◾
*थिंकोनी कमेंटावे!*
_एक मुद्दा, एक विचार!_
*28 जानेवारी 2026, बुधवार*
लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक.
▪️
*थिंकोनी कमेंटावे!*
*स्टुपिड कमेंट्स केल्याशिवाय ज्यांचा डेटा ते स्वतः दोघांनाही गप्प बसवत नाही, असे काही लोक सोशल मीडियावर जन्माला आले आहेत. ‘दिवसभर विविध इ-भिंतींवर पोष्टी टाकणे आणि लाईक, कमेंट्सची वाट पाहणे, डकवल्या गेलेल्या पोष्टींवर लक्ष ठेवणे, त्या आपल्या अभ्यासपूर्ण, चिकित्सक नजरेखालून काढणे, त्यात थोडासा का होईना ‘त्रुटी’ नामक क:पदार्थ आढळतो का ते पाहणे, दिसल्यास तत्काळ त्यावर तुटून पडणे, सर्वशक्तीनिशी कमेंटवार करून समोरच्याला गारद करणे आणि मोहीम फत्ते करून विजयीमुद्रेने पुढील पोष्टमोहिमेवर निघणे!’ हा यांचा शिरस्ता. हे सगळं कशासाठी? तर आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, किंवा स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी! शिवाय आपल्या संपूर्ण तार्किक, अनुभविक, नोस्टेल्जिक, टायपिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून डेटाबळ खर्चल्याचं समाधान मिळविण्यासाठी. कधी हे इतरांना हर्ट करतात, तर कधी स्वतःच तोंडघशी पडतात!*
*हे कमेंटलेखक केवळ साध्या लोकांच्याच पोस्टवर तिरकं लिहीत नाहीत; तर मोठ्मोठ्या सेलिब्रिटींचे फोटो असलेल्या अनोळखी पोस्टवरसुद्धा तावातावाने कमेंटतात. खूपच घाणेरडा शब्द असेल तर xx अशा फुल्या टाकतात; नाहीतर मग शब्दखेळ, अक्षरबदल करून का होईना आपल्या तिरकस भावना तिथपर्यंत पोहचवतातच! ‘आपली कमेंट एकदा तरी तो सेलिब्रेटी वाचेल’ असे त्यांना वाटते. राजकारणी लोकांनी विरोधी मतं पोस्ट करण्यासाठी चाळीस पैशाने माणसं नेमलेली असतात हेही यांच्या गावी नसते. हे त्यांच्या गर्दीत फुकटच सामील होतात! ना प्रसंगाचे गांभीर्य, ना कोणत्या वेळी काय कमेंट करावी याचे भान! सगळाच सावळा गोंधळ!*
*एका मोठ्या नटीला एका मुलाखतीमध्ये मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की लोक तुमच्या फोटोवर अतिशय खालच्या शब्दात कमेंट्स करतात ते वाचून तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर तिने दिलेलं उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली की ‘सोशल मिडियावरच्या कमेंट आम्ही वाचतो’ हे तुम्हाला कोणी सांगितलं? एवढ्या कमेंट्स वाचण्याइतका वेळ तरी आहे का आमच्याकडे? पण तुम्हाला एक मात्र सांगेल. कमेंट्स करणाऱ्याच्या कमेंट्स प्रत्यक्ष तो सेलिब्रिटी जरी वाचत नसला, तरी टाईप करणाऱ्याचे मित्रमंडळ मात्र नक्की वाचत असते, आणि त्यातून कमेंट करणारा कोणत्या लायकीचा आहे हे त्या मित्रमंडळींना कळत असते. वरील सापळा न समजल्यामुळे समाजात सज्जन म्हणून परिचित असलेले अनेकजण इंटरनेटवर मात्र अतिशय खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असतात. एक प्रकारे अशा कमेंट करणारा माणूस खराब शब्द वापरून स्वतःचीच लायकी घालवून घेत असतो, पण त्याला भावनेच्या भरात ते समजत नाही!*
*कमेंट जरूर करावी, पण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी. व्यक्त जरूर व्हावं, पण आपल्या कमेंटचं मूल्य ओळखून. प्रसंग काय आहे, आपण स्वतः कोण आहोत, आपलं समाजातलं स्थान काय आहे, आपलं लिहिलेलं वाचणारे कोण आहेत याचा विचार करून व्यक्त झालं तर व्यक्तही होतं येतं आणि देवाचं देवपणही टिकून राहतं, म्हणून-*
*'जैसा जगी मान, तैसेचि वर्तावे*
*आणि कमेंटावे, थिंकोनिया!*
-
-राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224.
No comments:
Post a Comment