Thursday, August 28, 2025

खेळ नियतीचा

*खेळ नियतीचा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_27 ऑगस्ट, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*खेळ नियतीचा* 

*"हं बोला, काय झालं?" "डॉक्टर, मी दोन महिन्यांपासून झोपलेलो नाहीये." टेबलाच्या पलीकडून बसलेल्या त्या इसमाच्या डोळ्यात खोल बघत हसत डॉक्टर म्हणाले, "मोबाईल जरा कमी बघत जावा." समोरचा माणूस म्हणाला, "नाही. माझ्याकडे अकराशे रुपयेवाला बटनाचा मोबाईल आहे." "मग काय कारण आहे?" "माझा भाऊ." "काय झालं त्याला?" माझ्या स्वप्नात येतो." "आणि?" "आणि मला म्हणतो की दादा तू मला का वाचवलं नाहीस? मग पुढची रात्रभर मी झोपू शकत नाही!"*

   *डॉक्टरांनी खुर्ची सरळ केली. त्यांचा चेहरा गंभीर झाला. सावरत बसत म्हणाले, "काय झालं तुमच्या भावाचं जरा सांगाल का?" समोरचा इसम म्हणाला, "डॉक्टरसाहेब, एका दुपारी आम्ही दोघेच घरात सोफ्यावर बसलेलो होतो. अचानक त्याच्या छातीत जळजळ व्हायला लागली. तो मला म्हणाला की मला ऍसिडिटीसारखं होतंय. गोळी दे ना. मी म्हटलं, ड्रॉवरमध्ये तूच ठेवलेली आहेस ना. घे ना तिथून. मला वाटलं तो घेईल उठून. पण काही कळायच्या आतच तो जमिनीवर गडबडा लोळायला लागला. मीही गांगरून गेलो. मी उठून गोळी आणून देईपर्यंत त्याने मान टाकलीसुद्धा. माझा प्रिय भाऊ माझ्या डोळ्यांदेखत मला सोडून गेला डॉक्टरसाहेब. मी तिथेच असून, शिवाय त्याने मला मदत मागूनसुद्धा त्याला वाचवू शकलो नाही. तेव्हापासून त्याच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असं मला सारखं वाटत राहतं. आता ही गोष्ट मला खायला उठली आहे. साहेब मी काय करू? हे ओझं कसं उतरवू?”*
 
    *डॉक्टरांनी आवंढा गिळला आणि म्हणाले, "माझे वडीलही दोन वर्षांपूर्वी असेच माझ्यासमोर गेले. मी काहीच करू शकलो नाही. जे तुम्हाला वाटतंय ते दुःख, ते शल्य डॉक्टर असून मीही कित्येक दिवस वागवलंय. पण आता मी सावरलो आहे. कारण मला एक गोष्ट समजली आहे. आपलं आयुष्य त्या मैदानावरच्या क्रिकेटच्या खेळासारखं असतं. कधी आपण खेळाडू असतो तर कधी प्रेक्षक. जेव्हा आपण खेळाडू असतो तेव्हा जीवाची बाजी लावून खेळ जिंकण्याचा प्रयत्न करतो, जिंकतोच. पण जेव्हा आपण प्रेक्षक असतो, तेव्हा डोळ्यासमोर खेळ हरत असतानाही आपण मैदानात उतरू शकत नाही. आपल्याला तशी परवानगीच नसते. आपण कितीही चांगले खेळाडू असलो तरी! तेव्हा आपण फक्त हतबल होऊन बघणारे असतो... हरलेल्या मॅचला प्रेक्षक जबाबदार नसतो. म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ज्या दिवशी तुमचा भाऊ गेला त्या दिवशी तुम्ही प्रेक्षक होता, खेळाडू नाही. समोरच्या माणसाने डबडबल्या डोळ्यांनी विचारलं, "मग त्या दिवशी खेळत कोण होतं?" डॉक्टरांनी एक श्वास घेतला, आणि म्हणाले, "नियती! तिच्यापेक्षा मोठा खेळाडू कोण आहे?"*

   *दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्या माणसाचा फोन डॉक्टरांना आला. त्याने म्हटलं, " थँक्यू डॉक्टर, दोन महिन्यानंतर काल रात्री जे झोपलो ते आत्ता उठलो! माझी झोप परत मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद."*
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...