Monday, March 25, 2024

पाणी जपून वापरा बाई

शहरातल्या ताई,
पाणी जपून वापरा बाई!

तुमच्या बंगल्यात आहेत जागोजागी नळ 
पिण्यासाठी, धुण्यासाठी
अंगणात सडा टाकण्यासाठीही

न्हाणी घरातल्या नळांचीही काय सांगावी हौस
कधी गरम कधी गार
कधी चक्क पाऊस!
एकेका नळाची एक एक नवलाई...
पण ताई,
पाणी जपून वापरा बाई

शहरात तुमचं बरं आहे
बटन दाबलं की पाणी आहे 
कधी बोरचं,
कधी मुन्शीपाल्टीचं
सगळं अबादानी आहे 
कालचं भरलेलं सरत नाही
म्हणून आजचं भांडं भरत नाही
कधी कधी म्हणे पाणी ठेवायला
भांडंसुद्धा उरत नाही
फुलझाडांच्या अंगाखांद्यावर
पाणी खेळत राहतं
फरशी धुवा, गाड्या धुवा
घर भिजून जातं!
मोटर बंद करायचीही कुणास नसते घाई...
पण तरीही,
ताई,
पाणी जपून वापरा बाई

हंडाभर पाण्यासाठी
गाव तिकडं जागतंय
तासभर झिरा उपसल्यावर
पिण्यापुरतं भागतंय
उन्हातान्हात अनवाणीच
पाणी हुडकतात पाय 
कडेवरती तान्हं घेऊन
धावते कुणाची माय...
वाटी वाटी पाणी उपसून
हंडा भरत नाही,
शहरातल्या ताई,
पाणी जपून वापरा बाई!

पाणी जपून वापरा बाई!

-

राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...