◾
*खरा शिक्षक कोण?*
_एक मुद्दा, एक विचार!_
_10 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
◾
*खरा शिक्षक कोण?*
*खरा शिक्षक कोण? या अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर अगोदरच देऊन टाकतो! शाळा सोडून गेल्यानंतरही आयुष्यभर जो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील, तो खरा शिक्षक. 'आमचे सर!' किंवा 'आमच्या मॅडम!' असे म्हटल्याबरोबर ज्यांचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतो ते ‘खरे’ शिक्षक! बाकीचे नुसते शिक्षक. माझ्या छोट्याशा कारकिर्दीत मला आढळलेले शिक्षकांचे सहा प्रकार पुढील प्रमाणे. आपण शिक्षक असाल तर यात कुठे बसता ते शोधा. विद्यार्थी असाल तर आठवा.*
*1. नवीन शिक्षक!*
*नवं रक्त असतं, उत्साह फार, पण नॉलेज कमी, सगळं कॉपी पेस्ट! घे गाईड, सांग समजून. मार रट्टा. शिवाय जुण्यांची कामं ऐका. शिंगरू ओझ्यानेच मरण्याची शक्यता जास्त. शिकवणं बोंबललं.*
*2. मॉडेल शिक्षक!*
*इतकं नटतील की त्याला माप नाही, सर मॅडम एक समान. मुली सरांवर फिदा, मुलं मॅडमवर फिदा!! तिसरं लिहीत नाही. मग मुलांनी शिकायचं की मेकप बघायचा? की फ्लर्ट करायचं?*
*3. हास्य शिक्षक!*
*इतकं हसवतील की शिकवण्याचं राहूनच जाईल. मुलं डोक्यावर घेतील पण मुख्याध्यापक? आणि इतर शिक्षक? त्यांच्या नजरेतून उतरतील. कारण, परीक्षा डोक्यावर आली तरी अभ्यासक्रम अपूर्णच. त्याचं काय?*
*4. कठोर शिक्षक!*
*असं म्हटलं जातं की यांच्यामुळे शाळेची शिस्त टिकून आहे. पण, ‘दिसला पोरगा की काढ ठोकून!’ ही मानसिकता. त्याची साधी चौकशी नाही, की समजून घेणं नाही. चुकीला माफी तर नाहीच. मग 'मारकुट्या' नाव नाही पडलं तर काय कमावलं?*
*5. अनुभवी शिक्षक!*
*पोक्त म्हणूया. बाकीच्यांचे वय तेवढी तर यांची कारकीर्द! मुलं सोडा, त्यांच्या बापांनाही यांनी शिकवलेलं असतं! तसं ते बोलूनही दाखवतात. पण एक प्रकारची कामात शिथिलता. ‘आपले काय? थोडे राहिले’ ही मानसिकता. नवं तंत्रज्ञान शिकण्यातला पराकोटीचा आळस. ‘फेक तिकडं!’ ही भूमिका. ‘करत नाही म्हणून सांग त्याला!’ ही गुर्मी. मग कसं जुळवून घेणार नव्या पिढीशी? यांना मुलांची घेणं देणं नाही, मग मुलांनाही यांच्याशी घेणं देणं नसतं!*
*बाकी काही असो. शिक्षणाचा महामेरू आजही सहाव्या प्रकारातल्या 'धडपडया शिक्षकांनी' पेलून धरलेला आहे. त्यांच्यात वरील सर्व प्रकार चिमूटभर असू शकतात; पण कोणत्या प्रकारात किती अडकायचं याच भान त्यांना असतं. मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या, स्वतःचं आयुष्य उधळून देणाऱ्या, खिशाला चाप पडला तरी मागे न हटणाऱ्या आणि ‘माझा प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे!’ या ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या अशा शिक्षकांमुळेच शिक्षणक्षेत्राच्या कपाळावरचा पावित्र्याचा मंगल तिलक शोभून आणि टिकून आहे. आणि जोपर्यंत ही धडपडी मंडळी शिक्षण क्षेत्रात येत राहतील, तोपर्यंत शिक्षण हाच प्रत्येकाचा तिसरा डोळा राहील!*
-
✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc
No comments:
Post a Comment