एक मुद्दा, एक विचार!
बुधवार - 29 जानेवारी 2025
▪️
*ये 'इ-पब्लिक' है!*
_*शोले चित्रपटातील गब्बर सिंगच्या तोंडचं एक वाक्य फार गाजलं होतं, "कितने आदमी थे?" आज जर गब्बर सिंग पुन्हा परतून आला आणि पुन्हा गावात माणसं पाठवली तर तो प्रश्न विचारेल, "कितने मोबाईल थे?" आणि कालिया सांगेल, "सरदार, आदमी चार, मोबाईल आठ!"*_
_*आज परिस्थिती अशी आहे की काही माणसं अक्षरशः मोबाईलवेडी झाली आहेत. काय तर म्हणे सोशल मीडियावर चमकायचं आहे. मंडळी इतकी नादावलीयत की पहाटेच उठून पहिली पोस्ट टाकण्यापासून रात्री लेटनाईटची पोस्ट टाकेपर्यंत सर्व पुण्यकर्म यांनाच करावं लागतं. त्यांच्या जेवणाच्या ताटात मोबाईल ठेवण्यासाठी एक खाचा बनवून घेण्याची वेळ आलेली आहे, कारण मोबाईलशिवाय यांना जेवण जाईनासं झालं आहे. मोबाईलने या लोकांवर काय काळी जादू केली आहे कोण जाणे! कधीकाळी रात्र झाली की भूताखेतांचा सुळसुळाट असे. हडळ, खवीस ही नावं ऐकली तरी घाम फुटे. भीतीने अंगावर शहारे येत. रात्री बेरात्री उठायला लोक घाबरत. मुलं गप झोपत. मोबाईल आल्यापासून गुडूप अंधारात तोंडावर स्पॉटलाईट पाडून रात्रभर हीच भूतं जागी असल्याने ओरीजनल भूतांचा धंदा बंद पडला आहे. मुळात मोबाईल हीच एक जादू आहे. ज्याला इंग्रजीमधलं 'क म्हणता ढ' कळत नाही, त्यालाही मोबाईलच्या स्क्रीनवरचं सगळं इंग्लिश समजतंय म्हणजे काय? जादूच नाही का? लिहिण्या वाचण्याचा जमाना केव्हाच गेला! आता फक्त ‘बघण्याचा’ जमाना आला आहे. आणि बघण्याला ना भाषेचा अडथळा, ना देशाचा, प्रायव्हसीच्या नावाखाली कंटेंटचाही! त्याच्या बदल्यात यांना मिळतं काय, तर डोळ्यांना त्रास, ओव्हरथिंकिंगचा फास, इमोशनल स्ट्रेस आणि अशाच अनेक गोष्टी. काहीतरी, कुठेतरी चुकतंय खरं. पण विचार कोण करणार?*_
_*तथाकथित मोठ्यांचं एवढं कर्तृत्व असेल तर लहानग्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार? लहान मुलं ते शिकत नाहीत जे मोठी लोकं त्यांना शिकवतात. मुलं ते शिकतात, जे मोठी माणसं करतात! मोठ्यांचं पाहून लहान-लहान मुलंही मोबाईलसाठी आकांडतांडव करीत आहेत. पोरासोरांचं सोडा, आत्ता कुठे डोळे उघडू लागलेलं तान्हं बाळही मोबाईल पाहून हसू-रडू लागलं आहे. त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतला तर पप्पांना लाथा मारू लागलं आहे! भलतंच अवघड झालं आहे हे प्रकरण. लहान वयात मुलांना चष्मे लागताहेत. ज्यांचे दुधाचे दातही अजून पडले नाहीत त्यांना चष्मे लागावेत? तोंडी फटाफट उत्तरं देणाऱ्या मुलांना चार शब्द शुद्ध लिहिता येऊ नयेत? काहीतरी, कुठेतरी चुकतंय मंडळी.*_
_*मोबाईलचा केवळ गरजेपुरता वापर करणाऱ्या आणि उरलेला अधिकाधिक वेळ मोबाईल जाणीवपूर्वक बाजूला ठेऊन जिवंत माणसांसोबत घालवणाऱ्या समंजस लोकांना दंडवत घालावासा वाटतो, तो यामुळेच!*_
-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc
No comments:
Post a Comment