◾
*ज्ञान अन् प्रभुत्व*
_एक मुद्दा, एक विचार!_
_11 जून, बुधवार_
▪️
*ज्ञान अन् प्रभुत्व*
*एकदा एका राजाला सहज फेरफटका मारताना लक्षात आलं की त्याचा एक सेवक दरबारात येणाऱ्या लोकांची आस्थेने विचारपूस करतो. राजाला वाटलं, याला अधिकारपदावर बसवलं तर हा प्रजेचीही अशीच काळजी घेईल, म्हणून राजाने त्याला नगराचा प्रमुख अधिकारी करून टाकलं. अधिकारी होताच त्याने पहिलं काम काय करावं? कधीकाळी त्याच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या जुन्या सेवकावर लक्ष ठेवायला सांगितलं. आणि त्याची चूक झाली हे कळताच त्याला कामावरून काढून टाकलं! सगळे लोक अवाक् झाले.*
*दरबारातल्या एका नवख्या गड्याने घरी गेल्यावर आपल्या वयस्कर वडिलांना विचारलं, "हा सुद्धा अगोदर सेवकच होता ना? मग आपल्याच एका सहकाऱ्याला ही वागणूक? माणूस अचानक एवढा रंग कसा बदलू शकतो?" वडील म्हणाले, "त्यात काय एवढं? धन, सत्ता, अहंकार, आणि प्रभुत्व या चार गोष्टी अशा आहेत की एखाद्याकडे यापैकी एक जरी गोष्ट आली, तरी त्याच्या वागण्यात लगेच बदल होतो. आणि जर कधीही न मिळालेली एखादी गोष्ट अचानक मिळाली, त्यातल्या त्यात लायकीपेक्षा अधिक मिळाली, तर मग विचारायलाच नको. काही करून ती आपल्या हातून सुटू नये अशी त्याची धडपड असते. माणूस इतरांना जितका घाबरत नाही, तितका तो आपल्याच क्षेत्रात पारंगत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना घाबरतो. त्यांचा एकदा पत्ता कट झाला की मग तो बिनघोर असतो. म्हणून अशांना काढून टाकणे किंवा त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणे, त्यांच्या संदर्भात वरिष्ठांचे कान भरणे, त्यांच्या चुकांवर लक्ष ठेवून जाणीवपूर्वक त्या सर्वांसमोर आणणे, आणि त्यांचे खच्चीकरण करणे या गोष्टी अशी माणसं करतात, म्हणजे त्यांचा रस्ता मोकळा!"*
*मुलगा म्हणाला, "धन, सत्ता आणि अहंकारामुळे माणसाच्या वागण्यात झालेला बदल समजू शकतो, परंतु प्रभुत्व म्हणजे एखाद्या गोष्टीचं इतरांपेक्षा थोडं अधिक ज्ञानच ना? मग ज्ञानामुळे माणसाच्या वागण्यात बदल का होईल?" वडील म्हणाले, "इथेच तर खरी मेख आहे. 'मलाच सगळं येतं आणि इतरांना येत नाही' या भावनेतून माणूस स्वतःला इतरांपेक्षा वेगळा, मोठा, आणि ज्यांना ती गोष्ट येत नाही त्यांना तुच्छ समजू लागतो. इथे तो चुकतो. हा त्याच्यातील हावरट माणसाचा तात्पुरता विजय; परंतु त्याच्यातल्या चांगल्या माणसाचा दीर्घकालीन पराभव असतो."*
*मुलाने विचारलं, "मग एखाद्या गोष्टीत प्रभुत्व मिळवून उपयोग काय?" वडील म्हणाले, "अधिक ज्ञान असणं वाईट नाही, तर त्या ज्ञानामुळे इतरांना तुच्छ लेखण्याची, त्यांचे खच्चीकरण करण्याची कुबुद्धी होणं हे वाईट आहे! खरं तर इतरांचा बळी देऊन स्वतःची पोळी भाजणं आजपर्यंत कुणालाही पचलेलं नाही. त्याची परतफेड इथेच करावी लागते. शेवटी चांगलं मन असलेला माणूस आणि त्याच्यात शिल्लक असलेली माणुसकी याशिवाय माणसाच्या यशाला, ज्ञानाला, मिळकतीला आणि या जगाला तरी काय किंमत आहे? हो की नाही?" मुलाने विचारलं, "हो, पण मग राजाला या माणसाचं खरं रूप कळणार केव्हा?" वडील म्हणाले, "जेव्हा एके दिवशी त्याच्यामुळे खुद्द राजालाच मान खाली घालायची वेळ येईल ना, तेव्हा!*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment