Friday, May 1, 2026

शहरातले, गावाकडचे

*शहरातले, गावाकडचे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*22 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*शहरातले, गावाकडचे!*

*एका मोठ्या भावाच्या शहरातल्या घरी लहान भावाचा गावाकडचा पोरगा शिकायला आणला. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. मोठ्या भावाची मुलं आणि हा धाकट्याचा मुलगा यांच्यात काही वादावादी झाली, की मोठ्या भावाचा जीव तीळतीळ तुटायचा. नेमकी बाजू कोणाची घ्यावी हे त्याला काही कळायचं नाही. भावाच्या पोराची बाजू घेतली, की बायको त्याच्यावर डाफरायची. स्वतःच्या पोरांची बाजू घेतली की भावाचा पोरगा फोनवर सांगायचा, “मला मारतात! माझ्यावर मुद्दाम चिडतात!”*

 *मोठ्या भावाची कुचंबणा बिचाऱ्यालाच माहीत.*

 *एके दिवशी असाच कशावरून तरी खटका उडाला, आणि संध्याकाळची वेळ पाहून पोरगा घरातून गायब झाला!*

    *मोठा भाऊ कामाच्या वैतागातून घरी पोहोचलाच होता, की घरच्यांनी त्याच्या कानावर बातमी घातली. त्याचं डोकं बिथरलं. 'पोरांचं काहीतरी भांडण झालं होतं’ कळल्याबरोबर त्याने पहिल्यांदा आपल्या पोराच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि हातातली पिशवी टाकून स्वतः पोराला शोधायला निघाला. घरातली सगळी मंडळी कामाला लागली.*

 *सात-आठ वर्षाचा पोरगा कुठे गेला असावा कोणाला कळेना. अंधार पडायला लागला तसा यांच्या पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. पोरगा सापडला नाही, तर घरच्यांना काय तोंड द्यायचं? तेवढ्यात एकजण म्हणाला की गावाच्या बाहेर त्याला हायवेवर चालताना मी मगाशी बघितला! म्हणजे? हा मुलगा पायी गावाच्या दिशेने चालत गेला की काय? आणि जर रस्त्याने एखाद्या ट्रकमध्ये वगैरे जाऊन बसला, एखाद्या अनोळखी गाडीत बसून गेला, तर काय करायचं? पोराला शोधायला हायवेवर चार गाड्या गेल्या. दूरपर्यंत जाऊन त्यांनी फोन केला, “मुलगा इकडे कुठे दिसत नाही.” वातावरण गंभीर झालं. शोधून बिचारे थकून गेले.*

  *इकडे घरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या एका देवळात एक आजोबा संध्याकाळी फेरफटका मारायला गेले आणि बाकड्यावर बसले. बाकड्याखाली त्यांच्या पायाला काहीतरी लागलं म्हणून खाली वाकून बघतात तर काय? खाली पोरगा बसलेला! त्यांनी त्याला बाहेर काढलं, व्यवस्थित विचारपूस केली, आणि विश्वासात घेऊन त्याला मोठ्या भावाच्या घरी घेऊन आले. त्याचा जीव भांड्यात पडला. रात्र गंभीर शांततेत सरली.*

 *सकाळी धाकट्याच्या मुलाची आंघोळ वगैरे झाल्यावर मोठ्या भावाने त्याला चारचाकी गाडीत टाकलं आणि शंभर दीडशे किलोमीटरवर असलेल्या थेट आपल्या गावी गाडी घेऊन आला. पोराला गाडीतून उतरवलं, त्याच्या बापाच्या स्वाधीन केलं आणि म्हणाला, “सांभाळ रे बाबा! शहरात इकडे मला माझा जीव जड झालाय, तिथे तुझ्या पोराचे नखरे झेलायला मला कुठे वेळ आहे? शिवाय कपाळावर एखाद्या वेळी कलंक लागला तर आयुष्यभर मिटायचा नाही!”*

   *म्हणून ज्यांची बाजू पडती आहे, त्यांनी पोरांना ‘तिकडच्या घरी कसं रहावं, कसं वागावं, आणि दुसऱ्याच्या पोटात शिरून त्याला कसं जिंकावं’ हे शिकवून ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्या घरी दुसऱ्यांची मुलं शिकायला आहेत त्यांनी, त्यांच्या मुलांनी, या मुलांना समजून घेऊन त्यांना मायेचा आधार दिला पाहिजे, म्हणजे ते शिकून पुढे गेलेलं मूल मरेपर्यंत उपकार विसरत नाही!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


भ्रमाचा भोपळा

*भ्रमाचा भोपळा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*8 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*भ्रमाचा भोपळा!*

  *माणसाची तीन बलस्थानं आहेत. माय, माती आणि मायबोली. ज्यांच्याकडे ह्या तीनही गोष्टी शाबूत आहेत ते नशिबवान! पण मायबाप आयुष्यभरासाठी थोडेच पुरतात? आपल्या आयुष्याचा गाडा योग्य वळणावर आणून सोडण्यापुरता त्यांचा प्रवास!*

  *माय म्हणजे नुसती माय नाही; तिच्यात बापही आला. ते दोघे एकच आहेत. बापाचं छत्र पोरांच्या डोक्यावरून लहानपणीच हरवलेलं असतानाही लेकरांच्या भल्यासाठी आयुष्यभर संकटाशी झुंजणारी माय म्हणजे धैर्याचा मर्द हिमालय! आणि बाप? बाप ही दुसरी मायच असते; शर्ट पॅन्ट घातलेली. मायच्या परोक्ष लेकरांची माय बनून त्यांचा सांभाळ करणारा बाप बघा. प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, काळजी तीच; फक्त शरीर वेगळं. पण आजकाल मायला 'माय म्हटलेलं चालत नाही. बापाला 'बाप म्हटलं तर राग येतो. शहरात जन्माला झालेल्या नव्या पिढीला आईवडिलांना 'मम्मा 'डॅडा म्हटलं की जास्त 'कुल आणि 'क्लोज वाटतं असा गोड भ्रम आहे.*

   *आपण सर्वजण मातीचे पुतळे आहोत. मातीतूनच आपल्याला प्रत्येकाला उगवून यायचं आहे आणि शेवटी माती बनून या मातीतच मिसळून जायचं आहे. आपला आदी आणि अंत मातीच तर आहे!*

*कधीकाळी माती सगळ्यांसाठी होती. लोक मातीला धरून राहत. माती कपाळाला लावली की आयुष्यभराची निष्ठा वाहत. पण जसे माणसाला हावरटपणाचे डोहाळे लागले, तो दुसऱ्यांच्याही वाट्याची माती हडप करू लागला. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने काही माणसं मातीवान झाली. जे बळी नव्हते त्यांचा बळीराजा झाला, आणि मातीमोल झाला. आज शहरात मातीच्या कणाला कोटीची किंमत येऊ लागली आहे. मोक्याच्या जागेवरच्या मातीसाठी माणसं एकमेकांचे मुडदे पाडू लागली आहेत. 'शेती इकायची नसती, राखायची असती', हे शहरालगतच्या कानपाड्या शेतकऱ्यांना ऐकू येईनासे झाले आहे. हातची शेती विकून गाडी, बंगला, शॉपिंग आणि इलेक्शनमध्ये पैसा घालवणाऱ्यांना भपक्यात सुख असल्याचा गोड भ्रम आहे.*

    *आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आपली माय आपल्याशी ज्या बोलीत बोलायची ती मंजुळ वाणी म्हणजे मायबोली! ते अमृत पिऊनच आपला भाषिक जीव पोसला. तिचे शब्द आपले झाले. आपण शाळेत पहिलं पाऊल टाकलं, आणि आपलं बोट पुस्तकांच्या हातात दिलं. पुस्तकांनी आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याच्या नावाखाली हळूहळू आपली मायबोली कधी आपल्यापासून काढून घेतली हे आपल्याला कळलंही नाही. आता पुस्तकी भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणतो आणि मायबोलीला गावंढळ! काँक्रीटचा कॅनॉल कधी खळखळ वाहणारा झरा होईल का? 'तुका म्हणे झरा, आहे मूळचाच खरा' पण आता झऱ्यालाच लोकं नाला म्हणून नावं ठेवू लागलीयत. इस्त्री आणि इन केलेल्या कपड्यांमध्ये मायबोली कोंबून इंग्रजी मिश्रित चमचमीत प्रमाणभाषा बोललं की आपला प्रभाव पडतो असा आजच्या नवभाषकांना भ्रम आहे! पण नारळाच्या पाण्याची सर मुन्शीपाल्टीच्या नळाच्या पाण्याला केव्हा यावी?*

 *मंडळी गोष्ट अशी आहे की हल्ली आपण स्पष्टयुगात नाही, तर भ्रष्टयुगात आणि भ्रमयुगात राहतो आहोत, म्हणून भ्रष्ट आणि भ्रमिष्ट झालो आहोत! झाडं तोडून विकासाच्या सावलीचं स्वप्न पाहत आहोत! हा निव्वळ भ्रमाचा भोपळा आहे. तो लवकर फुटो, माय, माती, मायबोली, आपली माणसं आणि आपल्याला पोसणारा निसर्ग यांना ओळखण्याची, जपण्याची सद्बुद्धी प्रत्येकाला लाभो इतकंच मागणं आहे!*

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Wednesday, April 1, 2026

ज्याच्या घरी गंगा...

*ज्याच्या घरी गंगा...*
_एक मुद्दा, एक विचार!_
*1 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*ज्याच्या घरी गंगा...*

*एक आई-पालक मुलाच्या शिकवणी वर्गातील सरांना भेटायला आल्या. त्यांचा मुलगा त्या सरांना खूप मानतो वगैरे त्यांनी त्या सरांना सांगितलं. सरांनी विनम्रपणे त्यांना नमस्कार केला.* 

*पुढे त्या बाई म्हणाल्या, “सर, माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मुलाला प्लीज शिकवा की त्याने घरातल्यांचं काम ऐकलं पाहिजे. अजिबात ऐकत नाही. इकडची वस्तू तिकडे करायला नको. साधं ग्लासभर पाणी मागितलं प्यायला तर म्हणतो ‘उठून घे ना.’ मी म्हटलं- अरे वर्गात मी फक्त इतकं जरी म्हटलं की मला तहान लागलीय रे पोरांनो! की पुढच्या मिनिटाला सगळ्या वर्गाची माझ्यासमोर झुंबड उडते पाणी देण्यासाठी. प्रत्येकजण माझ्यासमोर पाण्याची बाटली धरतो आणि म्हणतो की बाई, माझ्या बॉटलमधलं पाणी प्या. आणि तू माझा मुलगा असून मला पाणी देत नाहीस...? तर म्हणतो- यात काय विशेष? मी पण स्कूलमध्ये आमच्या मॅडमना पाणी देतो! बघा आता!”* 

*सर इतकंच म्हणाले, “घरच्या गंगेचं महत्त्व नसतं मॅडम. ज्याच्या घरी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा!”*
 
     *मंडळी, गोष्ट फक्त त्या मुलापर्यंत थांबत नाही. समाजातही काही वेगळी परिस्थिती नाही. नशिबाने आपल्याला प्राप्त झालेल्या, आपल्याकडे असलेल्या चांगल्या माणसांचं आपल्याला कौतुकच नसतं. आपण त्यांना हलक्यात घेतो. बऱ्याचदा तर त्यांना चेष्टेचा विषय बनवलं जातं, आणि कधीकधी त्यांना मुद्दाम डावलून त्यांची खरोखर क्रूर चेष्टा केली जाते.*

 *घर असो, खेळ असो, कार्यालय असो, की संघटना; पळसाला पानं तीनच! सगळीकडे हीच परिस्थिती. पण लोकांना आपली किंमत नसली तरी ‘आपण कोण आहोत’ हे ज्यांना माहीत असतं, ती माणसं कधीही स्वतःची किंमत खाली पडू देत नाहीत. आपला आब राखून असतात. जिथे आपली किंमत नाही अशी जागा कितीही सुशोभित, चमचमीत आणि लोकांच्या लेखी उत्कृष्ट, चांगली असो, ही माणसं तिथे रमत नाहीत. अगदीच नाईलाजास्तव थांबावं लागलंच तर त्यांचं केवळ शरीर तिथे असतं, ती स्वतः नसतात. योग्य वेळी ती जागा रिक्त करतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं महत्त्व कळू लागतं. त्यांचं आपल्यातून जाणं वेदनादायी वाटू लागतं, पण उपयोग नसतो.*

 *म्हणून आपल्यासोबत असलेल्या अशा माणसांची कदर केली पाहिजे. वयाने, पदाने, शिक्षणाने, समजेने ती लहान असतील तरीही... कारण ही सगळी गंगेची रूपं आहेत. गंगा नेहमी हिमालयातूनच वाहते असं नाही… ती कधी आईच्या रूपात घरात असते, कधी मित्र-मैत्रिणीच्या रूपात आपल्याजवळ उभी असते, कधी वरिष्ठ बनून आपल्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते, तर कधी एखाद्या साध्या माणसाच्या रूपात आपल्याला आयुष्याचे धडे देत असते. पण आपणच तिचं पावित्र्य ओळखलं नाही, तिची कदर केली नाही, तर एक दिवस हीच गंगा आपल्या आयुष्यातून निघून जाते…आणि मग उरतो तो फक्त कोरडा काठ — आणि जिथे पाणी असताना आपण तहानलेलेच राहिलो होतो, याची खंत! म्हणून…*

*आपल्या आयुष्यातील ‘गंगा’ ओळखा, तिचा मान ठेवा, कारण घरची गंगा ओळखायला उशीर झाला, तर उरतात फक्त आठवणी… आणि डोळ्यात पाणी!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

पाडव्याचं कौतुक कशासाठी

*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*19 मार्च 2026, गुरूवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*पाडव्याचं कौतुक कशासाठी?*

*आजकाल सणसुद्धा अंमळ धावपळीत असल्यासारखेच वागतात. आता गुढी पाडव्याचंच पहा ना. सकाळी धावतपळत आला, आणि हार-कड्याची गोडी वाढायला सुरू होण्याआधीच संपलादेखील!*

 *इतकी धावपळ आहे प्रत्येकामागे, इतकी कामं पडलीयेत प्रत्येकाला, की सण चवीने साजरा करायलाही वेळ नाही. स्टेट्सला फोटो मिळाला की झालं; नाहीतर एक पाडवा असायचा- गळ्यात हार-कडे घालून मिरवायचं आणि समोरच्याला म्हणायचं, “म्हण, गुढी पाडवा” आणि त्याने ‘गुढी पाडवा’ म्हटलं की आपण म्हणायचं, “नीट बोल गाढवाs!” आणि मग दोघांनीही हसायचं! काय निरागस काळ होता, नाही?*

  *आता खूप पुढे निघून आल्यावर जरासं समजू लागलं आहे, ‘गाढवा’त लायकी काढून का होईना, नीट बोलण्याची तंबी यामुळे दिली जात असायची कारण येत्या काळात माणसं नीट बोलणार नाहीत हे जुन्या लोकांना माहीत होतं!*

     *पाडव्याचं कौतुक कशासाठी? तर पाडवा, म्हणजे चैत्र नवी पालवी घेऊन येतो म्हणून! त्या आधीचा फाल्गुन म्हणजे कंटाळा, शक्तीहीनता... निसर्गाचा झोपी जाण्याचा काळ. पण माणसाला झोपून राहून कसं चालेल? म्हणून आली फाल्गुनातली महाशिवरात्र! हे सांगायला, की ‘झोपू नको, जागा आणि जागता रहा! तरीही आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन ढेपाळलेले आणि झोपाळलेलेच. म्हणून केला होळीचा भल्ला मोठ्ठा जाळ! लोकांना सांगितलं आता होळीत थंडी जळून गेली, आता घरात दडून बसू नका, स्वेटर फेका, बाहेर निघा. निघत नाही? कसा निघत नाही, खेचा याला बाहेर! म्हणत आली धुळवड आणि रंगपंचमी! रंग उधळा पण स्वतःमध्ये थोडी तरतरी शिल्लक ठेवा, कारण थोड्याच दिवसात नवी पालवी घेऊन वसंत येणार आहे! चैत्र उंबरठ्यावर उभाय! मग या सणांच्या बळावर निसर्ग आणि माणूस थोडी धुगधुगी कायम ठेवतो आणि अखेर दारावर येऊन उभा राहतो, नव्या वर्षाचा नवा शिलेदार गुढी पाडवा! नवं वर्ष, नवा हर्ष! नवी पालवी, नवी सळसळ, नवा उत्साह! निसर्गाला पुन्हा नवं हिरवेपण मिळू लागलं की माणूसही आतून हिरवा म्हणजे ताजा होऊ लागतो. नाविन्य म्हणजे काय? तर आनंद! मग आता हे सगळं इतकं सगळं नवीन म्हटल्यावर नव्याचा आनंद साजरा व्हायला पाहिजे की नको? म्हणून गुढी पाडवा महत्वाचा!*
 
    *सगळं कोलमडून पडण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा स्वतःमध्ये नवी शक्ती, नवी उर्जा, नवा आत्मविश्वास, नवी स्वप्नं भरण्यासाठी, नवी सुरुवात करण्यासाठी निसर्गाने पुढे केलेला विश्वासाचा हात म्हणजे गुढी पाडवा! सातत्याने येणारं अपयश, दु;ख, अपमान, अपघात, वियोग, मृत्यू म्हणजे जणू अमावस्या. चैत्रातली प्रतिपदा म्हणजे फाल्गुनातल्या अशा शेवटच्या अमावस्येनंतरचा पहिला नवा दिवस. ‘अमावस्या सरलीय, आता सगळं चांगलं होईल, मी नव्या उर्जेचा हात पुढे करतोय, तू फक्त लढायला तयार हो...’ म्हणणारा. अंग झटकून नवी उभारी देणारा... म्हणून पाडव्याचं कौतुक. कारण, या दिवशी निसर्ग आपल्याला म्हणत असतो,*

_*नवा सूर्य करतो तुझ्या मी हवाली, जगाला कळू दे नव्याने खुशाली!*_
_*दिशाभूल करतिल जरी लोक काही, तुझे स्वप्न राहो तुझ्या भोवताली!*_
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

Wednesday, March 11, 2026

एक वाटी वरण

*एक वाटी वरण!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*11 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*एक वाटी वरण!*

       *संध्याकाळी नवऱ्याला चहा देता  देता बायकोने नवऱ्याच्या वाढत्या पोटाकडे पाहिलं आणि खूप दिवसांपासून तिच्या मनात शिजत असलेला विषय शेवटी काढलाच… “अहो, ऐका ना!” “बोल.” “तुम्ही डायट वगैरे का करत नाही?” “म्हणजे??” “अहो, जरा तुमच्या पोटाचा घेर कुठे चाललाय त्याचा काही विचार? आणि ती शर्टची बटनं पहा, तुटतात की सुटतात अशी सारखी भीती वाटते मला.” अचानक झालेला अण्वस्त्र हल्ला सावधतेने परतून लावत नवरा म्हणाला, “आता तुझ्यासारखी चांगलंचुंगलं करून खाऊ घालणारी बायको म्हटल्यावर ढेरी वाढणारच ना?”*

 *पण बायकोने विषय पुढे रेटलाच, “हो! ते झालं तुमचं म्हणणं, पण ते बरं दिसतं का? इतर बायकांचे नवरे बघा कसे सडसडीत बांध्याचे आणि तुमच्या पोटाची चाललीय पृथ्वीगोलाबरोबर स्पर्धा! कुठे घेऊन जाणार आहात म्हणते मी एवढा सगळा डोलारा!?”*   

 *“अगं, वाढलेली ढेरी म्हणजे सुखी माणसाचं लक्षण असतं. आता त्या वाळकुट्या माणसांचे पोट वाढत नाही त्याला आम्ही काय करणार? ढेरीवरून हात फिरवण्याचं समाधान आणि आत्मानंद आहे का त्यांच्या नशिबात? जळतात मेले आमच्यासारख्यांवर!”*

 *“ते बाकी मला काही माहीत नाही. उद्यापासून तुम्ही डायटवर! समजलं? सकाळी चहा-बिहा काही मिळणार नाही. बीट-काकडी-गाजराचा ज्यूस देते तुम्हाला. जेवण जरा कमी करत जा, आणि फिरायला जात जा सकाळ-संध्याकाळ दहा-पंधरा हजार पावलं! पंधरा दिवसात ढेरी कमी झाली पाहिजे. मी माझ्या मैत्रिणीशी पैज लावलीय- नवऱ्याची ढेरी कमी करून दाखवते म्हणून!”*

*नवरा जागेवर उडालाच. “ऑं? अगं काय हे? बावळट झाली का तू?” “नाही! त्यातसुद्धा स्वार्थच आहे माझा. जर या निमित्ताने माझा नवरा हिरोसारखा दिसायला लागला, तर नको आहे का आपल्याला, म्हणजे मला??” “अगं माणूस कर्माने हिरो बनतो, दिसण्याने नाही! आता तू बारीक किडकिडीत आहेस म्हणून मीही तसंच व्हावं यात कोणतं आलं लॉजिक आणि शहाणपण?” “अहो, लग्नाच्या वेळेस होतात का तुम्ही असे? तेव्हा तर काडीसारखे होतात अगदी. आता झालात बटाटा घातलेल्या वड्यासारखे! लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसायला पाहिजे की नको..?” “जा मग! शोध दुसरा बारीक आणि किडकिडीत काडीसारखा नवरा..!” “दुसरा कशाला? मी माझा जो आहे त्यालाच बारीक करून दाखवणार!” “अगं पण अधूनमधून थोडं-थोडं खाल्ल्याशिवाय राहवत नाही मला. भूक लागते!” “ही भूकच मारायची आहे मला. सदानकदा खायला मागता. बरणीत हात घालून शेंगदाणे घेऊन पळता. हद्द झाली बाई या खाण्याची!”*

 *“ऐक ना, आपण आज मस्तपैकी चिकन बिर्याणीचा बेत करूयात, ओके?  मी घेऊन येतो हवं तर अर्धा किलो.’’ बायकोने थेट सिक्सरच मारला, “ओ चिकनवाले..., आता हे जिभेचे चोचले किमान पंधरा दिवस बंद!” “म्हणजे??” “म्हंजे वाघाचे पंजे! आजपासून संध्याकाळी तुम्हाला फक्त एक वाटीभर वरण देणार आहे मी प्यायला!” “देवा देवा! मेलो!! अगं कोणी घातलं तुझ्या डोक्यात हे भूत?” “त्या दिवशी ते तुमचे कोण मित्र आले नव्हते का आपल्या घरी जेवायला? तेच सांगून गेले जाताना. म्हणाले, ताई तुमच्या मिस्टरांची ढेरी कमी करायची असेल तर यांना संध्याकाळी फक्त एक वाटीभर वरण देत जा!” “अस्सं का...! नवरा निश्चयाच्या सुरात म्हणाला, “आता येऊ दे पुढच्या वेळी त्यांना. नाही चहाऐवजी वाटीभर मुगाचं वरण प्यायला दिलं तर नाव नाही सांगणार!!”* 
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, March 5, 2026

अनुभवाच्या पलीकडले

*अनुभवाच्या पलीकडले !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*4 मार्च 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*अनुभवाच्या पलीकडले*

*निसर्गाने माणसाला अभिव्यक्त होण्याची क्षमता दिली आहे. हे त्याने त्याच्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत.*

 *मिळणाऱ्या उण्यापुऱ्या सत्तर-ऐंशी वर्षाच्या जगण्यात माणूस इतकं पाहतो, सोसतो, अनुभवतो की ते इतरांसमोर मांडल्याशिवाय त्याला राहवत नाही. बोलकी माणसं भडभड बोलून, रागावून, प्रसंगी दोन शिव्या देऊन, दोन कानाखाली देऊन-घेऊन का होईना, पण ‘मोकळी’ होतात. पण सगळीच माणसं बोलकी थोडीच असतात? काही अबोल असतात, काही अबोल राहतात. स्वतःसोबत स्वतःचा हिमनग घेऊन फिरतात. एखाद्या कलेचं बोट धरून स्वतःचं अव्यक्त सांगणं सांगत राहतात, आणि लोक असे, की त्याकडे मनोरंजन म्हणून पाहतात!*

 *खरं तर जगात कला आणि कलाकार आहेत म्हणून माणसे जिवंत आहेत. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर मारलेला एक फटकारा ‘त्याने का मारला होता’ हे तो हे जग सोडून जातो तरीही लोकांना समजत नाही. एखाद्या गायकाने अचानक घेतलेली ताण ही खरे तर अगोदर त्याच्याच काळजातल्या वेदनेचा ठाव घेते, पण लोक त्यांच्या परीने याचा अर्थ लावतात, आणि ‘वाहवा!’ म्हणतात! एखादी स्त्री प्रख्यात लेखिका असेल, तिच्या लिखाणाचे लाखो चाहते असतील; परंतु तिने प्रत्यक्षात काय भोगले होते हे कदाचित तिच्या लिखाणात कधीही येणार नाही; ती ते येऊ देणार नाही. आले तरी लोकांना ते कळणार नाही, कारण लोक फक्त तिने गोलगोल फिरवलेल्या शब्दांची जादू पाहतील, तिच्या त्यावेळच्या मनस्थितीचा कयास लावू शकणार नाहीत. एखादा कवी हजारो कविता लिहील; परंतु ज्या एका दुःखामुळे तो प्रचंड कोलमडून पडला होता, ते दुःख त्याच्या कवितेत कदाचित कधीही येणार नाही. कदाचित म्हणूनच कलाकाराची कला आपण कैकदा पाहतो; पण त्यामागचा माणूस आपल्याला क्वचितच दिसतो!*

*शहाणी, समजदार माणसं दुनियेला जे हवं आहे ते ते पुढे ठेवत जातात. जे दुनियेला नको आहे, परंतु आपल्याकडे भरपूर आहे, ते जाणीवपूर्वक आपल्याकडेच ठेवत जातात. ही सुद्धा एक कलाच आहे. या अर्थाने जर प्रत्येक माणसाला आणि विशेष करून दुनियेतल्या समस्त कलाकारांना उकलून पाहिलं, तर आपल्या डोळ्यांना झेपवणार नाहीत असे दुःखाचे असंख्य निद्रिस्त झरे आपल्याला दिसतील. परंतु आपण तरी त्याचं काय करणार? आपल्या अश्रुंचे आणखी दोन थेंब त्यात टाकल्यामुळे ते प्रवाहीत थोडेच होणार आहेत? त्यामुळे ज्याच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे राहू द्यावं. आताच्या या घडीला तो माणूस ‘जसा आहे तसा’ त्याला स्वीकारावं. त्याने स्वतःहून काही सांगितलं तर गुमान ऐकावं, त्याला रिक्त होऊ द्यावं; विसरून जावं. त्याला सल्ले देऊ नयेत. शांत झालेलं पाणी पुन्हा ढवळून गढूळ करू नये. अशा वेळी त्याला मनातल्या मनात फक्त इतकंच म्हणावं,*

*_कुठून तू आणलास संयम, शिकव मला_*
*_तुझ्यापुढे मी उजाड पत्थर, घडव मला!_*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.

Thursday, February 26, 2026

सोपस्कार


*सोपस्कार !*
_एक मुद्दा, एक विचार!_
*25 फेब्रुवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.

▪️
*सोपस्कार*

 *मंडळी, आठवतंय? लहानपणी सकाळी आपली अंघोळ झाल्यावर आई कौतुकाने आपल्याला तिच्यासमोर बसवायची. तिच्याकडे गंधाची एक बोटभर लांबट अशी डबी असायची. आपली इवलीशी हनुवटी तिच्या डाव्या हातांच्या काही बोटांच्या चिमटीत ती अलगद पकडायची, त्या डबीतला लालभडक किंवा चॉकलेटी गंध झाकणालाच असलेल्या लांबट काडीने आपल्या कपाळी रेखायची. आपण त्यावेळी साक्षात बाळकृष्ण, बाळराधा, बाळहनुमान, बाळराम वगैरे दिसायचो.*

    *गालांवरून अगदी मोरपीस फिरवावं तसे आई दोन्ही हात फिरवायची, नि आपण तिच्याकडे नुसतंच निरागस नजरेने बघत असायचो. तिचं आपल्याकडे बघून झालं की ती म्हणायची, “जा आता खेळायला! तिने असं म्हटलं, की जणू जग जिंकायला निघालेल्या वीराप्रमाणे शक्तिमान होऊन आपण खेळायला निघायचो! आठवतंय? किती सुंदर काळ होता तो!*
   *आता जेव्हा कळतं की आईच्या कपाळीचं कुंकू असो, की तिने आपल्या कपाळी लावलेला गंध किंवा टिळा असो, या गोष्टी लावण्यामागे आपल्या शरीरातलं सर्वात प्रभावी जे आज्ञाचक्र त्याचं रक्षण व्हावं हा निर्मळ हेतू होता, तेव्हा आपल्या महान संस्कृतीचा खरोखर अभिमान वाटू लागतो. पण हळूहळू आपण संस्कृतीपेक्षाही महान झालो! आधुनिकतेच्या लाटेत स्त्रियांनी कुंकवाचा आकार छोटा-छोटा करत एके दिवशी कुंकवालाच तिलांजली दिली आणि थेट टिकलीवर आल्या! तशा बाथरूमच्या भिंतीही सौभाग्यवती झाल्या! टिकल्यांचेही इतके आकार-प्रकार झाले, की साडी कोणत्या रंगाची घातलीय त्यावर टिकली केवढी आणि कोणत्या रंगाची लावायची हे ठरू लागलं.*

 *इकडे बाप्या माणूस कोणत्या देवाला किंवा गुरुजींना फॉलो करतो त्याच्यावर त्याची गंध लावायची पद्धत ठरू लागली. माणसं आधीही गंध लावायचीच, पण एकसारखा. आता ‘गंध एक बोटाचा लावायचा, की तीन बोटांचा? उभा लावायचा की आडवा? एक ठिपक्याचा की दोन!’ एक न अनेक प्रकार! आता मंगळसूत्राला लपायला जागा हवीय, आणि गंधाने मात्र प्रदर्शनार्थ उचल खाल्लीय!*

   *अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत गंध लावलेली मंडळी सात्विक, सुस्वभावी वगैरे वाटत असत. हल्ली काही ठिकाणी ते जरा जास्तच अंगावर येऊ लागलं आहे. समाजातील अपप्रवृत्तींच्या कपाळीही गंध हटकून दिसू लागलाय. समोरच्या माणसाला बघताक्षणीच भीती वाटावी किंवा त्याच्यावर दबाव पडावा असा आक्रमक, भडक गंध वा कुंकू मुद्दाम लावून मिरवणाऱ्या या माणसांच्या गावी ‘आज्ञाचक्र’ हा शब्द तरी असेल का?*

    *मंडळी, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला नक्की जपायच्या आहेत; मात्र त्यांचा विपर्यास होणार नाही याचं भान समाज म्हणून आपल्याला ठेवावंच लागेल, कारण गंध कपाळावर असतो; पण माणसात देव पाहण्याचे संस्कार मनात असतील तरच तो अर्थपूर्ण ठरतो, अन्यथा तो उरतो फक्त आणि फक्त सोपस्कार!*

-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224.


वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...