Sunday, March 24, 2024

वेदनेचे काटे : सोमनाथ पगार

वास्तवाशी दोन हात करणारी कविता : वेदनेचे काटे 


आयुष्याशी दोन हात करताना कधी माणूस जिंकतो कधी हारतो. पुन्हा हसऱ्या चेहऱ्याने जगाला सामोरे जातो. परंतु त्या हसऱ्या चेहऱ्यामागे बेमालूमपणे एखादी वेदना लपवलेली असते. समाजाला आपल्या व्यक्तिमत्वाचा सुगंध प्रदान करत असतानाच या काटेरी फुलाच्या वेदनाचे काटे मात्र आपण सहजच काळजात रुतवून घेतलेले असतात. ते काही केल्या निघत नाहीत. बऱ्याचदा ते आयुष्यभर सोबत राहतात. सर्वसामान्यांपैकी बरेच जण ते कधी कुणाला सांगूही शकत नाहीत. परंतु कवीच्या हाती शब्दांचे धन असल्याने ही वेदना त्याला शब्दमय करता येते. मग त्याने लिहिलेले शब्द हे त्याच्या एकट्यापुरते मर्यादित न राहता अवघा भावतालच कवेत घेतात. पिंडी ते ब्रह्मांडी चा अनुभव देतात. 

  मित्रवर्य, कवी, गीतकार आणि सोज्वळ मनाच्या व्यक्तिमत्त्वाचे धनी सोमनाथ पगार यांचा 'वेदनेचे काटे' हा काव्यसंग्रह नुकताच वाचण्यात आला. या पुस्तकाच्या प्रकाशनार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनुदान मिळाले आहे. साहित्य अकादमी विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर यांची या संग्रहाला मौलिक प्रस्तावना लाभलेली आहे ; तर प्राचार्या डॉक्टर वेदश्री थिगळे यांनी या संग्रहाची पाठराखण केलेली आहे.अगदी समरसून वाचावा असा हा संग्रह झालेला आहे. संग्रहाच्या सुरुवातीलाच 

ज्ञान मंदिरात नित्य, आमुची प्रार्थना
समृद्धीचे गीत ओठी, विश्वाच्या कल्याणा

 अशी माणुसकीची प्रार्थना करत कवी रसिकाला संग्रहाशी जोडण्यात यशस्वी होतो. सोमनाथ पगार हे गीतकार असल्याने त्यांच्या बहुतांश रचनांमध्ये एक लय, ताल आणि गेयता आढळते. प्रत्येक छोटा मोठा अनुभव शब्दांमध्ये बद्ध करण्याचे सामर्थ्य कवीला लाभलेले आहे. आता पुढील खारुताईच्या कवितेच्या ओळीच पहा ना.

खारूताई, खारूताई काय बाई तुला घाई भुर्रकन, सरसर वर जाई, खाली येई

 अतिशय बालसुलभ अशा या ओळी आहेत. खरंतर मोठ्या वयाच्या माणसांना लहान मुलांना रुसेल असं लिहिता येणे ही अवघड गोष्ट असते. परंतु सोमनाथ पगारांना ती सहज साध्य झालेली आहे. बऱ्याचदा भाषिक वाद होत असतात. आणि एका भाषेचा झेंडा घेऊन इतर भाषांना दृष्टीने देण्याचा प्रघात दिसतो. परंतु कवी तसा भेदभाव करत नाही तो म्हणतो,

आई आमची मराठी, हिंदी आमची मावशी इंग्रजीचे बोट हाती, सूर जुळले जगाशी...!

 जागतिकीकरणाच्या रेट्यात खेड्यापासून नाळ तुटलेलं शहर कविता मनाला अस्वस्थ करतं. नाईलाजाने का होईना गाव सोडून शहरात जाऊन रहावं लागणं ही कित्येक ग्रामीण तरुणांची शोकांतिका आहे. आपली माणसं सोडून अनोळखी माणसांच्या जंगलात पुन्हा नव्याने ओळख निर्माण करण्याची धडपड कवीच्या ओंजळीत खालील शब्दांचे दान टाकते.
 
काँक्रिटच्या जंगलात
होई जीवाची काहिली
रक्त नात्याची माणसं
दूर गावाला राहिली

 ढळणारा तोल सावरण्यासाठी आणि चुकणारं पाऊल रोखण्यासाठी जीवाभावाचं कुठेतरी असायला हवं असतं, परंतु अनोळखी जगात असं कोणीतरी भेटण्याची शक्यता कमीच. कवी म्हणतो, 

शेखचिलीसारखा मुद्दाम
ज्या फांदीवर बसलोय
तिच फांदी काटतोय कराकरा
येणारे जाणारे मात्र शाबासकी देऊ पाहताय मला
माझं अवसान पाहून
 
 लबाडांचं जग आणि त्याचा मुखवटा फाडण्यात कवी यशस्वी झालेला आहे. जगाचे व्यवहार कसे असतात ते सांगताना तो म्हणतो,

काळजाला टोचे वेदनेचे काटे
जगाचे वेव्हार सारे उफराटे

 अशा उलट्या व्यवहारी जगाबरोबर वागताना त्याला ठाई ठाई आई वडिलांची आठवण येते.
 त्यांच्या आठवणीत त्याची लेखणी झरू लागते, 

बाप आभाळाची छाया माय धरतीची माया पिलांसाठी मायबाप जसा जीवनाचा पाया
जशी पायाला भिंगरी बाप फिरं शेतातूनी
घाम जिरं बांधा मेरा होई रिता दांडातूनी!

 आईवडिलांबरोबरच गाव खेड्यातील प्रत्येक माणूस कवीला काहीतरी शिकवून जातो. ते प्रत्येकाबद्दलची कृतज्ञता कवी खालील शब्दात व्यक्त करतो.

रंगनाथतात्याचा कानमंत्र कामी आला संतूतात्यानं ऐकवलं रामायण
माधवतात्याचा तमाशा सुरू मनामधी हरीतात्या करी हरिपाठाचं पारायण काळूबाबा, पर्बतबाबा, म्हातारबाबा
सारे पाठीशी उभे साक्षात नारायण!

 निसर्गातील विविध रूपांचंही कवी बारकाईने टिपण करतो. उन्हाळ्याची दाहकता सोसल्यावर जेव्हा पावसाळा अल्हाददायी जलधारा घेऊन येतो तेव्हा कवीला त्यात आभाळ आणि धरतीचा तरल असं नातं दिसतं. तो म्हणतो,

आभाळाचं धरतीशी जेव्हा मिटलं भांडण आभाळानं धरतीला दिला पाऊस आंदण

 आज कालच्या तथाकथित चमको अध्यात्मावर कवी जोरदार शाब्दिक प्रहार करतो.

सारे तीर्थक्षेत्र कसे धनवान 
गरीब हे जन उपाशी का

असा रोकडा सवाल करतो.संपत्तीच्या हव्यासापायी स्वतःचं खरंच जगणंच विसरलेल्या माणसाला भानावर आणताना तू त्याच्या काळजाला साद घालतो. पुढील शब्दात त्याचे शब्द जगण्याचा गौरव करतात.

समजून घे, भल्या मानसा
तव श्वासाचा, अर्थ वेगळा
जीवन नसे, पालापाचोळा
हा तर जगण्याचा, सोहळा

आणि या ओळी पहा, 
कुठे उगम, शेवट तत्त्व जीवनाचे एक नटविण्या किनाऱ्याला नदी करी कार्य नेक

 कवी संसारात रमलेला असला तरीही संघर्ष त्याला चुकलेला नाही. आपल्या वेदनेचे काटे बाजूला सारत तो लढण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतो. कोणत्याही जंजाळात न अडकता आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर आपले प्रश्न सोडवण्याची मानसिकता राखतो.तो म्हणतो, 

मातीचा अंगारा कपाळाला लावून
घामाची भरलीय पेनात शाई
मी आता चाखणार आहे
बुद्धीच्या पिकाची कमाई!

 असा वेदनेवर हळुवार फुंकर घालणारा हा संग्रह मुळातून वाचण्याजोगा झालेला आहे.जर तुम्हालाही हा संग्रह हवा असेल तर तुम्ही कवीच्या खालील दिलेल्या क्रमांकावर प्रत्यक्ष संपर्क साधून तो प्राप्त करू शकता व कवीशी संवादही साधू शकता.

- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक 
  9423542224

▪️
काव्यसंग्रह : वेदनेचे काटे 
कवी: सोमनाथ पगार 9273357159
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे. 
स्वागतमूल्य : ₹49 मात्र

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...