Tuesday, September 20, 2022

जुन्या पिढीचं असं होतं...

जुन्या पिढीचं असं होतं...

संस्कारांचं बियाणं घेऊन
फिरत असतात वावरभर
जमेल तेवढं पेरत असतात
उधळत असतात शिवारभर
कधी कधी येतं पीक...
कधी कधी हसं होतं!
जुन्या पिढीचं असं होतं!!

कुठे कुणाचं चुकलं काही
की यांनाच होतो अधिक त्रास
नवी पिढी कशी कुचकामी
यावर बोलतील अख्खा तास
भूतकाळामध्ये शिरून म्हणतील
आमच्यावेळी असं होतं,
आमच्यावेळी तसं होतं...
जुन्या पिढीचं असं होतं!

कळकळ यांची खूप असते
पण हात पुरत नाही...
कधीकधी तर मेंदूही खास
काम करत नाही
भरकटलेलं जहाज काठावर
मग कसंबसं येतं...
जुन्या पिढीचं असं होतं!

त्यांचा त्यांना मान मिळाला 
की आभाळ यांना ठेंगणं
मग नको कुणावर रुसणं
आणि नको कुणावर चिडणं
नातवंडांमध्ये असतील तर मग 
ते म्हणतील, तस्सं होतं!
जुन्या पिढीचं असं होतं!

हळवं असतं यांचं मन
डोळ्यांमध्ये असतो झरा...
पल्याड कोणी बोलवित असतं
शरीर थकलेलं असतं जरा
त्यांच्या केवळ असण्यानेही
घर अगदी साजेसं होतं
जुन्या पिढीचं असं होतं!!

हळूच सोडुन जातात हात
त्याचा नंतर होतो त्रास
फोटोकडे बघतो आपण
शिल्लक राहतात केवळ भास
वेळप्रसंगी गप्पा निघतात 
त्यांचं वागणं कसं होतं!
...
जुन्या पिढीचं असं होतं!

-राजेश्वर पांडुरंग शेळके
नाशिक
9423542224

Wednesday, September 14, 2022

दुनिया

निर्णय चुकला!  हसून म्हटली दुनिया
"मी वेडया माणसांत असतो हल्ली!"


दुःखाचे गाठोडे पेलत जगते दुनिया
तरी हासते किती बहाणे करते दुनिया

कुठे जराशी जागा मिळता टेकायाला
हळूच ओझे हलके थोडे करते दुनिया

तोल तिचाही हजार वेळा ढळतो येथे
सावध होते, पुन्हा पुन्हा सावरते दुनिया

तिच्या मनाचा खोल तळाचा हा गाभारा 
रोज नव्या स्वप्नांना येथे पुरते दुनिया 

जमेल तितके सांगत असते तुला मला ही 
सोबत घेउन बरेच काही मरते दुनिया 

कधी कुणाला उचलून घेते खांदयावरती 
कधी कुणाच्या सरणावरती चरते दुनिया! 

तुला वाटते तितकी दुनिया सोपी नाही
लाखामधल्या एखादयाला कळते दुनिया!

-राजेश्वर शेळके
नाशिक
9423542224

शाळा, शिक्षण आणि तो


वर्गाच्या भिंतींना केवळ नाही ठेका 
झाडाखाली सुध्दा शाळा शिकता येते !

त्याच्यासाठी.!

कोण म्हणतो अभ्यास म्हणजे 
नुसता डोक्याला ताप आहे?
शाळा म्हणजे टाइमपास 
अन् शिकणे म्हणजे पाप आहे?

सांगा कोणाला प्रत्येक लेक्चर 
भकास,बोरींग, रटाळ वाटतं?
सांगा कोणाला शाळा सोडून 
अर्ध्यावरती कटावं वाटतं?

गृहपाठ कम्प्लीट कर म्हटल्यावर
 कोण फक्त रट्टा मारतो?
अधली मधली वाक्ये गाळून 
उभा आडवा पटटा मारतो?

वर्गामधला भाई बनून
 कोण दुसऱ्याला छळतो?
खिडकीमधून सर दिसले की 
आपल्या जागेकडे पळतो?

पहिला बेंच रिकामा असूनही 
कोण शेवटीच बसतो?
वर्गात कधिकधीच असतो, 
पण त्याला गमपस्तावा नसतो?

कोण वर्गात टॉन्टस मारण्यात 
सगळ्यात पुढे असतो?
आणि सरानी प्रश्न विचारल्यावर 
एकदम गुपचूप बसतो!

कोण आठवडयातून एकदा तरी 
खरपूस मार खातो?
आणि एवढं सगळं सोसूनसुद्धा 
खुशाल अॅबसेंट राहतो?

परीक्षा जवळ आल्यावरती 
कोणाचा चेहरा पडतो?
कॉपी करताना पकडल्यावर
सांगा बरं कोण रडतो?

प्रत्येक वेळेला रिझल्ट लागल्यावर 
कोण निकालपत्रक लपवतो?
आणि चुकून सापडल्यावर 
काहीही कारणं खपवतो?

सांगा त्याच्या अशा वागण्याचं 
असतं कारण काय?
अहो त्याला मुळात कळलेलंच नसतं
हाऊ व्हाट अँड व्हाय?

गणितातल्या उदाहरणानी 
पुरता जाम होतो 
व्याकरणाच्या नियमांनी 
बिचारा हैराण हातो

विज्ञानाची अवघड भाषा 
सुपीक डोक्यात शिरत नाही
नुसता अक्षराचा पाऊस, 
मातीत पाणी जिरत नाही!

इतिहासाच्या तारखा छळतात, 
भूगोलामधले मॅप्स,
पोकळी भरून निघत नाही, 
डोक्यात राहतात गॅप्स !

शिकण्याची हौस त्यालाही आहे 
पण त्याचं शिकणं होत नाही
कानावर फक्त एवढंच त्याच्या
"याला काही येत नाही!

थोडं जाऊ त्याच्या कलाने,
मेथड बदलून पाहू 
शिकविण्याचं टेक्निक बदलू, 
रिझल्ट येतो का पाहू

शिक्षणाने त्याच्या चेहऱ्यावर
स्माईल ठेवलंच पाहिजे
खरंच दोस्तहो,आपण त्याच्यासाठी
एवढं केलंच पाहिजे
एवढं केलंच पाहिजे!

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Wednesday, September 7, 2022

शिक्षक दिन कृतज्ञता

🌻
*तुमच्यातल्या गुरूतत्वाला प्रेमादरपूर्वक चरणस्पर्श.*
🙇‍♂️

*कारण,*
🌻
*तुम्ही हे विद्यादानाचं क्षेत्र निवडलं ते यासाठी नाही की खूप पैसे कमवता येतील; पण यासाठी की मुळातच तुमच्यामध्ये एक शिक्षक दडलेला होता, म्हणून.*

🌻
*तुम्ही पदवीप्राप्त गुरू नंतर झालात, अगोदरपासूनच दुसऱ्याला काहीतरी समजून सांगण्याची कला तुम्हाला अवगत होती, म्हणून.*

🌻
*आपल्या मनातलं तर सगळेच सांगतात, परंतु आपण मिळवलेलं ज्ञान दुसऱ्याला देऊन त्याला श्रीमंत करणारे सगळे नसतात. तुम्ही तुमचं ज्ञान त्यांच्यात उतरवून येत्या पिढीला पुढील काळात श्रीमंत करण्यासाठी आता झटत आहात, म्हणून.*

🌻
*आपण नोकरी धरलीत, तेव्हा आपण खूप श्रीमंत नव्हतात, पण तुमची जिद्द प्रचंड होती, तुम्ही पार केलेल्या अनंत अडथळ्यांचे तुम्हीच साक्षीदार आहात, म्हणून.*

🌻
*तुम्हाला दऱ्यांखोऱ्यातल्या मुलांसोबत रमताना पाहिलं की आजही लोकांचा उर अभिमानाने भरून येतो, म्हणून.*

🌻
*फळ्यासमोर उभे राहिल्यावर देहभान विसरून मुलांना समजावून सांगताना तुम्ही अजूनही तितकेच तल्लीन होता, म्हणून.*

🌻
*तुमचं आणि विद्यार्थ्यांचं एक वेगळं नातं आहे. साक्षात भक्त आणि ईश्वराचं असावं तसं. तुमचे विद्यार्थी काहीतरी यश मिळवतात, आणि तुमची छाती अभिमानाने भरून येते कारण ते पहिला फोन तुम्हाला करतात, पहिला पेढा तुम्हाला भरवतात, कित्येकदा घरी अगोदर न जाता तुमच्याकडे अगोदर येतात, म्हणून.*

🌻
*मुलं एकवेळ आईवडिलांचं ऐकणार नाहीत, पण तुमच्या शब्दांवर त्यांचा अजूनही अतूट विश्वास आहे, म्हणून.*

🌻
*समाजातील इतर प्रत्येकजण एकच आयुष्य जगतो, परंतु तुम्ही आजवर शिकवलेल्या विद्यार्थ्यांची आयुष्ये ही तुमच्या आयुष्याच्याच प्रतिकृती असतात. तुम्ही शिकवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आयुष्यभर पुरतात. तुम्ही त्यांच्या आयुष्याचा एक भाग होऊन जाता, म्हणून.*

🌻
*मातीच्या गोळ्याला आकार देणारे तुम्ही सर्वश्रेष्ठ कुंभार आहात, म्हणून.*

🌻
*तुम्ही तुमची सात्विकता अजूनही शाबूत ठेवली आहे, म्हणून.*

🌻
*तुम्ही खरोखर ग्रेट आहात, म्हणून.*

🌻
*लोकांना म्हणू देत काहीही...*
*तुम्ही दिपस्तंभ होता, आहात,*
*आणि अखंड रहाल.*

*शेवटी इतकंच,*

🌻
*अडखळलेलं प्रत्येक पाऊल*
*आपोआप शिक्षकांकडे वळतं*
*आणि*
*प्रश्न जेव्हा रस्ता अडवतो,*
*तेव्हा शिक्षकांचं महत्त्व कळतं!*

*तुमच्यातल्या गुरूतत्वाला प्रेमादरपूर्वक चरणस्पर्श.*
🙇‍♂️

-राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

Sunday, August 21, 2022

पावसाने एवढे तर साधले आहे


*पावसाने एवढे तर साधले आहे*

पावसाने एवढे तर साधले आहे 
एक घर जगवून दुसरे पाडले आहे

मोजक्या धारा कुणाला चालल्या नसत्या? 
पण ढगांनी हे खुबीने टाळले आहे!

एक छप्पर पावसाने चिंब भिजलेले
दूर दुसरे वाट पाहुन त्रासले आहे

कोरड्या शेतांत नाही थेंबभर पडला
ऐकतो... शहरांत पाणी साचले आहे!

चांदण्यांची पालखी होती, कुठे गेली?
की पुरे आभाळ खाली सांडले आहे?

मायबापा पावसा इतकेच कर आता
जा, जिथे जाणे कधीचे थांबले आहे

राजेश्वर शेळके,नाशिक
9423542224

Monday, August 15, 2022

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : काय कमावलं? काय गमावलं? - Raj Shelke

🇮🇳
*आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. त्यानिमित्ताने हे थोडंसं आत्मचिंतन.*

1947 साली आपण स्वतंत्र झालो, तेव्हा आपल्याकडे काय उरलं होतं? काहीच नाही. आपल्या हाती आपली सत्ता आल्यानंतर पुढील आजपर्यंतच्या वर्षांत खालील काही गोष्टी मात्र आपण अथक प्रयत्नांनी साध्य केल्या.

पंचवार्षिक योजना,
औद्योगिक विकास महामंडळांची निर्मिती,
आर्थिक समृद्धी,
उद्योगधंद्यांची भरभराट,
इतर देशांची वाताहत होत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावत असलेला आपला दर्जा,
कंप्यूटर मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देशाने घेतलेली झेप,
भारतातील बुद्धिमान लोकांनी परदेशात जाऊन, स्थायिक होऊन का होईना, आपल्या देशाचे उंचावलेले नाव,
भारताची झपाट्याने इंडियाकडे होत असलेली वाटचाल,
अनेक क्षेत्रे जी अगोदर सामान्य जनतेला माहीत नव्हती ती ती त्यांच्या माहितीपर्यंत आणण्यामधील मिळालेले यश,
पिढ्यानंपिढ्या अशिक्षित राहिलेल्या शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाची पोहचलेली पाऊलवाट,
देशभर वेगाने विकसित होत असलेले रस्त्यांचे जाळे,
गरीब घरातल्या मुलांनीही जिद्दीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळवलेली अत्यंत सन्मानाची व महत्वाची शासकीय पदे,
डावलल्या गेलेल्या अनेक समाजबांधवांचा शासनकर्ता वर्ग बनण्यापर्यंतचा प्रवास,
एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर्स,
जागतिक परिसंवादांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व सन्मान,
वैज्ञानिक प्रगती व देशाची संरक्षण सिद्धता,
हॉस्पिटल्स व आरोग्यसुविधा,
अनेक उत्पादनांमध्ये देशाचा असलेला अव्वल  क्रमांक,
शहरीकरणामुळे आणि मेट्रोसिटीजमध्ये अनोळखी चेहऱ्यांच्या एकत्र काम करण्यामुळे थोडा नजरेआड झालेला जातीयवाद इत्यादी.
 
 या आणि अनेक अशा गोष्टींमुळे भारत जगात ताठ मानेने उभा राहतो आहे. परंतु आपण ज्या ठिकाणी सपशेल तोंडावर पडलो आहोत असे खालील कित्येक प्रश्न जे आपण सहज सोडवू शकलो असतो, ते समाजात अजूनही टिकून आहेत. या प्रश्नांच्या बाबत आपण किती जागरूक आहोत?

सामाजिक अहंकार,
दुसऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती,
चिटकून बसलेली आणि जात नसलेली जात,
तिला जाऊ न देणारे तिचे रखवालदार,
खालच्या जातीच्या लोकांना त्यांच्यापेक्षा खालच्या जातीबद्दल असलेली घृणा,
सख्ख्या नात्यांना लाज आणणारी आणि आपल्याच खानदानाचे नाव खराब करणारी भाऊबंदकी,
अशिक्षित आईबापांनी रक्ताचं पाणी करून, पोरांना शिकवून, नंतर आपल्याच अट्टाहासाने  त्यांच्या गळ्यात मारलेल्या अजागळ पोरी व त्यामुळे सगळ्यांच्याच सुखी संसाराची झालेली माती, पोरांच्या जागी पोरी ठेवुन सेम प्रकारे त्यांचेही केलेले मातेरे,
शिकलेल्या लोकांनी आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या ओव्हरस्मार्ट मुलांना चरायला सोडलेले मोकळे कुरण, त्यामुळे बिथरलेली पिढी,
तल्लफ पासून व्यसनाधीनतेपर्यंतचा तरुणांचा हतबल, जीवघेणा प्रवास, 
अति कर्मकांड, 
दोन धर्मामधील तेढ, 
शिकून सुधारण्यापेक्षा अधिकच अंधश्रद्धाळू झालेले व आपल्या सफाईदार इंग्रजी भाषेतुन संभाषण करून, इतरांवर छाप टाकुन, त्यांनाही बाबा, बुवा आणि तत्सम अतिकथित मार्गाला अक्षरशः जुंपणारे सू?संस्कृत भक्त,
देवघरातील वाढत चाललेली फोटोची संख्या,
नालायक व खुनशी नेतृत्व,
काटा काढण्याची प्रवृत्ती,
आपल्यापेक्षा दुसऱ्याला मोठं झालेलं बघू न शकण्याची विकृती,
स्त्रियांकडे बघण्याची घाण नजर,
स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी पुरुषांना अक्षरशः ब्लॅकमेल करणाऱ्या निर्लज्ज स्त्रिया,
लाज आणणारं घाणेरडं राजकारण,
स्वतःचा स्वाभिमान आणि तटस्थता अक्षरशः विसरून किंवा विकून कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले आणि त्यांची बाजू हिरीरीने मांडून अनभिज्ञ समाजाची दिशाभूल करणारे समाजातील शिक्षक, विचारवंत, न्यायाधीश असे सन्माननीय परंतु लाचार घटक, 
पैशातून राजकारण, राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा राजकारण या दुष्टचक्राने घोटलेला लोकशाहीचा गळा,
स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारे आधुनिक बकासुर,
पैशासाठी दर निवडणुकीत विकली जाणारी गरजवंत, बिनडोक, सामान्य जनता,
मतदान न करणारे प्रज्ञावंत,
शिक्षणाचा अक्षरशः ठरवून वाजवलेला बोजवारा आणि किळसवाना बाजार,
आईबापांना तोंडावर अपमानित करण्यापर्यंत पुढारलेली त्यांची नवशिकी औलाद,
झोपडपट्ट्यामधले पोसलेले दलाल आणि तिथे राहून श्रीमंत होऊनही झोपडपट्टी न सोडणारे तथाकथित भाई,
आर्थिक आकडेमोडीची लूटमारी करणारे आधुनिक कॉर्पोरेट दरोडेखोर,
शेल कंपन्यांमार्फत चाललेली हजारो कोटींची अफरातफरी 
गरज नसताना वाढत चाललेली प्रार्थनास्थळांची यादी व त्यांच्या आडून पुढे रेटवले जाणारे छुपे अजेंडे,
पुस्तकांपासून दूर चाललेली पिढी,
मदत करण्यापेक्षा व्हिडीओ शूट करण्यात धन्य मानणारे टेक्नॉसेव्ही ड्युड्स,
 देश आणि देशबांधव, माणुसकी आणि आपुलकी या कमालीच्या सपक होत चाललेल्या संकल्पना.

     या आणि इत्यादी गोष्टींमुळे आपली मूळ प्रश्न यादी अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आपला सदसदविवेक जागा होवो आणि भारतीय म्हणून आपली मान सदैव अभिमानाने उंचावलेली राहो या सदिच्छा.

✒️
- *राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक.*
*9423542224*

Thursday, November 11, 2021

तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं काय?


*दिसायला गोगलगाय, यांचे पोटामध्ये पाय*
*तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं  काय?*

*चेहऱ्यावरती भाव असा की कळत मुळीही नाही*
*धक्का मारा, तरीही गाडी ढळत मुळीही नाही*
*हजार वेळा सांगूनसुद्धा पुन्हा विचारतात... "काय"??*
*तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं  काय?*

*जमेल तितकं आडमार्गाने करून घेतात काम*
*दुनिया खाते हजार खस्ता खिशात यांच्या दाम*
*दूध मिळेना लोकांना हे मजेत खातात साय!!*
*तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं  काय?*

*ओठावरची गोष्टही यांच्या पोटात होते गडप...* 
*"ऐकलच नाही" म्हणतात फक्त, सहजच करतात हड़प...!*
*कुलुप लावून खुशाल किल्ली फेकून देतात की काय??*
*तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं  काय?*

*कोणत्याच् लफडयात कधीच नसतं यांचं नाव अन गाव*
*मोठ्ठ्या जहाजांमागे ठेवतात हळूच आपली नाव*
*समुद्र खवळला तर खवळू दे यांचं बिघड़तं काय??*
*तुम्हीच सांगा आता नेमकं यांचं करायचं  काय?*

🖊️
© राज पांडूरंग शेळके.
 9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...