◾
*खुसखुशीत आणि सुरक्षित प्रवास!*
_एक मुद्दा, एक विचार!_
_29 ऑक्टोबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*खुसखुशीत आणि सुरक्षित प्रवास!*
*पैसे मागतो पण भिकारी नाही! कागद फाडतो पण वेडा नाही! घंटी वाजवतो पण पुजारी नाही!! ओळखा पाहू कोण? लहानपणी बाईंनी शाळेत आम्हाला हे कोडं घातलं होतं. कोणालाच त्याचं उत्तर सांगता आलं नव्हतं! काय? आठवलं म्हणता? हो! बरोबर! तेच! आपला 'कंडक्टर'!*
*नोकरी करणाऱ्या वर्गापैकी सर्वात जास्त वैतागणारा प्राणी जर कुणी असेल तर तो कंडक्टरच असावा! आणि तोच जर सिटीबसचा असला तर त्याला टक्कल पडलंच म्हणून समजा! सकाळच्या 'बोहणी'पासून शेवटच्या ट्रिपपर्यंत बिचाऱ्याची किती लोकांशी भांडणं होतात तोच जाणे! पण 'प्रवाशांच्या सेवेसाठी'तो सगळं सहन करतो. नाहीतर इतकी भांडणं पचवणं म्हणजे काही 'च्येष्टा' नव्हे; आणि भांडणात एक ‘लेडीजबाई’ असेल तर नव्हेच नव्हे! त्यातल्या त्यात कंडक्टर स्वतःच 'आग्गाव' असला की मग कहरच!!*
*काही कंडक्टर म्हणजे एक प्रकारे झेडपीच्या शाळेवरचे शिस्तप्रिय गुरुजीच, आणि प्रवासी म्हणजे जणू काही त्याच शाळेतली तिसरीची वांड मुलं! अख्खी एस.टी. म्हणजे कंडक्टरचा वर्ग! गुरुजींप्रमाणे कंडक्टर बसमधल्यांना झापू शकतो. ऐ! पुढे सरक. ओ साहेब, तिकीट घेतलं का? ओ बाई! सरका तिकडे जरा! तिघांच्या सीटवर दोघीच बसलात खुशाल! बाळ, कितवीला आहेस तू? ह्या पोराचं तिकीट लागेल बरका! बाबा, तिकीट? अर्ध? बघू ओळखपत्र? वरील सर्व वाक्यांत आवाज पारंपरिक मोठा! एसटीतले प्रवाशीही बिचारे त्याचं निमूटपणे ऐकतात!*
*गुरुजींच्या छडीकडे जसं सगळ्यांचं लक्ष असतं तसंच बसमधल्या प्रवाशांचं आपला स्टॉप जवळ आला, की कंडक्टरच्या बेलवर असतं! कधी कधी तर स्टॉप मागे गेला, आणि जर कंडक्टरऐवजी प्रवाशानेच बेल मारली, तर चाणाक्ष ड्रायव्हरला लगेच समजतं, कारण त्याच्याकडे ‘गायछाप’ नावाची बुद्धीवर्धक वल्ली असते म्हणे!*
*बाकी भरदिवसा लोकांदेखत प्रत्येकाच्या खिशाला कायदेशीर हात फक्त कंडक्टरच घालू शकतो. फाटका 'तिकीट' नावाचा बोटभर कागद आपल्याला दिला की आपण खुश आणि आपल्या खिशातले किंवा पर्समधले पैसे त्याच्या खिशात आले की तोही खुश! सुट्या पैशांबाबतीत कंडक्टरचा घोळ कधीच होत नाही. याची टोपी त्याला घालून तीन-चार जणांना पाचच्या ठोकळ्यात किंवा दहाच्या नोटेत तो बरोब्बर 'ऍडजेस्ट' करतो, नाहीतर 'पुढच्या वेळेला घ्या' म्हणतो. पण आपल्याकडे एक-दोन रुपये कमी असतील तर सरळ "उतरून घ्या!" म्हणतो! त्याचवेळी एखादा प्रेमळ कंडक्टर सगळ्या प्रवाशांचं मनसुद्धा जिंकतो.*
*आजकाल निम्मी बस फुकटवाल्यांची आणि हाफवाल्यांची असल्यामुळे कंडक्टरलाही वाईट वाटत असणार, पण लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचविण्याचं पुण्य मात्र त्याला आणि त्याच्या जोडीदाराला नक्की मिळतं. म्हणूनच ‘लालपरी’वरचं आणि ‘डायवर-कंडक्टर’वरचं सामान्य जनतेचं प्रेम आजही टिकून आहे. एसटीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास आहे. उगाच लोक म्हणत नाहीत, 'वाट पाहीन, पण एस. टी. नेच जाईन!' एस. टी. प्रमाणेच आपल्या आयुष्याचा प्रवासही असाच सुरक्षित असला म्हणजे झालं!*
-
राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t
No comments:
Post a Comment