Wednesday, April 23, 2025

पैसा की माणसं?

*पैसा की माणसं?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_23 एप्रिल, बुधवार_

▪️
*पैसा की माणसं?*

*पहाटेच्या गोड गारव्यात शहरातील एक आजी-आजोबा जॉगिंग ट्रॅकवरच्या एका कट्ट्यावर बसून चक्क जोडीने मोबाईल पाहत होते. ‘अजून आलम दुनिया झोपेतच असताना ही जोडी मोबाईलमध्ये काय बरं पाहत असेल?’ या उत्सुकतेने एक जण त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, " बाबा, इतक्या पहाटे ट्रॅकवर आलात खरं; पण मस्तपैकी फेरफटका मारायचा सोडून हे मोबाईल मध्ये काय पाहत बसलात?" बाबांनी मोबाईलची स्क्रीन त्याच्याकडे केली आणि म्हणाले, "ही बघ, माझ्या मुलाने गाडी घेतली." मुलाने घेतलेली फोर व्हीलर आजोबा चक्क मोबाईलमध्ये पाहत होते. माणूस म्हणाला, "अरे व्वा, मस्त आहे गाडी." बाबा म्हणाले, "पण ती इथे नाहीये, अमेरिकेत आहे. तिथून तो आम्हाला दाखवतोय." माणूस म्हणाला," म्हणजे तुमचा मुलगा अमेरिकेत आहे तर! मग तुमच्यासोबत इकडे कोणकोण आहेत?” “कोणीच नाही, आम्ही दोघंच. आमचा बंगला आहे दोन सीआरचा. मागच्याच वर्षी मुलाने बांधून दिला.” “वॉव. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही दोघेच राहता? भीती नाही वाटत?” “कशाची?” “चोरांची वगैरे?” “चोरांची नाही; पोरांची वाटते!”*

 *आता मात्र मात्र प्रश्न विचारणारा चपापला. बाबांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाले, “बाबा रे, आम्हाला हा दोन कोटीचा बंगला आणि हा दोन लाखाचा मोबाईल आमच्या प्रिय मुलाच्या मोबदल्यात मिळाला आहे. दर महिन्याला आमच्या अकाउंटला पैसेही टाकतो तो. पण आता म्हातारपणात या पैशाचं, बंगल्याचं करू काय आम्ही? ज्यांच्यासोबत वेळ घालवायचा तेच पक्ष्याप्रमाणे उडून गेले. झाड इथेच राहिलं. जाताना तो म्हणाला होता, मी लगेच येणार आहे दोन-तीन महिन्यात. म्हटलं काढून घेऊ दोन-तीन महिने. त्याला वर्ष लोटली. आता म्हणतो, मला ग्रीन की कुठलं कार्ड मिळालंय. आम्ही नवरा बायको इकडेच सेटल होणार आहोत. कधीकधी आम्हालाही तिकडे या म्हणतो, पण या मातीची ओढ जाऊ देत नाही. पैसा की माणसं? या द्वंद्वात तेव्हा माणसं निवडण्याच्याऐवजी पैसा निवडला. माणसं दूर लोटली. पण त्या माणसांमध्ये आमचाही क्रमांक लागणार हे तेव्हा कळलंच नाही. खरं तर जे पेरलं तेच उगवलंय. आम्ही आमच्या तरुणपणात नोकरीच्या निमित्ताने आमच्या आईवडीलांना सोडून शहरात आलो. इकडचेच झालो. इकडेच बंगला बांधला. आईवडील गावाकडेच राहिले. तेव्हा त्यांनीही आमची अशीच खूप वाट पाहिली असेल.”*

     *ऐकणाऱ्याने डोळ्यांच्या कडा पुसल्या. म्हणाला, “बरेच दिवस झाले, गावाकडे गेलो नाही. या शनिवार-रविवारी दोन दिवसांसाठी का होईना घरच्यांना भेटून येतो. काय सांगावं त्यांनाही भीती वाटत असेल – पोरगा कायमचा दुरावतो की काय याची!”*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...