Wednesday, February 12, 2025

निद्रादेवी सुप्रसन्न!

*निद्रादेवी सुप्रसन्न!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_बुधवार - 5 फेब्रुवारी 2025_

▪️
*हवेत जरा गारवा असला की माणसं सकाळी उठण्याचा जरा कंटाळाच करतात, नाही? अंथरुणातून बाहेर निघायला जीव नको नको म्हणतो. थोडं झोपतो म्हणून पुढचा अर्धा पाऊण तास आपण सहज झोपून काढतो. शिवाय 'अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच झोपसुद्धा माणसाची एक महत्वाची गरज असते' असंही ठासून सांगतो. पण झोप गरजेची असली म्हणून का कधीही, कितीही आणि कसंही झोपावं? झोपण्याच्या एकेकाच्या तऱ्हा पाहिल्या की कळतं की कोणालाच भारतात योगासनं शिकवण्याची गरज नाही! शिर्षासन सोडून सगळ्या आसनांत झोपणारे लोक आहेत आपल्याकडे. शिवाय कॉटवर झोपून जमिनीवर उठणारे, झोपेत गाणी म्हणणारे, जोरजोरात आज्ञा देणारे, झोपेत चालणारेही कमी नाहीत!*

  *मनुष्यप्राण्याला साधारणतः सहा-सात तासांची रात्रीची झोप ठीक आहे. पण रात्री झोपून पुन्हा दिवसाही झोपणं? हे जरा अतिच होत नाही का? झोपेवर नियंत्रण नसणारी माणसं पहा. अगदी मनमौजी असतात. त्यांना जगाची फिकीर नसते. 'मेरे मन को भाया, मैं बिन तकिये का सोया!' अशी त्यांची भुमिका असते. मनसोक्त झोपा काढल्यामुळे त्यांचं शरीरसुद्धा चांगलंच स्थूल झालेलं असतं. पण त्याला जुमानतील ते झोपाळू कसले? झोप येईल तेव्हा "मी आता झोपणार!" अशी राजेशाही घोषणा करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. सरळ ताणून देतात. पाहुण्यांची घरं, लग्न समारंभ वगैरे ठिकाणं त्यांना अडवू शकत नाहीत. थोडं पोटात काही ढकललं की निद्रादेवी स्वतःच त्यांना शोधत येते! शिवाय झोपेवर घोरणे बोनस. 'घोरणे ही अघोरी कला यार हो!' हे यांना कोण सांगणार?*
  
  *एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे झोप येत नाही म्हणून रात्री अडीच वाजेपर्यंत मोबाईल चाळणारी मंडळी. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी शरीर आपल्याला काम करू देत नाही. ते आपल्याकडून झोप वसूल करतं. म्हणून माणसं दिवसासुद्धा झोपतात. निसर्गाने आपल्याला छानपैकी पहाट साधनेसाठी, दिवस आपले कर्म करण्यासाठी आणि रात्र झोपण्यासाठी दिलेली आहे. हा क्रम आपल्यापैकी किती जण पाळतात?*

  *झोपेचं महत्त्व त्यांना विचारा ज्यांना रात्री झोपेची इच्छा असूनही झोपच येत नाही. झोप येणं ही त्यांच्यासाठी स्वर्गातलं फळ प्राप्तीची गोष्ट असते. लहान मुलांवर जसा देवाने झोपेचा वरदहस्त ठेवलेला असतो, तसा मोठ्यांवरही रहावा. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोपण्याची इच्छा केली की झोपेने हळूच यावं, आपल्याला तिच्या अदृश्य हातांनी समेटून घ्यावं, आणि उठण्याच्या नियमित वेळी इतरांनी न उठवताच आपोआप डोळ्यांच्या पापण्यांनी अलगद विलग व्हावं...*

*ही कित्ती सुंदर गोष्ट आहे, नाही का ?*


-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...