Thursday, February 19, 2026

आड आणि पोहरा

*आड आणि पोहरा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*18 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*आड आणि पोहरा*

*एका नवीनच रंग दिलेल्या घराला भेट देण्यासाठी दुसरं एक कुटुंब आलं. घर छान सजवलेलं होतं. सगळं काही एकदम फ्रेश! सगळेजण घराची स्तुती करत चहा, फराळ आणि गप्पांमध्ये गुंतले असताना पाहुण्याच्या आठ-दहा वर्षाच्या मुलाने हातातल्या गाडीच्या चावीने घरातल्या नव्या कोऱ्या भिंतीला खरवडून टाकलं, आणि महागामोलाचा पेंट लावलेली भिंत सगळी विद्रूप करून टाकली! घर ज्यांचं होतं त्यांनी जेव्हा ते पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनात काय वादळ उठलं असेल बरं? करा विचार! तुमचं घर असतं तर तुम्ही काय केलं असतं? त्या मुलाच्या घरच्यांकडून तुम्ही काय अपेक्षा केली असती? त्यांनी मुलांना बाहेर जाण्याआधीच ‘तिकडे कसं वागावं’ हे जरा सांगायला पाहिजे होतं, नाही का?*

*आपण माणसांच्या समाजात राहतो. हा समाज हजारो वर्षांपासून इथपर्यंत सुरळीत चालत आला कारण माणसांनी स्वतःच्या आणि आपल्यासोबत जे आहेत त्यांच्या जगण्याला काही फुटपट्ट्या लावून घेतल्या, काही नियम घालून घेतले आणि त्यांची मर्यादाही वारंवार सांभाळली. बाप नावाच्या माणसाचं वागणं कसं असावं, मुलांनी कसं वागावं, पाहुण्यांनी कसं वागावं वगैरे. माणसं या जगण्याच्या फुटपट्ट्या निरंतर जपत आली आहेत. एकमेकांचा आदरयुक्त धाक ठेवत आली आहेत. समाज आपल्याला काय समजतो, आणि आपण कसं वागलं पाहिजे याचं एक अनामिक बंधन लोकांनी घातलेलं अगदी कालपर्यंत तरी दिसत होतं, म्हणून सगळं सुरळीत होतं. जगण्यात एक अदब होती.*

 *आता काही लोक हळूहळू या फुटपट्ट्या सोडून द्यायला लागले आहेत. आता तुम्ही सगळ्याच दुकानदारांकडून चांगल्या मालाची अपेक्षा करू शकत नाही. डॉक्टरांकडून चांगल्या वैद्यक सेवेची अपेक्षा करू शकत नाही. सुतार तुमचं फर्निचर चांगलं बनवेलच याची आता खात्री राहिलेली नाही. सरकारी कर्मचारी लाच न घेता काम करेलच असं नाही. पोलीस चोराला पकडल्यावर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवेलच याची खात्री नाही. न्यायाधीश खराखुरा न्याय देतीलच असं नाही. ज्यांच्याकडून कधीही व्यसनाची अपेक्षा केली नव्हती, ते गटारात; तर जे इतरांना ज्ञानामृत पाजत होते ते अश्लीलतेच्या प्रकरणांमध्ये रंगेहात सापडत आहेत. दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे रात्री दारूच्या पार्ट्यांमध्ये झिंगून पडलेले दिसत आहेत. निवडून दिलेले सगळे राजकीय लोक हे तसे सामान्य माणसांचे सेवक; पण ते आता आपले मालक असल्यासारखे वागू लागले आहेत! समाजात अतिशय सात्विक चेहरा असलेल्या माणसांचा दुसरा चेहरा इतका भयावह आहे की भीतीने थरकाप व्हावा!*

 *हे सगळं असं आणि असंच आहे. मोठ्या माणसांनीच ताळतंत्र सोडलंय, मग यापुढे त्या भिंत खरवडणाऱ्या मुलाला तरी दोष देऊन उपयोग काय? शेवटी जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार! मंडळी, छत्रपती शिवरायांचं स्मरण करूया, त्यांच्यासारखं होऊया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यापुरता का होईना आड स्वच्छ ठेऊया!*
*जय जिजाऊ! जय शिवराय!*
🚩
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...