Wednesday, April 16, 2025

प्रकाशाची बेटं

*प्रकाशाची बेटं*
_एक मुद्दा, एक विचार!_
_16 एप्रिल, बुधवार_

▪️
*प्रकाशाची बेटं*

*आपण जन्माला येतो मातेच्या उदरातून, खांद्यावर वडिलांच्या बसतो. मस्ती भावंडांसोबत करतो, खेळतो सवंगड्यांबरोबर. मोठे होतो मित्रांसोबत, जबाबदाऱ्या वाटून घेतो सहकाऱ्यांसोबत. ज्ञानाची देवाण-घेवाण करतो गुरूतुल्य व्यक्तिमत्त्वांसोबत, तर हितगुज करतो काळजातल्या लोकांसोबत. कोणाकडून शिकतो तर कोणाला शिकवतो. कोणाकडून घेतो तर कोणाला देतो. कुणाकुणाला आपण काहीच देत नाही. कुणाकुणाकडून आपण काहीच घेत नाही. फक्त त्यांच्यासोबत राहतो.*

 *आपल्या आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर ही माणसं आपल्याला भेटत राहतात. थोड्या काळासाठी आपल्या सोबत राहतात, नकळत आपल्या आयुष्यात सुखाचं चांदणं शिंपडतात, आणि कोणत्यातरी अवचित वळणावर अलगद आपला हात सोडून निघून जातात; नाहीतर आपला तरी हात त्यांच्या हातातून सुटतो.  आपल्याला जी माणसं मनापासून आवडतात, त्यांचाच सहवास नेमका कमी मिळतो. आपण तो अधाशासारखा टिपून घेतो. एक एक क्षण मनात गिरवत राहतो. अशी माणसं मुळत:च सुगंधी असतात. त्यांच्यासोबत राहिलं की आपल्याला सुगंधी वातावरणात राहिल्यासारखं वाटतं. त्यांनी दिला नाही तरीही सुगंध आपोआप आपल्यापर्यंत पोहोचतोच. त्यांनी स्वतःहून वाटला तर मग त्याची बातच न्यारी! असा सुखाचा, आनंदाचा एक क्षणही मग संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवण्यासाठी पुरेसा असतो.*

     *ही सगळी माणसं आपल्या आयुष्यातील प्रकाशाची बेटं आहेत. आपला अंधारू पाहणारा भोवताल ही माणसं थोड्या काळासाठी का होईना उजळून टाकतात. पण त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात हा गारवा निर्माण झाला आहे याची त्यांना सुतराम कल्पना नसते. तो कृतज्ञभाव जपणं ही आपली जबाबदारी असते. कारण हे सगळे आपल्या आयुष्यातले अल्पकाळाचे थांबे असतात. प्रवासी बदलत राहतात. प्रवास सुरू राहतो. बहुतांश जण विस्मृतीत जातात, एखादा आयुष्यभर लक्षात राहतो, आपली मूक सोबत करतो. त्याने सांगितलेल्या एखाद्या वाक्यावर आपलं उरलेलं अख्खं आयुष्य तग धरतं. मग अशा वेळी आपल्या हाती इतकंच. भेटणारा प्रत्येक माणूस आपल्याला अल्पकाळासाठी भेटणार आहे याची जाणीव कायम मनात ठेवणं. इतक्याशा काळात आपल्यातलं जास्तीत जास्त चांगुलपण त्याला देणं; त्याच्यातलं जास्तीत जास्त चांगुलपण आपल्याकडे घेणं. तेही दोन्ही देवांचं देवपण सांभाळून. एखाद्याने आपल्याला काही चांगलं देऊ केलं तर त्याचा हात ओढून घेऊ नये. आपण एखाद्याला देताना संपूर्णच वाहत जाऊ नये. परंतु उगीचच आखडूपणाचा आवही आणू नये. मोकळं रहावं. आपल्या केवळ सोबत असण्यानेही एखादी जागा सुंदर व्हावी यापेक्षा चांगली दुसरी गोष्ट कोणती!*
-


✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...