Wednesday, August 20, 2025

सलाम त्यांनाही

*सलाम त्यांनाही*
_एक मुद्दा, एक विचार!_
_20 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*सलाम त्यांनाही*


*एक प्रज्ञाचक्षु ऑफिसर होते. त्यांच्या डोळ्यावर महागडा काळसर चष्मा असल्याने बऱ्याचदा लोकांना ते दृष्टीने अधू आहेत हे समजायचंच नाही. त्यांना भेटायला कोणीही येवो, ते त्यांना स्वतःचं नाव सांगायचे, त्यांचे नावही विचारून घ्यायचे. शेक हॅन्ड करायचे. बस. हाताचा स्पर्श होताच त्याची ओळख आयुष्यभरासाठी साहेबांच्या मेंदूमध्ये नोंद होत असे. त्याचा आवाज त्यांच्या मेंदूमध्ये कोरला जात असे. एकदा असंच त्यांना भेटायला एक सदगृहस्थ गेले. त्यांना शेक हॅन्ड केलं, आणि फक्त नमस्कार म्हटलं. साहेबांनी क्षणात त्यांची पूर्ण कुंडली त्यांना ऐकवली. ऐकणारा थक्क झाला. कारण तो त्यांना पाचेक वर्षापूर्वी केवळ एकदा भेटला होता!*

*आयुष्याची लढाई अपुऱ्या शरीराने लढणाऱ्या या लढवय्यांना खरं तर सलामच केला पाहिजे. पण समाज त्यांची कीव करतो. ‘अरेरे!’ म्हणतो. केवढा हा विरोधाभास! आपल्याला परवा भेटलेला माणूस कोण होता हे आठवत नाही. डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे तर खरे आपण असतो, आणि खापर मात्र इतरांवर फोडतो!*

*आणखी एक, जितका संघर्ष या दिव्यांग, प्रज्ञाचक्षु, विशेष, किंवा आजाराशी झुंजणाऱ्यांच्या वाट्याला असतो, त्याहूनही खूप मोठा संघर्ष करणारा एक घटक कायम दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे यांचा सांभाळ करणारी देवमाणसं! त्यांच्यासाठी स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारी घरातली ही माणसं आपलं पद, प्रतिष्ठा, नोकरी, पैसा, आयुष्य सगळं सगळं डावावर लावून त्यांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात, खूप सोसतात, दवाखाने, मंदिरं, आश्रम, गंडेदोरे... सगळं पालथं घालतात. कर्जबाजारी होतात, कंगाल होतात. अवघं आयुष्य उधळतात! कधी हरतात, कधी जिंकतात. कधी कधी नाउमेद होऊन थकतात. त्यात आणखी कधी माणूस हाती लागतं, कधी लागत नाही. खूप अवघड लढाई असते ही.*

 *या दमछाक करणाऱ्या प्रवासात ज्यांची मानसिकता सकारात्मक आहे, बाणा लढाऊ आहे, ते फक्त टिकतात. ते स्वतःला कमनशिबी समजत नाहीत. उलट म्हणतात, “माझ्यात याला सांभाळण्याची धमक आणि ताकद आहे हे प्रत्यक्ष देवालाही माहीत आहे, म्हणून त्याने त्याचं हे लाडकं अपत्य सांभाळायला माझ्याकडे दिलेलं आहे!” हा खूप मोठा विचार त्यांना लढतं ठेवतो. समाज म्हणून आपण त्यांचा संघर्ष, त्यांची वेदना समजून घेतली पाहिजे, त्यांना सहानुभूती नव्हे, तर लढण्याचं बळ दिलं पाहिजे. कारण ही माणसं अजूनही घराघरात टिकून आहेत म्हणून हे जग जगण्यासाठी अद्याप लायक आणि शिल्लक आहे. हात, पाय, डोळे नसलेल्यांनी गाठलेल्या उत्तुंग यशाच्या कहाण्या आपण ऐकतो, पाहतो. त्यांचं कौतुक करतानाच त्या याच माणसांच्या आटलेल्या रक्ताने अगोदर लिहिल्या गेल्या होत्या याची जाणीव ठेवली तरी पुरे!*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...