Wednesday, June 4, 2025

शुभ मंगल सावधान

*शुभ मंगल सावधान !*
_एक मुद्दा, एक विचार!_
_4 जून, बुधवार_

▪️
*शुभ मंगल सावधान !*

 *"कशी दिली मेथीची जुडी?" "वीस रुपयांना." 'बघू?' म्हणत अलकाताई मेथीची जुडी बघू लागल्या. दोन जुड्या इकडे तिकडे केल्या तर मेथीवाली म्हणाली, "ताई, खूप जास्त निरखून पारखून बघू नका. काडी काडी पारखून घ्यायला तुम्हाला फक्त जुडी घ्यायची आहे, नवरदेव नाही!" अलकाताईंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं, "अहो, नवरदेव तरी कुठे इतका पारखून घेतात लोक हल्ली? आजकाल लोकांना नुसता भपका पाहिजे. आणि नवरदेवांचं काय घेऊन बसलात? दाढी वाढवली की झाला नवरदेव!"*

    *अलका ताईंचं म्हणणंही काही अगदीच चुकीचं नव्हतं म्हणा. साधी मेथीची जुडी घेताना चार वेळा निरखून पारखून बघणारी बरीच माणसं नेमकं मुलांसाठी स्थळं निवडतानाच कशी फसतात कळत नाही. त्याचं एक कारण म्हणजे आजकाल माणसं नवरदेव नाही; त्याचा पैसा आणि पोजिशन बघतात. मुलीचे गुण नाही, तिचा गोरा मुखडा बघतात. लग्नाचा थाटमाट असा करतात, की भावकीने तोंडात बोटं घातली पाहिजेत. सोयरा अशा उंचीचा शोधतात, की त्याच्याकडे बघताना भावकीच्या टोप्या खाली पडल्या पाहिजेत. लग्नाची पद्धत म्हणाल तर, प्री-वेडिंगच्या नावाखाली मंडळी अगोदरच एक छोटं लग्न उरकून घेतात. 'होऊ दे खर्च!’ अगदी लग्नाच्या दिवशीही दोन-दोन लग्नं करतात. हे कुठलं? म्हणे वैदिक पद्धतीने आणि ते? ते सर्वांसाठी नेहमीच्या पद्धतीने,  आणि ते आणखी? ते रिसेप्शन. म्हणजे लग्नासारखंच! मोजा एकूण लग्नं झाली किती? आणि इतक्या वेळा लग्न करूनपण मुलगी सुखात आहे का? तीच जाणे! श्रीमंत असणं वाईट नाही, पण कधीकधी कोटीच्या लख्ख बंगल्यातही आपुलकीचा कोरडा दुष्काळ असू शकतो; तर मध्यमवर्गीय घरीही खळखळ वाहणारा मायेचा, सुखाचा झरा असू शकतो. केवळ खोट्या दिखाऊपणाला भूलून जावई/सुनबाई निवडणारे कित्येक आई-वडील आणि ज्याचं लग्न झालं तेही आज पश्चाताप करताहेत. कारण त्यांची निवड चुकलीय. चुकीच्या माणसासोबत आयुष्य काढणं सोपी गोष्ट नाही. म्हणून, जावई किंवा सुनबाई शोधताना त्यांचं घराणं किती श्रीमंत आहे त्यापेक्षा तो किंवा ती ‘आपल्या कुटुंबात नव्याने येणारी व्यक्ती’ म्हणून किती लायक आहे, गुणी आहे हे खूप काळजीने बघितलं पाहिजे. संसार घरादाराने नाही, तर त्यात राहणाऱ्या आनंदी माणसांनी चांगला होतो. ज्यांना सुदैवाने असे चांगले, गुणी जावई आणि सुना मिळाल्या आहेत, त्यांनी केवळ तितक्यासाठीच परमेश्वराचे रोज आभार मानले पाहिजेत. ज्यांना दुर्दैवाने नाही मिळाले, त्यांनी 'वाद सुरू होण्याचा क्षण' हुशारीने टाळला पाहिजे. सतत कुरकुर करणाऱ्या नवऱ्यांना देवाने थोडी सदबुद्धी, उधार का होईना, पण दिली पाहिजे, आणि जे स्थळं शोधताहेत, त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी मेथीची जुडी आहेच की!*

-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...