◾
*संयमाची गोष्ट*
_एक मुद्दा, एक विचार!_
_9 एप्रिल, बुधवार_
▪️
*संयमाची गोष्ट*
*"संयमाचा हात थोडा सोडता मी,*
*वादळे धावून आली स्वागताला*
*शब्द माझे ज्या ठिकाणी सैल झाले,*
*दोस्त हो, तेथेच माझा घात झाला!"*
*प्रत्येकाला कधी ना कधी हा अनुभव येतोच. आपली इच्छा नसतानाही आपला किंवा समोरच्याचा शब्द सुटतो, विषय भरकटतो, काम बिनसतं आणि नंतर 'असं व्हायला नको होतं' असं कित्येक दिवस वाटत राहतं.*
*मोठ्या लोकांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्या काही पायऱ्या सांगितल्या आहेत त्यात संयम ही फार महत्त्वाची पायरी मानली आहे. पण आपला नारळ या पायरीवरच फुटतो! बहुतेक वेळा आपण बॅकफूटवर जातो, कारण आपला ढळलेला संयम. खास करून भावनिक माणसं मागे पडण्याचं हे खूप मोठं कारण आहे. मोठ्या कष्टाने उभा केलेला डोलारा केवळ ऐनवेळी संयम सुटल्यामुळे कोसळतो आणि भरून न येणारं नुकसान होतं.*
*संयम म्हणजे आपली वेळ येईपर्यंत स्वतःवर चांगल्या प्रकारे ठेवलेलं नियंत्रण. चांगली वेळ सुरू असेल तर तिचा भंग होऊ नये म्हणून दाखवलेलं समंजसपण. किंवा अंगावर धावून आलेली वाईट वेळ निस्तरेपर्यंतचं शांत राहून निर्णय घेण्याचं शहाणपण. आपण जिंकत असताना ठेवलेला संयम आपली गुणवत्ता वाढवतो; तर हरत असताना राखलेला संयम आपल्याला पुन्हा जिंकण्यासाठी उभे करतो. संयम म्हणजे तोंड फुगवून धरलेला अबोला नव्हे. चेहऱ्यावरचं स्मितहास्य ही संयमाची पहिली कसोटी आहे. पण आपण हे विसरतो. आपल्याला कसली घाई झालेली असते कुणास ठाऊक? सर्व काही मनासारखंच होणार असतं. गोष्टी मिळणारच असतात. पण त्या मिळेपर्यंतही आपल्याला दम निघत नाही. लगेच हवं असतं. मग जे मिळणार असतं तेही हातातून निसटून जातं. म्हणून संयम ढळायला लागला की अगोदर "यामुळे माझं काही नुकसान तर होणार नाही ना?" असा स्वार्थी चिमटा स्वतःला काढून पहावा. होणार असेल तर गप्प बसावं. नाहीतर 'दैव देतं अन् कर्म नेतं' अशातला प्रकार होतो. संयम न ठेवल्यामुळे आयुष्यात पडलेला एखादा खड्डा भरून निघण्यासाठी आयुष्यातील महत्त्वाच्या पंधरा ते वीस वर्षांची आहुती द्यावी लागते. कधी कधी उरलेलं संपूर्ण आयुष्य त्यातच निघून जातं. मग आपण त्याला साडेसाती म्हणतो.*
*खरं तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही अदृश्य टप्पे असतात. आपली व्यवस्था नियतीने कोणत्या टप्प्यावर केली आहे हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येक टप्पा आपल्याला दिसायलाच हवा असंही काही नसतं. अशावेळी संयमाचं तीर्थ थोडं हळूच मस्तकावर घेता आलं तर किती बरं होईल! नाही का?*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc
No comments:
Post a Comment