इंग्रजी वाचता का येत नाही?
-राज शेळके
इंग्रजी पासून दोन हात दूर राहणारी खूप मोठी पिढी महाराष्ट्रात आहे. का? या मुलांना इंग्रजी आवडत नसेल का? आवडतं. त्यांनाही खूप आवडतं. परंतु त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ती भाषा कधीही अवगत झाली नाही. त्यांचं डोकं दुखून शेवटी त्यांनी त्या भाषेचा नाद सोडला. परंतु मराठीच्या बाबतीत तसं झालं नाही! शाळेत गेलेलं प्रत्येक मूल मराठी आनंदाने शिकलं. त्याला तोडका मोडका का होईना, मराठीतून निबंध लिहिता येतो. मराठीत पाच वाक्य झाडता येतात. शिव्यासुद्धा घालता येतात!
वाघिणीचं दूध म्हणून हिणवल्या किंवा गौरविल्या गेलेल्या इंग्रजी पासून फटकून राहणं हे मात्र काही त्यांना स्वस्तात पडलेलं नाही. पुढे मोठे झाल्यानंतर आणि ठिकाणी अडचणी उभ्या राहतात आणि मग समजते, की अरेच्चा! आपल्याला यायला पाहिजे होतं इंग्रजी. का नाही आलं? याचा जेव्हा आपण विचार करु, तेव्हा, आपल्या लक्षात येईल की आपण मराठी आणि इंग्रजी यांना एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तसं नेमकं नाही. तुम्ही विचाराल कसं काय? मित्रांनो, त्याचं असं आहे, की आपली मुलं मराठी भाषा ऐकून ऐकून शिकतात. तेव्हा त्यांनी जे घरी ऐकलेलं असतं, तेच नंतर त्यांना शाळेत मराठी शिकताना एकतर लिहावं लागतं किंवा वाचावं लागतं. म्हणजे त्यांनी जे ऐकलं तेच ते लिहितात आणि त्याला तेच म्हणतात! म्हणजे असं की जर त्यांनी क ऐकला असेल तर लिहिले जाणारे अक्षर क च असणार आणि त्याला क च म्हणणार! दिसणारसुद्धा क आणि असणारसुद्धा क च! नेमकं इंग्रजीच्या बाबतीत इथे उलटं आहे! B हे अक्षर बी म्हणून घोकलं पण शब्दात त्याला दरवेळी ब म्हणतात बी नव्हे! म्हणजे दिसायला बी आणि असायला? ब! असा हा गोंधळ आहे. सेम परिस्थिती इतर अक्षरांची. P हे अक्षर शिकताना पी शिकायचा मात्र नंतर त्याला कुठेही पी म्हणत नाहीत तर प असेच म्हणतात!! मग बी किंवा पी असं शिकून उपयोगच काय? आपल्या मुलांची पहिली विकेट पडली, ती याच ठिकाणी. एबीसीडी आणि अबकड यांच्या मधला गोंधळ जो त्यांच्या मानगुटीवर बसला तो उतरलाच नाही. म्हणून इंग्रजी वाचणार्यांच्या, लिहिणार्यांच्या, स्पेलिंग येत नसणार्यांच्या अडचणी यांच्या मुळाशी हे एबीसीडी प्रकरण आहे!!
जोपर्यंत आपण अक्षरलेखन शिकण्याच्या सुरुवातीलाच एबीसीडी याप्रमाणे शिकवणे बंद करून त्या अक्षरास आपल्या मायमराठीतून काय म्हणतात ते शिकवत नाहीत, तोपर्यंत कधीही आपल्याला इंग्रजी व्यवस्थित येणार नाही. काय हरकत आहे S लिहून त्याला स म्हणून शिकवायला? मला तर नेहमी असं वाटत आलं आहे की, या अक्षरांची तोंडओळख करून देतानाच आपण पहिली चूक करतो. त्यांना एबीसीडी अशा नावांनी त्यांचा परिचय करून देऊ नये, तर अबकड नुसार सांगावे आणि नंतर त्यांना समज आल्यावर त्यांना कळू द्यावे की, हा ए आहे, बी आहे वगैरे. आपली मुले प्रचंड हुशार आहेत, परंतु त्यांच्या माथी मारली जाणारी पद्धत चुकीची असल्यामुळे त्यांचा गोंधळ संपत नाही हे सत्यचित्र आहे. आपण मात्र त्यांना एक मुखाने म्हणतो की मुलांना इंग्रजी येत नाही.
मित्रांनो, संकल्प करू या की या नंतरच्या पिढ्यांना तरी इंग्रजीच्या भयगंडापासून वाचवायचे असेल तर, आपण एबीसीडी ची ओळख करून देताना अबकड प्रमाणे शिकवा आणि नंतर त्यांना ए आहे की, बी आहे ते सांगा म्हणजे त्यांची किमान त्या अक्षरांशी व्यवस्थित तोंडओळख झाली, तरी त्यांचा गोंधळ होणार नाही. आणि त्यांना मस्तपैकी इंग्रजी समजू लागेल.
कारण,
शिकण्याची हौस त्यालाही आहे
पण त्याचं शिकणं होत नाही
कानावर फक्त इतकंच त्याच्या
की त्याला काही येत नाही
राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224
No comments:
Post a Comment