱ्याला प्रलोभनांची ताटं ओवाळण्यासाठी तयारच असतात. परंतु ज्याचं हृदय सच्च्या कामगाराचं आहे, तो त्यांना बळी पडत नाही उलट जिद्दीने पुढे जात राहतो. सुर्व्यांच्या खालील ओळी याची प्रचिती देतात.

झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असे नाही.

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.

शिवाय, पाठीमागून येणाऱ्यांना सांगायलाही ते विसरत नाहीत

मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार
"सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही."

     समस्त कविलोकांसाठी एक जळजळीत वास्तव सुर्व्यांनी दाऊदचाचाच्या माध्यमातून तेव्हाच सांगून ठेवलंय

एक ध्यान ठेव बेटा !
शब्द लिखना बडा सोपा है
सब्दासाठी जीना मुश्किल है.

प्रत्येक संघर्षानंतर फलप्राप्ती अटळ आहे हा आशावाद सांगताना सुर्वे सोप्या शब्दांत म्हणतात

 याच वस्तीतून आपला सूर्य येईल
 तोवर मला गातच राहिले पाहिजे!


          सुर्व्यांची मनिआडर ही कविता आपल्याला सुन्न करून टाकते. देहव्यापार करून मुंबईत पोट भरणाऱ्या बाईचं निमित्त करून सुर्वे समाजमनाचा तळ अक्षरशः ढवळून काढतात.

आन हे बगा....
असंबी लिवा,
का मी खुस हायः
आंग ठनाकतंय पर म्हनावं,
गावापक्षा बरं हाय.

ढगावानी मानूस येतो आन
म्हामूर होतो बगा...
पन बबडी
डूक धरल्यावानी परतेकाला इचारते,
'माज्याकडं येन्याआदी
किती जनीकडे गेलता !
अवं तो पुरुस;
 बसा म्हनलं; बसावं,
 त्येच्या बायकांनी दावं का सोडावं...
- हे तुमाला सांगते.

म्होरं लिवा -
मनीआइर उशिरानी का व्हयना,
 पर जाती.
म्हनावं- नवी वजरटीक घड़वलीय
वाक्या पाटिवल्यात इष्णूकडं
आन् धा कमी पन्नास रुपयबी
 त्येचं गंगीला याक पुस्तक प्या.
नाम्याला चरडी
रोजचं धा पैसं द्या
म्हंजी पळल पोरगं साळ ला
- दोघासनी मुका बी लिवा.

आता हितंबी म्हागाई वाढलीय.
मानसाला नवी चादर लागती.
गिलासावरलं पानी उडालंय...
नुसता कंद्या न्हाई पुरत,
पंकाबी लागतो.
- हे नगा लिवू,
 पर तुमी ऐकता म्हनून म्हनले.

बगा, मला हसू येतंय,
सांगू का नगं, असं व्हतंय...
मागं याक गि-हाईक आलं,
'हितं रहान्यापरीस
बाईल व्हशील का?" म्हनलं....
'आता हाय की मी शेजंला तुमच्या-
म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं.
अख्ख्या पुरुस जातीचं मला हसू आलं.

हे कातडं लई वंगाळ बगा.
मानूस गोचिडीवानी चिकाटतं.
आन् कायबी बोलून जातं.
पुरुस जातीचं मला हसूबी येतं,
अन रडूबी येतं बगा.....
पर ह्या कातड्याची
ढोरावानी वड असती मानसाला!
-
लोचट माणसांच्या सोज्वळपणाचा बुरखा टराटरा फाडणारी ही कविता!

      कामगार असला म्हणजे तो फक्त ढोरकष्ट उपसण्यासाठीच असतो असं नव्हे. त्याच्या आतही एक संवेदनशील मन असतं. म्हणूनच एक कामगार त्याच्या मालकाला स्पष्ट म्हणतो

सगळी कामं सांगा,
तेवढं ते घरटं पाडायचं काम सांगू नगा
जीव उदास व्हतो...

       केवढ्या कमी शब्दांत केवढं हे जगण्याचं भान आणि तत्त्वज्ञान!
      बाह्यरूप हे माणसाचं खरं रूप नव्हे! तुम्ही कितीही नटा, माणूस मेल्यावर त्याच्या शरीराची दुर्गंधी ही येणारच! मग शुद्ध माणूस सापडावा कसा?


हा धेह रोज आपन धुतो
गंधटिळं लावतो.
इट्टल गजरात सकाळधरनं मिरवतो,
इटाळ नगं म्हून सांभाळतो...
पोथीपुराणं वाचतो...
सुद्ध करतो... आन् इतकी घान.
मानसाला इतकी घान असती?

   दुसऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी इथली व्यवस्था सामान्य माणसाला कधीही वर येऊ देत नाही. त्याला हे कळलं तरी तो काही करू शकत नाही, इतकंच म्हणतो...

  साला अपन लोगच पांडू है
 इसलिये इंडिया का पॉलिटिक्स गांडू है'

बाकीच्यांनी पायरी सोडली तरी तो तसं करण्यास धजावत नाही. 'माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय' नोंदवताना तो म्हणतो

हे माझ्या देशा;
सूर्यकुलाचे आपणही एक सभासद म्हणून,
सूर्यकुलाला शोभेसेच वर्तन व्हावे!

म्हणून हा देश अजूनही टिकून आहे.

तेव्हा मोबाईल्स नव्हते, पण बायकोला निरोप देण्याची नवऱ्याची पद्धत तर बघा,

माझ्याकडून काहीच कळले नाही;
तर समज,
मी ठीकच असेन.

कातडीबचाव लोकांचं ढोंग समाजासमोर आणताना हा कामगार म्हणतो

म्हणजे काय की
घरंदाज माणसेसुद्धा आता बिथरलीत
पण ती बोलत नाहीत
आम्ही बोलतो!

       मर्ढेकरांशी एक बातचीत ही कविता मुळातच अभ्यासण्यासारखी आहे.मर्ढेकरांचा गणपत वाणी, हो तोच बिडी पिणारा, सुर्व्यांनी त्यांच्या शब्दात त्याचा समाचार घेतलाय. ते म्हणतात,

परंतु मर्ढेकर !
गणपत वाण्याचा एकूणच प्रवास....
काड्यांचा चोथा केव्हाच थुंकला त्याने.
माडीही बांधली आहे.
विधानसभेत 'फाड-फाड' बोलतो.
दाराशी नवी गाडी आहे.

 या कवितेत कविवर्य नारायण सुर्वे यांनी एक जळजळीत वास्तव सांगून ठेवलंय. माझ्यासाठी ते एखाद्या दिपस्तंभासारखं आहे,जे मी कायम डोळ्यांसमोर ठेवतो.ते वाक्य म्हणजे

....कवीचा अहंकार फार मोठा असतो म्हणतात !

'तुमचंच नाव लिवा' या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय शेवटाकडे कसं येता येईल? बापाचं नाव ठाऊक नसलेल्या पोराचं नाव शाळेत घालताना त्याची आई फँड्री चित्रपटातल्या शेवटच्या दृश्यातला दगड आपल्या अंगावर भिरकवते!

मास्तर, लिवा -
तुमचंच नाव लिवा;

खरं सांगते;
मरीआईला समरून सांगते,
 लिवा तुमी
 होच्या केसाची जटा बगा मास्तर:
कसा नागाचा फडा हाय त्यो....
अवं, देवाच देणं हाय त्ये.. देवावं.

मास्तर, जिमीन उतमातती...
व्हय उफानती, पन
नांगर घातल्याबिना आन्,
बी पेरल्या बिना,
रोप वर उगत का? उगतं? बोला.
मंग बापाच्या जागी माजं नाव लिवून कसं चालंल?
बाप न्हाई म्हनलं तर पोराचं कसं जमंल....

कनच्याबी देवाचं नांव नगा लिवू
 मानसाचंच लिहा..
देवानं काय केलंय हो,
वटी तेनं भरली नाही...
तुमचंच लिवा.

जात नगा इचारू,
अवं, आमी कुना एकाची का बायली हावंत मास्तर,
 घरोट्यातल्या बाया नव्हत आमी,
 तेवढं कुठलं नशिबाला...

तेचा जलम हितलाच.
फाटला जलामला त्यो,
पॉट निरनाखाली सराकलं;
 ना सुईण, ना काय जवळ,
 मन चराकलं...पन मग हराकालं.

पड, पोरा पड पाया.
पड़ ह्येनच्या पाया.
पर तेवढं तुमचंच नाव लिहा


प्रिय मित्रहो,
आपण आपल्या कविता सर्वांसमोर मांडण्यासाठी किती उत्सुक असतो! परंतु आपण इतर साहित्य किती वाचतो? ह्या प्रश्नाने मला छळू नये म्हणून मांडलेला हा प्रपंच!!


✒️
rajshelkesir@gmail.com

गझल । बरी नव्हे




घरातल्या घरात ही कुचाळकी बरी नव्हे
घरास मीच पोसते! फुशारकी  बरी नव्हे

जशी मला तशी तुला गरज सदैव राहिली
'नकोच तू' अशी जिव्हा प्रचारकी बरी नव्हे

घरात चार माणसे इथे कुणी न पाहुणा
तरी उगाच ही मनात भावकी बरी नव्हे

तुझे नशीब चांगले म्हणून ही तुला मुभा
नव्या घरात ही नवी हुशारकी बरी नव्हे

मरेपर्यंत जर इथेच नांदणे असेल तर
विघातकी नजर कुटील बेरकी बरी नव्हे

जिथे तिथे तुलाच मान पाहिजे, खुशाल घे
परंतु लायकीविना पुढारकी बरी नव्हे!


( _वृत्त- कलिंदनंदिनी_ )


rajshelkesir@gmail.com

Thursday, May 7, 2020

नाशिकच्या कवितेला पडलेलं एक सुंदर स्वप्न : कविवर्य किशोर पाठक

📌

नाशिकच्या कवितेला पडलेलं एक सुंदर स्वप्न : कविवर्य किशोर पाठक



        किशोर पाठक सरांचं देहावसान झालं. परंतु आपल्या शब्दांच्या सुगंधाच्या रूपाने ते अवघ्या महाराष्ट्रातल्या काव्यक्षेत्रात अविरत दरवळत राहतील, असं त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाकडे पाहिल्यावर सहज लक्षात येईल.
         *8 काव्यसंग्रह, 2 ललित लेखसंग्रह, 2 कादंबऱ्या,  4 नाटके, 5 एकांकिका, 2 बालनाट्य, 2 कथासंग्रह, 2 समीक्षा आणि तब्बल 12 बालकविता संग्रह!* किशोरदा म्हणजे शब्दांच्या गुंजारवात अखंड बुडालेला भ्रमर जणू! म्हणूनच सध्याच्या *इयत्ता 4 थी आणि दहावीच्या पाठयपुस्तकात* किशोर सरांच्या कवितांना मानाचं पान मिळालेलं आहे.
        किशोरदांच्या *पालव, आभाळाचा अनुस्वार, निरूपण, मी मृगजळ पेरीत, संभवा, काळा तुकतुकीत उजेड, बेचकीत जन्मतो जीव*, वगैरे संग्रहातील कविता पाहिल्या तर त्या वाचकाला जागेवर स्तब्ध करून सोडतात! संभवा हा तर फक्त *स्त्री जाणिवांचा धांडोळा* घेणारा संग्रह! एकेक शब्द आभाळाएव्हढा आशय सांगणारा!
        तात्यासाहेब अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या  सावलीत किशोर सरांची कविता प्रगल्भ होत राहिली. *नाशिकच्या सर्वच  सन्माननीय कवी लेखकांचे जिवलग मित्र* असलेल्या किशोरदांना अवघ्या महाराष्ट्र्रभर आणि बाहेरही गोतावळा मिळाला. त्यांची
 *हत्ती पळतो तुरुतुरु,*
 *हरीण चाले हळूहळू*
ही कविता प्रसिद्ध कवी *रवींद्र मालुंजकर* यांनी सर्वदूर पोहचवली, तर प्रसिद्ध कवी *भूषण कटककर* यांनी त्यांना सार्थपणे *कवितेचा दीपस्तंभ* म्हटले!
       कविवर्य किशोर पाठक यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडिया ही बाब जेव्हा अस्तित्वात नव्हती, मोबाईल फोन आला नव्हता, तेव्हापासून तर आताच्या *हायटेक* मोबाईल युगात, दोन्ही काळात त्यांनी स्वतःला व त्यांच्या कवितांना खूप अनायासे *मॅच* करून घेतलं! ते कायम फ्रंटला राहिले. कवितेशी एकनिष्ठ राहिले. आपल्यापैकी कितीजण ब्लॉग लिहितात माहीत नाही, परंतु kishorpathak.blogspot वर गेलात तर तुम्हाला तिथे त्यांच्या कवितांचा खजिना सापडेल! म्हणजे *ऑनलाईनचा आधुनिक टच* सुद्धा त्यांनी सहज स्वीकारला. अर्थात त्यामागे त्यांच्या हरहुन्नरी चिरंजीवांचा म्हणजेच *मित्र प्रथमेश* चा मोठा वाटा आहे, परंतु बदलत्या काळानुसार टिकून,टिकवून आणि स्वतःला समायोजित करून असणं ही खूप मोठी व अवघड गोष्ट त्यांना साध्य झाली हे तितकंच खरं.
      किशोरदांबद्दल खूप लिहिण्यासारखं आहे, परंतु विस्तारभयास्तव आज त्यांच्या फक्त *बालकवितांचा खजिना* मी तुमच्यासमोर रिता करू इच्छीतो. त्यातील या निवडक ओळी तुम्हाला नक्की आवडतील याची मला खात्री आहे!

*पाळण्यात ठेवला चंद्र त्याला दोन झोके दिले*
*चंद्रावरचे सगळे ससे हवेत उडून गेले*
( वाह!)

*आभाळ खाली पडत नाही चंद्र कधी उडत नाही*
 *खोल खोल समुद्रात सूर्य कधी बुडत नाही*
(ग्रेटच!)

*पान कधी बोलत नाही झाड कधी चालत नाही*
*फुलपाखरांच्या डोळ्यामध्ये काजळ कुणी घालत नाही*
( मस्त ना?)

*आजोबा जेव्हा घरात असतात*
*टीव्ही टेप गप्प बसतात!!*
(आजोबांचा धाक!)

*तुम्ही रोज ऐटीत फिरा*
*आम्ही मात्र अभ्यास करा!*
(इति सध्याची डांबरट मुलं!)

*हसली चिंगी झाली मुंगी*
*खाल्ली साखर दिला ढेकर!*
(सोपे शब्द मोठा आशय!)

*पाहुणे आले पाहुणे आले*
*चार कुंड्या फोडून गेले*
( _हत!_)
*म्हणून जेव्हा पाहुणे येतात*
*स्वागत म्हणून गुच्छ देतात!*
( षटकार!)

*सावलीला दिला पांढरा रंग*
*काळा रुसून बसला ..*
 *सूर्य गालात हसला*
( उत्तुंग!)

*राक्षस बिक्षस नसतो मुळी दाखवू नका भिती*
*झोपावा मी म्हणून तुम्ही खोटे बोलाल किती ?*
( क्लीन बोल्ड!!😄)

*पहिला पाऊस आला आणि गंमत काय झाली?*
*ओल्या ओल्या मातीला अत्तरफुले आली*
( Wow! अत्तरफुले!! )

*कावळेदादा कावळेदादा एवढे काळे कसे?*
*आंघोळ केली नाही म्हणून झालात का हो असे?*
(निरागस!)

*आई, सुट्टीच्याच दिवशी पाहुणे का गं येतात?*
*दिवसभराचा कार्यक्रम आमचा खराब करतात!*
(पाहुणे जाणाऱ्यांनी खबरदार!)

*थोडे पास थोडे नापास*
*दोघांनाही केवढा त्रास!*
( पास'वाल्यांना जास्त!!😢)

*समुद्राला पिळलं तेव्हा नदी झाली उलटी*
*पळत पळत सरळ गेली परत डोंगरावरती!*
(उत्तुंग काव्यप्रतिभा!)

*पांगळासुद्धा पळेल फार पायाला द्या चाके चार*
*आंधळ्याला दिसेल आकाश डोळ्यात घाला थोडा प्रकाश!*
( गोड आशावाद)

*सचिन तुझं चॉकलेट खाऊ ?*
*आपण दोघं भाऊ भाऊ!*
(😄 लब्बाssssड!)

*एक यंत्र गात होते*
*त्याला ऐकू येत नव्हते!*
( निरागस सत्य!)

*कावळा होता गेला उडून*
*मासा होता गेला बुडून!*
( छोटा पॅक!)

*ताई चष्मा लावत नाही*
*मेकअप पुसून जातो बाई!!*
(तायांनो, ऐका!😄)

*थोडा पडशील,थोडा झडशील*
 *तेव्हा गड्या थोडा घडशील...!*
( ग्रेट, ग्रेट!)

*एक होते टिंब, त्याने खाल्ला लिंब*
*कडवट केले तोंड, झाला उघडाबंब!*
( टिंबाच्या कविता वाचायलाच हव्यात!)

*वाघाला चावली गोगलगाय*
*म्हणते कशी सोडीन की काय?*
( वाघाचं काही खरं नाही आता!😻)

*धड धड धडाड आभाळ रे*
 *कड कड कडाड विजाळ रे!*
( आला पाऊस!)

*अगडम बगडम आहे तगडम*
 *गुरुजी म्हणती नुसता दगडम्!*
( गुर्जी, कट्टी!)

*घरात घबाड,*
*घबाडात गाठोडं*
*गाठोड्यात चंची*
*चंचीत पुडी*
*पुडीत सुपारी*
*सुपारीला कातर कर कर कर!!!*
( यांचं गाणं नाही होणार तर काय होणार?)

आणि गाण्याबद्दलही सांगायला ते विसरत नाहीत. जगण्याचं एक नितळ सत्य खालील ओळींतून मांडताना कविवर्य किशोर पाठक म्हणतात,

*गाणे एक फुलांचे आणि गाणे एक मुलांचे*
 *जो जो हसतो आनंदाने गाणे असते त्याचे!!*
(क्या बात! सॅल्युट!👌)

*प्रिय किशोरदा,*
*तुम्ही कायम स्मरणात रहाल!*
🌹


✒️
rajshelkesir@gmail.com

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...