Wednesday, March 19, 2025

चांगुलपण दे गा देवा!

**चांगुलपण दे गा देवा!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_19 मार्च, बुधवार_

▪️
*चांगुलपण दे गा देवा!*

   *समाजात काही माणसं चांगल्या स्वभावाची असतात, काही धूर्त, धोरणी, लबाड. चांगल्या माणसांचे खायचे दात चांगले असतात, धूर्त माणसांचे दाखवायचे. चांगली माणसं चेहऱ्याने चांगली असतीलच असं नाही, मात्र धूर्त माणसांच्या पदरात कधीकधी 'लंगूर के हाथ अंगूर' या न्यायाने देखणेपणाचं दान पडलेलं असतं, त्याचाही ती योग्य वेळी बरोब्बर शस्त्र म्हणून उपयोग करतात.*

    *चांगल्या माणसांना धूर्तांचा कावा लक्षात येत नाही. मुळात ती माणसं धूर्त आहेत हेच त्यांना कळत नाही. कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. तोपर्यंत धूर्त माणसं चांगल्या माणसांशी त्यांना हवी तितकी जवळीक साधून त्यांना हवं ते काम त्यांच्याकडून काढून घेतात. चांगली माणसं असतात केवळ प्रेमाची भुकेली. दोन शब्द कोणी प्रेमाचे बोललं की ही माणसं भाळतात. धूर्त माणसांना हे चांगलंच ठाऊक असतं. त्यांना जितकं ओरबाडायचं असतं तेवढं ओरबाडून झालं की धूर्त माणसं शिताफीने हळूच अंग काढून घेतात. काम झालं की त्या माणसाला खड्यासारखं बाजूला करतात. नंतर ओळख द्यायलाही त्यांना वेळ नसतो. ना ते त्यांचा कॉल उचलतात, ना त्यांच्या मेसेजला उत्तर देतात. नंतर चांगल्या माणसांनी त्यांच्याकडून एकच अपेक्षा ठेवायची. दुर्लक्षित होण्याची किंवा अपमानित होण्याची!*

    *चांगल्या माणसांना सुरुवातीला हे फार अवघड जातं. पण जेव्हा ती भानावर येतात, तेव्हा त्यांना अधिक स्पष्ट दिसू लागतं. मात्र ती त्यांचं चांगुलपण सोडत नाहीत. समुद्रातून एक लोटा पाणी कोणी घेऊन गेलं तर समुद्राला काही फरक थोडाच पडतो? तसंच चांगल्या माणसांच्या बाबतीत होतं. उलट त्यांना फसवणाऱ्या धूर्त माणसांची नंतर कधीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची व त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नाही. हा चांगुलपणाचा विजय असतो.*

    *याउलट फसवणूक झालेल्या काही चांगल्या माणसांना वाटू लागतं की ' माझ्या चांगुलपणामुळे माझ्यावर खूप अन्याय झाला आहे'. मग ही माणसं स्वतःच इतरांशी धूर्त लोकांसारखी वागू लागतात. कामापुरतं गोड गोड बोलतात, काम झालं की ओळख देत नाहीत. बिझी असल्याचं भासवतात. ब्लॉक करतात. मग इतर लोक या कधीकाळच्या चांगल्या माणसांनाही स्वार्थी, धूर्त, लबाड, खडूस समजू लागतात. त्यांच्या तोंडावर त्यांना हे स्पष्टपणे ऐकवतात. तीही मख्खपणे ऐकून घेतात. इथे समुद्राचं डबकं होतं. चांगल्या नावाला बट्टा लागतो आणि चांगुलपणाची मान शरमेने खाली जाते.*

   *म्हणून चांगल्या माणसांनी 'आपलं चांगुलपण आपण धूर्तांच्या दावणीला तर बांधत नाही आहोत ना?' हे वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे. शिवाय परिस्थितीने अडलेल्या चांगल्या माणसांना धूर्त समजण्याची गल्लतही नाही केली पाहिजे. कारण मनाचं चांगुलपण प्रत्येकालाच थोडं लाभतं? मोजक्याच लोकांना देवाने बहाल केलेला तो एक सुंदर दागिना आहे. त्याला जीवापाड जपलं पाहिजे.*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...