Wednesday, November 5, 2025

तिसरी बाजू

*तिसरी बाजू*
_एक मुद्दा, एक विचार!_
_5 नोव्हेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ 

▪️
*तिसरी बाजू*

  *महाभारतात एक प्रसंग आहे. पितामह भीष्म अंगराज कर्णाचा आणि त्याच्या युद्धक्षमतेचा इतका अपमान करतात की रागाने लालबुंद झालेला कर्ण म्हणतो, "जोपर्यंत हा थेरडा जिवंत आहे तोपर्यंत मी धनुष्याला बाण लावणार नाही!" आणि खरोखरच भीष्म धारातीर्थी पडेपर्यंत कर्ण युद्धात उतरत नाही.*

*बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्म कर्णाला भेटण्याची इच्छा प्रकट करतात. कर्ण जरासा चरफडतच त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा भीष्म म्हणतात, "मला तुझ्या युद्ध कौशल्यावर कधीही संशय नव्हता, नाही. उलट माझं तुझ्यावर निरातिशय प्रेमच आहे, परंतु कुंतीचा प्रथम पुत्र असलेल्या तुझ्यासारख्या तेजस्वी हिऱ्याचा या घनघोर युद्धात हकनाक बळी जाऊ नये, तू सुरक्षित रहावास, म्हणून मी तुझ्याबद्दल कटू वचन काढले, जेणेकरून तू माझा राग-राग करून का होईना, परंतु युद्धापासून थोडा अलिप्त राहशील आणि महत्त्वाचं म्हणजे जिवंत राहशील. मी जे बोललो ते तुझ्या हितासाठीच बोललो. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मृत्यू शय्येवर कोणीही खोटं बोलत नाही." हे सर्व ऐकून कर्णाचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याने भीष्मराजांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला.*

 *या ठिकाणी भीष्मांनी कर्णाचा केलेला अपमान, त्याची लगोलग आलेली प्रतिक्रिया, आणि घटनेमागची सत्यता, अशा तीन बाजू आहेत. माझी बाजू, तुझी बाजू आणि तिसरी बाजू.*

*प्रत्येक घटना प्रसंगाला अशा तीन बाजू असतात. आपल्यापैकी किती जण तिसऱ्या बाजूने विचार करतात? फक्त 'समोरचा काय बोलला? 'मी काय बोललो?' या दोनच बाजूंवर बहुतांश जण कितीतरी दिवस खल करत राहतात आणि विषय कुठल्या कुठे घेऊन जातात. याने विषय ताणला जातो. नातेसंबंध बिघडतात. होऊ शकणारं काम राहून जातं.*

*'तिसरी बाजू असू शकते आणि आपण त्यावर विचार केला पाहिजे’ एवढी समज आपल्याला बऱ्याचदा राहत नाही. ही समज अनुभवाने येते. संयमाने येते. आयुष्यातील चढउतार पाहिल्यावर येते. ज्याने आयुष्याची बरीवाईट चव चाखली आहे, ज्याने अपयश पचवलं आहे तो माणूस कधीही लगेचच मत बनवत नाही. मध्ये थोडा वेळ-काळ जाऊ देतो. ‘समोरचा काय बोलला यापेक्षा तो असं ‘का’ बोलला’ यावर शांत मनाने विचार करतो. बऱ्याचदा त्याला त्यात त्याचं स्वतःचं हित सापडतं. म्हणून ‘या वादाची तिसरी बाजू काय असू शकते’ याचा वेळ हातून निसटून जाण्यापूर्वी एकदा तरी विचार केला पाहिजे. कारण एरवी माणसं चांगलीच असतात. रागात त्यांचा तोल जातो. पण शिटी झाली की कुकरचा कोंडमारा जसा बाहेर पडतो तसंच त्यांचं होतं. नाहीतर ही माणसंही आतून खूप हळवी असतात. अस्वस्थ असतात. हे आपल्याला कळलं की आपला तोल ढळत नाही, आणि हेच जगण्याचं मर्म आहे!* 

-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक 
9423542224

• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा 
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t

No comments:

Post a Comment

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...