◾
*सांगकामे आणि कामसांगे*
_एक मुद्दा, एक विचार!_
_30 एप्रिल, बुधवार_
▪️
*सांगकामे आणि कामसांगे*
*संध्याकाळच्या वेळेला कामावरून थकूनभागून वडील घरी आले. मुलगा कॉटवर मस्त मोबाईल चाळत बसला होता. वडील हातपाय धुवून बाथरूमच्या बाहेर येतच होते, की तेवढ्यात मुलाने ऑर्डर सोडली, "पप्पा एक ग्लास पाणी घेऊन या." वडील आधीच वैतागलेले होते. म्हणाले, "बापाला काम सांगतोस? लाज नाही वाटत? कानाखाली देईन!" मुलगा म्हणाला, "कानाखाली द्यायला याल तेव्हा पाणी घेऊन या ना प्लीज...!" सी द कॉन्फिडन्स!! या प्रजातीतूनच पुढे ‘कामसांगे’ लोक जन्माला आले.*
*याच्या अगदी उलट काहीजण, काम असं करतील की समोरच्याने म्हटलं पाहिजे, “राहुदे, करतो मीच!” बिचाऱ्यांनी त्यांच्या मनाने थोडं काही करायचं म्हटलं, की लाखाचे बारा हजार झालेच म्हणून समजा! आहे ते काम बिघडून जातं. मग लोक म्हणतात, "ठोंब्या आहेस नुसता. सांगितलं तेवढं कर. जास्त डोकं लावू नकोस!" आणि मग यातून मनावर दगड ठेवून, इच्छा असूनही सांगितलं तेव्हाच, आणि तेवढंच करणारी, ’सांगकामे’ नावाची प्रजाती जन्माला आली.*
*अशा प्रकारे कोणी झाले कामसांगे, कोणी झाले सांगकामे!*
*कुणालातरी काहीतरी काम सांगितल्याशिवाय कामसांग्यांना स्वस्थ बसवत नाही. 'दिसला माणूस की सांग काम!' असा यांचा खाक्या असतो. आज्ञा, विनंती, सल्ला, उपदेश असे प्रकार बदलून का होईना पण इतरांना काही ना काही काम ते सांगतीलच. अगदी बसमध्ये प्रवास करत असतील तरी, 'खिडकी लावून घ्या ना प्लिज!' चं मधाचं बोट शेजारच्याला चाटवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या औषधाचा गुणही येतो!*
*सांगकामे बिचारे कधीही इतरांना काम सांगत नाहीत, उलट इतरांनी सांगितलेलं काम करतात. पण त्याचं श्रेय मात्र त्यांना कधीही मिळत नाही; अपमानच होतो. परंतु मेंदूची काही बटणं त्यांनी अगोदरच बंद करून ठेवलेली असल्यामुळे अपमान, टोमणे, शिव्या या गोष्टींचा या स्थितप्रज्ञ जनांवर काहीही परिणाम होत नाही.*
*मग इतकं राबुनसुद्धा यशाची माळ कायम कामसांग्या लोकांच्याच गळ्यात कशी? आणि सांगकाम्यांच्या नशिबी वनवास का? त्याचं कारण, कामसांग्यांमधले हुशार लोक. हे बुद्धीने तल्लख असतात. जिथे सांगकाम्या लोकांचा मेंदू बंद पडतो, तिथून यांचा सुरू होतो! वेळप्रसंगी ते संकटाला एकट्याने भिडतात, परिणामांना सामोरे जातात, आणि यश खेचून आणतात. ती हिंमत, जिद्द, आणि तयारी जी त्यांच्यात असते, ती सांगकाम्या लोकांमध्ये नसते! म्हणून अधिकाराची खुर्ची कामसांग्यांना मिळते; सांगकाम्यांना नाही. लोकांनाही काम सांगणारे लोकच आवडतात. फक्त अट एकच. कामसांग्या हुशार असावा; बिनडोक नको!*
*बाय द वे, तुमच्या वाट्याला कोण आले आहेत? कामसांगे? की सांगकामे?*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc