Friday, July 24, 2026

अट्टहास, अहंकार आणि अटळता

अहंकार, अट्टहास आणि अटळता!
_एक मुद्दा, एक विचार!_
२४ जुलै २०२६, शुक्रवार
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
अहंकार, अट्टहास आणि अटळता!

सध्या दोन प्रधानांनी म्हणजे धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान यांनी एक छोटासा निर्णय वेळेवर न घेऊन देशावर जी वेळ आणली आहे त्यामुळे देश कोणत्या टोकाला येऊन उभा राहिला आहे याचा अंदाज येतोय. एका बाजूला हतबल सरकार तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेली लाखो लाखोंची गर्दी! अवघड आहे सगळं. सरकार हे सगळं आवरू शकेल?

  कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणे  पाहिलं तर हे सगळं टाळता येण्यासारखं होतं. इतके सगळे पेपर लीक झाल्यावर, आणि त्याचा धसका घेऊन दिवसाचे सोळा-सोळा तास अविरत अभ्यास करणाऱ्या आपल्याच देशातल्या कोवळ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकदार पाऊल उचलल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी म्हटलं द्या राजीनामा, तर थोडी संवेदना दाखवून देऊन टाकायचा! फेकायचा त्यांच्या तोंडावर आणि बाजूला व्हायचं! त्यात काय विशेष गोष्ट होती इतकी? नाव राहिलं असतं. खरंतर लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याचीही गरज नाही. अशावेळी स्वतःनेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा ही आपल्या देशाची परंपरा आहे. नसेल देत एखादा, तर सन्माननीय पंतप्रधानांनी त्याला सांगायचं- ठीक आहे बाबा, हो बाजूला काही दिवस. परत तुला घेतो वाटलं तर. दोन-तीन वर्षानंतर पुन्हा त्याला घेतला असता एखाद्या मंत्रिमंडळात. कोण लक्षात ठेवतो? गेला बाजार एक महिनाभर ती मुलं तिथे ऊन, पाऊस झेलत शांतपणे आंदोलन करत होती, आणि जागतिक कीर्तीचा एक माणूस त्यांच्यासाठी उपोषण करत होता, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपला एखादा माणूस दिला असता पाठवून! त्यांचं समाधान झालं असतं! मुलंच ती. गेली असती नाचत नाचत घरी!

 पण जेव्हा माणसाचा अहंकार त्याच्यापेक्षाही मोठा होऊ लागतो, तेव्हा त्याला छोटया-छोट्या गोष्टींमध्येही स्वतःचा अपमान, पराभव वाटू लागतो, आणि तो टाळण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार होतो.

   जिथे आम्ही मोठ्यांना फाट्यावर मारतो, तिथे ह्या झुरळांचं काय? फवारलं हिट की विषय फिट! इतका सरकारला हा विषय सोपा वाटला. सोनम वांगचूक यांना 'असं चादरीत गुंडाळून उचलून आणा' ही कल्पना मांडणाऱ्याला आता त्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल. त्यांना 'चायनाचा एजंट' म्हणणारांचे नेतेच त्यांना भेटायला आणि उपोषण सोडण्याची विनंती करायला दवाखान्यात गेले आहेत. असे म्हणणाऱ्यांनी मुलांच्या आंदोलनात त्यांची एन्ट्री होण्याच्या अगोदरच सरकारच्या कानात सांगायला पाहिजे होतं, की मुलांचं ऐका, आणि यांचा छोटासा प्रश्न मिटवून टाका; म्हणजे हा चायनाचा एजंट मध्ये येणार नाही, पण तसं शहाणपण त्यावेळी कुणालाही सुचलं नाही! आपल्या जवानांचं बर्फातलं टिकून राहणं सुसह्य व्हावं म्हणून त्यांना उबदार निवारा पुरविण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसालाच यांनी शिक्का लावून टाकला. देशभक्तीचा ठेका जणू फक्त आपल्याच नावावर केलेला आहे, आपण म्हणू तोच देशभक्त, बाकी सगळे देशद्रोही, असा स्वतःचा  गैरसमज करून घेऊन विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला तर यांनी देशद्रोही ठरवलंच; परंतु लोकशाहीत विरोधी पक्ष आवश्यक असताना सगळ्याच यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांनाच दाबून टाकलं. ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या चिठ्ठ्या सापडल्या त्या सगळ्यांना सोयीने ईडीबीडीसीडीचा धाक दाखवून धाकात ठेवलं, स्वतःकडे खेचलं. पण भ्रष्टाचाराचा कलंक नसलेल्या या मुलांना अडवणार आणि अडकवणार कशात, कोण, आणि कसे? इथे माशी शिंकली!

 सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायाधीशांनी आपल्याच देशातील विद्यार्थ्यांना झुरळ म्हणावं, आणि शिक्षणमंत्र्यांनी दहशतवादी म्हणून त्यांना हिणवावं हे आपल्या देशाचं दुर्दैव. पण त्यांनी हे केलं. त्यांच्या हांजीवाल्यांनीही त्यांची री ओढली. अगदी सीबीएसईच्या पेपर चेकिंगचा घोटाळा बाहेर काढणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यालाही परकीय शक्तींचा हस्तक म्हणावं? पण म्हटलं गेलं. आपला प्रत्येक निर्णय योग्यच आहे असं म्हणणाऱ्यांची टोळी आपल्या पाठीशी असली की मग माणसाचं रूपांतर फार लवकर बेडकात होतं. राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या माध्यमांनी तर सडेतोड प्रश्न विचारण्याचं सोडून  केव्हाच नांगी टाकली. म्हणून जेव्हा ही मुलं जंतर-मंतरवर आली तेव्हा 'दहा-बारा दिवस बसतील. जेव्हा कोणत्याही राष्ट्रीय चॅनलवरून त्यांची कोणतीही बातमी देशाला कळणारच नाही, तेव्हा आपण दुर्लक्षुन मारलेले हे चेहरे गपगुमान आपला गाशा गुंडाळून गुपचूप निघून जातील', अशा भ्रमात हे राहिले. परंतु पाठीमागून कोणतं मोठं वादळ घोंगावत येत आहे, याची यापैकी कोणालाही सूतराम कल्पना आली नाही. 'मोठे-मोठे गार केले गंमतमधी' तिथे या झुरळांची काय बिशाद? या भ्रमात मंडळी राहिली आणि आजची ही अवस्था!

  मोबाईलच्या स्क्रीनचं शस्त्र करून रणात उतरलेली ही पोरं आता आवरतील असं वाटत नाही. काल मार खाऊन आज पुन्हा त्यांनाच गुलाबाचे फुल देणाऱ्या, पोलिसांच्या गाडीत पोरांना कोंबून नेत असताना शिवछत्रपतींचा गनिमी कावा करत पाठीमागून हळूच दरवाजा उघडून कोंडलेल्यांना मोकळं करून देणाऱ्या, तुमच्या खिशात ड्रगची पावडर टाकून, तुमच्यावर खोटी केस करून, तुम्हाला आयुष्यातून उठवू म्हणणाऱ्या पोलिसाचाच गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या, पोलिसांच्या गाडीला दोन्ही हातांनी समोरून रोखून धरत एकटं नडणाऱ्या, कपाळावर कफन बांधून फिरणाऱ्या, मोठ्या अभिमानाने गांधी आणि आंबेडकरांचा एकत्रित फोटो मिरवत, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचा नारा देत, पोलिसांच्या तोंडावर त्यांनाही पाठ नसलेली राज्यघटनेतील कलमे फेकून मारणाऱ्या, पोलीस मारायला आले की 'जनगणमन' सुरू करणाऱ्या, जोरदार पाण्याचे फवारे मारून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला तर त्याच पाण्यात मनसोक्त नाचण्याचा आनंद घेणाऱ्या, आणि त्यांच्यावर फेकलेला अश्रू धुराचा गोळा उचलून पुन्हा त्यांच्यावरच भिरकावणाऱ्या जेन-झी ला आवरताना सरकारच्या नाके नऊ आलेत.

काठीला खिळे लावून त्यांना झोडपून काढल्यानंतर तर ही आग अधिकच भडकली आहे. आता त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलही उतरलेत. आता त्यांना देशद्रोही म्हणा, किंवा आणखी कोणता कलंक लावा, पण हा वणवा आता थांबणार नाही बहुतेक. काहीतरी मोठा धमाका येत्या काळात आपल्याला बघायला मिळणार नक्की. एकतर शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचे, किमान आंदोलनाचे रणशिंग फुंकणाऱ्यांच्या आयुष्याचे मोल घेऊनच ही आग थांबणार, किंवा 'दिल्लीचेही तख्त उलटवतो महाराष्ट्र माझा!!' अशा गर्जना पुढच्या काळात सह्याद्रीच्या कडे-कपारीत पुन्हा एकदा घुमणार! यांच्या अगोदरच्या सरकारातील लोकांनी भ्रष्टाचाराचा जो कळस गाठला होता, त्यांना वैतागून लोकांनी यांना असंच आंदोलन करून अगदी विश्वासाने सत्तेवर आणलं, तर यांनी त्यांच्या पुढची पायरी गाठली. त्यांनाच आपल्यात सामावून घेतलं! न्यायदेवतेने जरी डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली असली, तरी या देशातील जनता उघड्याठाक डोळ्यांनी हे सगळं बघत आहे, कोणत्याही निमित्ताने लोकांच्या संयमाचा कडेलोट होऊ शकतो, ही गोष्ट ही मंडळी साफ विसरली. आता निमित्ताला पेपरफुटी असली, तरीही त्याच्यामागे आमदारफुटी, खासदारफुटी, भ्रष्टाचाराची गुटी, आणि यांच्या आश्रयाला असलेल्या गुंडांच्या कटकटी या सगळ्यांना आंदोलकांनी एकाच फडक्यात गुंडाळले आहे! जिथं स्वतःला विद्वान म्हणवणारी शहाणी माणसे शेपूट घालून बसली आहेत, तिथं पंधरा-सोळा वर्षांची नुकतीच मिसरुडं फुटलेली मुलं मोबाईल समोर धरून अन्यायाविरोधात धाडधाड बोलू लागली आहेत.

  काय गंमत आहे बघा. लोकशाहीत जनता मालक असते आणि इतर सर्व अधिकारी आणि राजकारणी तिचे सेवक. आजकाल लोकांना सेवा करण्याची इतकी काय हौस आली आहे कुणास ठाऊक? लोक ओरडून सांगताहेत की आम्हाला तुमच्याकडून सेवा नको आहे, तरीसुद्धा 'मी तुमची सेवा करणारच!' अशा अट्टहासाला पेटलेल्या लोकांना काय म्हणावं? "मला तुमची सेवा करायला नको म्हणणारे तुम्ही कोण? भले तुमचे कंबरडे मोडो, तुमचा जीव जाओ, परंतु मी तुमची सेवा करणारच!" असं म्हटल्यावर आता मालकांनी यावर काय म्हणावं? "अरे बाबा आम्ही तुला आमची सेवा कर म्हटलं नव्हतंच. तूच तुझ्या मनाने उभा राहिलास आणि सेवक म्हणून स्वतःच्या माथ्यावर शिक्काही तूच मारून घेतलास! त्याच्यासाठी तू काय काय झोल केलेस ते तुलाही चांगलं माहीत आहे, आणि आम्हालाही! आता बस की खाली!" असं जनतेने सगळ्याच पक्षातील सगळ्याच अशा बळजबरीचा रामराम करणाऱ्या सेवकांना कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांचं ऐकतील तर ते सेवक कसले!? गोलमाल है भाई सब गोलमाल है!

 बाकी काही असो. जगाने अभिमानाने ज्याच्याकडे पहावं असा हा आपला सुंदर देश! आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचा आदर्श अवघ्या जगाने घ्यावा अशा! असे असताना जगहसू होणाऱ्या अशा काही अप्रिय गोष्टींमुळे  जगभरात डागाळू पाहणारी आपल्या प्रिय देशाची प्रतिमा एक जागरूक नागरिक म्हणून मनाला अस्वस्थ करते, कारण आंदोलनामध्ये अतिशय विदारकपणे मार पडणारी निरागस मुलं आपलीच आहेत. ज्यांच्यावर पलटवार होतो आहे ते पोलीस, सैनिक आपलेच आहेत. दोघांवरीलही हल्ले बघवत नाहीत. दोन्ही बाजूंनी नुकसान आपलंच आहे. कुणाच्यातरी वेड्या अट्टहासापायी अनागोंदीची अटळता समोर येऊ नये म्हणून हे कळकळीचं स्पष्ट बोलणं अगत्याचं आहे! याकडे कोणत्याही एकांगी चष्म्यातून पाहू नये, नाहीतर धूसर दिसण्याची शक्यताच अधिक! 
वंदे मातरम्!

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, July 15, 2026

मोडला 'आहे' कणा?

*मोडला ‘आहे’ कणा?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*१५ जुलै २०२६, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*मोडला ‘आहे’ कणा?*

   *मुलांचे शिक्षण भ्रष्टाचारमुक्त रहावे म्हणून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर भारतातील महान शिक्षणतज्ञ आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानित असलेले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक कित्येक विद्यार्थ्यांसह अन्नत्याग सत्याग्रह करत अखेरच्या घटका मोजत आहेत. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या देशाच्या प्रधान सेवकाला या जागतिक कीर्ती असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज ऐकू जात नाही. केवढं हे दुर्दैव!*

*शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांची देशात, राज्यात प्रचंड केविलवाणी अवस्था झाली आहे. जवळपास सगळ्याच क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. परंतु देशाचे नागरिक म्हणून यावर बोलण्यासाठी आपण शिल्लक उरलो आहोत कुठे? आपण तर केव्हाच वाटले गेलो आहोत. ‘त्यांचं ते बघतील...’ म्हणत स्क्रीन स्क्रोल करत थंड बसलो आहोत. अण्णा आंदोलनात मेणबत्त्या आणि झेंडे घेऊन गावभर फिरणारे आता कुठे गेले कुणास ठाऊक? इतक्या लवकर आपल्या संवेदना बोथट झाल्या? की आपल्याला कशाची गुंगी आली आहे?*

   *आपण कालपर्यंत असे नव्हतो. आपला कणा ताठ होता. आता आपल्याला काय झालंय? आपण एवढे कसे कोरडे, कोडगे, लाचार आणि मुर्दाड झालो? 'चूक' ला 'चूक' म्हणण्याची हिंमत आपल्यात उरू नये? आपण खरं बोललो तर आपल्यावर कोणीतरी डोळे वटारेल, आपली  नोकरी घालवेल अशी भीती आपल्याला सतत वाटत रहावी? सध्या आपलं सगळं अलबेल चाललेलं आहे, ते या नसत्या उचापतींनी संकटात येईल याचं दडपण सतत आपल्या मागे रहावं? कोणीतरी आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, आणि आपण थोडी जरी तथाकथित चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर उद्या आपल्या सुखी संसारावर गंडांतर येईल, हा वेताळ आपल्या मानेवर कधीपासून आणि कसा बसला? आपण इतके नेभळट कधीच नव्हतो. आपण असे कधीपासून झालो? कोणत्या कड्यावर येऊन उभे राहिलो आहोत आपण? आपला कणा मोडत चालला आहे की काय?*

    *आपण अगोदर लोकांना निवडून द्यायचो, त्यांना प्रश्न विचारायचो. तेही दबकून असत.  आता आपण त्यांना निवडून देत नाहीत; ते स्वतःच मनी आणि मसल पॉवरवर निवडून येतात. आता जर आपण त्यांना प्रश्न विचारायला जाऊ, तर ते आपला खात्मा करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, कारण निवडून येण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये लावले आहेत. पद सोडायचं म्हणजे त्यांचं तेवढ्या रुपयांचं नुकसान होणार. ते त्यांना कसं सहन होईल? त्यापेक्षा सामान्य जनतेतले काही लोक मेले तर त्यांना काय फरक पडतो?*

*आपल्यालाही आपल्यातले काही मेले तर काय फरक पडतो??*

    *फरक पडायला हवा! पुन्हा गुलामगिरीत खितपत पडायचे नसेल तर फरक पडायलाच हवा. आणि त्यासाठी आपल्या डोक्यात आपलाच मेंदू आहे ना, हे वारंवार तपासून पाहिलं पाहिजे. सदसद्विवेक सांभाळला पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, आणि आपल्यासाठी निस्वार्थपणे लढणाऱ्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे; अगदी कणा मोडू न देता!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Friday, May 8, 2026

आन, बान आणि शान

*आन, बान आणि शान*
_एक मुद्दा, एक विचार!_
*6 मे 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आन, बान आणि शान*

*तिन्ही सांजेची वेळ होती. हवेत छानसा गारवा होता. आई संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी चिरत बसली होती. बाहेर खेळायला गेलेला तिचा मुलगा घरी आला. घरावर फडकत असलेल्या झेंड्याकडे पाहून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. हातपाय धुवून झाल्यावर तो आईजवळ येऊन बसला आणि म्हणाला, "आई, आपल्या घरावर हा एवढा मोठा झेंडा का लावतो आपण?"*

 *"अरे हा झेंडा तर आपली आन बान आणि शान आहे!" मुलगा काहीतरी विचार करत म्हणाला, "आणि तो माझा एक मित्र, त्यांच्या घरावर तर वेगळा झेंडा असतो? इतकाच मोठा. तोही त्यांची आन, बान आणि शान आहे का?"  "असेल." "आणि त्या तिकडच्या गल्लीमध्ये तर मी वेगळ्याच रंगाचा आणखी एक झेंडा इतकाच मोठा पाहिला? त्यांचंही तसंच असेल का?" "असू शकतं." "आई, हे झेंड्याचे इतके सगळे प्रकार कशासाठी?" "कारण प्रत्येकाचा धर्म, जात, पंथ, भाषा, विचार वेगवेगळा आहे म्हणून. झेंडा आपली वेगळी ओळख निर्माण करतो." "म्हणजे वेगवेगळे झेंडे- वेगवेगळी माणसे. बरोबर?" "हो." "म्हणजे झेंडे माणसांना विभागण्याचं काम करतात का?" "गप्प बस. तुला त्यातलं काही कळत नाही." "म्हणून तर तुला विचारतोय ना?" "तुझ्या पप्पांना विचार." "ते म्हटले, झेंड्याबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही." "मग मला का विचारतोयस?" "कारण तू ऐकून घेतेस!"*

  *दोन मिनिटं शांततेत गेली. मुलगा पुन्हा सुरू झाला, "आई, ऐक ना..." "बोल." "हा झेंडा लावल्यावर काय होतं?" "आपलं संरक्षण होतं. लोक आपल्याला वचकून राहतात. आपण कोण आहोत, आपल्या मागे कोण आहे, आणि आपण काय करू शकतो हे जगाला समजतं. मग लोक आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत." "आई, झेंडा नसल्यावर लोक एकमेकांकडे वाकडया नजरेने बघतात का?" ”तसं नाही, पण कमजोर समजतात. झेंडा असला की आपल्याला ताकतवान समजतात." "मग गावातील प्रत्येक घरावर लोक झेंडा का लावत नाहीत?" "त्यांना तशी गरज वाटत नाही." "मग आपल्याला का वाटते?" "कारण आपल्याला आपल्या धर्माचा आणि झेंड्याचा अभिमान आहे." "म्हणजे जे झेंडा लावत नाहीत त्यांना तसा अभिमान नाही का?" "ते तू त्यांना जाऊन विचार."*

 *"आई ज्यांच्या घरावर झेंडा नाही त्यांना जर धर्माचा अभिमान नसेल तर त्यांना जगण्याचाही अधिकार नाही का?"  "तसं नाही, जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण झेंडा लावला की जगण्यात आणि वागण्यात जरा ऐट येते, जरब येते, रुबाब येतो." "आई मी शाळेत जाताना त्या झोपडपट्टीमध्ये एक मोठा झेंडा पाहिला, पण तिथली लोकं तर खूप गरीबीचं आणि हालाखीचं जीवन जगतात. ना ऐट, ना रुबाब. मग ते कसं?" "तो झेंडा तिथे आहे म्हणूनच ती लोक तिथे राहू शकतात; नाहीतर त्यांना आतापर्यंत लोकांनी तिथून हाकलून दिलं असतं! झेंडा समूहाचं रक्षण करतो." "आई, सगळ्यांचा मिळून एकच झेंडा राहू शकत नाही का गं? म्हणजे सगळ्यांचं एकदाच रक्षण होईल?" "राहू शकतो ना. पण तो नेमका कोणाचा आणि कोणता हे कोण ठरवणार? प्रत्येकाला वाटतं, आपलाच झेंडा श्रेष्ठ." "आई, पण तिरंगा तर आपल्या सगळ्यांचा झेंडा आहे ना? मग हे सगळे इतर झेंडे बंद करून तो एकच का नाही लावत ज्यांना झेंडा लावायचा आहे त्यांच्या घरावर?" "मूर्ख आहेस का रे तू? निघ! अभ्यासाला जाऊन बस! म्हणे सगळ्यांचे झेंडे बंद करून एकच लावा!"*

 *मुलगा शांतपणे उठत म्हणाला, “म्हणजे तिरंगा फक्त शाळेतच सगळ्यांचा असतो तर!” भाजी चिरणारे आईचे हात आपोआप थांबले. त्याला उत्तर मात्र ती देऊ शकली नाही. तिच्याकडे ते नव्हतंच!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Friday, May 1, 2026

यंदा लग्नाचं काही बघताय का

*यंदा लग्नाचं काही बघताय का?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*29 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*यंदा लग्नाचं काही बघताय का?*

*लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणे… आता स्वर्ग कुणी प्रत्यक्ष जाऊन पाहिलाय का? नाही; पण त्या गाठी बांधायला देवाने त्याची काही खास माणसं मात्र पृथ्वीवर पाठवलेली आहेत एवढं मात्र नक्की. त्यांच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सुपारीचं खांडही फुटत नाही! असं म्हणतात की नवरदेव येतो नवरीसाठी, वऱ्हाड येतं जेवण्यासाठी! पण पुढचं आपल्याला सांगितलंच जात नाही, ते म्हणजे 'काही खास माणसं' येतात पुढचा नवरदेव-नवरी शोधण्यासाठी!*

*कोणतंही लग्न घ्या, त्यात 'लग्नाला आलेल्या' मुला-मुलींची माहिती काढणारी एक तरी दिव्य विभूती असतेच! मग ती स्त्री असो की पुरुष. शिवाय वयानेही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली; त्यामुळे इतरांना सांगण्याचा अधिकारही त्यांचा चिमुटभर जास्तच. शहरातल्या ‘वधुवरसूचक मंडळातले चाणक्य’ यांच्या बुद्धीपुढे लोटांगण घालतील! त्यांच्या वागण्यात एक रुबाब असतो, बोलण्यात एक ढब असते. “ती आत्ता गेली ती लाल ड्रेसवाली कोण? कोणाची मुलगी? कितवी शिकलेली आहे? काय करते? यंदा लग्नाचं काही बघतायत का? आपल्याकडे तीन चार स्थळं आहेत चांगली.” झालं! पाच मिनिटात मुलींचा डेटा फोटोसकट जमा! तर, “तो उंचसा सोफ्यावर बसलेला कोण हो? काय करतो? लग्न झालंय का त्याचं? पगार किती आहे? परमनंट आहे का? भाऊ बहिणी किती आहेत त्याला? क्षेत्र वगैरे किती आहे? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?” झाला डेटा जमा! पण दोन माणसांच्या खऱ्या स्वभावाचा ‘डेटा’ मात्र यांच्यापैकी कुणाकडेच नसतो बरं का! इकडची माहिती तिकडे पोहोचवून, तिकडची माहिती इकडे आणून, मध्यस्थी करून मंडळी अशी काही जादूची कांडी फिरवतील, की गोष्ट लग्नाच्या लाईनला आलीच पाहिजे. गुळुमूळू स्वभावाचं कुटुंब असलं तर ही माणसं त्यांना अक्षरशः कच्चं खातात. असल्या-नसलेल्या कोणत्याही चार गोष्टी सांगून पार्टीला बाटलीत उतरवतीलच!*

*मंडळी, लग्न कोणीही जुळवो, संसार सुखाचा होईलच याची गॅरंटी नाही. कारण स्थळ पाच मिनिटांत जुळतं हो, पण नातं? पाच वर्षांत काय कधीकधी आयुष्यभरातही ते जुळेलच याची खात्री नाही. लग्न जुळवणारी माणसं नाती जोडतात, पण ती टिकवण्याची जबाबदारी कोणाची? घरातल्यांची!*

*माणसं, मग ती कोणीही असो, तोंड सोडून बोलायला लागली, की संसाराला दृष्ट लागते. एकदा नात्यात फट पडायला लागली, की ती वाढतच जाते आणि तुटू नये, पण संसार तुटतो. अशावेळी शिव्याशापांचा पहिला धनी कोण होतो?“हे लग्न व्हावे ही ‘ज्यांची’ इच्छा!” होती तो किंवा ती! दोन्हीकडून बिचाऱ्यांना शिव्या खाव्या लागतात. म्हणजे कोळशाच्या दलालीत हात काळे करण्यासारखंच! तरी ही मंडळी त्यांचं काम थांबवत नाहीत. कारण, त्यांना अनुभवाने माहीत असतं, की जेव्हा एखादा हतबल बाप स्थळ शोधून थकतो, तेव्हा प्रत्येक घरात काळजीचा एकच प्रश्न कायम असतो- "बघा ना एखादं चांगलं स्थळ असेल तर!?"*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

शहरातले, गावाकडचे

*शहरातले, गावाकडचे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*22 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*शहरातले, गावाकडचे!*

*एका मोठ्या भावाच्या शहरातल्या घरी लहान भावाचा गावाकडचा पोरगा शिकायला आणला. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. मोठ्या भावाची मुलं आणि हा धाकट्याचा मुलगा यांच्यात काही वादावादी झाली, की मोठ्या भावाचा जीव तीळतीळ तुटायचा. नेमकी बाजू कोणाची घ्यावी हे त्याला काही कळायचं नाही. भावाच्या पोराची बाजू घेतली, की बायको त्याच्यावर डाफरायची. स्वतःच्या पोरांची बाजू घेतली की भावाचा पोरगा फोनवर सांगायचा, “मला मारतात! माझ्यावर मुद्दाम चिडतात!”*

 *मोठ्या भावाची कुचंबणा बिचाऱ्यालाच माहीत.*

 *एके दिवशी असाच कशावरून तरी खटका उडाला, आणि संध्याकाळची वेळ पाहून पोरगा घरातून गायब झाला!*

    *मोठा भाऊ कामाच्या वैतागातून घरी पोहोचलाच होता, की घरच्यांनी त्याच्या कानावर बातमी घातली. त्याचं डोकं बिथरलं. 'पोरांचं काहीतरी भांडण झालं होतं’ कळल्याबरोबर त्याने पहिल्यांदा आपल्या पोराच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि हातातली पिशवी टाकून स्वतः पोराला शोधायला निघाला. घरातली सगळी मंडळी कामाला लागली.*

 *सात-आठ वर्षाचा पोरगा कुठे गेला असावा कोणाला कळेना. अंधार पडायला लागला तसा यांच्या पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. पोरगा सापडला नाही, तर घरच्यांना काय तोंड द्यायचं? तेवढ्यात एकजण म्हणाला की गावाच्या बाहेर त्याला हायवेवर चालताना मी मगाशी बघितला! म्हणजे? हा मुलगा पायी गावाच्या दिशेने चालत गेला की काय? आणि जर रस्त्याने एखाद्या ट्रकमध्ये वगैरे जाऊन बसला, एखाद्या अनोळखी गाडीत बसून गेला, तर काय करायचं? पोराला शोधायला हायवेवर चार गाड्या गेल्या. दूरपर्यंत जाऊन त्यांनी फोन केला, “मुलगा इकडे कुठे दिसत नाही.” वातावरण गंभीर झालं. शोधून बिचारे थकून गेले.*

  *इकडे घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या एका देवळात एक आजोबा संध्याकाळी फेरफटका मारायला गेले आणि बाकड्यावर बसले. बाकड्याखाली त्यांच्या पायाला काहीतरी लागलं म्हणून खाली वाकून बघतात तर काय? खाली पोरगा बसलेला! त्यांनी त्याला बाहेर काढलं, व्यवस्थित विचारपूस केली, आणि विश्वासात घेऊन त्याला मोठ्या भावाच्या घरी घेऊन आले. त्याचा जीव भांड्यात पडला. रात्र गंभीर शांततेत सरली.*

 *सकाळी धाकट्याच्या मुलाची आंघोळ वगैरे झाल्यावर मोठ्या भावाने त्याला चारचाकी गाडीत टाकलं आणि शंभर दीडशे किलोमीटरवर असलेल्या थेट आपल्या गावी गाडी घेऊन आला. पोराला गाडीतून उतरवलं, त्याच्या बापाच्या स्वाधीन केलं आणि म्हणाला, “सांभाळ रे बाबा! शहरात इकडे मला माझा जीव जड झालाय, तिथे तुझ्या पोराचे नखरे झेलायला मला कुठे वेळ आहे? शिवाय कपाळावर एखाद्या वेळी कलंक लागला तर आयुष्यभर मिटायचा नाही!”*

   *म्हणून ज्यांची बाजू पडती आहे, त्यांनी पोरांना ‘तिकडच्या घरी कसं रहावं, कसं वागावं, आणि दुसऱ्याच्या पोटात शिरून त्याला कसं जिंकावं’ हे शिकवून ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्या घरी दुसऱ्यांची मुलं शिकायला आहेत त्यांनी, त्यांच्या मुलांनी, या मुलांना समजून घेऊन त्यांना मायेचा आधार दिला पाहिजे, म्हणजे ते शिकून पुढे गेलेलं मूल मरेपर्यंत उपकार विसरत नाही!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


भ्रमाचा भोपळा

*भ्रमाचा भोपळा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*8 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*भ्रमाचा भोपळा!*

  *माणसाची तीन बलस्थानं आहेत. माय, माती आणि मायबोली. ज्यांच्याकडे ह्या तीनही गोष्टी शाबूत आहेत ते नशिबवान! पण मायबाप आयुष्यभरासाठी थोडेच पुरतात? आपल्या आयुष्याचा गाडा योग्य वळणावर आणून सोडण्यापुरता त्यांचा प्रवास!*

  *माय म्हणजे नुसती माय नाही; तिच्यात बापही आला. ते दोघे एकच आहेत. बापाचं छत्र पोरांच्या डोक्यावरून लहानपणीच हरवलेलं असतानाही लेकरांच्या भल्यासाठी आयुष्यभर संकटाशी झुंजणारी माय म्हणजे धैर्याचा मर्द हिमालय! आणि बाप? बाप ही दुसरी मायच असते; शर्ट पॅन्ट घातलेली. मायच्या परोक्ष लेकरांची माय बनून त्यांचा सांभाळ करणारा बाप बघा. प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, काळजी तीच; फक्त शरीर वेगळं. पण आजकाल मायला 'माय म्हटलेलं चालत नाही. बापाला 'बाप म्हटलं तर राग येतो. शहरात जन्माला झालेल्या नव्या पिढीला आईवडिलांना 'मम्मा 'डॅडा म्हटलं की जास्त 'कुल आणि 'क्लोज वाटतं असा गोड भ्रम आहे.*

   *आपण सर्वजण मातीचे पुतळे आहोत. मातीतूनच आपल्याला प्रत्येकाला उगवून यायचं आहे आणि शेवटी माती बनून या मातीतच मिसळून जायचं आहे. आपला आदी आणि अंत मातीच तर आहे!*

*कधीकाळी माती सगळ्यांसाठी होती. लोक मातीला धरून राहत. माती कपाळाला लावली की आयुष्यभराची निष्ठा वाहत. पण जसे माणसाला हावरटपणाचे डोहाळे लागले, तो दुसऱ्यांच्याही वाट्याची माती हडप करू लागला. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने काही माणसं मातीवान झाली. जे बळी नव्हते त्यांचा बळीराजा झाला, आणि मातीमोल झाला. आज शहरात मातीच्या कणाला कोटीची किंमत येऊ लागली आहे. मोक्याच्या जागेवरच्या मातीसाठी माणसं एकमेकांचे मुडदे पाडू लागली आहेत. 'शेती इकायची नसती, राखायची असती', हे शहरालगतच्या कानपाड्या शेतकऱ्यांना ऐकू येईनासे झाले आहे. हातची शेती विकून गाडी, बंगला, शॉपिंग आणि इलेक्शनमध्ये पैसा घालवणाऱ्यांना भपक्यात सुख असल्याचा गोड भ्रम आहे.*

    *आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आपली माय आपल्याशी ज्या बोलीत बोलायची ती मंजुळ वाणी म्हणजे मायबोली! ते अमृत पिऊनच आपला भाषिक जीव पोसला. तिचे शब्द आपले झाले. आपण शाळेत पहिलं पाऊल टाकलं, आणि आपलं बोट पुस्तकांच्या हातात दिलं. पुस्तकांनी आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याच्या नावाखाली हळूहळू आपली मायबोली कधी आपल्यापासून काढून घेतली हे आपल्याला कळलंही नाही. आता पुस्तकी भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणतो आणि मायबोलीला गावंढळ! काँक्रीटचा कॅनॉल कधी खळखळ वाहणारा झरा होईल का? 'तुका म्हणे झरा, आहे मूळचाच खरा' पण आता झऱ्यालाच लोकं नाला म्हणून नावं ठेवू लागलीयत. इस्त्री आणि इन केलेल्या कपड्यांमध्ये मायबोली कोंबून इंग्रजी मिश्रित चमचमीत प्रमाणभाषा बोललं की आपला प्रभाव पडतो असा आजच्या नवभाषकांना भ्रम आहे! पण नारळाच्या पाण्याची सर मुन्शीपाल्टीच्या नळाच्या पाण्याला केव्हा यावी?*

 *मंडळी गोष्ट अशी आहे की हल्ली आपण स्पष्टयुगात नाही, तर भ्रष्टयुगात आणि भ्रमयुगात राहतो आहोत, म्हणून भ्रष्ट आणि भ्रमिष्ट झालो आहोत! झाडं तोडून विकासाच्या सावलीचं स्वप्न पाहत आहोत! हा निव्वळ भ्रमाचा भोपळा आहे. तो लवकर फुटो, माय, माती, मायबोली, आपली माणसं आणि आपल्याला पोसणारा निसर्ग यांना ओळखण्याची, जपण्याची सद्बुद्धी प्रत्येकाला लाभो इतकंच मागणं आहे!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, April 1, 2026

ज्याच्या घरी गंगा...

*ज्याच्या घरी गंगा...*
_एक मुद्दा, एक विचार!_
*1 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*ज्याच्या घरी गंगा...*

*एक आई-पालक मुलाच्या शिकवणी वर्गातील सरांना भेटायला आल्या. त्यांचा मुलगा त्या सरांना खूप मानतो वगैरे त्यांनी त्या सरांना सांगितलं. सरांनी विनम्रपणे त्यांना नमस्कार केला.* 

*पुढे त्या बाई म्हणाल्या, “सर, माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मुलाला प्लीज शिकवा की त्याने घरातल्यांचं काम ऐकलं पाहिजे. अजिबात ऐकत नाही. इकडची वस्तू तिकडे करायला नको. साधं ग्लासभर पाणी मागितलं प्यायला तर म्हणतो ‘उठून घे ना.’ मी म्हटलं- अरे वर्गात मी फक्त इतकं जरी म्हटलं की मला तहान लागलीय रे पोरांनो! की पुढच्या मिनिटाला सगळ्या वर्गाची माझ्यासमोर झुंबड उडते पाणी देण्यासाठी. प्रत्येकजण माझ्यासमोर पाण्याची बाटली धरतो आणि म्हणतो की बाई, माझ्या बॉटलमधलं पाणी प्या. आणि तू माझा मुलगा असून मला पाणी देत नाहीस...? तर म्हणतो- यात काय विशेष? मी पण स्कूलमध्ये आमच्या मॅडमना पाणी देतो! बघा आता!”* 

*सर इतकंच म्हणाले, “घरच्या गंगेचं महत्त्व नसतं मॅडम. ज्याच्या घरी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा!”*
 
     *मंडळी, गोष्ट फक्त त्या मुलापर्यंत थांबत नाही. समाजातही काही वेगळी परिस्थिती नाही. नशिबाने आपल्याला प्राप्त झालेल्या, आपल्याकडे असलेल्या चांगल्या माणसांचं आपल्याला कौतुकच नसतं. आपण त्यांना हलक्यात घेतो. बऱ्याचदा तर त्यांना चेष्टेचा विषय बनवलं जातं, आणि कधीकधी त्यांना मुद्दाम डावलून त्यांची खरोखर क्रूर चेष्टा केली जाते.*

 *घर असो, खेळ असो, कार्यालय असो, की संघटना; पळसाला पानं तीनच! सगळीकडे हीच परिस्थिती. पण लोकांना आपली किंमत नसली तरी ‘आपण कोण आहोत’ हे ज्यांना माहीत असतं, ती माणसं कधीही स्वतःची किंमत खाली पडू देत नाहीत. आपला आब राखून असतात. जिथे आपली किंमत नाही अशी जागा कितीही सुशोभित, चमचमीत आणि लोकांच्या लेखी उत्कृष्ट, चांगली असो, ही माणसं तिथे रमत नाहीत. अगदीच नाईलाजास्तव थांबावं लागलंच तर त्यांचं केवळ शरीर तिथे असतं, ती स्वतः नसतात. योग्य वेळी ती जागा रिक्त करतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं महत्त्व कळू लागतं. त्यांचं आपल्यातून जाणं वेदनादायी वाटू लागतं, पण उपयोग नसतो.*

 *म्हणून आपल्यासोबत असलेल्या अशा माणसांची कदर केली पाहिजे. वयाने, पदाने, शिक्षणाने, समजेने ती लहान असतील तरीही... कारण ही सगळी गंगेची रूपं आहेत. गंगा नेहमी हिमालयातूनच वाहते असं नाही… ती कधी आईच्या रूपात घरात असते, कधी मित्र-मैत्रिणीच्या रूपात आपल्याजवळ उभी असते, कधी वरिष्ठ बनून आपल्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते, तर कधी एखाद्या साध्या माणसाच्या रूपात आपल्याला आयुष्याचे धडे देत असते. पण आपणच तिचं पावित्र्य ओळखलं नाही, तिची कदर केली नाही, तर एक दिवस हीच गंगा आपल्या आयुष्यातून निघून जाते…आणि मग उरतो तो फक्त कोरडा काठ — आणि जिथे पाणी असताना आपण तहानलेलेच राहिलो होतो, याची खंत! म्हणून…*

*आपल्या आयुष्यातील ‘गंगा’ ओळखा, तिचा मान ठेवा, कारण घरची गंगा ओळखायला उशीर झाला, तर उरतात फक्त आठवणी… आणि डोळ्यात पाणी!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...