🎙️
🔳
गझलचा पेड क्लास. यावरचं हे आत्मचिंतन.
मुळात पैसे देऊन गझल शिकण्याला गझलोत्सुक मंडळी तयार का होतात?
काही निरीक्षणे.
▪️ कोणत्याही कवी संमेलनामध्ये गझल सादर करणारा टाळ्या आणि वाहवा घेऊन जातो! हे भाग्य आपल्याही वाट्याला मिळावे अशी प्रबळ इच्छा होते म्हणून.
▪️ मला कोण शिकवणार? या संभ्रमात असतानाच कोणीतरी पैसे घेऊन का होईना परंतु शिकवत आहे, ही दिलासादायक बातमी मिळते म्हणून.
▪️ आपला पिंड गझललेखनाचा आहे की नाही हे पुरेसे कळलेले नसते म्हणून.
▪️ तुम्ही गझल म्हणून जे लिहिलं आहे ती मुळात गझल नाहीच आहे, आणि तुम्हाला आणखी खूप सराव करावा लागेल, असं पालूपद त्यांना नेहमी तथाकथित गझलकारांकडून ऐकावं लागतं म्हणून.
▪️ आपल्या नव्या प्रयत्नाला मिळालेले उर्मट उत्तर ऐकूनच नवीन गझल शिकणारा बऱ्याच वेळा सुरुवातीलाच गारद होतो म्हणून.
▪️ गझल फार अवघड गोष्ट आहे आणि मी खूप प्रयत्न केला पण मला गझल लिहायला जमली नाही, अशी जाहीर कबुली बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळत असते म्हणून.
▪️ नव्या उमेदीचा गझलकार साहजिकच सुरुवातीला चुका करत असल्यामुळे तथाकथित सेट झालेले गझलकार त्यांनी आस्थापूर्वक पाठवलेल्या गझलेकडे नाही म्हटलं तरी थोडा कानाडोळाच करतात. अर्थात त्यांचा दुसरा कुठला हेतू नसतो, परंतु नव्याने लिहिणाऱ्यांना हुरूप येईल इतपत, त्यांना समजून सांगेल इतका उत्साह, वेळ आणि संयम सेट झालेल्या गझलकाराकडे आणि नवशिक्याकडेही असेलच असे नाही. उलट गझल पाठवणाऱ्या नव्या शिलेदाराचा इगो कधी हर्ट होईल हे सांगता येत नाही. नारायण सुर्वेंनी सांगून ठेवले आहे की कवीचा अहंकार फार मोठा असतो. त्यामुळे त्याच्या चुका काढल्या, की त्याचा राग कधी फणा वर काढेल सांगता येणार नाही. नाहीतर तो नाउमेद तरी होतो. त्यामुळे आहे ते संबंध दुरावण्याची शक्यता निर्माण होते. दोन्ही बाजूंनी टाळाटाळ होते, म्हणून.
▪️ पैसे न घेणाऱ्याकडून त्याच्या सवडीने शिकावे लागते. शिवाय, त्यांचे मन राखावे लागते हाजी हाजी करावी लागते. ऐकून घ्यावे लागते. त्यात खूप वेळ जातो. पैसे दिले की समोरच्याच्या उरावर बसून शिकता येते म्हणून!
▪️ पैसे न घेणारा नुसतेच डोस पाजत असतो, पण पैसे घेणारा बिचारा कळकळीने शिकवतो. हे शिकणाऱ्यासाठी फार सुखदायक असते म्हणून.
▪️ दोन-तीन महिन्यात गझलचा फॉरमॅट समजला की आपण लिहायला मोकळे! म्हणून.
▪️ शिकण्यासारख्या जवळपास सगळ्याच गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत असताना कवितेपेक्षा वेगळा फॉरमॅट असलेली व सहज साध्य नसलेली गझल शिकण्यासाठी जर पैसे द्यावे लागत असतील आणि मला हव्या त्या वेळेत शिकायला मिळत असेल तर चुकले कुठे? शिकवणारा पण त्याचा बहुमूल्य वेळ देत असतोच. फुकटला व्हॅल्यू नाही, म्हणून मी पैसे देऊन शिकतो/ शिकवतो अशी दोघांचीही मनोभावना असते म्हणून.
▪️ जे विकते ते पिकते, म्हणून.
▪️ पैसे घेऊन गझल शिकवणाऱ्याचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे? त्याची साधना किती आहे? गझलेतले किती बारकावे त्याला माहित आहेत? त्याच्या किती गझला रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत? एक माणूस म्हणून तो किती चांगला आहे? गझल शिकवण्याची त्याची कळकळ किती आणि बिझनेस किती? या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक आणि सकारात्मक असतील, तर पैसे देऊनही शिकायला हरकत नसावी. तिथेही केवळ तंत्रच शिकायला मिळेल हे लक्षात असू द्यावे. मंत्र तुमचा तुम्हालाच आत्मसात करावा लागेल.
पण म्हणून काय एखाद्याला पैसे न देता गझल शिकताच येणार नाही❓ नक्कीच येईल. कारण आज चांगली गझल लिहिणारे बहुतांश लोक पेड क्लास न करताच गझल लिहू लागले होते. गझल ही शिकण्याची नव्हे तर आतून उमलण्याची गोष्ट आहे.
◾मग काय करावं?
▪️अगोदर एखादी गझल ऐका.
▪️तुम्हाला मनापासून ती आवडलीये का ते पहा. आणि का आवडली आहे ते सुद्धा!
▪️जर तुम्हाला गझल हा प्रकार आवडायला लागला तर तुम्ही आणखी ऐकू लागाल. कान तयार होईल तुमचा. आधी कान तयार करा. खूप ऐका. लिहा कमी, ऐका जास्त. वाचा जास्त.
▪️समाजाकडे, आपल्या अवतीभोवती आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये जरा अंतर्मुख होऊन बघायला शिका. छोट्या छोट्या स्ट्राइक्सची तुमच्या मेंदूमध्ये नोंद होते का? त्याचे निरीक्षण करा. ते तुम्ही दोन ओळींमध्ये मांडू शकता का ते पहा.
▪️ गझलसंग्रह वाचत रहा. इतर लोक तुम्हाला चांगले कवी मानत असतील आणि तुम्हाला गझलेची लय, ठेका, नाद, आवर्तन आवडत असेल, तर तुम्ही गझलकडे आकर्षित होता आपोआप. तुम्हाला कुणी सांगायची गरज नाही की अशी गझल लिहा. ती तुमच्याकडून आपोआप लिहिली जाईल एक दिवस. वृत्त, मात्रा, लगावली वगैरे गोष्टी आपोआप साधल्या जातील. लक्षात ठेवा, "वह, जिस में लय हैं, आरोह अवरोह उस में तय हैं!"
▪️थोडं ओबड धोबड लिहाल सुरुवातीला. लिहीत रहा. कुणाला तरी पाठवत, पोस्ट करत रहा. जर तुमच्या लिखाणात गझलतत्त्व असेल, तर गझलेच्या मार्गावरचा एखादा पुढे गेलेला प्रवासी स्वतःहून तुम्हाला कॉल करेल. समजावून सांगेल. तुमचा हात धरून तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
▪️ गझलेने तुमचा हात धरेपर्यंत गझल लिहिणे सोडू नका. एकदा गझलेने तुमचा हात धरला, की ती तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाही एवढं नक्की.
✒️
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224