◾
*यंदा लग्नाचं काही बघताय का?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*29 एप्रिल 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*यंदा लग्नाचं काही बघताय का?*
*लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणे… आता स्वर्ग कुणी प्रत्यक्ष जाऊन पाहिलाय का? नाही; पण त्या गाठी बांधायला देवाने त्याची काही खास माणसं मात्र पृथ्वीवर पाठवलेली आहेत एवढं मात्र नक्की. त्यांच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी सुपारीचं खांडही फुटत नाही! असं म्हणतात की नवरदेव येतो नवरीसाठी, वऱ्हाड येतं जेवण्यासाठी! पण पुढचं आपल्याला सांगितलंच जात नाही, ते म्हणजे 'काही खास माणसं' येतात पुढचा नवरदेव-नवरी शोधण्यासाठी!*
*कोणतंही लग्न घ्या, त्यात 'लग्नाला आलेल्या' मुला-मुलींची माहिती काढणारी एक तरी दिव्य विभूती असतेच! मग ती स्त्री असो की पुरुष. शिवाय वयानेही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली; त्यामुळे इतरांना सांगण्याचा अधिकारही त्यांचा चिमुटभर जास्तच. शहरातल्या ‘वधुवरसूचक मंडळातले चाणक्य’ यांच्या बुद्धीपुढे लोटांगण घालतील! त्यांच्या वागण्यात एक रुबाब असतो, बोलण्यात एक ढब असते. “ती आत्ता गेली ती लाल ड्रेसवाली कोण? कोणाची मुलगी? कितवी शिकलेली आहे? काय करते? यंदा लग्नाचं काही बघतायत का? आपल्याकडे तीन चार स्थळं आहेत चांगली.” झालं! पाच मिनिटात मुलींचा डेटा फोटोसकट जमा! तर, “तो उंचसा सोफ्यावर बसलेला कोण हो? काय करतो? लग्न झालंय का त्याचं? पगार किती आहे? परमनंट आहे का? भाऊ बहिणी किती आहेत त्याला? क्षेत्र वगैरे किती आहे? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?” झाला डेटा जमा! पण दोन माणसांच्या खऱ्या स्वभावाचा ‘डेटा’ मात्र यांच्यापैकी कुणाकडेच नसतो बरं का! इकडची माहिती तिकडे पोहोचवून, तिकडची माहिती इकडे आणून, मध्यस्थी करून मंडळी अशी काही जादूची कांडी फिरवतील, की गोष्ट लग्नाच्या लाईनला आलीच पाहिजे. गुळुमूळू स्वभावाचं कुटुंब असलं तर ही माणसं त्यांना अक्षरशः कच्चं खातात. असल्या-नसलेल्या कोणत्याही चार गोष्टी सांगून पार्टीला बाटलीत उतरवतीलच!*
*मंडळी, लग्न कोणीही जुळवो, संसार सुखाचा होईलच याची गॅरंटी नाही. कारण स्थळ पाच मिनिटांत जुळतं हो, पण नातं? पाच वर्षांत काय कधीकधी आयुष्यभरातही ते जुळेलच याची खात्री नाही. लग्न जुळवणारी माणसं नाती जोडतात, पण ती टिकवण्याची जबाबदारी कोणाची? घरातल्यांची!*
*माणसं, मग ती कोणीही असो, तोंड सोडून बोलायला लागली, की संसाराला दृष्ट लागते. एकदा नात्यात फट पडायला लागली, की ती वाढतच जाते आणि तुटू नये, पण संसार तुटतो. अशावेळी शिव्याशापांचा पहिला धनी कोण होतो?“हे लग्न व्हावे ही ‘ज्यांची’ इच्छा!” होती तो किंवा ती! दोन्हीकडून बिचाऱ्यांना शिव्या खाव्या लागतात. म्हणजे कोळशाच्या दलालीत हात काळे करण्यासारखंच! तरी ही मंडळी त्यांचं काम थांबवत नाहीत. कारण, त्यांना अनुभवाने माहीत असतं, की जेव्हा एखादा हतबल बाप स्थळ शोधून थकतो, तेव्हा प्रत्येक घरात काळजीचा एकच प्रश्न कायम असतो- "बघा ना एखादं चांगलं स्थळ असेल तर!?"*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.