◾
*जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_15 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!*
*“रविss कुठे आहेस तू? काय करतोयस?” “पप्पा अभ्यास करतोय, बेडरूममध्ये.” “इकडे ये, एक रफ वही आणि पेन घेऊन ये.” “कशासाठी?” “आण म्हटल्यावर घेऊन येत जा. पुढे शंभर चौकशा करत जाऊ नकोस.” मुलगा निमुट वही-पेन घेऊन आला. वडिलांनी त्याच्या हातातून वही घेतली, एक कोरं पान फाडलं आणि त्याच्या बारीक घड्या केल्या! ‘आता पप्पा कागदाची होडी, विमान किंवा एखादी जादू वगैरे करून दाखवतात की काय?’ मुलाला प्रश्न पडला.*
*वडिलांनी जेवढ्या घड्या पडल्या होत्या तेवढे तुकडे केले, आणि म्हणाले, “आता या प्रत्येक चिठ्ठीवर एकेक नाव लिहायचं.” ‘अच्छा! म्हणजे आज 'राजा-राणी-चोर-शिपाई' खेळण्याचा मूड आहे तर!?’ असा विचार मुलाच्या डोक्यात येईपर्यंत वडिलांनी खिशातून कोऱ्या करकरीत नोटा बाहेर काढल्या. बायकोला हाक मारली. बायको किचनमधून हात पुसतच बाहेर आली, नोटा पाहिल्या व म्हणाली, “झाला वाटतं पगार?” नवऱ्याने मान हलवली. तीही कॉटवर येऊन बसली. सगळा लवाजामा कॉटवर स्थिरस्थावर झाल्यावर नवरा बायकोला म्हणाला, “सांग आता.”*
*बायकोने सुरू केलं- "घरभाडे अमुक रुपये." वडिलांनी मुलाकडे पाहिलं व म्हणाले, “लिही एका चिठ्ठीवर -घरभाडे.” मुलाच्या लक्षात ‘त’ म्हणता तपेलं आलं. नवऱ्याने पगारामधले घरभाड्याचे पैसे मोजले, बायकोच्या हातात दिले, तिने एक-एक नोट सुट्टी करून बरोबर आहेत का पाहिलं. “हं!” म्हटलं. वडिलांनी नोटा घेतल्या, ‘घरभाडे’ लिहिलेली चिठ्ठी पैशांवर लावली आणि नोटांना रबरबँड लावून बाजूला ठेवली. मुलाला म्हटले, “लिही- किराणाची उधारी, दूधवाले काका, भाजीपाल्यावाली मावशी, लाईटबिल, गॅसची टाकी, मोटरसायकलचा हप्ता, पेट्रोलचे पैसे, दवाखान्याचा खर्च, रविची शाळेची फी, ट्युशनची फी, दीदीचा होस्टेलचा खर्च, मोबाईलचा रिचार्ज, किरकोळ खर्च, उरलेले पैसे...”*
*वडिलांनी चिठ्ठ्यांप्रमाणे पैसे मोजून त्यांना रबरबँड लावले, पण शेवटची चिठ्ठी तशीच उरली. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. मुलाने म्हटलं, “पप्पा तुम्ही जॉबऐवजी एखादा बिझनेस वगैरे का नाही करत? बिझनेसवाल्या लोकांकडे खूप पैसे असतात."*
*वडिलांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. प्रत्येक माणसाला असंच वाटतं. आपल्यापेक्षा दुसरे जास्त सुखात आहेत; पण तसं काही नसतं. दुरून डोंगर साजरे. जवळ गेलं की सब घोडे बारा टक्के! सगळ्यांच्या डोक्याला सारख्याच मुंग्या! त्यापेक्षा आहे त्याचं असं काही नियोजन करता आलं की जीव सुखात राहतो बघ."*
*आज मुलाने पुस्तकात नसलेले दोन तीन नवे धडे एकाच अनुभवात शिकले. शिवाय वडिलांनी शेवटच्या चिठ्ठीचे पैसे मुद्दाम खिशातच ठेवले होते ते वेगळं!*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t
No comments:
Post a Comment