17 October 2021
cat च्या स्पेलिंग मध्ये k का नाही?
इंग्रजी वाचता न येण्यामागचा गोंधळ
जर k या अक्षराला क म्हणायचं आहे तर cat चे स्पेलिंग मध्ये k का नाही? किंवा c या अक्षराला क म्हणायचं असेल तर king च्या स्पेलिंग मध्ये c का नाही? असं जर एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारलं, तर शिक्षक काय सांगतील? गप्प बस. ते तसंच आहे. इंग्लिश असंच असतं. जेवढं सांगितलं तेवढं पाठ कर. आम्हीपण असेच शिकलो होतो. स्पेलिंगनुसार पाठ कर. खरं ना? परंतु तसं नाही. जोपर्यंत आपण मुलांना या प्रश्नांची खरी उत्तरं देऊ शकणार नाहीत, तोपर्यंत आपल्या मुलांना वाचता येणार नाही.ज्या शिक्षकांना हे गुपित माहीत असतं ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होतात, कारण ते मुलांना शंका उत्पन्न होण्यापूर्वी स्वतःच ती त्यांच्यापुढे मांडतात आणि मुलांना आश्चर्यचकित करून सोडतात. मुलांना आवडतं हे. जेव्हा शिक्षक त्यामागील गुपित मुलांना समजावून सांगतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा असतो!
खरंतर इंग्रजीमध्ये सॉफ्ट साऊंड आणि हार्ड साऊंड ( मृदू आणि कठोर )अशा प्रकारचे दोन ध्वनी असतात. आणि शब्द वाचन करत असताना या कन्सेप्टचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. c आणि k हे दोघेही जरी क असले तरी सुद्धा ज्या क नंतर e, i आणि y हे साऊंड म्हणजे ध्वनी येतील, त्या ठिकाणी क हा सॉफ्ट असतो. व त्यासाठी k हे अक्षर लागते, ( king मध्ये k नंतर i आहे म्हणून क साठी c न वापरता k घेतला आहे.) आणि a, o व u हे ज्या क नंतर असतील तिथे क हा harsh किंवा hard असतो, व त्यासाठी c हे अक्षर घ्यावे लागते,( cat मध्ये c नंतर a आहे म्हणून क साठी k न घेता c घेतला आहे! ) हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे.परंतु बऱ्याच शिक्षकांनाही हे दुर्दैवाने माहित नसते. मग ते तरी काय करणार?
c, g, s ही तीन अक्षरे ही अशीच आहेत. त्यांना प्रत्येकी दोन दोन नावे आहेत. ज्याच्यानंतर e, i,y येईल तो सॉफ्ट, ज्याच्यानंतर a, o,u येईल तो हार्ड. हे किती विद्यार्थ्यांना माहीत असेल? वाचकांपैकी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी यांची दोन्ही नावे म्हणजे उच्चार असे आहेत.
c- सॉफ्ट असेल तर स / हार्ड असेल तर क
g- सॉफ्ट असेल तर ज / हार्ड असेल तर ग
s- सॉफ्ट असेल तर ज / हार्ड असेल तर स
उदाहरणाने समजून घेऊया.
city सिटी. कारण c नंतर i ( सॉफ्ट e, i y)आला आहे. नाहीतर कीटी म्हटलं असतं! car कार. कारण c नंतर a ( हार्ड a, o, u )आला आहे.
सी म्हणजे क हे तो शिकला आहे सी फॉर कॅट मधून. परंतु सी म्हणजे स हेसुद्धा त्याला माहित असले पाहिजे. अशीच गत g आणि s ची आहे. हे जर आपल्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या टप्प्यांवर कळले तर ते judge ला 'जुडगे' म्हणणार नाहीत!
मित्रांनो, हा विषय फक्त ह्या दोन तीन अक्षरांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मुळाक्षरांची हीच गत आहे. ए पासून झेड पर्यंत बऱ्याच अक्षरांना वेगवेगळी नावे आहेत, वेगळे उच्चार आहेत. परंतु विद्यार्थ्यांना ते माहीतच नसते. त्यांनी लहानपणी ज्याप्रमाणे पाठ केले त्याचे नेमके विपरीत उच्चार पुढच्या वर्गांमध्ये गेल्यावर त्यांना म्हणावे लागतात. आणि मग त्यांचा संभ्रम होतो. म्हणून नुसतं एबीसीडीची घोकंपट्टी केली म्हणजे मुलांना वाचता येईल या भ्रमात कुणी राहू नये, तर प्रत्येक अक्षराला असलेले वेगवेगळे आवाज वेगवेगळे ध्वनी मुलांच्या मनःपटलावर लहानपणापासूनच कोरले गेले पाहिजेत. दुर्दैवाने हे न झाल्यामुळे त्यांना इंग्रजी वाचता येत नाही. आणि वाचता न आल्यामुळे यांना बिनचूक लिहीताही येत नाही. आणि मग इंग्रजी चा राक्षस त्यांच्या मानगुटीवर जो बसतो, तो शाळा सुटेपर्यंत त्यांची मानगुट सोडत नाही. पुढील लेखात आपण सर्व इंग्रजीच्या मुळाक्षरांची झाडाझडती घेऊया.
कारण
प्रत्येक मुलगा महत्वाचा
पहिल्या बेंचवर बसलेला असो,
की शेवटच्या बेचवरचा रुसलेला...
प्रत्येक मुलगा महत्वाचा!
- राजेश्वर शेळके
( बिझिनेस इंग्लिश,केम्ब्रिज.)
9423542224
No comments:
Post a Comment