Wednesday, April 2, 2025

हप्त्यांवरचं जगणं

*हप्त्यांवरचं जगणं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_2 एप्रिल, बुधवार_

▪️
*हप्त्यांवरचं जगणं*

   *जेव्हापासून ईएमआय म्हणजे हप्त्यावर वस्तू मिळण्याची सोय झाली आहे, तेव्हापासून लोकांच्या खरेदीला अगदी भरतं आलं आहे. 'हप्ते पे देंगे तो दुनिया भी खरीद लेंगे!' इतका लोकांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. हसण्यावारी नेण्याच्या गोष्टी हप्त्यावारी मिळायला लागल्यापासून लोकांची गाडी सुसाट सुटली आहे. 'बचेंगे तो और भी भरेंगे!' या भरवशावर शोरूम्समध्ये आणि बिल्डरांकडे ग्राहकांच्या उड्या पडू लागल्या आहेत. 'कितने ज्यादा भरेंगे?' हा विचार करायला कोणालाही वेळ नाही. सगळं जगणंच हप्त्यावर झालं आहे.*
 
*कधीकाळी लोक आपली पायरी ओळखून असत. 'उंटाच्या बुडाचा मुका घेऊ नये' अशा समजावणीच्या भाषेत सांगत. 'अंथरूण पाहून पाय पसरण्याचा' सल्लाही देत. पण आता, 'आहे तरुण तर घे मजा करून!' म्हणणाऱ्या नव श्रीमंतांचा  जमाना आहे. 'हप्ते भरू पण श्रीमंतच दिसू!' च्या व्हायरसने ज्याला त्याला पछाडलंय. अजून मिसरूडही न फुटलेल्या पोरांच्या बुडाखाली लाखांच्या गाड्या आल्या आहेत. ज्यांच्या बापांकडे स्क्रीन फुटलेला सॅमसंग आहे त्या पोरांकडे सिक्सटीन प्रो मॅक्सचा आयफोन आहे. ज्यांनी रोखीने मारुती आठशे घेतली नसती ते आठ दहा लाखाच्या पुढच्या गाड्या मिरवत आहेत. सगळी ईएमआयची आणि बापाची कृपा. मोबाईलने बँकच खिशात आणून ठेवल्याने फोन पे, गुगल पे पसरून "हप्त्यापुरते पैसे टाक ना!" म्हणणारे नवे जीव हप्त्यांवर खरेदी न करणाऱ्याला मात्र “तुमचा सिबिल स्कोर खराब आहे का?” असं विचारून धन्य करू लागले आहेत!*

     *खरंतर ज्यांना खोऱ्याने पैसा येतो आहे त्यांची कॉपी करण्याचा सामान्यांनी प्रयत्न करू नये. आहे त्यातही आनंदाने, समाधानाने जगता येतं. फारफार तर आपल्याला पेलवेल इतक्याच किंवा त्यापेक्षाही कमी हप्त्यावर, जिच्यामुळे आपली महत्वाची अडचण दूर होणार आहे अशीच गरजेची गोष्ट खरेदी केली तर समजण्यासारखं आहे. पण हाव आणि नातेवाईकांमध्ये खोटा दिखावा करण्याची हौस माणसाला स्वस्थ बसू देत नाही. 'करू ऍडजेस्ट' म्हणत आवाक्याबाहेरची खरेदी माणसं करतात. नंतर हप्ते भरताना नाकी नऊ येतात. हप्त्याची तारीख आली की चेहरे चिंताक्रांत आणि उदास होतात. सगळे हप्ते कट होऊन काहींच्या हाती केविलवाणी रक्कम उरते. आपल्या डोळ्यांदेखत आपली गाडी फायनान्सवाले घेऊन जातात आणि “उरलेली सगळी रक्कम भरा तरच तुम्हाला गाडी परत मिळेल” म्हणतात, किंवा घराला सील लावतात, तेव्हा जीवाला काय बरं वाटत असेल? पण सांगणार कुणाला? 'पळा पळा रे पुढे पळा!' च्या शर्यतीत कासव व्हायला कुणीही तयार नाही. सगळ्यांना न झोपणारा ससा व्हायचं आहे. मात्र गोष्ट कालही तशीच होती; आजही तशीच आहे. काल ससा हिरवळीवरचे गाजर खाऊन झोपला होता, आज ईएमआयचे गाजर खाऊन कायमचा झोपतो आहे इतकंच. म्हणून हप्त्यावर खरेदी करताना जिल्ह्यापेक्षा तालुका तर मोठा होत नाही ना? हे आधी पहावं, मग पाऊल उचलावं.*
*नाहीतर कुण्या कवीने लिहून ठेवलेलंच आहे,* 

*पायरी आहे कुठे, अन् चालली दुनिया कुठे*
*जग बुडवतिल एकदा, शेफारलेली माणसे!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...