◾
*गायीच्या पोटाची गोष्ट*
_एक मुद्दा, एक विचार!_
_7 मे, बुधवार_
▪️
*गायीच्या पोटाची गोष्ट*
*“मम्माsss लवकर बाहेर ये. आपल्या दारात काऊ आली आहे. सोबत तिचं बेबीपण आहे!” एक चिमुरडी मम्मीला हाक मारत होती. मम्मा किचन मधून बाहेर आली आणि म्हणाली, “अगं तिला गाय म्हणावं आणि तिच्या बेबीला वासरू. मम्मीने गायवासराला हळदकुंकू लावलं. स्वतःच्या कपाळावरही लावलं, मनोभावे नमस्कार केला, आणि मुलीलाही करायला लावला. मुलगी हे पहिल्यांदा पाहत होती. तिने विचारलं, “मम्मा, गायीला हळदकुंकू का लावलं? मम्मी म्हणाली, “बेटा गाय आपली माता असते. तिच्या पोटात तेहतीस कोटी देव राहतात.” मुलगी भुवया उंचावत म्हणाली, “यू मिन थर्टी थ्री करोर्स?” मम्मी म्हणाली, “मी तर लहानपणापासून हेच ऐकत आले आहे बाई.” “म्हणून गायीचं पोट मोठं असतं का?” या मुलीच्या प्रश्नावर मात्र मम्मीसह मुलगीही जोरात हसली.*
*मायलेकीचा हा संवाद ऐकत असलेले आजोबा मागून म्हणाले, “बाळा, कोटी म्हणजे दरवेळी करोडच असले पाहिजेत असं नाही. कोटी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो ‘प्रकार’. गायीच्या शरीरात तेहतीस निरनिराळ्या देवता वास करतात; किंबहुना त्यांनी रहावं इतकी गाय पवित्र आणि उपयुक्त आहे असं त्यामागील शास्त्र आहे.” नात म्हणाली, “तेहतीस तर तेहतीस. परंतु एवढ्या सगळ्यांना बसायला जागा तर लागेलच ना!” आजोबांनी ‘हो तर!’ असं म्हणत हसत बाजू मारून नेली. 'गायीच्या पोटात एवढ्या सगळ्या देवता कशा राहत असतील?' हा प्रश्न मुलीच्या मनात घोळत राहिला. आजकालची मुलं केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नाहीत. मुलीने अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाल्यावर मोबाईल घेऊन बसली, आणि इंटरनेटवर प्रश्न विचारला, ‘गायीच्या पोटात काय असते?’ इंटरनेटवरचे उत्तर वाचून तिला धक्काच बसला, कारण स्क्रीनवर उत्तर आलं होतं, ‘प्लास्टिक’!*
*मुलीने आजोबांना हाक मारली, “आजोबा, तुम्ही दोघांनीही मला सांगितलं नाही, की गायीच्या पोटात प्लास्टिक असतं म्हणून, आणि त्यामुळे गाय मरते म्हणून? हे फोटो पहा बरं. एक गाय मरून पडलेली आहे, आणि तिच्या पोटातून प्लास्टिकच्या मोठमोठ्या पिशव्या बाहेर काढतायेत. खोटं आहे का हे?” नातीच्या ठाम आणि थेट प्रश्नावर आजोबांना काय बोलावं कळेना. गंभीर चेहऱ्याने फक्त इतकंच म्हणाले, “खरं आहे बाळा. आम्हाला माफ कर. पण शिळंपाकं अन्न आणि कालचे उरलेले पदार्थ उघड्यावर टाकून देणारे मूर्ख लोक ते पदार्थ प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवतात. घरात नको असलेलं प्लास्टिक रस्त्यावर फेकतात. बिचारी गाय भूकेपोटी ते तसेच खाते. घातक प्लास्टिक तिच्या पोटात जाते, त्याचा गोळा होतो, आणि ती पोट फुगून मरते. हे वाईट आहे. पण या मुर्खांना सांगणार कोण? आपल्यापुरतं म्हणशील तर आपण प्लास्टिक पिशवी अजिबात वापरत नाही. तू बघीतलयस का मला कधी, प्लास्टिक पिशवीत काही नेताना किंवा आणताना?” “नाही! आणि म्हणूनच तुम्ही आणि आजी कधीही बाहेर जाताना कापडी पिशवी घेऊन जाता, हो, ना?” “करेक्ट!” म्हणत आजोबांनी नातीला गोड मिठी मारली.*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment