Wednesday, September 3, 2025

आनंदाचा टिळा

*आनंदाचा टिळा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_03 सप्टेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*आनंदाचा टिळा* 

        *उत्साहाने अगदी ओसंडून वाहणारी काही माणसं असतात. त्यांना कधीही पहा, नेहमी टवटवीत असतात. चेहऱ्यावर मस्तसं स्मित असतं. कोणतीही नवी कल्पना मांडा, ती ऐकायला ही माणसं सर्वांच्या पुढे! काहीही काम सांगा, जबाबदारी घ्यायला सगळ्यांच्या अगोदर! निम्मं काम एकट्याच्या जीवावर ओढण्याची यांची हिंमत आणि तयारी असते. कोणताही विषय काढा, यांची त्याच्यावर पीएचडी ठरलेली! अनुभवांचं, किश्श्यांचं भांडार म्हणजे अशी माणसं. बोलतील तर असं की मैफल सजलीच पाहिजे!*

     *देवाने त्यांना खास सवडीने बनवलेलं असतं. साबणावर शाम्पू फ्री देतात ना, तसंच देवाने त्यांना श्वासांसोबत उत्साह फ्री दिलेला असतो! त्यांच्या चेहऱ्यावर असे काही तेज असते की बघणाऱ्याला प्रश्न पडावा, “कौनसी चक्की का आटा खाते हो भाई?”*

        *ही माणसं जिथे कुठे असतील तिथे स्वर्ग निर्माण करतील. त्यांचं नुसतं उपस्थित असणं म्हणजे आनंदाचा अभिषेक! पावसाआधीचा गारवा! त्यांचे शब्दही इतके प्रभावी असतात की मरगळलेल्या मनालाही क्षणात जगण्याची उभारी मिळावी. जगण्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही, तर आनंद लागतो! हा आनंद या माणसांकडे असतो.*
 
       *उत्साही माणसं श्रीमंत असलीच पाहिजेत असा काही दंडक नाही. श्रीमंत माणूस उत्साही असेलच असंही नाही. उत्साही असण्याची प्रतवारीच वेगळी आहे. या माणसांचे संसार पहा. फार उत्साहाने त्यांनी त्यांचा संसार फुलवलेला असतो. त्यांचं घर छोटेखानी असलं तरी त्यांनी असं सजवलेलं असतं की बंगल्यावाल्याला भारी! या उत्साहाच्या बळावरच ही माणसं लढत असतात. ती प्रत्येक वेळेला जिंकतातच असं नाही; परंतु हारल्यावर पुन्हा उठून लढण्याची हिंमत आणि उत्साह त्यांच्यात जितका असतो तितका इतरांमध्ये नसतो.*

     *या ग्रेट लोकांना खिंडीत गाठण्यासाठी देव त्यांना मुद्दाम निरुत्साही माणसांमध्ये टाकतो! त्यांच्या भोवती मुद्दाम आळशी, काही करण्याची हिंमत नसलेली, उमेद नसलेली, कायम नकारात्मक विचार करणारी माणसे टाकतो. पण पूर आलेली नदी जसं तिच्यासोबत ओलं सुकं सगळं वाहून नेते तसंच ही उत्साही माणसंही आपल्यासोबत असलेल्यांना पुढे रेटून घेऊन जातात. अशी कितीतरी निरुत्साही माणसं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांच्या जागा ह्या केवळ त्यांच्यासोबत असलेल्या उत्साही माणसांच्या बळावर टिकून आहेत. हे काम करतात, ते श्रेय घेतात! उत्साही माणसं तिथून वजा केली, की बाकीची मंडळी भुईसपाट झालीच म्हणून समजा!*
 
     *आपण या उत्साही माणसांना जपलं पाहिजे. कारण त्यांचा उत्साह मावळला की अवेळी सूर्य झाकोळल्यासारखं वातावरण तयार होतं. लोहचुंबकाच्या सानिध्यात आलेल्या लोखंडामध्येही जसा काही काळ का होईना, लोहचुंबकाचा गुण उतरतो, तसाच आपल्या सानिध्यात असलेल्या एखाद्या उत्साही माणसाकडून थोडासा उत्साह उसना घेऊन हा आनंदाचा टिळा आपल्याही कपाळी लावला तर काय हरकत आहे?* 
-

✒️
श्री. राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/BhEBKeTsXHsFqgKR8Ai8Dc

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...