Wednesday, February 12, 2025

आवडती माणसं नावडती माणसं

*आवडती माणसं नावडती माणसं!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 फेब्रुवारी, बुधवार_

▪️
   *एक मुलगा शाळेत जायचा कंटाळा करत होता. त्याची आई त्याला शाळेत जाण्यासाठी विनवण्या करत होती. पोरगं काही ऐकेना. "तुला शाळेत का जायचं नाही?" असं विचारता त्याचं उत्तर होतं, " कुणालाच मी आवडत नाही!" मग त्याला समजावणीच्या सुरात त्याची आई म्हणाली, " बाळा, असं म्हणून कसं चालेल? कुणाला तू आवडो, न आवडो तुला शाळेत जावंच लागेल. कारण तूच शाळेचा मुख्याध्यापक आहेस!? "*

    *गमतीचा भाग सोडला तर आपल्यापैकी असे किती जण आहेत की ज्यांच्या आसपास अशी नावडती माणसं आहेत?आणि तरीही त्यांच्यासोबत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही? मुद्दा विचार करण्यासारखा आहे.*

   *काही माणसं सर्वांना आवडतात. काही कुणालाच आवडत नाहीत. काहींना त्याने काही फरक पडत नाही. ते अधिकारपदावर असतील तर बाकीच्यांच्या छाताडावर बसून त्यांच्याकडून काम करून घेतात. त्यांच्या माघारी त्यांना शिव्या घातल्या तरी " माघारी लोक राजालाही शिव्या घालतात!" असं म्हणत वेळ मारून नेतात. पदावर नसतील तरी ते तिसऱ्या वाक्याला वाकड्यात घुसतात. आपण इतरांपेक्षा किती जास्त पाण्यात आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून इतरांची लायकी काढतात. दोन शब्दांचं कौतुक तर सोडाच, पण चुका मात्र अगोदर काढतात. लोक अशा माणसांना दबकून राहतात, मात्र ते सोबत नसतील तर आनंदोत्सव साजरा करतात! अशी माणसं इतरांच्या बाबतीत 'साला फडतूस' या कॅटेगरीतली ठरतात.*

  *काही माणसं मनाने 'राजा माणूस' असतात. ती अधिकारपदावर असोत, नसोत, प्रिय असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रसन्नता असते. बोलण्यात साधेपणा असतो. 'इतरांना आपण आवडावं' यासाठी ते वेगळं काहीही करत नाहीत, तरीही एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. आपली सुखदुःखं त्यांच्याशी शेअर करतात. ही माणसं अशावेळी फक्त 'डस्टबिन' बनतात. समोरच्या माणसाला रितं होऊ देतात. त्याचं ऐकून घेतात. समोरच्या माणसातला विश्वास जागा करतात. त्यांनी सहज सुचवलेल्या एखाद्या सल्ल्याने जर समोरच्या माणसाची एखादी कधीची न सुटलेली समस्या सुटली की आधीच आवडत्या असलेल्या माणसाच्या शिरपेचात प्रेमाचा आणखी एक तुरा खोवला गेलाच म्हणून समजा!*

  *मंदिरातला देव तरी दुसरं काय करतो? शांतपणे ऐकून घेतो. माणसाचं मन मोकळं झालं की माणूस पुन्हा नव्या उमेदीने काम करायला तयार होतो. करतो माणूसच; परंतु श्रेय ऐकून घेणाऱ्या देवाला जातं. देव सर्वांना आवडतो याचं एक कारण हेही असावं तर! कुण्या कवीने म्हणून ठेवलं आहे,*

_*याचसाठी देव आवडतो मला की...*_ 
_*दुःख माझे सर्व तो ऐकून घेतो!*_
-

-- राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...