◾
*तिचं असणं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*तिचं असणं*
*जगात खऱ्या जाती दोनच. स्त्री आणि पुरूष. तसं बघितलं तर स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक संयमी, सहनशील, विचारी आणि धाडसीसुद्धा. त्याग स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. आपण केवळ आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणला तरी या विधानाची खात्री पटते.*
*अशा या सर्वगुणसंपन्न स्त्रीला बरोबरीचा दर्जा देत राहिलो तर आपलं वर्चस्वच संपुष्टात येईल असला अहंकारी विचार पुरूषजातीत केव्हातरी आला आणि त्यांनी स्त्रियांना कमी लेखायला सुरुवात केली. काही स्वार्थी माणसं काळालाच कसं अघोरी वळण लावतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण.*
*स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजाने त्यांच्या पायाला दोर बांधला परंतु स्त्रियांनी त्यांचीच पैंजणं केली. त्यांनी दोन चांगले शब्द ऐकू नयेत म्हणून त्यांच्या कानांना छिद्र पाडली; तर त्यांनी त्या कानांनाच डूल अडकवून त्यांचं सुंदर आभूषण बनवलं. त्यांना चांगला सुगंध घेता येऊ नये म्हणून समाजाने त्यांच्या नाकाला छिद्र पाडलं; स्त्रियांनी त्याच्यामध्ये नथ अडकवली आणि आणखी सुंदर बनल्या. त्यांनी कुरूप दिसावं म्हणून समाजाने त्यांचं कपाळ गोंदून विद्रूप केलं; परंतु स्त्रियांनी त्यावर सुरेख कुंकू रेखून त्या आणखी सुंदर झाल्या. शेवटी माणूस हरला, पण स्त्रिया हरल्या नाहीत. उलट जेव्हा जेव्हा माणूस हतबल झाला, हवालदिल झाला, तेव्हा तेव्हा स्त्रियांनीच त्याला प्रेरणा दिली, प्रेम दिलं, आधार दिला आहे.*
*आजही स्त्री घरी राहणारी असो, की कमावती असो, कुटुंबाचा आधारच आहे. मुलं शाळेतून परतली की अगोदर आईकडे धाव घेतात. नवरा थकून-भागून घरी आला की बायकोलाच हक्काने चहा ठेवायला सांगतो. तीही आवडीने बनवते. कमावत्या स्त्रीचा पगार झाला की ती कुटुंबासाठी काय करता येईल याचाच अगोदर विचार करते.*
*कित्येक कमावत्या स्त्रियांच्या पगारावर थेट नवरे हक्क सांगतात. त्या स्वतःच्याच पगारातून मनासारखा खर्चही करू शकत नाहीत, घरी राहणाऱ्या असतील तर नवऱ्याचे पैसे हक्काने हवे तेव्हा हवे तसे वापरू शकत नाहीत; तरीही त्यांचं प्रेम तसूभरही कमी होत नाही. कारण त्यांच्यात उपजत असलेली ममता, प्रेम, जिव्हाळा! या मायेपोटी त्या एकवेळ स्वतःकडे दुर्लक्ष करतील पण कुटुंबाचं अगोदर पाहतील. त्यांच्या तब्येतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी त्या उठसुठ मांडत बसत नाहीत; मांडल्या तरी बऱ्याचदा त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. काढू नये, पण तरीही त्या आजही अंगावर आजारपण काढतात. पण कधीकधी हे अंगावर काढलेलं दुखणंच त्यांच्या जीवावर बेततं तेव्हा सगळं कुटुंबच हादरून जातं! कारण स्त्री आहे, तर घर आहे. एका विशिष्ट वयानंतर स्त्री एकटी जगू शकते; पुरूष नाही! प्रसंगी आभाळाएवढ्या उंचीचा धिप्पाड कर्तृत्त्वसम्राट माणूसही बायकोच्या किंवा आईच्या कुशीत ढसाढसा रडतो. म्हणून कुटुंबात स्त्री असली पाहिजे, आनंदाने जगली पाहिजे, आणि कुटुंबातील प्रत्येकाने तिला जीवापाड जपलं पाहिजे!*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t
No comments:
Post a Comment