◾
**कमी, आम्ही आणि हमी!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_2 जुलै, बुधवार_
▪️ *कमी, आम्ही आणि हमी!*
*दररोज सकाळ होते, माणसं उठतात. आवरतात, कामाला लागतात. दिवसभर धावपळ करत राहतात. संध्याकाळी सूर्याने पाठ फिरवली, की माणसांची शक्ती शून्य होते. पुन्हा माणसं रात्रभरासाठी अंथरुणावर स्वतःला ढकलून देतात, सकाळी उठून पुन्हा धावपळ सुरू!*
*प्रश्न हा आहे, की 'सकाळी उठणे आणि रात्र झाली की झोपणे' एवढेच जर माणसाच्या दिवसाचे प्रयोजन असेल तर, दररोज उठून माणसं दिवसभर इतकी धावपळ का करतात? तशीही संध्याकाळ होणारच असते की! अशी कोणती गोष्ट आहे की जी माणसांना उठून धावायला भाग पाडते? तुम्ही म्हणाल, पोटासाठी. पोटासाठी इतकं लागतं? पहाटेपासून रात्रीपर्यंतचं उसंत नं घेता राबणं लागतं? जीवघेणी स्पर्धा लागते? टोलेजंग बंगले लागतात? कोटी कोटीचा बँक बॅलन्स लागतो? घरदार, आईबाप, बायका पोरं सगळं विसरून टारगेटमागे धावणं लागतं? नक्कीच नाही. आणि ज्याने चोच दिली आहे तो पोटापुरता चारा तरी प्रत्येकाला देतोच ना. मग या धावपळीचं कारण? यामागे आहे तीन शब्दांची जादू. आणि ते तीन शब्द आहेत... 'काहीतरी कमी आहे!'*
*गरीबाला वाटतं पैशाची कमी आहे, पैसेवाल्याला वाटतं सुखाची कमी आहे. धंदेवाल्याला वाटतं नफ्याची कमी आहे, नोकरीवाल्याला वाटतं पगार जरा कमी आहे. कुणाला वेळेची कमी, तर कुणाला संधीची कमी, कुणाला नाव लौकिकाची कमी, तर इस्पितळातल्या कुणाला श्वासांची कमी. काहींना तर सगळं काही असूनसुद्धा काहीतरी कमी आहेच! आणि ही कमी भरून काढण्यासाठीच तर सगळी धावपळ आहे!*
*निर्मात्याने जेव्हा माणूस नावाचा 'घट' पहिल्यांदा बनवला, तेव्हा त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी त्याने त्याच्यामध्ये टाकल्या. बुद्धी टाकली, सौंदर्य टाकलं, भाषा टाकली, प्रेम टाकलं, भावना टाकल्या, जिद्द टाकली, ऐश्वर्य टाकलं, प्रगती टाकली, कल्पनाशक्ती टाकली, यश आणि अपयश टाकलं, डोळ्यांमधले आसू टाकले, ओठांवरचं हासू टाकलं, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती टाकली, विचार करण्याची शक्ती टाकली. सगळं काही टाकून झाल्यावर शेवटची एकच गोष्ट त्याच्या हातात शिल्लक राहिली. ती टाकताना त्याने थोडा हात आखडला आणि म्हणाला, "एवढी एक गोष्ट माझ्याकडे राहू देतो. नाहीतर हा मलाच विसरून जाईल, आणि उद्या माझ्यावरच डोळे वटारायला मागेपुढे पाहणार नाही." त्याने हात आखडता घेतला.*
*माणसाला जेव्हा हे कळायला लागतं, की आपल्याला जी गोष्ट हवीय ती तर आपल्या निर्मात्याने त्याच्याकडेच राखून ठेवलेली आहे, तेव्हा थकूनभागून झाल्यावर तो त्याच्याकडे येतो, त्याच्या पायाजवळ बसतो, हात जोडतो, डोळे मिटतो, मनाने निर्मळ होतो... तेव्हा देव त्याच्याकडे पाहत एक हलकंसं स्मित करतो, आणि हळूच डोक्यावर हात ठेवत त्याने राखून ठेवलेली गोष्ट त्याला बहाल करतो! ती गोष्ट असते... मनाची शांतता! बस्स. ती मिळाली, की माणसाच्या धावपळीचं सार्थक होतं. कमी भरून निघते.*
*तुम्हाला काय वाटतं? वर्षानुवर्षं दर आषाढी कार्तिकीला पंढरपुरात होणारी लाखोंची गर्दी उगीचंच होते की काय? महाराज, गेली अठ्ठावीस युगे मराठी माणसांच्या मनातली 'कमी' भरून काढण्याची 'हमी' तिथे विटेवर उभी आहे, हे त्यामागचं खरं कारण आहे !*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
No comments:
Post a Comment