◾
*चकवा*
_एक मुद्दा, एक विचार!_
_10 डिसेंबर, बुधवार_
_लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._
▪️
*चकवा*
*आजच्या डिजिटल जाहिरातीच्या युगात प्रत्येक दुकान रंगबिरंगी लाइटिंगने सजत असताना एका गरीब दिसणाऱ्या दुकानाची मात्र नेहमी कीव येते. कुठलाही डामडौल नाही, लाइटिंग नाही, गाजावाजा नाही, भपका नाही. एखाद्या साधूने एखादी शांत निवांत जागा बघून तपाला बसावं तसं हे दुकान लोकांच्या गजबजाटापासून आपलं गुमान एका बाजूला असतं. शिवाय दुकानाचं नावही कोणाही गरीब, सामान्य, अल्पशिक्षित माणसाला सहज वाचता येईल असं. अगदी साध्या सोप्या मराठीत लिहिलेलं. 'सरकारमान्य देशी दारू दुकान!'*
*असं म्हणतात की दूध विकणाऱ्याला घरोघरी जाऊन विकावं लागतं; परंतु दारू विकणारा हा थकल्याभागल्या आत्म्याला परमतृप्तीचा आनंद देणारा असल्यामुळे त्याचे साधक त्याला शोधत-शोधत या दिव्य दुकानापर्यंत स्वतःच जाऊन पोहोचतात, इतकंच नव्हे तर स्वतःला त्या दिव्य तेजाची प्राप्ती झाल्यानंतर मित्रांनाही त्याचा कसा फायदा आहे हे परोपरीने पटवून देत त्यांनाही या सोमरस-भक्तिमार्गात आणतात. आधुनिक भाषेत जिला माऊथ ‘पब्लिकसिटी' म्हणतात ती हीच! देशी दारू दुकानदार गिऱ्हाइकाच्या माघारी पाणी न टाकता त्याच्यासमोरच दारूत पाणी टाकतो, शिवाय ग्लाससुद्धा काचेचा ठेवतो, त्यामुळे गिऱ्हाइकाला त्याचा व्यवहार ‘पारदर्शक’ वाटतो. मग पैसे मागण्याच्या आधीच गिऱ्हाइक काउंटरवर पैसे ठेवतं आणि दिल्या जाणाऱ्या ओल्या प्रसादाकडे मिटीमिटी बघतं. बऱ्याच लोकांना माहीत नसेल की दारू पिणारे लोकही ग्लासामधला पहिला थेंब दोन बोटांच्या टिचकीने देवाला अर्पण करून, डोळे बंद करून, भक्तीभावाने दारू पितात! काही तर अगदी दोन बोटांच्या चिमटीने नाकपुड्या बंद करून, कडू तोंड करून घशात ओततात; पण पितातच! पहाटे पाचला उठून दारू प्यायला जाणारे महाभागही कमी नाहीत.*
*इतर दुकानांमध्ये वस्तू घेऊन गिर्हाइकाचा किती फायदा होतो माहीत नाही परंतु या दुकानातल्या गिऱ्हाइकाला दारू पिल्याबरोबर पाचच मिनिटात फायदा होतो, म्हणजे ज्ञानवृद्धी होते, अनेक भाषा ज्ञात होतात, वक्तृत्व कला साधते, गायन जमते, स्मरणशक्ती वाढते, शिवाय बडबडीनंतर एक दीड तासात ध्यान आणि समाधीची अनुभूतीही येते! या अनुभूतीचा उच्चांक असा की आपण रस्त्यावर आहोत की गटारात याचेही भान त्याला राहत नाही.*
*अगोदर 'कष्ट करून थकतो म्हणून पितो' असं म्हणत माणूस दारू पितो, मग हळूहळू दारू त्याला पिते. गिर्हाइकाचा बेवडा करते. घरातलं किडूक-मिडूक विकून देशोधडीला लागेपर्यंत, आणि 'चाळीस रुपये द्या ना!’ ची भिक लागेपर्यंत त्याला आपटून आपटून मारते. मग तो घरच्या लक्ष्मीसारख्या बायकोला शिव्या आणि लाथा घालतो आणि जिथे काम करत असेल त्यांच्या शिव्या आणि टोमणे खात राहतो. एके दिवशी छातीच्या पिंजऱ्याचा ताबा खोकल्याची उबळ घेते, आणि अखेरीस चादरीवर पडलेला दम्याचा रोगी, मुलाबाळांना उघड्यावर टाकून, उशीखाली बाटली घेऊन शून्यत्वाला जातो. आपल्यातलं कुणी अशा चकव्यात भरकटत असेल तर त्याला वेळेआधीच सावरा, कारण दारू शेवटी माणसाला संपवते, पण वेळेआधी दिलेला आधार एखादं घर, एखादा संसार वाचवू शकतो!*
*सरतेशेवटी ज्याने आयुष्यात अजून एकदाही पिलेली नाही, परंतु परिस्थिती त्याला दारूकडे खेचते आहे, त्याने छातीवर दगड ठेवून मनाला ठणकावून सांगितलं पाहिजे की, "काहीही झालं तरी मी या मार्गाला जाणार नाही!" मित्रांनीही जे पीत नाहीत त्यांना अतिआग्रह करून या मार्गाला आणण्याचं पातक करू नये. जे म्हणतात की 'मी कधीकधीच आणि थोडीशीच घेतो', त्यांनी बेवडेपण येण्यापूर्वीच विचारपूर्वक थांबून घेतलं पाहिजे. जे दारूच्या आहारी गेले आहेत, पण त्यांना सोडायची मनापासून इच्छा आहे, त्यांनी डॉक्टरांना भेटून मोकळेपणाने त्यांची इच्छा सांगितली पाहिजे, कारण दारू नक्की सुटते, फक्त पिणाऱ्याची तशी तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि शेवटी राहिले ते, जे भरपूर पितात कारण त्यांच्याकडे चिक्कार पैसा आहे, त्यांना सोडायचीच नाहीये. त्यांना फक्त मजा करायची आहे. त्यांच्याबद्दल काय बोलावं? 'नंगे से खुदा भी डरे!'*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.
• सरांचे लेख नियमित मिळविण्यासाठी दुवा
https://chat.whatsapp.com/EsoZ5SCsVxZJfbJ48x3ejJ?mode=ems_copy_t
No comments:
Post a Comment