■
एक बाहुली घरात जेव्हा दंगा मांडत असते
थकलेले घर थकवा विसरुन क्षणभर हासत असते
शाळा भरली, शाळा सुटली, जे जे काही घडले
दप्तर टाकुन लेक अगोदर सगळे सांगत असते
हातामधला खाऊ अर्धा पप्पांना "खा" म्हणते
लेक भरवते अन बापाचे पोट टरारत असते
बापाच्याही नकळत त्याला वाचत असते मुलगी
परिस्थितीची पाने काही, तीही चाळत असते
मुलगी म्हणजे काटकसर अन ऐनवेळची लक्ष्मी
अडचण आली की गल्ल्यातिल चिल्लर नाचत असते
कुरकुरमाळ्या करता करता दुःख विसरतो बाबा
बापालाही लेक निरागस जगणे शिकवत असते!.
-राज शेळके, नाशिक
No comments:
Post a Comment