◾
*मोडला ‘आहे’ कणा?*
_एक मुद्दा, एक विचार!_
*१५ जुलै २०२६, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*मोडला ‘आहे’ कणा?*
*मुलांचे शिक्षण भ्रष्टाचारमुक्त रहावे म्हणून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर भारतातील महान शिक्षणतज्ञ आणि जागतिक पुरस्कारांनी सन्मानित असलेले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक कित्येक विद्यार्थ्यांसह अन्नत्याग सत्याग्रह करत अखेरच्या घटका मोजत आहेत. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या देशाच्या प्रधान सेवकाला या जागतिक कीर्ती असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आवाज ऐकू जात नाही. केवढं हे दुर्दैव!*
*शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांची देशात, राज्यात प्रचंड केविलवाणी अवस्था झाली आहे. जवळपास सगळ्याच क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. परंतु देशाचे नागरिक म्हणून यावर बोलण्यासाठी आपण शिल्लक उरलो आहोत कुठे? आपण तर केव्हाच वाटले गेलो आहोत. ‘त्यांचं ते बघतील...’ म्हणत स्क्रीन स्क्रोल करत थंड बसलो आहोत. अण्णा आंदोलनात मेणबत्त्या आणि झेंडे घेऊन गावभर फिरणारे आता कुठे गेले कुणास ठाऊक? इतक्या लवकर आपल्या संवेदना बोथट झाल्या? की आपल्याला कशाची गुंगी आली आहे?*
*आपण कालपर्यंत असे नव्हतो. आपला कणा ताठ होता. आता आपल्याला काय झालंय? आपण एवढे कसे कोरडे, कोडगे, लाचार आणि मुर्दाड झालो? 'चूक' ला 'चूक' म्हणण्याची हिंमत आपल्यात उरू नये? आपण खरं बोललो तर आपल्यावर कोणीतरी डोळे वटारेल, आपली नोकरी घालवेल अशी भीती आपल्याला सतत वाटत रहावी? सध्या आपलं सगळं अलबेल चाललेलं आहे, ते या नसत्या उचापतींनी संकटात येईल याचं दडपण सतत आपल्या मागे रहावं? कोणीतरी आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, आणि आपण थोडी जरी तथाकथित चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर उद्या आपल्या सुखी संसारावर गंडांतर येईल, हा वेताळ आपल्या मानेवर कधीपासून आणि कसा बसला? आपण इतके नेभळट कधीच नव्हतो. आपण असे कधीपासून झालो? कोणत्या कड्यावर येऊन उभे राहिलो आहोत आपण? आपला कणा मोडत चालला आहे की काय?*
*आपण अगोदर लोकांना निवडून द्यायचो, त्यांना प्रश्न विचारायचो. तेही दबकून असत. आता आपण त्यांना निवडून देत नाहीत; ते स्वतःच मनी आणि मसल पॉवरवर निवडून येतात. आता जर आपण त्यांना प्रश्न विचारायला जाऊ, तर ते आपला खात्मा करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, कारण निवडून येण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये लावले आहेत. पद सोडायचं म्हणजे त्यांचं तेवढ्या रुपयांचं नुकसान होणार. ते त्यांना कसं सहन होईल? त्यापेक्षा सामान्य जनतेतले काही लोक मेले तर त्यांना काय फरक पडतो?*
*आपल्यालाही आपल्यातले काही मेले तर काय फरक पडतो??*
*फरक पडायला हवा! पुन्हा गुलामगिरीत खितपत पडायचे नसेल तर फरक पडायलाच हवा. आणि त्यासाठी आपल्या डोक्यात आपलाच मेंदू आहे ना, हे वारंवार तपासून पाहिलं पाहिजे. सदसद्विवेक सांभाळला पाहिजे, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, आणि आपल्यासाठी निस्वार्थपणे लढणाऱ्या माणसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे; अगदी कणा मोडू न देता!*
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.