🔳
लायकी नसलेल्यांची धावपळ
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके
नाशिक
• एक मुद्दा एक विचार
• बुधवार दिनांक 29 जुलै 2026
तुम्हाला आठवतंय? आपण भारताला महासत्ता बनवायला निघालो होतो? रस्त्याने समाज सुधारण्याच्या गप्पा करता-करता बरेच पुढे निघून आलो राव आपण! वीस लाख द्या, तुम्हाला NEET चा पेपर परीक्षेआधीच देतो. पंधरा लाख द्या, तुमचे इंजिनिअरिंगचे पर्सेंटाईल ९९ टक्के करून देतो. पाच लाख द्या, तुम्हाला TET चा पेपर देतो. तीन लाख द्या, तुम्हाला घरबसल्या बीकॉम च्या तिन्ही वर्षांचे सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेटसह देतो. आमच्या क्लासला प्रवेश घ्या, तुमच्या मुलाचा कॉलेजचा प्रवेशही करून देतो; शिवाय बारावीला जेवढे पाहिजेत, तेवढे मार्क्सही मिळवून देतो! अरे, काय चाललंय काय??
लायकी नसलेल्यांची लायकीत येण्यासाठी किती ही ना-लायकी धडपड म्हणायची! समाज सुधारतो आहे की बिघडतो आहे? बोगस धंदे करणाऱ्यांनी तर केव्हाच कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय, पण ‘झोल’ करून समाजात उथळ माथ्याने फिरणाऱ्या काळवंडलेल्या या बगळ्यांचं काय? एवढी लाज सोडून द्यावी? की लायकी नसलेल्या आपल्या मुलांना पैशाच्या बळावर, लायकी असलेल्यांच्याही पुढे, किंबहुना त्यांच्या जागी सेट करण्यासाठी धडपड करावी? रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांच्या प्रामाणिक प्रयत्नांचं काय? त्यांना डावलून एकवेळ यांना पुढे रेटालही; पण ज्या जागांसाठी हे करत आहात त्या यांना झेपणार आहेत का याचा काही विचार? कुठे चाललो आहोत आपण? कोण रोखणार यांना? आपल्या एक दिवट्या चिरंजीवाचं भलं होण्यासाठी, इतरांच्या प्रामाणिक स्वप्नांची राखरांगोळी करणारे मारेकरी आहेत हे! आणि यांची मुलं? पुढे ती काय म्हणतील? ‘माझ्या वडिलांनी हा पेपर असा फ्रॉड करून मिळवला आणि माझं ॲडमिशन झालं!’ हे सांगताना या मुलांची जीभ चाचरणार नाही? ‘चोरी करना तो खुद पापा ने सिखाया!’ चं बाळकडू प्यालेल्या या मुलांकडून पुढे तुम्ही काय अपेक्षा ठेवणार आहात? ‘होऊ देत आमचा मुलगा कसाही, तुम्ही नका मध्ये-मध्ये नाक खुपसू’ म्हणणाऱ्याना हे कधी समजणार, की हेच दिवटे नंतर समाज पोखरणारे किडे बनणार आहेत म्हणून? यांच्या ना-लायकपणाची शिक्षा इतर समाजाला का म्हणून? आणि ज्यांच्याकडे देण्यासाठी इतके पैसे नाहीत; आणि असतील तरी ज्याना द्यायचे नाहीत, त्यांच्या वाट्याला काय? क्षमता असूनही उपेक्षा? केवढा अन्याय आहे हा! तुकोबा तुकोबा, आणावी ती काठी, नाठाळांच्या माथी, हाणावया!!
‘शासनाने निर्माण केलेल्या चांगल्या संस्थांची दारे नेहमी अभ्यास करून पुढे येणाऱ्या हुशार, होतकरू, आणि बुद्धिमान उमेदवारांसाठी खुली असावीत. समाजातल्या सर्व चांगल्या गोष्टींची सूत्रे चांगल्या आणि लायक माणसांच्या हाती, योग्य माणसांच्या हाती असावीत, म्हणजे मग समाजाची वाटचाल योग्य दिशेने होते. हे साधे, सरळ, सोपे आणि सुटसुटीत सूत्र असताना, ना-लायकांच्या पदरात लायकीच्या जागा टाकून कोणता देदीप्यमान समाज आपण घडवू पाहत आहोत, देव जाणे!
-
राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
No comments:
Post a Comment