Monday, January 4, 2021

व्यथा चालून थकली



व्यथा चालून थकली शेवटी, माझ्याबरोबर
तिला पाहून हसले, जीर्ण झालेले कलेवर

तसा मी वर्ज्य होतो... मैफिलीबाहेर अगदी
तरी पडलीच टाळी... तान येताना समेवर

उगीचच हिंडलो मी गावभर वेड्याप्रमाणे
घरी माझ्याच होते शोधले मी जे घरोघर

खऱ्याचा कानही ऐकून खोटे तृप्त झाला
म्हणाला, त्रास होतो सत्य कोणी बोलले तर!

तुला देईन भिक्षा पाहिजे तितकी परंतू
पुन्हा आणायचे नाही कुणी बालक कडेवर

तुझ्यामागे घराचा व्याप आहे,मान्य आहे
तरीही बैस थोडे, जग स्वतःसाठी घडीभर

-राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...