◾
*माणसाचा वर्ग कोणता?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_12 मार्च, बुधवार_
▪️
*माणसाचा वर्ग कोणता?*
*"मम्मी, पशु म्हणजे प्राणीच ना?" तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीने आईला विचारलं. मम्मी म्हटली, "हो तर!" "मग माणसाला पशु म्हटलं तर चालेल ना?" मुलीच्या या प्रश्नावर मात्र घास घशात अडकावा तसा उत्तराचा शब्द मम्मीच्या घशात अडकून बसला. काय उत्तर द्यावे तिला कळेना. स्वतःला सावरत ती इतकंच म्हणाली, "पप्पांना विचारून सांगते."*
*माणसाला प्राण्यांच्या वर्गात टाकायचं की पशुंच्या? हा तर नवीनच बॉम्ब टाकला लेकीने! माणूस हा समाजशील प्राणी आहे असंच आपण लहानपणापासून वाचत, लिहीत, म्हणत आलो. माणूस हा पशु आहे असं कधीच म्हटलं नाही, किंवा ऐकलंही नाही. पशु-पक्षी यांच्याबद्दलही आपण लहानपणापासून माहिती गोळा करत आलो, मात्र प्राणी आणि पशु हे वेगवेगळे असतील असं कधी वाटलं नाही. लेकीला उत्तर देणं भाग होतं. मम्मीच्या विचारांची गाडी वेगात धावायला लागली. काही क्षणातच ती विचारांच्या कोणत्या जगात गेली हे तिलाही कळलं नाही. शब्दांची उकल करून बघता बघता शब्द स्वतःच तिच्यासमोर अर्थ ओंजळीत घेऊन उभे राहिले.*
*ज्यांच्यात प्राण आहे ते प्राणी. हिंदीमध्ये त्यांना जानवर म्हणतात कारण त्यांच्यामध्ये 'जान' म्हणजे 'प्राण' असतो. 'वर' म्हणजे 'धारण करणारा'. मग 'पशु' कोण? पशु शब्द संस्कृतमधल्या 'पश' या धातूपासून आला. ज्यांना पाशात म्हणजे बंधनात ठेवणे आवश्यक असते ते प्राणी म्हणजे पशु. त्यांच्यावर बंधन ठेवले नाही तर त्यांच्या शक्तीचा ते क्रूर उपयोग करतात. इतरांना हानी पोहोचवतात. म्हणून मुक्त श्वापदांना शक्यतो पशु म्हटलं जातं, आणि जे माणसांसोबत राहु शकतात, शक्यतो कोणाला इजा करत नाहीत, त्यांना प्राणी! गुंता हळूहळू सुटू लागला.*
*क्षणात मम्मीच्या डोळ्यांसमोरून गेल्या पंधरा दिवसांच्या बातम्या येऊन गेल्या. बसमध्ये पाशवी बलात्कार. लोखंडी रॉडने मारहाण करत पाशवी हत्या. निर्घृण हत्या केलेल्या प्रेताची विटंबना. निराधार महिलेवर पाशवी अत्याचार! पाशवी म्हणजे? पशूंप्रमाणे?? हो हो, तसेच. माणुसकीला कलंकित करणारी ही माणसे, माणसे नव्हेतच! हे तर पशू!! प्राण्यांमध्ये असलेले प्रेम, वात्सल्य, माया, ममता, जिव्हाळा, आपुलकी, कृतज्ञता यांच्यात कुठे आहे? यांच्यात आहे फक्त क्रौर्य, स्वार्थ, वासना, ओरबाडण्याची राक्षसी वृत्ती आणि नीच हव्यास! म्हणजे प्राणी आणि पशु यांच्यात भावनांवरच्या नियंत्रणाचा फरक आहे तर?*
*मम्मीचे डोळे भरून आले. पोरीजवळ गेली. तिला पोटाशी घट्ट धरलं, आणि इतकंच म्हणाली, "पशु म्हणजे प्राणी नाही हं बाळ! पशु म्हणजे फक्त पशु, आणि प्राणी म्हणजे फक्त प्राणी! आणि हो, माणूस हा प्राणीच आहे, पण त्याचा पशु व्हायला वेळ लागत नाही, म्हणून जरा सावध राहत जा."*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment